भारतापेक्षा पाकिस्तानकडे जास्त अण्वस्त्रं!

अण्वस्त्र नष्ट करण्यासाठीचा जागतिक दिवस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 26 सप्टेंबर हा दिवस अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो.

26 सप्टेंबर हा दिवस 'जागतिक अण्वस्त्रं निर्मूलन दिन' म्हणून पाळला जातो. 2013 साली संयुक्त राष्ट्रांनी असा दिवस पाळला जावा याबाबतचा निर्णय घेतला.

या दिवसा निमित्त कोणत्या देशाकडे सर्वाधिक विनाशकारी शस्त्रं आहेत हे पाहू या.

अण्वस्त्रसाठ्याच्या बाबतीत अमेरिका आणि रशिया आघाडीवर आहेत.

रशियाकडे सर्वाधिक अण्वस्त्रं

अमेरिकेकडे 6,800 अण्वस्त्रं आहेत. एवढ्या अण्वस्त्रांचा वापर केला, तर पृथ्वी मानवाला राहण्याच्या लायकीची उरणार नाही. अमेरिकेकडची शस्त्रं ब्रिटनकडच्या शस्त्रांपेक्षा 31 पटींनी जास्त आहेत, तर चीनच्या तुलनेत 26 पट जास्त आहेत.

पण अमेरिकेतल्या 'आर्म्स कंट्रोल असोसिएशन'च्या अहवालानुसार, सध्या अण्वस्त्रांच्या बाबतीत रशिया अमेरिकेच्या पुढे आहे. रशियाकडे जवळपास 7,000 अण्वस्त्रं आहेत!

अमेरिकेचा लष्करी तळ

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, अमेरिकेचा लष्करी तळ

अमेरिका आणि रशिया दोन असे देश आहेत की, ज्यांच्याकडे अणुयुद्धाच्या गरजेपेक्षाही जास्त अण्वस्त्रं आहेत. जगातील अशा 15000 शस्त्रांपैकी 90 टक्के शस्त्रं या दोन देशांकडे आहेत. या यादीत 300 अण्वस्त्रांसह फ्रान्स तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतापेक्षा पाकिस्तानकडे जास्त अण्वस्त्रं

भारताकडे 110 अण्वस्त्रं आहेत, तर पाकिस्तानकडे 140 अण्वस्त्रं आहेत. ब्रिटनच्या अण्वस्त्रांची संख्या 215 आहे तर चीनकडे 260 अण्वस्त्रं आहेत. उपलब्ध माहितीनुसार उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रांची संख्या 10 आहे, तर इस्राईलकडे 80 अण्वस्त्रं आहेत.

अमेरिकेला राहचं आहे पुढे

2010 मध्ये प्रागमध्ये झालेल्या 'स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन करारा'नुसार अमेरिका आणि रशिया यांना 2018 पर्यंत अण्वस्त्रांची संख्या समान करायची आहे. त्यानंतर दोन्ही देशांत 2020 ला नवा करार होईल.

'नाटो' करारानुसार अमेरिकेनं बेल्जियम, जर्मनी, इटली, नेदरलँड आणि तुर्कीमध्ये अण्वस्त्रं तैनात केली आहेत. कॅनडा, ब्रिटन आणि इजिप्तमध्येही अमेरिकेची अण्वस्त्रं होती. ती नंतर हलवण्यात आली. याशिवाय सैनिकी तळ तसंच युद्धनौकांवरही अण्वस्त्र तैनात करण्यात आली आहेत.

अमेरिकेच्या अणुचाचण्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1946 ला अमेरिकेनं नौसेनेच्या जहाजांवर अण्वस्त्रांचा परिणाम अभ्यासण्यासाठी 2 अणुचाचण्या घेतल्या होत्या.

निःशस्त्रीकरणाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रांचं मत आहे की, 'या शस्त्रांनी फक्त एक शहरं नष्ट होऊन लाखो लोक मारले जातात असं नाही, तर येणाऱ्या पिढ्या आणि पर्यावरणावरही परिणाम होतो.'

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)