अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकून भारताने पोखरणची दुसरी अणुचाचणी कशी केली होती?

फोटो स्रोत, Harper Collins
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर काही दिवसांतच तत्कालीन मावळते पंतप्रधान नरसिंह राव यांनी नव्याने पंतप्रधान झालेल्या अटल बिहारी बाजेपायी यांची भेट घेऊन सांगितलं, ‘सामग्री तयार आहे, तुम्ही पुढचं काम सुरू करू शकता.”
संसदेत विश्वासमत प्राप्त केल्यानंतर एका पंधरवड्यातच वाजपेयी यांनी डॉक्टर कलाम आणि डॉक्टर चिदंबरम यांना बोलवून अणुचाचणी करण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले होते.
तत्कालीन राष्ट्रपती केआर नारायणन 26 एप्रिल ते 10 मे पर्यंत दक्षिण अमेरिकेतल्या देशांच्या दौऱ्यावर जाणार होते पण त्यांना हळूच सांगण्यात आलं की त्यांनी आपला दौरा पुढे ढकलावा.
डॉक्टर चिदंबरम यांच्या मुलीचं लग्न 27 एप्रिलला होणार होतं, पण ते लग्नही पुढे ढकललं गेलं कारण मुलीच्याच लग्नात चिदंबरम नसले तर काहीतरी मोठं घडणार आहे याचे संकेत गेले असते.
डॉ कलामांनी सल्ला दिला की अणुचाचणी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करावी. तो दिवस होता 11 मे 1998.
शास्त्रज्ञांना सैन्याचे युनिफॉर्म घालण्यासाठी दिले
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरच्या वरिष्ठ वैज्ञानिकांना 20 एप्रिलपर्यंत भारताच्या अणुचाचणीबद्दल कल्पना दिली होती. त्या लोकांनी लहान लहान गटांमध्ये पोखरणला जायला सुरुवात केली.
त्यांनी आपल्या पत्नी आणि घरच्यांना सांगितलं की एकतर ते दिल्लीला जाणार आहेत किंवा अशा ठिकाणी संमेलनात भाग घ्यायला चाललेत जिथे त्यांच्याशी पुढचे 20 दिवस फोनवर संपर्क होऊ शकणार नाही.
ही मोहीम गुप्त ठेवण्यासाठी प्रत्येक शास्त्रज्ञ नाव बदलून प्रवास करत होता आणि सरळ पोखरणला जाण्याऐवजी घुमून-फिरून त्या ठिकाणी पोचत होता. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर आणि डिआरडीओ या दोन्ही संस्थाचे एकूण 100 वैज्ञानिक या प्रकल्पाचा भाग होते.

फोटो स्रोत, HARPER AND COLLINS
ते लोक पोखरणला पोचले तेव्हा त्या सगळ्यां सैन्याचे युनिफॉर्म घालायला दिले. त्या सगळ्यांना कमी उंचीच्या खोल्यांमध्ये थांबवलं होतं. या खोल्यांमध्ये लाकडी पार्टीशन टाकले होते आणि त्यात फक्त एक पलंग ठेवण्याइतकी जागा होती.
शास्त्रज्ञांना सैन्याचे युनिफॉर्म घालायला मुश्कील होत होती. कारण त्यांना स्टार्चचे कपडे घालण्याची सवय नव्हती.
टेनिस बॉलच्या आकाराचे बॉम्ब
चाचणी केल्या जाणाऱ्या अणुबॉम्बचं कोडनेम होतं ‘कँटीन स्टार्स’. या स्फोटांना हिरवा झेंडा मिळाल्यानंतर सर्वात मोठी अडचण ही होती की मुंबईतल्या भूमिगत व्हॉल्टमध्ये ठेवलेले हे बॉम्ब पोखरणपर्यंत कसे पोहचवायचे.
हे व्हॉल्ट्स ऐशींच्या दशकात बांधले गेले होते आणि दरवर्षी फक्त विश्वकर्मा पूजेच्या दिवशीच उघडले जायचे.
या पूजेच्या दिवशी शास्त्रज्ञ आणि तिथे काम करणारे कामगार व्हॉल्टच्या दारांवर भस्म लावायचे. जेव्हा पंतप्रधान भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरच्या (बार्क) दौऱ्यावर आले तर त्यांना हे व्हॉल्ट उघडून दाखवले जायचे.
एकदा तत्कालीन सैन्यप्रमुख सुंदरजी यांनाही व्हॉल्ट दाखवले गेले. यात सहा प्लुटोनियम बॉम्ब ठेवले होते जे टेनिस बॉलपेक्षा थोडेसे मोठे होते.

फोटो स्रोत, HARPER AND COLLINS
या बॉल्सचं वजन तीन ते आठ किलोच्यामध्ये होतं. सगळे बॉल एका काळ्या बॉक्समध्ये ठेवले होते. हे बॉक्स फळांच्या पेटीसारखे दिसत. पण या बॉक्सची रचना अशी होती की यात ठेवलेल्या प्लुटोनियम बॉम्बला पोखरणला पोहचेपर्यंत काही हानी पोचणार नाही.
बार्कच्या शास्त्रज्ञांची सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे हे बॉल आपल्याच सुरक्षारक्षकांच्या नजरेस न पडता तिथून हलवणं. सुरक्षारक्षकांना सांगितलं गेलं की काही उपकरणांना दक्षिणेतल्या दुसऱ्या अणूसंयंत्रात न्यायचं आहे त्यामुळे रात्री त्यासाठी खास ट्रक्सचा ताफा येईल.
चार ट्रक्समधून हे प्लुटोनियमचे बॉम्ब एअरपोर्टला नेले गेले.
मुंबईत मध्यरात्रीही बऱ्यापैकी वर्दळ असायची. त्यामुळे ट्रॅफिक जॅममधून वाचण्यासाठी, आणि संशयाला कोणतीही जागा नको म्हणून हे ट्रक रात्री 2 ते 4 या काळात चालवले गेले.
जेष्ठ पत्रकार राज चेंगप्पा आपलं पुस्तक ‘वेपन्स ऑफ पीस, द सिक्रेट स्टोरी ऑफ इंडियाज क्वेस्ट टू बी अ न्युक्लिअर पावर’ या पुस्तकात लिहितात, “ 1 मेला पहाटे चार ट्रक बार्क संयंत्रात पोचले. प्रत्येक ट्रकवर पाच सशस्त्र सैनिक तैनात होते.”
“या चारही ट्रकवर बॉम्बविरोध यंत्रणा बसवली होती म्हणजे त्यावर बॉम्ब हल्ला केला जाऊ शकणार नाही. दोन काळ्या क्रेट आणि इतर उपकरणं ट्रकवर चढवली गेली. डीआरडीओचे जेष्ठ सदस्य उमंग कपूर यांच्या तोंडातून निघून गेलं – इतिहास बदलतो आहे.”

फोटो स्रोत, HARPER COLLINS
हे चारी ट्रक वेगाने मुंबई विमानतळाकडे निघाले. विमानतळ 30 मिनिटांच्या अंतरावर होता. तिथे आवशयक त्या कागदपत्रांची पूर्तता झाली होती. ट्रक सरळ धावपट्टीकडे गेले. तिथे एएन 32 ट्रान्सपोर्ट विमान त्यांची वाट पाहात होतं.
विमानात फक्त चार सुरक्षारक्षक होते. बाहेरच्या जगाच्या दृष्टीने ही साधी सैन्य प्रक्रिया होती.
कोणालाच याची जराशीही कल्पना नव्हती की या विमानात जे ठेवलं होतं ते मुंबई शहराला काही क्षणात उद्धवस्त करू शकत होतं. विमानाने उड्डाण केलं आणि दोन तासात जैसलमेर विमानतळावर लँड झालं. तिथे ट्रक्सचा एक ताफा वाटच पाहात होता.
प्रत्येक ट्रकमध्ये सशस्त्र सैनिक बसले होते. ट्रकमधून उतरताना त्यांनी आपली हत्यारं टॉवेलमध्ये लपवली होती. ट्रक जेव्हा पोखरणच्या दिशेने निघाले तेव्हा बाहेर चांगलंच फटफटलं होतं.
राज चेंगप्पा लिहितात, “पोखरणमध्ये हे ट्रक सरळ प्रार्थना सभागृहात पोचले. इथेच हे बॉम्ब जोडले जाणार होते. जेव्हा प्लुटोनियमचे हे गोळे तिथे पोचले तेव्हा भारतीय अणु उर्जा आयोगाचे अध्यक्ष राजागोपाला चिदंबरम यांच्या जीवात जीव आला. ते आतुरतेने या गोळ्यांची वाट पाहात होते.”
त्यांना आठवत होतं की 1971 च्या तुलनेत आता गोष्टी किती बदलल्या आहेत. तेव्हा अणु यंत्राला त्यांना स्वतःच पोखरणला घेऊन यावं लागलं होतं.
विंचू, बुलडोझर आणि कप्पी
अणुचाचणीच्या काही दिवस आधीच बार्कचे संचालक अनिल काकोडकर यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांना अंत्यसंस्कारांसाठी पोखरण सोडावं लागलं पण काकोडकर दोनच दिवसात परत आले.

फोटो स्रोत, Harper Collins
ताजमहल शाफ्टमधून वाळू काढणाऱ्या बुलडोझरने चुकून एका मोठ्या दगडला टक्कर दिली. तो वेगाने शाफ्टच्या तोंडावर जाऊन आदळला. जर हा दगड जर शाफ्टच्या आत पडला असता तर तिथे लागलेल्या तारांचं नुकसान होणं पक्कं होतं.
एका जवानाने सूर मारून त्या गडगडत जाणाऱ्या भल्यामोठ्या दगडाला 150 मीटर खोल शाफ्टमध्ये जाण्यापासून थांबवलं. आणखी चार जवान आपला जीव धोक्यात घालून त्या दगडाला थांबवायला धावले आणि त्यांनी पूर्ण ताकद लावून दगड थांबवला.
चाचणीच्या काही दिवस आधी कप्पी म्हणजेच पुली सिस्टम शाफ्टमधून खाली उतरवली जात होती तेव्हा अचानक वीज गेली आणि लोक शाफ्टमध्ये अडकून पडले. वीज परत यायला अनेक तास लागले, तोवर त्या लोकांनी एकमेकांना जोक सांगत वेळ घालवला.
सारखी वीज जात असल्यामुळे कामात अडचणी निर्माण होत होत्या. वीजेच्या व्होल्टेजमध्येही खूप जास्त चढ-उतार होत होते त्यामुळे उपकरणं जळून जाण्याचा धोका होता.
वादळ आणि वीज पडण्याचा धोका
पोखरणचं हवामानदेखील शास्त्रज्ञांची डोकेदुखी वाढवत होतं. एका रात्री कडकडत्या वीजांसह भयानक वादळ आलं. ‘प्रेयर हॉल’ मध्ये बॉम्ब जोडणीचं काम सुरू होतं. शास्त्रज्ञ एसके सिक्का आणि त्यांच्या टीमच्या लोकांना काळजी वाटत होती की जर प्रेयर हॉलवरच वीज पडली तर काय हाहाकार होऊ शकतो.
तिथे वीज पडली असती तर बॉम्ब डिव्हाईसची हानी तर झाली असतीच पण बॉम्बही वेळेआधी फुटण्याचा धोका होता. एका रात्री एवढ्या जोरात वारा सुटला की काही दिसणं बंद झालं.

फोटो स्रोत, DAE
प्रेयर हॉलमध्ये काही अपघात होऊन आग लागू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तिथे एसी लावण्याची परवानगी नव्हती. शास्त्रज्ञ फारच अवघड परिस्थितीत काम करत होते. उन्हाळा तर इतका कडक होता की शास्त्रज्ञ घामाने चिंब भिजून रोज काम करायचे.
मदत करणारे कर्मचारी मुद्दामहूनच कमी ठेवले गेले होते. त्यामुळे सिक्कांसारख्या जेष्ठ शास्त्रज्ञांना पण स्क्रू फिरवणं आणि तारा नीट करण्यासारखी कामं करावी लागत होती.
काकोडकर यांना ओळखलं गेलं
मुळात ही सर्व मोहीम गुप्त होती. इथे कोण आलंय, काय काम चालूये हे सर्वसामान्य लोकांना माहिती नव्हतं.
एकीकडे हे काम सुरू असताना जवळच एका खाजगी कंपनीचे लोक खनिज तेल शोधण्यासाठी खोदकाम करत होते. शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी ठरवलं की ते तिथे जातील आणि पाहातील की कोणत्या तंत्रज्ञानाने तिथे खोदकाम सुरूये.
काकोडकर यांनी आपलं आत्मचरित्र ‘फायर अँड फ्युरी’ मध्ये लिहिलं आहे की, “आम्ही सगळे सैन्याच्या गणवेशात तिथे पोचलो. तिथे काम करणाऱ्या एका व्यक्तीने माझ्या टीममधले सदस्य विलास कुलकर्णी यांना बाजूला नेऊन विचारलं, हे काकोडकर साहेब तर नाहीत ना?”
“कुलकर्णींनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला की मी काकोडकर नाहीये तर ती व्यक्ती वारंवार म्हणत राहिली की मी स्वतः डोंबिवलीत राहातो आणि मी काकोडकरांना अनेकदा पाहिलं आहे. आम्हाला वाटलं तिथून निघून जाण्यातच भलाई आहे.”
दुसरीकडे दिल्लीत अचानक पंतप्रधान वाजपेयी यांनी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना बोलावणं पाठवलं.

फोटो स्रोत, RUPA
यशवंत सिन्हा आपलं आत्मचरित्र ‘रिलेंटलेस’ मध्ये लिहितात, “वाजपेयी मला त्यांच्या कार्यालयात भेटले नाही. मला त्यांच्या बेडरूममध्ये नेण्यात आलं. मला लगेच लक्षात आलं की ते काहीतरी अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय गोष्ट मला सांगणार आहेत. मी जसा खुर्चीवर बसलो त्यांनी मला भारताच्या अणुचाचणीबद्दल सांगितलं.”
“त्यांनी म्हटलं की कदाचित जगातली राष्ट्र भारतावर आर्थिक निर्बंध लावू शकतात. आपण प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार असलं पाहिजे म्हणूनच मला वाटलं की मी तुम्हाला आधी कल्पना देऊन ठेवतो म्हणजे तुम्हाला तयारी करता येईल.”
अमेरिकेच्या उपग्रहांची नजर चुकवून
पोखरणमध्ये शास्त्रज्ञ फक्त रात्री काम करत होते म्हणजे दिवसा वरतून जाणाऱ्या उपग्रहांची नजर पडणार नाही. त्या चांदण्या रात्री शास्त्रज्ञांच्या आठवणींचा भाग झाल्या.
चेंगप्पा लिहितात, “एका रात्री शास्त्रज्ञ कौशिक यांना रात्री एक उपग्रह दिसला. तीन तासांच्या कालावधीत त्यांनी तिथून चार उपग्रह जाताना पाहिले. त्यांनी डीआरडीओचे सदस्य कर्नल बीबी शर्मा यांना म्हटलं, सर त्यांना संशय आलाय की आपण काहीतरी करतोय. नाहीतर एका रात्रीत एवढे उपग्रह का गेले असते इथून. शर्मा म्हणाले आपल्याला सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण कोणतीच जोखीम पत्कारू शकत नाही.”
जेव्हा 1995 साली नरसिंहा राव यांनी अणुचाचणी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अमेरिकन उपग्रहांना नव्याने पसरलेल्या तारांच्या जाळ्यांवरून भारताचा हेतू कळला.
त्यावेळी अमेरिकन उपग्रहांच्या नजरेला शाफ्ट पडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात वाळू भरली होती. पण वाहनांच्या हालचालीवरून अमेरिकन सतर्क झाले.
1998 साली अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने पोखरणवर चार उपग्रह सोडले होते. पण चाचणीच्या काही दिवस आधी फक्त एक उपग्रह तिथे निरीक्षण करत होता. तो उपग्रह रोज सकाळी 8 वाजून 11 मिनिटांनी तिथून जायचा.

फोटो स्रोत, Harper Collins
चाचणीच्या एक रात्र आधी उपग्रहाकडून मिळालेल्या फोटोंचं विश्लेषण करायला एका अमेरिकन विश्लेषकाची ड्युटी लावली होती. त्याला हेही सांगितलं होतं की तिथले काही फोटो दुसऱ्या दिवशी आपल्या अधिकाऱ्यांना दाखवायचे. पण जोवर अधिकारी त्या फोटोंचं विश्लेषण करतील तोवर खूप उशीर होणार होता.
दुपारी 3.45 ला झाले स्फोट
11 मे ला एपीजे अब्दुल कलाम यांनी पंतप्रधान निवासस्थानात ब्रजेश मिश्रा यांना फोन करून सांगितलं की, हवेचा वेग मंदावला आहे आणि पुढच्या एका तासात चाचणी करता येऊ शकते. कंट्रोल रूममध्ये प्लास्टिकच्या स्टुलवर बसलेले शास्त्रज्ञ हवामान अहवालाची आतुरतेने वाट पाहात होते.
दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी ब्रजेश मिश्रा खूप अस्वस्थ दिसत होते. वाजपेयी यांचे सचिव शक्ती सिन्हा त्यांच्याकडे काही महत्त्वाच्या फाईल्स घेऊन येत होते.
त्या दिवशी शक्ती सिन्हा यांचा वाढदिवसही होता पण ते शुभेच्छांचे कॉल घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.
पोखरणहून हवामानाचा अहवाल आला की, सगळं काही ठीक आहे. बरोब्बर 3 वाजून 45 मिनिटांनी मॉनिटरवर लाल ठिपका दिसला आणि एका सेकंदाच्या आतच तिन्ही मॉनिटर्सवर डोळे दिपवणारा प्रकाश पसरला.
अचानक सगळे लाईव्ह व्हीडिओ स्तब्ध झाले. शाफ्टच्या आत लावलेले कॅमेरे स्फोटात नष्ट झाल्याने असं घडलं सांगण्यात आलं. पृथ्वीच्या पोटातलं तापमान लाखो डिग्री सेंटिग्रेडपर्यंत पोहचलं.
ताजमहल नावाच्या शाफ्टमधल्या स्फोटाने हॉकीच्या मैदानाच्या क्षेत्रफळाइतकी वाळू हवेत उडवली. त्यावेळी हेलिकॉप्टरमधून हवेत उडणारे डीआरडीओचे कर्नल उमंग कपूर यांनाही धूळीचं वादळ दिसलं.
‘भारत माता की जय’ च्या घोषणा
जमिनीवर असलेल्या शास्त्रज्ञांना जाणवलं की त्यांच्या पायाखालची जमीन जोरजोरात थरथरतेय. तिथे आणि देशात इतरत्र असलेल्या सीस्मोग्राफ्स (भूकंपमापक यंत्र) यंत्राच्या सुया वेगाने हलत होत्या. शास्त्रज्ञ आपल्या बंकर्ममधून निघून बाहेर उभ्या राहिलेल्या अजस्र वाळूच्या भिंतीचा नजरा पाहायला धावले.
हे दृश्य सुरक्षित अंतरावरून पाहाणाऱ्या शेकडो सैनिकांनी वाळूची ही अजस्र भिंत पाहाताच मोठमोठ्याने घोषणा दिल्या ‘भारतमाता की जय’.
तिथे असलेले शास्त्रज्ञ संथानम यांनी बीबीसीला सांगितलं की, ‘ते दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला.’

फोटो स्रोत, Getty Images
चिदंबरम यांनी जोरात कलाम यांचा हात पकडला आणि म्हणाले, “मी तुम्हाला म्हणालो होतो, आपण 24 वर्षांनी हे काम पुन्हा करू शकतो.”
कलाम यांच्या तोंडातून निघालं, “आपण जगातल्या अणुशक्तींचं साम्राज्य संपवलं आहे. आता एक अब्ज लोकांच्या या देशाला कोणी सांगू शकत नाही की त्याने काय करावं, आता आपण ठरवणार की आपल्याला काय करायचं आहे.”
तिकडे पंतप्रधान कार्यालयात फोनच्या बाजूला बसलेल्या ब्रजेश मिश्रा यांनी पहिल्याच रिंगला फोन उचलला. त्यांनी रिसिव्हवर कलाम यांचा थरथरता आवाज ऐकला, “सर आपण करून दाखवलं.” मिश्रा फोनवर ओरडले, “गॉड ब्लेस यू.”
नंतर वाजपेयींनी म्हटलं की, “त्या क्षणाचं वर्णन करणं अवघड आहे, पण आम्हाला अत्यंत आनंद झाला आणि पूर्णत्वाची जाणीव झाली.”
नंतर अटल बिहारी वाजपेयी यांचे सचिव असणारे शक्ती सिन्हा यांनी आपलं पुस्तक ‘वाजपेयी द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तकात लिहिलं, “वाजपेयी मंत्रिमंडळाचे चार मंत्री लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, यशवंत सिन्हा आणि जसवंत सिंह वाजपेयी निवासात डायनिंग टेबलच्या चारी बाजूंना बसले होते. सोफ्यावर बसलेले पंतप्रधान खोल विचारात गढले होते. कोणी कोणाशी काही बोलत नव्हतं.”
सिन्हा लिहितात, “तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद साफ वाचला जाऊ शकत होता. पण तरी ना कोणी आनंदाने उड्या मारल्या, ना कोणी कोणाला मिठी मारली ना पाठीवर शाबासकी दिली. पण त्या खोली उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं.”
“बऱ्याच वेळानंतर वाजपेयींच्या चेहऱ्यावर स्मित दिसलं. तणावातून मुक्त झाल्यानंतर ते हसू लागले.”
त्यानंतर वाजपेयी आपल्या घरातून बाहेर लॉनवर आले. लॉनवर सगळ्या प्रमुख माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाजपेयी मंचावर जाण्याच्या काही सेकंद आधी प्रमोद महाजन यांनी तिथे भारताचा झेंडा ठेवला.
त्यावेळी दिलं जाणारं प्रेस ब्रिफिंग यशवंत सिन्हा यांनी बऱ्याच आधी तयार करून ठेवलं होतं. त्यात शेवटच्या क्षणी वाजपेयी यांनी एक छोटा बदल केला.
मुळ ब्रिफिंगमधलं पहिलं वाक्य होतं, “आय हॅव अ ब्रीफ अनाउन्समेंट फॉर यू.” त्यातला ‘ब्रीफ’ हा शब्द वाजपेयींनी काढला आणि म्हणाले, “आज 3 वाजून 45 मिनिटांनी भारताने तीन भूमिगत अणुचाचण्या केल्या आहेत. या चाचण्या यशस्वी करणारे शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्सचं मी अभिनंदन करतो.”
दोन दिवसांनी पोखरणची धरणी पुन्हा एकदा हलली आणि भारताने आणखी दोन अणुचाचण्या केल्या. त्यानंतर एका दिवसाने वाजपेयींनी घोषणा केली की, “भारत आता अण्वस्रसंपन्न देश आहे.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








