होमी भाभा यांचा मृत्यू अपघात होता की भारताचा आण्विक कार्यक्रम रोखण्याचा कट?

फोटो स्रोत, TIFR
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
23 जानेवारी 1966 रोजी होमी भाभा यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) मध्ये त्यांच्या कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर दिवसभर काम करत होते.
होमी भाभांचे सहकारी एमजीके मेनन सांगतात की, “त्या दिवशी भाभा माझ्याशी सुमारे दोन तास बोलले. त्यांनी मला सांगितले की, त्यांना चार दिवसांपूर्वी पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधींचा फोन आला होता. इंदिरा गांधींनी होमी भाभांना सांगितलं की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रत्येक बाबतीत मदत करण्यासाठी तुम्ही मला हवे आहात.
जर भाभांनी ती जबाबदारी स्वीकारली असती, तर त्यांना मुंबईहून दिल्लीला स्थायिक व्हावं लागणार होतं. भाभांनी मला सांगितलं की, इंदिरा गांधींची ऑफर मी स्वीकारलीय. त्यांनी मला सांगितलं की, व्हिएन्नाहून परत आल्यानंतर मी तुम्हाला TIFR चा संचालक बनवण्याचा प्रस्ताव कौन्सिलसमोर ठेवेन.”
भाभा यांचे भाऊ जमशेद, आई मेहेरबाई, जेआरडी टाटा, मित्र पिप्सी वाडिया आणि त्यांचे दंतचिकित्सक फली मेहता यांनाही इंदिरा गांधींच्या ऑफरची माहिती होती.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘होमी भाभा : अ लाइफ’ या चरित्राचे लेखक बख्तियार के. दादाभोय लिहितात, “इंदिरा गांधींनी नेमकी काय ऑफर दिली होती, हे भाभांनी एमजीके मेनन यांना स्पष्टपणे सांगितलं नाही. मात्र, मेनन यांना कल्पना होती की, इंदिरा गांधींनी भाभांना केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर दिली होती.”

फोटो स्रोत, Getty Images
भाभांचं विमान डोंगरावर आदळलं..
24 जानेवारी 1966 रोजी भाभा व्हिएन्नाला जाण्यासाठी एअर इंडियाच्या फ्लाइट 101 मध्ये चढले.
त्या काळात बॉम्बे ते व्हिएन्ना थेट विमान नव्हते आणि लोकांना व्हिएन्नाला जाण्यासाठी जिनिव्हामधील फ्लाइट बदलावी लागत असे. भाभा यांनी एक दिवस आधी जिनिव्हाला जाण्यासाठी फ्लाइट बुक केली होती. पण काही कारणांमुळे त्यांनी त्यांचा प्रवास एक दिवसासाठी पुढे ढकलला.
24 जानेवारी रोजी एअर इंडियाचे बोईंग 707 विमान ‘कांचनजंगा’ सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी 4 हजार 807 मीटर उंचीवर मोब्लान टेकड्यांवर आदळल्यानंतर कोसळलं.
हे विमान दिल्ली, बैरूत आणि जिनिव्हामार्गे लंडनला जात होते. या अपघातात सर्व 106 प्रवासी आणि 11 विमान कर्मचारी मृत्युमुखी पडले. नोव्हेंबर 1950 मध्ये ज्या ठिकाणी एअर इंडियाचं ‘मलबार प्रिन्सेस’ विमान कोसळलं होतं, त्याच ठिकाणी ‘कांचनजंगा’ कोसळले होते.

फोटो स्रोत, TIFR
‘मलबार प्राइज’ आणि ‘कांजनजंगा’ या दोन्ही विमानांचे अवशेष आणि प्रवाशांचे मृतदेह कधीच सापडले नाहीत. त्या विमानाचा ब्लॅक बॉक्सही सापडला नाही. खराब हवामानामुळे विमानाचे अवशेष शोधण्याचे काम थांबवावे लागले होते.
फ्रेंच चौकशी समितीने सप्टेंबर 1966 मध्ये पुन्हा तपास सुरू केला आणि मार्च 1967 मध्ये सादर केलेल्या अहवालात असं म्हटलं होतं की, “डोंगरावर प्रचंड बर्फवृष्टी झाल्यानं, तसंच पायलट आणि हवाई वाहतूक नियंत्रक यांच्यातील गैरसमजामुळे हा अपघात झाला. विमानाच्या कमांडरने मोब्लानपासून आपल्या विमानाच्या अंतराचा चुकीचा अंदाज लावला होता. विमानाचा एक रिसिव्हर देखील काम करत नव्हता.”
भारत सरकारने फ्रेंच तपास अहवाल स्वीकारला होता.
भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक
वयाच्या अवघ्या 56 व्या वर्षी होमी भाभा यांनी या जगाचा निरोप घेतला.
कॉस्मिक किरणांवरील त्यांच्या कार्यासाठी त्यांची जगभरात ओळख आहे. याच कार्यामुळे त्यांचं नोबेल पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं होतं. मात्र, भाभा यांचं खरं योगदान भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात आणि टाटा संस्थेच्या स्थापनेमध्ये होते.
भाभा यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण भारत हादरला होता. त्या काळातील सर्वात मोठे उद्योगपती जेआरडी टाटा यांच्यासाठी हा दुहेरी धक्का होता. त्याच विमानात एअर इंडियाचे प्रादेशिक संचालक, त्यांचे मेहुणे गणेश बर्टोली हे देखील त्याच विमानात प्रवास करत होते.
विमानात बसण्याच्या दोन दिवस आधी भाभा यांनी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या सन्मानार्थ शोकसभेचे अध्यक्षपद भूषवलं होतं. असं म्हटलं जातं की, लाल बहादूर शास्त्री यांनीही होमी भाभा यांना त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु तेव्हा भाभा यांनी राजकीय पदाऐवजी वैज्ञानिक क्षेत्रात कार्य करत राहण्याचा निर्णय घेतला होता.
भाभांच्या मृत्यूमागे CIA चा हात?
2017 मध्ये स्विस गिर्यारोहक डॅनियल रोश यांना आल्प्स पर्वतरांगांमध्ये एका विमानाचे अवशेष सापडले होते. ज्या विमानात होमी भाभा प्रवास करत होते, त्याच विमानाचे अवशेष असल्याचे सांगण्यात आलं होतं.
या दुर्घटनेशी संबंधित कटांच्या चर्चा झाल्या, त्यात प्रामुख्यानं अमेरिकन गुप्तचर यंत्रणा CIA चा हात असल्याचे अंदाज बांधले गेले होते.
2008 मध्ये 'कॉन्व्हर्सेशन विथ द क्रो' या पुस्तकात माजी सीआयए अधिकारी रॉबर्ट क्रोली आणि पत्रकार ग्रेगरी डग्लस यांच्यातील कथित संभाषण प्रसिद्ध करण्यात आलं होतं. या संभाषणावरून अनेकांना असं वाटलं की, या अपघातात CIA चा हात होता.
CIA मध्ये क्रोली हे ‘क्रो’ म्हणून ओळखले जात होते आणि CIA मध्ये त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द नियोजन संचालनालयात घालवली, ज्याला 'डिपार्टमेंट ऑफ डर्टी ट्रिक्स' असंही म्हटलं जातं.
ऑक्टोबर 2000 मध्ये निधनापूर्वी क्रोली यांनी डग्लस यांच्याशी अनेक संभाषणं केली. त्यांनी डग्लस यांना कागदपत्रांनी भरलेले दोन बॉक्स पाठवले आणि त्यांच्या मृत्यूनंतर उघडण्यास सांगितलं.

फोटो स्रोत, TIFR
5 जुलै 1996 रोजी झालेल्या एका संभाषणात डग्लस यांनी क्रोली यांचा हवाला देत म्हटलं की, “साठच्या दशकात भारताने अणुबॉम्बवर काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा आम्हाला अडचणी येऊ लागल्या.
ते (भारत) हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते की, ते किती हुशार आहेत आणि लवकरच ते एक मोठी महासत्ता बनणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ते सोव्हिएत युनियनच्या खूप जवळ जात होते.”
याच पुस्तकात क्रोली यांनी भाभांबद्दल म्हटले आहे की, “ते भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक आहेत आणि ते अणुबॉम्ब बनवण्यास पूर्णपणे सक्षम होते. भाभा यांना याबाबत अनेकवेळा इशारा देण्यात आला होता. परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
भाभा यांनी स्पष्ट केलं होतं की, जगातील कोणतीही शक्ती त्यांना आणि भारताला आण्विक शक्तींच्या बरोबरीत येण्यापासून रोखू शकत नाही. ते (होमी भाभा) आमच्यासाठी धोका बनले होते. त्यांच्या बोईंग 707 विमानाच्या कार्गो होल्डमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यांचा मृत्यू झाला.”

फोटो स्रोत, BASILISK PRESS
भाभा यांच्यासह 116 जणांचा मृत्यू
पुस्तकातील माहितीनुसार, क्रोली यांनी फुशारकी मारली की, त्यांना व्हिएन्नावर विमानाचा स्फोट करायचा होता, परंतु उंच पर्वतांवर स्फोट केल्यास कमी नुकसान होईल, असा अंदाज लावला गेला. मोठ्या शहरावर मोठे विमान पडण्यापेक्षा ते डोंगरावर पडल्यास कमी नुकसान होईल. एजन्सीमध्ये क्रोली यांना सोव्हिएत गुप्तचर संस्था केजीबीचे तज्ज्ञ मानले जात होते.
त्यांनी पुस्तकात असेही म्हटले आहे की, “खरं तर शास्त्रींना भारताचा अणुकार्यक्रम सुरू करायचा होता, म्हणून आम्ही त्यांच्यापासूनही सुटका करून घेतली. भाभा अत्यंत प्रतिभाशाली होते आणि त्यांच्याकडे अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता होती. म्हणून आम्ही दोघांपासून सुटका मिळवली. भाभांच्या मृत्यूनंतर भारतही शांत झाला.”
भाभा यांचे चरित्रकार बख्तियार के. दादाभोय लिहितात, “भाभांचा मृत्यू इटालियन तेल व्यापारी एनरिको मॅटी यांच्यासारखाच होता. त्यांनी इटलीची पहिली आण्विक अणुभट्टी सुरू केली आणि त्यांच्या खासगी विमानामध्ये कथितरित्या छेडछाड करून CIA ने त्यांना मारून टाकलं होतं.
या धक्कादायक दाव्यांची कधीही पडताळणी झालेली नाही. त्यामुळे शक्यता अशी आहे की, सत्य कधीच समोर येणार नाही. ग्रेगरी डग्लस हे सर्वात विश्वासार्ह स्त्रोत मानले जाऊ शकतात. भारताने अणुबॉम्ब बनवावा, असं अमेरिकनांना वाटत नसावं. पण एका व्यक्तीला मारण्यासाठी 117 लोकांना मारणं, हे समजण्याच्या पलिकडचं आहे.”

फोटो स्रोत, RUPA
अणुबॉम्बच्या मुद्द्यावर भाभा आणि शास्त्री यांच्यात मतभेद
24 ऑक्टोबर 1964 रोजी होमी भाभा अणु निशस्त्रीकरणावर आकाशवाणीवर बोलताना म्हटलं होतं की, “50 अणुबॉम्बचा साठा बनवण्यासाठी फक्त 10 कोटी रुपये लागतील आणि दोन मेगाटनचे 50 बनवण्याचा खर्च 15 कोटींपेक्षा जास्त नसेल. अनेक देशांच्या लष्करी बजेटचा विचार करता हा खर्च अत्यंत किरकोळ आहे.”
पंडित नेहरूंचे उत्तराधिकारी लाल बहादूर शास्त्री हे कट्टर गांधीवादी होते आणि त्यांचा अण्वस्त्रांना असलेला विरोध सर्वश्रुत आहे. तोपर्यंत नेहरूंशी जवळीक असल्याने भाभांचे अण्वस्त्र धोरण पाळले जात होते, पण शास्त्री येताच परिस्थिती बदलली.
बख्तियार दादाभोय लिहितात, “भाभा यापुढे पंतप्रधानांच्या कार्यालयात भेटीचा वेळ घेतल्याशिवाय प्रवेश करू शकणार नाहीत, या गोष्टीने ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. भाभा शास्त्रींना जे समजावू पाहत होते, ते शास्त्रींना समजून घेण्यास अडचण येत होती. चीनच्या अणुचाचण्यांपूर्वी, 8 ऑक्टोबर 1964 रोजी भाभा यांनी लंडनमध्ये घोषणा केली की, भारत सरकारच्या निर्णयानंतर 18 महिन्यांच्या आत अणुबॉम्बची चाचणी करू शकेल.”
यावर भाष्य करताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले होते की, “अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराच्या विरोधात असा कोणताही प्रयोग करू नये, असे अणु व्यवस्थापनाला कठोर आदेश आहेत.”

फोटो स्रोत, TIFR
भाभांनी शास्त्रींना पटवून दिलं...
यानंतर काही दिवसांतच भाभांनी शास्त्रींना अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरासाठी पटवून दिलं होतं.
प्रख्यात अणुशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांनी इंदिरा चौधरींना दिलेल्या मुलाखतीत हे स्वीकारलं होतं की, “आम्ही बॉम्ब बनवायचा की नाही, यावर आमच्यात चर्चा होत नसे. तो कसा बनवायचा, हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे होते. आमच्यासाठी तो आत्मसन्मानाचा विषय होता. 'डेटेरन्स'चा प्रश्न खूप उद्भवला. भारतीय शास्त्रज्ञ म्हणून आम्हाला आमच्या पाश्चिमात्य समकक्षांना दाखवायचे होते की, आम्हीही हे करू शकतो.”
यात अमेरिकेकडून कोणतीही मदत मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर भाभांनी एप्रिल 1965 मध्ये ‘न्यूक्लिअर एक्सप्लोजन फॉर पिसफुल पर्पज’ नावाचा छोटासा गट तयार केला. या गटाचं प्रमुखपद राजा रमण्णा यांना दिलं.
बख्तियार दादाभोय लिहितात की, “डिसेंबर 1965 मध्ये लाल बहादूर शास्त्रींनी भाभा यांना शांततापूर्ण हेतूंसाठी अणुस्फोटाचे काम जलद करण्यास सांगितले. होमी सेठना तर सांगतात की, 1965 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धादरम्यान शास्त्रींनी भाभा यांना काहीतरी विशेष करण्यास सांगितलं. त्या दिशेने काम सुरू असल्याचे भाभा म्हणाले. यावर शास्त्री म्हणाले की, तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा, पण मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय कोणताही प्रयोग करू नका.”

फोटो स्रोत, DRDO
शास्त्री आणि भाभा या दोघांचाही पंधरवड्याच्या कालावधीत मृत्यू
11 जानेवारी 1966 रोजी लाल बहादूर शास्त्री यांचं ताश्कंदमध्ये आकस्मिक निधन झालं. त्यांच्या उत्तराधिकारी इंदिरा गांधी यांना भाभा यांच्या सेवा वापरण्याची फारशी संधी मिळाली नाही. कारण इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 24 जानेवारीला विमान अपघातात भाभांचा मृत्यू झाला.
पंधरा दिवसांच्या कालावधीतच शास्त्री आणि भाभा दोघांचंही निधन झालं.
शास्त्री आणि भाभा यांच्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होत होती, हे सरकारमधील इतर कोणालाही माहिती नव्हते. कारण अणुबॉम्बशी संबंधित निर्णय लिखित स्वरूपात घेतले जात नव्हते. भाभा यांच्या निधनाने भारताच्या आण्विक धोरणाच्या निर्मितीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती.

फोटो स्रोत, THE STATESMAN
होमी भाभा यांचे बंधू जमशेद भाभा यांनी इंदिरा चौधरी यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, भाभा ज्या विमानातून आधी निघणार होते, त्याच विमानातून त्यांनी प्रवास केला नाही, हे सत्य त्यांच्या आई कधीच स्वीकारू शकल्या नाहीत.
दादाभोय लिहितात, “आर. एम. लाला यांनी मला सांगितलं की, भाभा यांनी त्यांची मैत्रीण पिप्सी वाडिया यांच्यामुळे त्यांचा प्रवास स्थगित करावा लागला होता. भाभांची आई मेहरबाई यांना याचं इतकं वाईट वाटलं की, त्यांनी आयुष्यभर पिप्सी वाडियांना माफ केलं नाही.
“पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यापेक्षा शास्त्रज्ञाच्या मृत्यूला प्राधान्य दिले जाणं, ही तशी सामान्य गोष्ट नव्हती. पण असं घडलं. ज्या दिवशी भाभांचा विमान अपघातात मृत्यू झाला, त्याच दिवशी इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र, वृत्तपत्रांनी भाभांच्या मृत्यूच्या वृत्ताला अधिक प्राधान्य दिलं होतं.”
तरुण शास्त्रज्ञांची टीम तयार केली...
25 ऑगस्ट रोजी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये भाभा यांच्या सन्मानार्थ शोकसभा आयोजित करण्यात आली होती. एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्या दिवशी काम बंद ठेवण्यास भाभांनी त्यांच्या कारकीर्दीत कायम विरोध केला. त्यांचं म्हणणं असे की, एखाद्या व्यक्तीला काम थांबवून नव्हे, तर काम अधिक जोमाने करून खरी श्रद्धांजली दिली गेली पाहिजे.
भाभा यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पाळीव कुत्रा क्युपिडने खाणंच बंद केलं आणि भाभांच्या मृत्यूच्या काही दिवसांनी त्याचाही मृत्यू झाला.
एमजीके मेनन यांच्या मते, भाभा त्यांच्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना मरण पावले. ते त्यांच्या हयातीतच दंतकथा बनले होते.
इंदिरा गांधी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले होते की, “भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या निर्णायक टप्प्यावर होमी भाभा यांचं निधन हा आपल्या देशाला मोठा धक्का आहे. त्यांची बहुआयामी बुद्धिमत्ता आणि जीवनाच्या विविध पैलूंमधील त्यांचा रस, तसंच विज्ञानाच्या प्रसारासाठीचे त्यांचे प्रयत्न आणि बांधिलकी हे कधीही विसरलं जाऊ शकत नाही.”

फोटो स्रोत, TIFR
त्यांना श्रद्धांजली वाहताना जेआरडी टाटा म्हणाले होते, “होमी भाभा हे तीन महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत, ज्यांना या जगात जाणून घेण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. त्यापैकी एक म्हणजे जवाहरलाल नेहरू, दुसरे महात्मा गांधी आणि तिसरे होते होमी भाभा.
होमी भाभा महान गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ तर होतेच, पण ते एक उत्तम अभियंता आणि निर्माते होते. याशिवाय ते एक उत्तम कलाकार देखील होते. ज्या ज्या लोकांना मी ओळखतो, आणि ज्यांचा वर मी उल्लेख केला आहे, त्यांपैकी होमी भागा एकटेच असे आहेत, ज्यांना ‘कम्प्लिट मॅन’ म्हणता येईल.”
जेव्हा भाभांचं स्वप्न पूर्ण झालं...
भाभा यांच्या निधनानंतर विक्रम साराभाई यांना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष करण्यात आलं. मात्र, ज्यांना ज्यांना हे पद ऑफर करण्यात आलं, त्यात साराभाई हे एकटेच नव्हते.
एस. चंद्रशेखर यांच्या आत्मचरित्रातील माहितीनुसार, “भाभा यांच्या निधनानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ एस. चंद्रशेखर यांना हे पद देऊ केले होते. परंतु चंद्रशेखर हे अमेरिकन नागरिक आहेत, याची त्यांना कल्पना नव्हती. नोव्हेंबर 1968 मध्ये चंद्रशेखर जेव्हा नेहरू स्मारकात भाषण देण्यास आले, तेव्हा त्यांनी पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या भेटीत त्यांनी इंदिरा गांधींना स्पष्ट केलं की, त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. त्यानंतर हे पद विक्रम साराभाई यांना देण्यात आलं.”
विक्रम साराभाई अण्वस्त्रे आणि शांततापूर्ण अण्वस्त्र चाचणी कार्यक्रमाच्या विरोधात होते. साराभाईंनी अणुकार्यक्रम विकसित करण्याच्या नैतिकतेवर आणि उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भाभा ज्या गोष्टी हिरहिरीने मांडत, त्या संपूर्ण प्रकल्पाच्या बरोबर उलट करण्यावर साराभाईंनी जोर दिला.

फोटो स्रोत, DAE
साराभाईंनी तत्कालीन कॅबिनेट सचिव धरमवीरा यांना सांगितलं होतं की, “भाभांचे उत्तराधिकारी बनणे इतके सोपे नाही. म्हणजे केवळ त्यांचे पद घेणे नव्हे तर त्यांची विचारधारा आत्मसात करणे.”
साराभाईंना होमी सेठना यांच्या विरोधाचाही सामना करावा लागला, जे स्वत:ला भाभा यांचे नैसर्गिक उत्तराधिकारी मानत असत आणि पद मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्नही केले होते.
विक्रम साराभाई यांचंही कमी वयातच निधन झालं. शेवटी होमी भाभा यांचं अणुस्फोटाचं स्वप्न राजा रामण्णा आणि होमी सेठना यांनी मे 1947 मध्ये पूर्ण केलं.











