ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी पडलेला तुकडा भारताने सोडलेल्या रॉकेटचाच भाग

ऑस्ट्रेलियात सापडलेलं उपकरण

फोटो स्रोत, Reuters

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या एका समुद्रकिनाऱ्यावर सापडलेला एक तुकडा भारताने सोडलेल्या उपग्रहाचा तुकडा असल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे.

जुलै महिन्यात पर्थ शहराच् उत्तरेला ग्रीन हेड बीचवरून 250 किमी अंतरावर हा मोठा तुकडा आढळला होता. तो तुकडा काय आहे याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात होते.

इस्रोच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं की हा तुकडा PSLV चाच एक भाग आहे.

या तुकड्याचं काय करायचं हे ऑस्ट्रेलियाने ठरवायला हवं असं इस्रोचे प्रवक्ते सुधीर कुमार म्हणाले. त्यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

ऑस्ट्रेलिया स्पेस एजन्सी (ASA) ने बुधवारी (1 ऑगस्ट) सांगितलं की हा तुकडा म्हणजे PSLV चा तुकडा असेल.

जेव्हा अशी एखादी मोहिम आखली जाते तेव्हा त्याचा कचरा समुद्रात पडेल अशी आखणी केली जाते जेणेकरून लोकांच्या जीवाचं आणि मालमत्तेचं नुकसान होणार नाही.

ASA च्या मते पुढे काय करायचं याबाबत ते इस्रोशी संपर्कात आहेत. बीबीसीने अधिक प्रतिक्रियेसाठी त्यांच्यासाठी संपर्क केला आङे.

संयुक्त राष्ट्राच्या Outer space affairs विभागाच्या नियमावलीमप्रमाणे एखाद्या परक्या देशाच्या मालकीची वस्तू त्या त्या देशाला परत करणं अनिवार्य आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तज्ज्ञांच्या मते मोहिमेच्या परीक्षणासाठी संबंधित देशाला या वस्तू परत हव्या असतात. मात्र या घटनेत भारताला या तुकड्याचा काहीही फायदा होणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे.

पश्चिम ऑस्ट्रेलियाने हा तुकडा त्यांच्या ताब्यात ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.

सध्या हा तुकडा ASA च्या ताब्यात आहे. हा तुकडा कोणत्या मोहिमेत वापरला गेला हे अद्याप स्पष्ट नाही. ग्रीन हेड समुद्रात तो किती काळ होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

तज्ज्ञांच्या मते काही महिने तो तुकडा तिथे असावा. या तुकड्यातून काही विषारी पदार्थ येतात की काय अशी चिंता सुरुवातीच्या काळात व्यक्त करण्यात आली होती. मात्र हा उपग्रहाचा तुकडा असल्याचं स्पष्ट झालं.

या तुकड्याचा कोणताही धोका नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं.

जुलै महिन्यात ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरांपैकी एक असणाऱ्या पर्थच्या उत्तरेस ग्रीन हेड बीचवर धातूपासून बनवलेली एक वस्तू आढळून आलेली होती. तेव्हापासूनच याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात होते.

समुद्रकिनाऱ्यावर आढळलेली ही दंडगोलाकार वस्तू अडीच मीटर रुंद आणि तीन मीटर लांब आकाराची आहे.

ज्या दिवशी ही वस्तू ग्रीन हेड बीचवर आढळली त्या दिवसापासून इथे राहणाऱ्या लोकांनी ही वस्तू पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

काही लोकांचे असेही म्हणणे आहे की भारताने नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान अभियानाशी याचा संबंध असू शकतो पण अशी कुठलीही शक्यता भारतीय अंतराळ संस्थेकडून लगेच फेटाळून लावण्यात आल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी आढळून आलेल्या एका विशालकाय घुमटाकार वस्तूबद्दल बोलताना भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाच्या प्रमुखांनी असे म्हटले आहे की ही यामध्ये काहीही रहस्यमय नाही.

सुरुवातीला 2014 मध्ये बेपत्ता झालेल्या MH370 या मलेशिया एअरलाईन्सच्या विमानाचे ते अवशेष असल्याचा अंदाज लावला गेला. त्यावर्षी 239 लोकांना घेऊन जाणारे हे विमान पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीपासून काही दूर अंतरावर बेपत्ता झाले होते.

मात्र यावर स्पष्टीकरण देताना या विषयातील तज्ज्ञांनी असे सांगितले की, हे अवशेष एखाद्या व्यावसायिक विमानाचा भाग नसून हा एखाद्या हिंद महासागरात कोसळलेल्या रॉकेटचा हिस्सा असू शकतो.

यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थेने यावर स्पष्टीकरण देताना केलेल्या एका विधानात म्हटले की ही वस्तू एखाद्या दुसऱ्या देशाच्या अंतराळ प्रक्षेपण वाहनातून पडलेली असू शकते.

चांद्रयान 3

फोटो स्रोत, ANI

यानंतर, ही वस्तू PSLV(Polar Satellite Launch Vehicle) ची इंधन टाकी असू शकते, असा अंदाज बांधला जात होता.

भारताची अंतराळ संस्था ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) नियमितपणे पीएसएलव्हीचा वापर अंतराळ मोहिमांसाठी करत असते.

अलीकडेच, म्हणजे शुक्रवारी चांद्रयान प्रक्षेपणात पीएसएलव्ही रॉकेटचा वापर करण्यात आला होता.

यानंतरच ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळून आलेली ही वस्तू चांद्रयान मोहिमेत वापरलेल्या रॉकेटचा हिस्सा असू शकते अशी एक नवीन चर्चा सुरु झाली. मात्र तज्ज्ञांचे असे मत आहे की वस्तू अनेक महिने पाण्यात बुडालेल्या अवस्थेत राहू शकते.

जे फोटो समोर आले आहेत तेदेखील हीच गोष्ट सिद्ध करतात कारण या वस्तूच्या पृष्ठभागावर अनेक शंखशिंपले दिसत आहेत.

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी बीबीसीला सांगितले की, याबाबत कोणतेही रहस्य नाही आणि ही एका रॉकेटचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाने याबाबत आणखीन काही माहिती प्रकाशित केलेली नव्हती.

ते म्हणाले की, ''आम्हाला माहिती आहे की पीएसएलव्हीचे काही भाग ऑस्ट्रेलियाच्या आर्थिक स्वामित्व क्षेत्राच्या बाहेरील हद्दीत असणाऱ्या समुद्रात पडले आहेत.''

इस्रोच्या प्रमुखांनी असे म्हटले की, ''ही वस्तू बराच काळ समुद्राच्या पाण्यावर तरंगत असावी आणि शेवटी ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी पोहोचली असावी.''

ते हेदेखील म्हणाले की यापासून कुणालाही कसलाच धोका नाहीये.

असे असले तरी ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की ते या वस्तूला धोकादायकच मानत आहेत त्यामुळे पोलिसांनी त्यापासून लोकांना दूर राहण्यास बजावले आहे.

काही तज्ज्ञांचे असे मत आहे की यामध्ये काही विषारी द्रव्येदेखील असू शकतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)