पोस्ट-पार्टम डिप्रेशन : प्रसुतीनंतरचं मानसिक नैराश्य म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉ. शैलजा चंदू
- Role, बीबीसीसाठी
डिलिव्हरीनंतर काही महिलांच्या वागण्यात बदल होतात. त्यांना भ्रम होतात. अस्तित्त्वात नसणाऱ्या गोष्टी खऱ्या असल्याचं वाटू लागतं. याला पोस्ट पार्टम सायकोसिस (Post Partem Psychosis) म्हणतात. हा एक मानसिक आजार आहे. या आजाराचा त्रास होणाऱ्या प्रसन्नाची ही गोष्ट.
"राधिका, तो लोखंडी डबा आधी बाहेर फेकून दे!"
"का दीदी, जीजाजी अमेरिकेहून नवीन आणणार आहेत का?"
"आधी फेकून दे तो..." दीदीच्या आवाजातली जरब ऐकून राधिका आश्चर्यचकित झाली होती.
"दीदी..." हाक मारत राधिकाने तिच्याजवळ जायचा प्रयत्न केला. पण प्रसन्ना किंचाळत दूर झाली आणि बाळाला उचलून खोलीत जात तिने दरवाजा धाडकन लावून घेतला.
त्या आवाजाने दचकलेलं बाळ खोलीत रडायला लागलं आणि सगळेजण खोलीबाहेर जमा झाले.
बरीच मनधरणी केल्यानंतर प्रसन्नाने दरवाजा उघडला.
प्रसन्नाची नुकतीच डिलिव्हरी झाली होती. तेव्हापासून तिला थकवा जाणवत होता. बाळाला काय हवं - नको ते पाहण्यात तिला अख्खी रात्र झोप लागत नसे. तिची सासू वा नातेवाईकांनी फोन केल्यावर ती त्यांच्याशी फारशी बोलत नसे. त्यांच्याशी बोलण्याऐवजी तिचं लक्ष बाळाचे कपडे नीट करण्यात किंवा मग कपाटातल्या वस्तू लावण्यात असे.
मग तिची बाजू घेत तिची आई सासरच्यांना सांगत असे - बाळ रात्री रडतं होतं म्हणून तिची झोप झाली नाही, डोकं दुखत असल्याने ती असं वागतेय.

आज तिने बहिणीसोबत भांडण उकरून काढलं आणि रडायला लागली.
तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत काळजीने विचारलं, "काय झालं?"
"बाबा, प्रॉमिस द्या की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल," प्रसन्ना म्हणाली.
"तू खोटं का बोलशील?" गोंधळून वडिलांनी विचारलं.
"बाबा, प्लीज तो लोखंडी खोका फेकून द्या. माझी सासू माझ्या बाळावर गरम इस्त्रीने हल्ला करायचा कट रचतेय. आणि ही राधिका त्यांना मदत करतेय," राधिकाकडे बोट दाखवत तिने आरोप केला.
"दीदी!" राधिकाला धक्काच बसला.
"निर्लज्ज आहेस तू. मला तुझा हेतू माहितेय," प्रसन्ना भडकून म्हणाली.
"काय झालंय तुला, तोंडाला येईल ते बोलतेयस. तुला वेड लागलंय का?" आईने तिला झापलं.
"तू तर सुरुवातीपासून कायमच तिची बाजू घेतेस. ती माझ्यासोबत काय करणार आहे हे तुला कळत नाही," प्रसन्ना रडत म्हणाली आणि खोलीत जात तिने दार लावून घेतलं.
सगळ्यांनाच तिच्या वागण्याचा धक्का बसला होता.
तिच्या आईचं कामही खरंतर वाढलं होतं. अनेकजण बाळाला बघायला येत होते, त्यांची सरबराई करण्यात तिचा वेळ जात होता. रात्रीही तिला नीट झोप मिळत नव्हती. आणि यात आता तिच्या मोठ्या लेकीच्या अशा वागण्याची भर पडली होती.
या सगळ्या गोंधळामुळे बावरलेल्या बाळाने रडायला सुरुवात केली. आईने दरवाजा ठोकत प्रसन्नाला बाहेर येऊन बाळाला दूध पाजायला सांगितलं. आतून काहीच उत्तर आलं नाही. शेवटी तिने फॉर्म्युलाच्या दुधाची बाटली करायला घेतली, पण बाळाला भूक सहन होत नव्हती.
राधिका आईजवळ जात म्हणाली, "तिला दे माझ्याकडे. मी घेते तिला." आईला मदत करण्याचा प्रयत्न ती करत होती.
"नको, नको. तिने तुला पाहिलं तर पुन्हा नवीन काहीतरी होईल. तू कॉलेजला जा. तिथे कँटीनमध्येच खा काहीतरी. आज मला स्वयंपाक करता आलेला नाही," आई म्हणाली.
राधिका एम. बी. बी. एसच्या तिसऱ्या वर्षाला आहे.

लेक्चर सुरू असताना राधिकाच्या मनात वेगळेच विचार होते. खरंतर त्या दोघींमध्ये इतकी चांगली मैत्री होती! त्या सिनेमाला जायच्या, एकत्र शॉपिंग करायच्या.
ती अनेक गोष्टींबद्दल राधिकाशी बोलत असे. अगदी त्या गोष्टी ज्या आईवडिलांना सांगता येत नसतं. पण आज तीच बहीण तिच्यावर संशय घेत होती. तोही बाळाला इजा करण्याचा!
राधिकाचे डोळे भरून आले.
काय झालंय हे दीदीला?
तिच्या मैत्रिणीने तिला कोपराने ढोसलं. आजूबाजूला पाहिलं तर सगळा वर्ग राधिकाकडे पाहत होता. प्राध्यापकांनी काहीतरी प्रश्न विचारला होता. पण तिने तो ऐकला नव्हता. ती उभी राहिली.
"वर्गात लक्ष नाही तुझं. काय चाललंय?"
राधिका खरंतर वर्गात अगदी उत्साहाने सगळ्या गोष्टींत भाग घेई. तिच्यासोबत असं हे पहिल्यांदाच घडत होतं.
तिने मान खाली घातली.
प्राध्यापकांनी तिला तास संपल्यानंतर भेटायला सांगितलं.
"प्रोफेसर नीरजा"
त्या नावाच्या पाटीकडे पाहात ती उभी होती. तिच्या पावलांचा आवाज कदाचित त्यांनी ऐकला असावा. त्या म्हणाल्या, "आत ये!"
आत जात ती म्हणाली, "सॉरी मॅडम"
"काय झालंय? तू अशी का वागतेयस?"
राधिकाच्या गालावरून अश्रू घळाघळा वाहू लागले.

फोटो स्रोत, Getty Images
"माझ्या दीदीची आठवडाभरापूर्वी डिलिव्हरी झाली. ती विचित्र वागतेय. विचित्र बडबडतेय. आज तिने माझ्यावर संशय घेतला," राधिकाने अखेरीस सांगितलं.
"हा कदाचित प्रसुतीनंतर उद्भवणारा मानसिक त्रास - पोस्ट पार्टम सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असावा. मी भेटते तिला," प्राध्यापिका म्हणाल्या.
"तिला कुठे घेऊन येऊ मॅडम, इथे आणू का?"
"जाता जाताच पाहते तिला मी."
त्या दोघी कारमधून निघाल्या.
"यापूर्वी असं कधी घडलं होतं का? कुटुंबातल्या कोणाला असा त्रास होता का?"
"असं काहीच नाही मॅडम. डिलिव्हरीनंतर हे घडलं असावं का?"
"डिलिव्हरीनंतरच्या पहिल्या आठवड्यात एक टप्पा येतो... त्याला बेबी ब्लूज म्हणतात. म्हणजे काहीसं दडपण येतं, नैराश्य येतं. ही अडचण तात्पुरती असते. नव्याने आई झालेल्या या स्त्रीचे मूड्स बदलत राहतात. कधीकधी ती खूप उत्साहात असते तर कधी रडू कोसळतं. पण या गोष्टी आपोआप जातात."
"पण कसं कधीपर्यंत सुरू राहणार?"
"जर हे बेबी ब्लूज असतील तर लवकरच कमी होतील. पण जर हा डिलिव्हरीनंतर उद्भवणारा मानसिक आजार - पोस्ट पार्टम सायकोसिस असेल, तर मग परिस्थिती थोडी गंभीर आहे."
"सायकोसिस (Psychosis) ओळखायचा कसा?"
"मनावर परिणाम झाला की मी वागण्यात टोकाचा बदल घडतो. पण याची लक्षणं ओळखणं कठीण आहे."

फोटो स्रोत, Getty Images
डेल्यूजन्स (Delusions) किंवा भ्रम होणं म्हणजे काय?
"स्वतःचीच बहीण बाळाला काहीतरी बरंवाईट करेल, यासारख्या गोष्टींची कल्पना करणं, असे विचार येणं. असं काहीही नाही, हे सिद्ध झालं तरी तिचा यावर विश्वास बसणार नाही. अशा परिस्थितीमध्ये मानसोपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि उपचार करणं गरजेचं आहे."
"मॅडम, अजूनही काही लक्षणं असतात का?"
"नैराश्य येतं. किंवा मग त्या अतिशय आनंदीही असू शकतात. तिच्या वागण्यातल्या फरकावर आपण लक्ष ठेवू शकतो. म्हणजे मूळ स्वभावापेक्षा वेगळ्या वागणुकीवर. अनिर्बंध वागण्यावर"
"म्हणजे?"
"तू म्हणालीस की तुझी बहीण आता विचित्र वागते. आधी ती कशी होती?"
"दीदी अगदी सौम्य स्वभावाची आहे मॅडम. ती मोठ्याने बोलतही नाही. तिचं हसणंही मृदू आहे. तिला लोक आवडतात. कपडे वा ज्वेलरीचा भपका वा दिखावा आवडत नाही."
"आणि तिच्या वागण्यात आता बदल झाल्याचं तुला वाटतंय का?"
राधिकाने मान डोलवत विचारलं, "अनिर्बंध वागणं म्हणजे?"
"म्हणजे उदाहरणार्थ, काहीही वावगं न वाटता दुसऱ्यांच्या समोर कपडे बदलणं..."
"असा पोस्ट-पार्टम सायकोसिस असणं गंभीर आजार आहे का?"
"बेबी ब्लूज किंवा बाळाच्या जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळात येणाऱ्या बावरलेपणापेक्षा ही मानसिक अवस्था जरा जास्त गुंतागुंतीची असते. हा एक गंभीर मानसिक आजार आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एखाद्या अचानक उद्भवलेल्या गंभीर रोगाप्रमाणेच याकडे पहायला हवं. अशा रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ठेवून उपचार करणं गरजेचं आहे. नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते."
"यापेक्षा गंभीर टप्पा काय असू शकतो, त्यात धोके काय आहेत?"
"अशा परिस्थितीत स्वतःला किंवा बाळाला इजा पोहोचवली जाण्याची शक्यता असते. जर नैराश्य जास्त असेल तर आत्महत्येचे विचारही मनात येऊ शकतात."
बोलतबोलत त्या दोघी राधिकाच्या घरी पोचल्यादेखील.

फोटो स्रोत, Getty Images
पोस्ट-पार्टम डिप्रेशन ( प्रसुतीनंतरचं मानसिक नैराश्य)
- हजारांमध्ये एकीला हा त्रास होण्याची शक्यता असते. (1:1000)
- असा त्रास होणाऱ्या महिलांपैकी 50% जणींना त्यापूर्वी कधीही कोणताही मानसिक विकार झालेला नसतो.
- प्रसुतीनंतर मानसिक आजार वा नैराश्य येण्यासाठी कारणीभूत होणाऱ्या घटना - पहिलं बाळंतपणं, बाळाचा वेळेपूर्वी झालेला जन्म (Pre-Mature), डिलिव्हरीत आलेल्या अडचणी, फोरसेप्स वा सिझेरियन डिलिव्हरी.
अशा महिलांच्या पुढच्या बाळंतपणातही याच अडचणी येण्याची शक्यता असल्याने अशा जोडप्यांनी पुढच्या गर्भधारणेच्या आधी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
राधिका आणि प्रोफेसर घरात दाखल झाल्या.
शेंदरी रंगाची जरीची साडी नेसलेली एक तरुणी लगबगीने कामं करत होती. तिने डायनिंग टेबलवरची भांडी नीट केली.
"आलीस राधू... ये तुला जेवायला वाढते. आई, आपण ताक - रस्सम करू. पण घरात कढीपत्ताच नाही. आई, तू आणशील का?" असं म्हणत ती उत्साहाने हॉलमधून किचनमध्ये गेली.
ही जेवायची वेळ नव्हती.
राधिकाची आई बाळाच्या कामात अगदी गुंतली होती.
घरात लगबगीने वावरणाऱ्या तरुणीकडे पाहात मॅडमनी राधिकाला विचारलं, "ही तुझी दीदी आहे का?"
उत्तरादाखल राधिकाने मान डोलावली.
"आजच सकाळी ती अतिशय भडकली होती. आणि आता ती अशी आहे!" राधिका हे सांगत असताना दीदीची लगबग सुरूच होती.
जवळ येत राधिकाच्या आईने दबक्या सुरात सांगितलं, "तिला मनाई केलेली असूनही तिने आंघोळ केली, केस धुतले आणि सिल्कची साडी नेसली."
या तरुणीने चारच दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिलाय, असं प्रसन्नाकडे पाहून वाटतंच नव्हतं. लग्नाला जायला तयार व्हावं, तशी ती तयार झालेली होती.

फोटो स्रोत, Getty Images
तिच्या वागण्यातलं वेगळेपण मॅडमना जाणवलं.
लगबग करणाऱ्या प्रसन्नाला आपल्यासोबत घेत मॅडमनी आपल्या बाजूला बसवलं.
"दीदी, या आमच्या कॉलेजमधल्या प्रोफेसर आहेत," राधिकाने ओळख करून दिली.
प्रसन्नाचे डोळे खोल गेले होते. चेहऱ्यावर थकवा होता.
"मला बाळाच्या जन्माचा आनंद आहे. कोणाला कळतंच नाही मला किती आनंद झालाय ते," ती घाईघाईने बोलत होती.
"तुला झोप लागतेय का नीट?" मॅडमनी विचारलं.
"झोप कसली...बाळाचा आताच जन्म झालाय. माझ्या सगळ्या साड्या आता तिच्यासाठी आहेत. मला तिच्यासाठी नवीन साड्याही घ्यायला हव्यात," खिदळत तिने सांगितलं.
"तो अमेरिकेहून येणार आहे. तो आल्यानंतर आम्ही मोठा समारंभ करू. तुम्हीही नक्की या," ती भरभर बोलत होती.
"अरे देवा," असं म्हणत तिने लेकीला उचलून मांडीवर घेतलं. साडीचा पदर बाजूला करत ती तिला तिथेच पाजायला सुरुवात करणार होती.
"असं नाही. आतमध्ये जाऊन बस," आईने प्रसन्नाला थांबवलं. रागाच्या भरात तिने बाळाला अक्षरशः बाजूला सारलं आणि रडायला लागली.
प्रसन्नाच्या परिस्थितीविषयी तिच्या आई-वडिलांना समजावल्यानंतर मॅडमनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

फोटो स्रोत, iStock
मानसोपचारतज्ज्ञांच्या निगराणीखाली काही आठवडे राहिल्यानंतर प्रसन्नाच्या तब्येतीत सुधार झाला. तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर राधिका मॅडमना जाऊन भेटली.
"दीदी पूर्णपणे बरी झाली आहे, असं तुम्हाला वाटतं का मॅडम? यापुढे ती नॉर्मल असेल का?"
"ती बरी झाल्याचं वाटत असलं तरी याचा अर्थ ती पूर्णपणे निरोगी आहे, असं नाही. थोडंसं नैराश्य अजूनही असू शकतं. कदाचित तिला पूर्णपणे कॉन्फिडंट वाटणार नाही. कदाचित बाळासोबत नातं तयार व्हायला थोडा वेळ लागेल. घरच्यांची यासगळ्यात मदत असणं महत्त्वाचं आहे."
"मदत म्हणजे आम्ही नक्की काय करायला हवं?"
"म्हणजे अशा लोकांच्या बाबतीत थोडा संयम बाळगायला हवा. ती काय बोलतेय त्याकडे लक्ष द्या. तिला पुरेशी विश्रांती मिळायला हवी."
"बाळाला दूध पाजायच्या वेळी तिला मदत करा. तिला पुरेशी झोप मिळतेय, याकडे लक्ष असावं. या काळामध्ये घरी भेटायला येणाऱ्यांची संख्या कमी ठेवता आली, तर उत्तम. घरच्या आणि बाळाच्या कामाने ती दमून जाणार नाही, याकडे लक्ष द्यायला हवं."
शरीर आजारी पडतं तेव्हा मिळणारं स्वातंत्र्यं मन आजारी पडल्यावर मिळत नाही. मनाला काही विकार झालाय का, हे समजून घेणं अतिशय कठीण असतं. हे त्या व्यक्तीचं नैसर्गिक वागणं आहे असा अनेकदा कुटुंबियांचा समज होतो आणि त्या रुग्णाच्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. ते तिला दूर लोटतात.
आपण आजारी आहोत हे त्या मातेला स्वतःला कळतंही नसतं. आणि जरी कुटुंबातल्या कोणाच्या ही बाब लक्षात आली, तरी लोक याबद्दल काय म्हणतील असा विचार त्यांच्या मनात येतो आणि मग तिच्यावर याबद्दलचे उपचार करण्याऐवजी ही बाब सगळ्यांपासून लपवली जाते. यात सगळ्यांत जास्त त्रास होतो, तो त्या रुग्णाला.
मानसिक आजारांकडे आणि ते झालेल्या रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलायला हवा, याबद्दल सहानुभूती बाळगायला हवी.
(वैज्ञानिक आणि वैदयकीय बाबी सोप्यारीतीने कळाव्यात म्हणून ही गोष्ट लिहिण्यात आली आहे. या कथेतली सगळी पात्रं काल्पनिक असून लेखिका डॉक्टर आहेत.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








