ओपेनहायमर: भगवद्गीतेचा चाहता अणूबॉम्बचा जनक कसा बनला?

जे. रॉबर्ट ओपेनहायमर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जे. रॉबर्ट ओपेनहायमर
    • Author, बेन प्लॅट्स-मिल्स
    • Role, लेखक

अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी पार पडलेल्या सोहळ्यात ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित ओपेनहायमर चित्रपटाचाच वरचष्मा पाहायला मिळाला.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वाधिक 13 नामांकनं मिळाली होती. त्यापैकी 7 पुरस्कार या चित्रपटाने आपल्या नावे केली आहेत.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपेनहायमर’ या चित्रपटाने पटकावला आहे. ख्रिस्तोफर नोलनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नोलानला देखील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ओपेनहायमर यांची भूमिका साकारणाऱ्या सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

हा चित्रपट ज्या रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर बेतला आहे, त्यांचं खरंखुरं आयुष्य कसं होतं?

कोण होते ओपनहायमर?

विज्ञान, जगातला पहिला अणूबॉम्ब आणि भगवद्गीता यांचा काय संबंध आहे? वरवर पाहिलं, तर काही नाही असं वाटेल. पण या तिन्ही गोष्टी अमेरिकेच्या रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनल्या होत्या.

अणूबाँम्बचा जनक म्हणून रॉबर्ट ओपेनहायमर यांना ओळखलं जातं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेनं 1945 साली न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात पहिल्यांदा अणूबॉम्बचा स्फोट घडवला.

ती पहिली अण्वस्त्र चाचणी यशस्वी झाल्यावर झाल्यावर त्याक्षणी भगवत गीतेची एक ओळ आपल्या मनात उमटली, असं ओपेनहायमर यांनी 1960 साली एका मुलाखतीत सांगितलं होतं. ते म्हणाले होते, “मी आता काळ बनलो आहे, जो जगाचा विनाशकर्ता आहे.”

ओपेनहायमर यांनी नेमक्या कोणत्या ओळींचा उल्लेख केला आणि त्यांना गीतेविषयी एवढं प्रेम का वाटत होतं? पहिल्या अणूस्फोटानंतर आणि त्याआधी काय घडलं? ओपेनहायमर यांची ही कहाणी इतिहासकार केई बर्ड आणि मार्टिन शेर्विन यांनी 2005 साली प्रकाशित ‘अमेरिकन प्रोमेथस’ या चरित्रात उलगडली आहे.

त्या पुस्तकावर आधारीत ओपेनहायमर हा चित्रपट आता प्रदर्शित होतो आहे.

पहिल्या अणूस्फोटानंतर

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

16 जुलै 1945 ची पहाट. रॉबर्ट ओपेनहायमर न्यू मेक्सिकोच्या वाळवंटातल्या एका बंकरमध्ये बसून त्या क्षणाची वाट पाहात होते, ज्यानं जग बदलून टाकलं.

ते जिथे बसले होते, त्या बंकरपासून दहा किलोमीटरवर जगातल्या पहिल्या अणूबॉम्बची चाचणी होणार होती. या चाचणीला नाव दिलं होतं, ‘ट्रिनिटी’.

ओपेनहायमर जेमतेम चार तास झोपले होते. ते थकले होते, चिंतेत दिसत होते. तसे ते कायमच सडपातळ होते आणि त्यात उंचीही 5 फूट 10 इंच (178 सेमी) असल्यानं ते आणखी बारीक वाटायचे.

पण मागच्या तीन वर्षांत ‘प्रोजेक्ट वाय’वर काम करताना त्यांचं वजन 52 किलोपर्यंत कमी झालं होतं. प्रोजेक्ट वाय हा मॅनहॅटन प्रोजेक्टचा भाग होता, ज्याअंतर्गत अमेरिकेनं पहिल्यांदाच अणूबॉम्ब तयार केला.

त्या बाँबचीच आता चाचणी होणार होती. काऊंटडाऊन सुरू झालं, तेव्हा ओपेनहायमर यांच्या चेहऱ्यावरचा तणाव अगदी वाढत गेला. ते श्वास रोखून पाहू लागले.

स्फोट झाला, तेव्हा त्या प्रकाशानं जणू सूर्यालाही मागे टाकलं. तोपर्यंतचा हा सर्वात मोठा स्फोट होता, ज्याची क्षमता 21 किलोटन टीएनटीच्या स्फोटाएवढी होती. ट्रिनिटीच्या स्फोटानं निर्माण झालेल्या तरंगलहरी 160 किलोमीटर अंतरावरही जाणवल्या.

स्फोटाचा आवाज सर्वदूर घुमला. मश्रूमसारखा धुराचा ढग वर उठू लागला, तसं ओपेनहायमर यांच्या चेहऱ्यावरचा ताण हलका झाला.

अणूचाचणी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'ट्रिनिटी' अणूचाचणीनंतर उसळलेला आग आणि धुराचा लोट

पण त्या स्फोटानंतरच्या दिवसांत रॉबर्ट निराश झाल्यासारखे वाटायचे, सतत विचारांत हरवून जायचे कारण पुढे काय होणार आहे हे त्यांना माहिती होतं, असं त्यांचे एक मित्र सांगतात.

एका सकाळी जपानच्या ‘गरीब बिचाऱ्या’ लोकांचं काय होणार आहे असा काहीसा अपमानजनक शब्दांत ओपेनहायमर यांनी शोक व्यक्त केला.

पण मग लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठकीत ते या ‘गरीब बिचाऱ्या’ लोकांना जणू विसरून गेले होते आणि बॉम्ब कसा टाकायचा, किती उंचीवर टाकायचा, पाऊस किंवा धुकं असताना कसा टाकायचा नाही अशा गोष्टींची चर्चा करू लागले.

ट्रिनिटीच्या यशानंतर महिनाभरानं अमेरिकेनं हिरोशिमावर यशस्वीपणे बॉम्ब टाकला आहे, असं आपल्या सहकाऱ्यांसमोर जाहीर करताना ओपेनहायमर यांनी एखाद्या विजेत्यासारखे हात उंचावले होते. तेव्हा टाळ्यांचा अगदी कडकडाट झाला.

ओपेनहायमर हे जणू मॅनहॅटन प्रोजेक्टचं बौद्धिक आणि भावनिक हृदयच होते. पण ते एखाद्या गूढ कोड्‌यासारखेही होते.

अणूबॉम्बची कल्पना प्रत्यक्षात आणण्यात त्यांच्याइतकं इतर कुणाचं योगदान नव्हतं. युद्धानंतर त्यांच्यासोबत काम करणारे जेरेमी बर्नस्टिन सांगतात, की ओपेनहायमर यांच्याशिवाय इतर कुणी हे करू शकलं नसतं.

किंवा आपणच हे करू शकतो, अशी धारणा करून घेतल्यामुळेच त्यांना हे शक्य झालं असावं.

हिरोशिमातल्या स्फोटानंतर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिरोशिमातल्या स्फोटानंतर

“ते एक थिऑरेटिकल फिजिसिस्ट (सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ) होते, पण त्यांच्यात महान नेत्यासारखे भुरळ पाडणारे गुण होते. ते सौंदर्याचे भोक्ते होते, पण त्यांच्या सांस्कृतिक संदिग्धताही होती,” असं बर्ड आणि शेर्विन लिहितात.

ओपेनहायमर यांचे एक मित्र सांगतात की ते वैज्ञानिक होते, पण एखाद्या कल्पनेचा कसा वापर करून घ्यायचा, हेही त्यांना चांगलं उमगलं होतं.

एकूणच ओपेनहायमर यांच्या व्यक्तीमत्वात, त्यांच्या स्वभावात बऱ्याचदा विरोधाभास असायचा. इतका की त्यांच्या चरित्रकारांना आणि मित्रांनाही अनेकदा प्रश्न पडत आला आहे.

अफाट बुद्धिमत्ता आणि विरोधाभासांनी भरलेलं व्यक्तीमत्व

ओपनहायमर यांचा जन्म 1904 साली न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांचे पालक ज्यू धर्माचे होते आणि जर्मनीतून अमेरिकेत स्थायिक झाले होते. कपडा व्यापारातून ते श्रीमंत बनले होते.

हा परिवार मॅनहॅटनच्या उच्चभ्रू भागात मोठ्या घरात राहायचा. घरी तीन मोलकरणी, एक ड्रायव्हर दिमतीला होते. घर युरोपातल्या कलाकृतींनी भरलेलं होतं.

वडिलांसोबत रॉबर्ट ओपेनहायमर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वडिलांसोबत रॉबर्ट ओपेनहायमर

पण श्रीमंतीत वाढलेले असूनही ओपेनहायमर बिघडलेले नव्हते आणि उदारमनाचे होते. त्यांची शाळेतली मैत्रिण जेन डिडिशाईम सांगते, की, ”रॉबर्ट तेव्हा तसा लाजाळू होता. सडपातळ गुलाबी गालांचा पण अतिशय हुशार होता. “

नऊ वर्षांच्या वयातच रॉबर्टनं ग्रीक आणि लॅटिन तत्वज्ञान वाचण्यास सुरुवात केली होती. त्याला खनिज शास्त्राचं जणू वेड लागलं होतं.

न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये तो भटकंती करायचा आणि तिथे काय सापडलं याविषयी न्यूयॉर्क मिनरललॉजिकल क्लबला त्यांना पत्रंही पाठवली होती. ती पत्रं इतकी विस्तृत होती त्यांनी रॉबर्टला प्रेझेंटेशन देण्यासाठी बोलावलं, कारण हि पत्र एका मोठ्या माणसानंच लिहिली आहेत असा त्यांचा गैरसमज झाला होता.

असामान्य बुद्धिमत्तेचा दुसरा परिणाम म्हणून लहानपणी ओपेनहायमर काहीसे एकटे एकटे राहायचे. त्यामुळे पुरुषांनी मैदानी खेळात उतरायला हवं, वयानुसार थोडी मस्ती करायला हवी अशा त्या काळातल्या अपेक्षित गोष्टींमध्ये त्यांना फारसा रस नव्हता.

त्यांचे एक नातेवाईक सांगतात, की इतरांसारखे नसल्यामुळे ओपेनहायमर यांना अगदी थट्टामस्करीलाही सामोरं जावं लागायचं.

हार्वर्ड विद्यापीठात रसायनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्टन यांनी घर सोडलं तेव्हा त्यांची नाजूक मानसिकता ठळकपणे दिसू लागली. त्याच्यांतला अहंकार आणि संवेदनशीलता या दोन्ही गोष्टी त्रासदायक ठरतायत असं वाटू लागलं.

ही समस्या ते पुढे इंग्लंडच्या केंब्रिजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी गेले, तेव्हाही कायम राहिली असं स्मिथ आणि विनर यांनी गोळा केलेल्या पत्रांतून दिसून येतं.

रॉबर्टनी अप्लाइड लॅबोरेटरीमध्ये काम करायला हवं, यावर त्यांचे ट्यूटर सतत भर देत होते. कारण त्यात रॉबर्ट थोडे कच्चे होते.

1925 साली एका पत्रात त्याने लिहिले आहे की, “मला हे सगळं खूप जड जात आहे. लॅबमध्ये काम करणं अतिशय कंटाळवाणं आहे आणि मी त्यात इतका कच्चा आहे की मी काही नवीन शिकतोय, असं वाटणंही अशक्य आहे.”

गोष्टी एवढा टोकाला गेल्या की ओपेनहायमरनी विष लावलेलं एक सफरचंद जाणूनबुजून आपल्या ट्यूटरच्या डेस्कवर ठेवलं. ट्यूटरनं ते सफरचंद खाल्लं नाही आणि कुठला अनर्थ टळला.

पण या प्रकारानं रॉबर्ट यांचा केम्ब्रिजमधील स्थानाला धक्का पोहचला. ते मानसोपचारतज्ज्ञाकडे जातील या अटीवरच त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं नाही.

ओपेनहायमर चित्रपटातत सिलियन मर्फी यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. ओपेनहायमर चित्रपटातत सिलियन मर्फी यांनी मुख्य भूमिका बजावली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ओपेनहायमर चित्रपटातत सिलियन मर्फी यांनी मुख्य भूमिका बजावली आहे.

रॉबर्ट यांना सायकोसिस असल्याचं निदान मानसोपचारतज्ञाने केलं. पण उपचारांनी फायदा होणार नाही असं नमूद करून त्यांना सोडून दिलं.

तो काळ कठीण होता की, आपल्या मनात आत्महत्येचाही विचार आला होता, असं रॉबर्ट यांनी पुढे सांगितलं होतं.

गीतेचा आधार

जिथे मानसोपचार अपयशी ठरले तिथे साहित्यानं मदत केली.

बर्ड आणि शेर्विन लिहितात की, त्या काळात एका सुट्टीत फ्रांसच्या कॉर्सिकामध्ये रॉबर्ट यांनी फ्रेंच कादंबरीकार मार्सेल प्रूस्ट याची ‘अ ला रिशेर्शे द्यू ताँप पर्द्यू’ (हरवलेल्या वेळेच्या शोधात) ही कादंबरी वाचली. त्यात त्यांना काहीसं स्वतःच्या मनोवस्थेचं प्रतिबिंब दिसलं.

रॉबर्टच्या मनाला त्यामुळे दिलासा मिळाला आणि ते आणखी कनवाळू झाले. पुस्तकातला एक परिच्छेद तर त्यांनी तोंडपाठ केला होता. त्यात म्हटलं होतं की, ‘आपल्यामुळे दुसऱ्याला झालेल्या दुःखाकडे दुर्लक्ष करणं, हे सर्वात मोठं क्रौर्य आहे.‘

दुसऱ्याच्या दुःखाकडे कसं पाहायचं हा प्रश्न रॉबर्ट यांना पुढेही भेडसावत राहिला. त्यातूनच त्यांना आध्यात्म आणि तत्त्वज्ञानात रस वाटू लागला. पुढे जाऊन त्यांचं काम आणि त्यांचा लौकिक ठरवण्यातही या प्रश्नानं महत्वाचा वाटा उचलला.

1930 च्या दशकाच्या सुरुवातीला विज्ञानात शैक्षणिक कारकीर्द सुरू असतानाच रॉबर्ट ओपेनहायमर इतर विषयांचाही अभ्यास करू लागले. याच काळात त्यांची हिंदू धर्मग्रंथांशी ओळख झाली.

भगवद्गीता मुळातून वाचता यावी यासाठी त्यांनी संस्कृत शिकायला सुरूवात केली. पुढे अणूबॉम्बच्या निर्मितीनंतरचे त्यांचे, “Now I am become death, the destroyer of worlds” (मी आता काळ किंवा मृत्यू बनलो आहे, जो जगांना नष्ट करू शकतो) हे प्रसिद्ध उद्गार गीतेतला एका श्लोकावरच आधारित आहेत.

गीतेच्या 11 व्या अध्यायातला तो बत्तीसावा श्लोक असा आहे :

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त: |

ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिता: प्रत्यनीकेषु योधा: ||

मान्यतेनुसार या अध्यायात श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूपदर्शन दाखवलं होतं आणि म्हटलं होतं, ‘मी महाकाल आहे, जो लोकांचा नाश करू शकतो. या लोकांच्या नाशासाठी मी आता प्रवृत्त झालो आहे. म्हणून तू युद्ध केले नाहीस, तरी शत्रुपक्षीय सैन्यातील योद्ध्‌यांचा नाश होणार आहे.’

महाभारतातल्या कथेनुसार अर्जुन नैतिक पेचात सापडला असताना, श्रीकृष्णानं त्याला दिलेलं ज्ञान गीतेत सामावलेला आहे. रॉबर्ट ओपेनहायमर अणुबॉम्ब निर्मितीच्या ‘प्रॉजेक्ट वाय’वर काम करत होते, तिथे त्यांनाही काहीसा असाच नैतिक पेच पडला असावा.

रॉबर्ट ओपेनहायमर आणि जनरल लेस्ली ग्रोव्ह्‌ज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉबर्ट ओपेनहायमर आणि जनरल लेस्ली ग्रोव्ह्‌ज ट्रिनिटी अणूचाचणीनंतर उरलेल्या अवशेषांची पाहणी करतााना.

रॉबर्ट यांचा गीता आणि तत्त्वज्ञानातला केवळ बौद्धिक नव्हता. त्यांनी या विषयावरची अनेक पुस्तकं जमा केली होती.

गीतेमध्ये कर्तव्य आणि निष्काम कर्मयोग म्हणजे कुठल्या फळाची अपेक्षा न करता काम करणं, अशा कल्पना मांडल्या आहेत. या तत्वज्ञानानुसार परिणामांची भीती वाटते, म्हणून कुठलंच पाऊल न उचलणं हेही योग्य ठरत नाही.

याचाच विशेष उल्लेख रॉबर्ट यांनी 1932 साली आपल्या भावाला लिहिलेल्या एका पत्रात केला आहे. त्यांच्यामध्ये युद्ध ही एक अशी परिस्थिती असेल जिथे हे तत्वज्ञान पडताळून पाहता येईल.

ओपेनहायमर लिहितात, “मला वाटतं शिस्तीद्वारा आपण शांतता, प्रसन्नता मिळवू शकतो. शिस्त आपल्याला कठीणातल्या कठीण प्रसंगातही आपल्या आनंदासाठी गरजेच्या गोष्टी टिकवून ठेवायला शिकवते. त्यामुळे शिस्त लावणाऱ्या सगळ्या गोष्टी जसं की अभ्यास, लोकांप्रती आपलं कर्तव्य, युद्ध अशा गोष्टींचं एक प्रकारे कृतज्ञतेच्या भावनेनं स्वागतच करायला हवं. कारण या गोष्टींमधूनच आपल्याला मनाची अलिप्तता साधता येईल आणि तेव्हाच आपल्याला शांततेचा अर्थही समजेल.”

1930 च्या दशकाच्या मध्यावर रॉबर्ट ओपेनहायमर जीन टट्लॉक यांना भेटले. त्या एक मानसोपचारतज्ज्ञ आणि डॉक्टर होत्या. रॉबर्ट त्यांच्या प्रेमातच पडले आणि अनेकदा त्यांनी लग्नाची मागणीही घातली. जीन यांनी ती नाकारली.

पण जीन यांच्यामुळेच रॉबर्ट यांचा मूलगामी राजकारणाशी आणि जॉन डन यांच्या कवितांशी परिचय झाला. या जॉन डन यांचाच कवितांमधल्या उल्लेखावरूनच पहिल्या अणूबाँबला ट्रिनिटी (ख्रिश्चन धर्मातली त्रिमूर्ती) हे नाव दिल्याचं सांगितलं जातं. पहिली अणूचाचणी होण्याच्या एक वर्षभर आधीच जीन यांनी स्वतःचं जीवन संपवलं.

कॅथरीन आणि रॉबर्ट ओपेनहायमर यांचा परिवाार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कॅथरीन आणि रॉबर्ट ओपेनहायमर यांचा परिवाार

1940 मध्ये सागरी जीववैज्ञानिक कॅथरीन उर्फ किती हॅरिसन यांच्याशी विवाह केल्यावरही रॉबर्ट जेन त्यांच्या संपर्कात राहिले.

केटी यांनी पुढे रॉबर्ट यांच्यासोबत प्रॉजेक्ट वाय वर फ्लेबोटोमिस्ट म्हणून काम केलं आणि किरणोत्सारामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी संशोधन केलं.

अण्वस्त्रांचा धोका

खरंतर राजकारण्यापेक्षा शास्त्रज्ञांमध्ये अण्वस्त्रांच्या धोक्याविषयी जास्त चर्‌चा होत असे. नाझी जर्मनी अणूबाँब तयार कररेल अशी भीती काहींना वाटत होती. 1939 मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी लिहिलेल्या एका पत्रामुळे अमेरिकेन सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांचं त्याकडे लक्ष वेधलं गेलं.

राष्ट्राध्यक्षांचं लक्ष वेधण्यात त्यांना यश आलं. अणुशक्तीचा वापर शस्त्रासारखा करता येईल का? या शक्यतेचा गांभिर्यानं विचार करण्यासाठी अमेरिकन सरकारने नेमलेल्या आघाडीच्या वैज्ञानिकांमध्ये रॉबर्ट ओपेनहायमर यांचा समावेश होता.

ओपेनहायमर यांच्या टीमच्या योगदानामुळेच अणुबॉम्ब बनवता येणं शक्य असल्याचं स्पष्ट झालं आणि सप्टेंबर 1942 मध्ये त्याच्या निर्मितीसाठी प्रक्रियाही हळूहळू सुरू झाली.

या प्रकल्पाचं नेतृत्व आपल्याकडे येणार याची कुणकुण लागताच ओपेनहायमर यांनीही तयारीला सुरुवात केली. मी कम्युनिस्ट व्यक्तींसोबत कुठलाही संपर्क ठेवणं बंद करत आहे, असं त्यांनी त्यांच्या एका मित्राला सांगितलं. ते म्हणाले होते, “मी तसं केला नाही तर सरकारला माझा वापर करून घेतलं कठीण जाईल. मला देशसेवेत कुठल्या गोष्टीनं व्यत्य येऊ द्यायचा नाही.”

अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी त्याविषयी एक टिप्पणी केली होती- " ओपेनहायमर यांची समस्या ही आहे की त्यांचं अमेरिकन सरकारवर प्रेम आहे, पण अमेरिकन सरकारचं त्यांच्यावर प्रेम नाही."

आइन्स्टाइन आणि ओपेनहायमर

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, आइन्स्टाइन आणि ओपेनहायमर

मॅनहॅटन इंजीनियर डिस्ट्रिक्ट अर्थात मॅनहॅटन प्रोजेक्टचे लश्करी प्रमुख जनरल लेस्ली ग्रोव्ह्ज 2002 साली लिहिलेल्या रेसिंग फॉर द बाँब या आत्मचरित्रात सांगतात, की त्यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून ओपेनहायमर यांचं नाव सुचवलं, तेव्हा काहीसा विरोध झाला.

‘लोकांना ते जरा जास्तच उदारमतवादी वाटत होते. पण ओपेनहायमर यांच्याकडे गुणवत्ता आणि वैज्ञानिक ज्ञान यासोबतच प्रचंड महत्त्वाकांक्षाही होती.’ ग्रोव्ह्ज यांनी अखेर ओपेनहायमर यांचीच निवड केली.

बदलती भूमिका आणि गीतेचा आधार

युद्धानंतरच्या काळात ओपेनहायमर यांच्या भूमिकेत बदल होताना दिसला. त्यांनी अण्वस्त्रांचं वर्णन “हल्लेखोरी, धक्का आणि दहशत यांच साधन“ असं केलं, तर शस्त्र उद्योग हे ‘सैतानाचं काम’ असल्याचंही ते म्हणाले.

ऑक्टोबर 1945 मध्ये एका बैठकीदरम्यानचं त्यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे. ओपेनहायमर तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांना म्हणाले होते , “मला वाटतं माझे हात रक्ताने माखले आहेत.” राष्ट्राध्यक्षांनी नंतर नमूद केलं की, "मी त्याला सांगितलं, तुझे नाही तर माझे हात रक्तानं माखले आणि त्याची चिंता मला करू दे.”

दोघांमधला हा संवाद ओपेनहायमर यांच्या आवडीच्या भगवतगीतेतील अर्जुन आणि कृष्णाच्या संवादासारखाच वाटावा.

अर्जुनानं लढण्यासाठी तेव्हा नकार दिला होता, कारण आपल्या नातेवाईकांच्या मृत्युसाठी आपण जबाबदार ठरू असं त्याला वाटलं होतं. पण कृष्णानं त्याच्या मनावरचा भार हलका केला.

हाच युक्तीवाद ओपेनहायमर यांनी अणुबॉम्बची निर्मिती करताना आपल्या सहकार्यांच्या मनातले किंतु परंतु आणि नैतिक प्रश्न दूर करण्यासाठीही वापरला होता.

पहिल्या अणूचाचणीत फोडलेला 'गॅजेट' नावाचा बाँब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पहिल्या अणूचाचणीत फोडलेला 'गॅजेट' नावाचा बाँब

ते आपल्या सहकार्यांना सांगायचे, ‘वैज्ञानिक म्हणून या शस्त्रांचा वापर कसा केला जातोय यासाठी तुम्ही जबाबदार नाहीत. तुम्ही फक्त तुमचं काम करत राहायला हवं. रक्ताने कुणाचे हात माखणार असतील तर ते राजकारण्यांचे माखतील.‘

पण प्रत्यक्षात जपानवर अणुबॉम्ब पडल्यानंतर मात्र ओपेनहायमर यांच्या आत्मविश्वासलाही हादरे बसल्याचं दिसून आलं.

अण्वस्त्रांना विरोध आणि सरकारकडून कारवाई

युद्धानंतरच्या काळात अटॉमिक एनर्जी कमिशन मध्ये काम करताना ओपेनहायमर यांनी अण्वस्त्रांच्या आणखी विकासाला विरोध केला. अगदी त्यांच्या संशोधनावर आधारित असलेल्या शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बलाही त्यांचा विरोध होता.

परिणामी 1954 साली अमेरिकन सरकारनं ओपेनहायमर यांची चौकशी सुरू केली. त्यांचा सिक्युरिटी क्लिअरन्स काढून घेण्यात आला. त्यामुळे धोरणात्मक कामात त्यांच्या सहभागाचा अंत झाला. पण विचारवंत मात्र ओपेनहायमर यांच्या बाजूने उभे राहिले.

नावाजलेले तत्त्ववेत्ते बट्रांड रसेल यानी 1955 मध्ये द न्यू रिपब्लिकमध्ये लेखात म्हटलं होतं, “सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी चुका केल्याचं नाकारता येणं या चौकशीमुळे शक्य नाही. पण त्यांनी विश्वासघात केल्याचा किंवा देशद्रोह केल्याचा कुठला पुरावा नाही. वैज्ञानिक एका दुःखद वैचारिक द्वंद्‌वात अडकले होते.”

एन्रिको फर्मी पुरस्कार स्वीकारताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एन्रिको फर्मी पुरस्कार स्वीकारताना

अर्थात अमेरिकन सरकारने 1963 साली ओपेनहायमर यांना एन्रिको फर्मी पुरस्कार देऊन एक प्रकार आहे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा सिक्युरिटी क्लिअरन्स काढून घेण्याचा निर्णय मागे घेतला जाण्यासाठी 2022 साल उजाडलं.

म्हणजे ओपेनहायमर यांच्या मृत्युनंतर 55 वर्षांनी अमेरिकन सरकारला त्यांच्या निष्ठेविषयी खात्री पटली.

अखेरचा काळ

अणुऊर्जेची ही समस्या त्या काळातल्या बौद्धिक जाणिवांच्या पलीकडची होती अशी त्यांची धारणा बनली. राष्ट्रध्यक्ष ट्रूमन म्हणाले तसं हे ही एक अशी क्रांतिकारी ताकद होती, जिचा जुन्या कल्पनाच्या चौकटीतून विचारही करता येणं शक्य नाही.

एका बाजूला अणूबॉम्बचं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेल्या यशाविषयीचा अभिमान आणि दुसरीकडे त्याच्या परिणामांविषयीची अपराधीपणाची भावना. या दोन्ही गोष्टी ओपेनहायमर आयुष्याच्या अखेरच्या दशकांमध्ये समांतरपणे मांडत आले.

त्या काळातल्या त्यांच्या वक्तव्यांमध्ये ‘आलिया भोगासी असावे सादर’ असा भावही दिसून येतो. कारण अनेकदा त्यांनी नमूद केलं की, कुणी ना कुणी तरी अणूबॉम्ब बनवला असताच.

बेन प्लॅट-मिल्स यांनी काढलेलं ओपेनहायमर यांचं चित

फोटो स्रोत, Ben Platts-Mills

फोटो कॅप्शन, बेन प्लॅट-मिल्स यांनी काढलेलं ओपेनहायमर यांचं चित

ओपेनहायमर शेवटचा 20 वर्षांमध्ये प्रिन्स्टन विद्यापीठात इंस्टिट्यूट फॉर एडवांस्ड स्टडीजचे संचालक म्हणून आईन्स्टाईन आणि अन्य शास्त्रज्ञांसोबत काम करत राहिले.

वेगवेगळ्या विषयांना, विज्ञानशाखांना एकत्र आणणाऱ्या कामाचा ते प्रसार करत राहिले. त्यांच्या भाषणात ते आवर्जून सांगायचे की विज्ञानाला आपले परिणाम समजून घेण्यासाठी मानवतेशी निगडीत इतर विषयांना समजून घेण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी अभिजात भाषांचे अभ्यासक, कवी, मानसशास्त्रज्ञ अशांचाही नेमणुका केल्या.

अगदी तरुणपणीच ओपेनहायमर यांना सिगरेटचं व्यसन लागलं होतं. अधूनमधून त्यांना क्षयपोगाचा त्रास व्हायचा. 1967 साली, 62 वर्षांच्या वयात घशाच्या कॅन्सरनं त्यांचा मृत्यू झाला.

अखेरच्या काळात त्यांनी केलेली ही विज्ञान आणि कवितेवरची टिप्पणी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. ‘कवितेपेक्षा विज्ञान वेगळं आहे, कारण त्यात तुम्ही तीच चूक पुन्हा करायची नाही, हे शिकता.’

* बेन प्लॅट-मिल्स हे एक लेखक आणि कलाकार आहेत.

* संकलन – जान्हवी मुळे

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)