शनीचे 62 चंद्र सापडले; इतके दिवस हे चंद्र कुठे लपले होते?

शनीचे 62 चंद्र सापडले; इतके दिवस हे चंद्र कुठे लपले होते? जाणून घ्या 'शनीचं विश्व'

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, स्टीफन डोलिंग
    • Role, बीबीसी फ्यूचर

शनीचे 62 नवे चंद्र सापडल्याचा दावा खगोलशास्त्रज्ञांनी नुकताच केला. सगळ्या ग्रहांमध्ये शनीचे नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र सापडायला एवढा वेळ का लागला? इतके सारे चंद्र एवढे दिवस कुठे दडून बसले होते?

माणसाने आकाश निरीक्षणाला सुरुवात केली तेव्हा त्याला सर्वांत प्रथम खुणावलं चंद्राने. पृथ्वीच्या कक्षेत फिरणारा आणि तुलनेने सर्वांत जवळ असणारा हा नैसर्गिक उपग्रह आपल्या सौरमालेतला सर्वांत ठळकपणे दिसणारा चंद्र आहे. पण अर्थातच हा एकमेव नाही.

नेमके किती चंद्र सौरमालेत आहेत हे सांगणं कठीण आहे. चंद्र शोधणं हे सातत्याने असलेलं आव्हान आहे.

या वर्षी मे महिन्यात खगोलशास्त्रज्ञांनी चंद्रासंदर्भातली मोठी घोषणा केली. आपल्या सौरमालेत 'गॅस प्लॅनेट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडीधारी शनीला आणखी 62 चंद्र फेऱ्या घालत असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी जाहीर केली.

यामुळे शनीच्या ज्ञात नैसर्गिक उपग्रहांची संख्या एकदम वाढून 145 वर पोहोचली आहे. सूर्यापासून 1.3 अब्ज किलोमीटरवर कक्षेत फिरणाऱ्या शनीची त्याच्या चंद्रांच्या संख्येवरून शेजारच्या गुरू ग्रहाशी स्पर्धा सुरू आहे.

गुरू ग्रहालासुद्धा अनेक ज्ञात उपग्रह आहेत आणि त्याची यादीही नवीन उपग्रह शोधाबरोबर वाढते आहे. पण सध्याच्या नव्या आकड्यांनुसार सर्वाधिक चंद्र आहेत कडी मिरवणाऱ्या शनीलाच.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

तैवानच्या अॅकेडेमिया सिनिका इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स इथे पोस्टडॉक्टरल स्नातक म्हणून अभ्यास करणाऱ्या एडवर्ड अॅश्टन आणि त्यांच्या टीमला शनीचे हे नवे चंद्र दिसले. त्यांचा हा चंद्रांचा शोध दोन वर्षांहून अधिक काळ सुरू होता.

हवाई बेटांवरच्या मौना किआ या अत्युच्च शिखरावर ठेवलेल्या टेलिस्कोपमधून त्यांनी शनीचं निरीक्षण केलं. पण हे यश मिळालं आहे सातत्याने साडेतीनशे वर्षं सुरू असलेल्या खगोलशास्त्रज्ञांच्या शनीदर्शनातून.

एवढी वर्षं या ग्रहाचं निरीक्षण तज्ज्ञ बारकाईने करत आहेत. फक्त पृथ्वीवरूनच नव्हे तर आणखी जवळून निरीक्षण करता यावं म्हणून शनीकडे आतापर्यंत चार अवकाशयानंही धाडण्यात आली आहेत. या कुणाच्यात नजरेत हे एवढे चंद्र आतापर्यंत पडले नव्हते.

हे सगळे चंद्र एवढे दिवस शास्त्रज्ञांच्या आणि अवकाश निरीक्षकांच्या नजरेतून कसे सुटले? लांबच्या ग्रहांचे आणि त्यांच्या लांबच्या उपग्रहांचे शोध एवढे कठीण असतात का? अद्याप न सापडलेले आणखी असे किती उपग्रह अवकाशाच्या अंधारात दडलेले असू शकतात?

दिसणं दुरापास्त

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आपल्या सौरमालेत किमान 290 'नैसर्गिक चंद्र' सध्या असल्याचं समोर आलेलं आहे. पण नुसता डोळ्यांना दिसतो (अर्थात टेलिस्कोपमधून) म्हणून तो चंद्र आहे असं अधिकृतपणे मानलं जात नाही.

नव्याने सापडलेल्या चंद्रांपैकी काही अगोदरही निरीक्षकांना दिसलेले आहेत. पण इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन जोपर्यंत औपचारिकपणे नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र म्हणून मान्यता देत नाही तोपर्यंत त्याची गणना होऊ शकत नाही. आणि ही आंतरराष्ट्रीय संस्था त्यासाठी अनेक वर्षं केलेलं शास्त्रीय निरीक्षण ग्राह्य धरते.

मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात अनेक शतकांपासून आपण नेटाने अवकाश निरीक्षण करत आहोत. पण काही अवकाशीय ग्रह-तारे एवढे दूर आहेत की ते ओळखणंही पूर्वी शक्य नव्हतं.

शनीचा सर्वप्रथम शोध लागलेला चंद्र म्हणजे 'टायटन'. हा या ग्रहाचा सर्वांत मोठा उपग्रह आहे आणि तो बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे.

'टायटन'चा शोध डच खगोलशास्त्रज्ञ ख्रिस्तिआन हायजेन्सने इ.स.1655 ला लावला. त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी जीन डॉमनिक कॅसिनीने 'लॅपेटस'चा शोध लावला. नंतर 'रिया', 'डायोनी' आणि अखेर इ.स.1684 मध्ये 'टेथीस' नावाच्या उपग्रहाचा शोध लागला.

पुढे बऱ्याच वर्षांनी म्हणजे 1789 मध्ये जर्मन खगोलतज्ञ विल्यम हर्शेलने 'मायमस' आणि आयसी मून म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'एनसेलडस'चा शोध लावला.

चंद्र, शनी, विज्ञान

फोटो स्रोत, NASA/JPL/Space Science Institute

मायमस हा आपल्या सौरमालेतल्या सर्वांत छोट्या उपग्रहांपैकी एक आहे.

प्लॅनेटरी मास मून्स असं ज्याला म्हणतात त्या स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर वर्तुळाकार असणाऱ्या आणि फिरणाऱ्या तसंच तुलनेने मोठ्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या 22 उपग्रहांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा छोटा उपग्रह आहे मायरस. तो 201 किमी व्यासाएवढा लहान असला तरी हर्शेलने त्या काळच्या मूलभूत दुर्बिणीच्या साहाय्याने पृथ्वीवरून त्याला बरोबर हेरलं. म्हणजे तो फारशा आधुनिक नसलेल्या ऑप्टिकल यंत्रातून दिसू शकतो.

शनीचे इतर उपग्रह मात्र माणसाच्या नजरेत बराच काळ आले नव्हते.

अगदी इ.स.1848 पर्यंत बटाट्याच्या आकाराचा 'हायपरिअन' सापडला नव्हता. त्यानंतर 'फीबी' (Phoebe)सापडायला पुढची 50 वर्षं लागली. फीबी हा शनीचा चंद्र इतर चंद्र ज्या दिशेने शनीभोवती फिरतात त्याच्या उलट दिशेने प्रदक्षिणा घालतो.

त्यानंतर शनीचे पुढचे बरेचसे उपग्रह दिसण्यासाठी 'स्पेस एज' यावं लागलं. अंतराळशास्त्रात प्रगती झाली आणि प्रगत टेलिस्कोप निर्माण झाले तसे एवढे दिवस आपल्यासाठी अप्रकाशित असलेले शनीचे चंद्र प्रकाशात येऊ लागले.

व्हॉएजर आणि कॅसिनीसारखी अंतराळयानं अवकाशात शनीजवळ पोहोचली तेव्हा या गुंतागुंतीच्या ग्रहमालेबद्दल बरेच शोध लागले.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

1980 मध्ये 'नासा'ने सोडलेल्या व्हॉएजर1 या स्पेसक्राफ्टने मायमसच्या एका बाजूला प्रचंड मोठा खड्डा... खरं तर 'विवर' असलेलं टिपलं. 4.1 अब्ज वर्षांपूर्वी भयंकर मोठा उत्पात होऊन हे विवर पडलं होतं.

त्या वेळी मायमस जवळजवळ दुभंगायचा बाकी होता. त्यामुळे मायमसची तुलना अनेक जण स्टार वॉर्स सिनेमात दिसलेल्या एका बाजूने चेपलेल्या 'डेथ स्टार'शी करू पाहतात.

व्हॉएजर यानाने शनीसंदर्भात आणखीही काही शोध लावले. त्यामध्ये अॅटलास, प्रोमिथिअस आणि पँडोरा या शनीच्या इतर उपग्रहांचा देखील शोध लागला.

तरीही शनीच्या आत्ता ज्ञात असलेल्या चंद्रांपैकी बहुतेक सगळे नव्याने सापडलेले आहेत. 2000 सालानंतरचे हे शोध आहेत.

यामागचं कारण म्हणजे, पूर्वीच्या काळजे खगोल शास्त्रज्ञ ग्रहाचे चंद्र शोधताना एक ठराविक पद्धत वापरायचे. तुलनेने मोठे आणि ग्रहाभोवती ठराविक कक्षेत फिरणारे (ज्याला शास्त्रज्ञ रेग्युलर ऑरबिट म्हणतात)उपग्रहच लक्षात घेतले जायचे.

चंद्र, शनी, विज्ञान

फोटो स्रोत, NASA/JPL/Space Science Institute

युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबियातील कॅनडियन खगोल शास्त्रज्ञ ब्रेट ग्लॅडमन सांगतात, "तुम्ही गुरूचे चार ठळक चंद्र पाहा. त्याला गॅलेलीयन उपग्रह असं म्हणतात. तेच हे नियमित चंद्र -रेग्युलर मून. सगळ्या मोठ्या ग्रहांना असे रेग्युलर मून आहेत." शनीबद्दलच्या ताज्या संशोधनात ग्लॅडमन हे अॅश्टन यांचे सहकारी होते.

ग्लॅडमन पुढे सांगतात, "ग्रहांच्या विषुववृत्तीय समतलात ते ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालत असतात. जणू ग्रहाभोवतीचं कडं. ते आपल्या कक्षेत फिरता फिरता वायू आणि धुळीची एक चपटी तबकडी ग्रहाभोवती निर्माण करतात. असंच कडं किंवा तबकडी सूर्याभोवती ग्रह फिरताना तयार होते."

ग्लॅडमन यांच्या मते, अशी कडी निर्माण करणारे चंद्र त्या ग्रहापासून जवळच्या आणि नियमित विषुववृत्तयी कक्षेत फिरत राहतात.

ग्रह सूर्याभोवतीच्या कक्षेत फिरतात तशीच ही रचना असते, हे उघड आहे. याच तर्कावर आधारिक पूर्वीच्या खगोल तज्ज्ञांनी ग्रहांच्या चंद्रांचे किंवा उपग्रहांचे शोध लावले.

पण सगळेच चंद्र ही पद्धत पाळत नाहीत हे तथ्य नंतर उघड झालं. ग्रहांना काही अनियमित उपग्रहसुद्धा असतात जे नेहमीच्या ठराविक कक्षेत न फिरता लंबगोलाकृती आणि कललेल्या कक्षेत फिरतात. ते विषुववृत्तीय समतलाला फेरी घालतातच असं नाही. ते ग्रहापासून लांब अंतरावर असतात आणि ग्रह सूर्याभोवती ज्या दिशेने प्रदक्षिणा घालतो त्यापेक्षा वेगळ्या दिशेने ते त्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालत राहतात. शिवाय यातले बरेच आकाराने खूप लहान आहेत.

पृथ्वीवरून अशा प्रकारे सूर्यमालेतील ग्रहांचे चंद्र शोधण्यासाठी शास्त्रज्ञ फोटोग्राफिक प्लेट्स वापरत असत. हे उपग्रह जितके लहान आणि जितके अनियमित कक्षेत फिरणारे असतील तितके ते सापडणे जिकिरीचे होते. पण 1990 आणि 2000 च्या दशकात डिजिटल फोटोग्राफीमध्ये मोठी क्रांती झाली.

त्यामुळे ग्लॅडमनसारख्या शास्त्रज्ञांचं ग्रह शोधण्याचं काम एकदम वेगळ्या पद्धतीने करायला मिळालं. सीसीडी म्हणजे Charged Coupled Device सेन्सर्स डिजिटल कॅमेऱ्यात आले.

फोटोग्राफिक प्लेट किंवा इमल्शनपेक्षा ते प्रकाशासाठी कितीतरी अधिक संवेदनक्षण होते. याचा अर्थ वस्तू कितीही पुसट आणि धूसर असेल तरी ती फोटोत स्पष्टपणे दिसू शकायची.

चंद्र, शनी, विज्ञान

फोटो स्रोत, Getty Images

पण CCD वापरताना नवा प्रश्न निर्माण झाला. हे CCD सेन्सर्स खूप छोटे होते. त्यामुळे त्यांच्यातून बघतानाचं क्षेत्र आणि कक्षा खूप अरुंद आणि मर्यादित होती. "मोठे ग्रह खरोखर महाकाय आहेत. त्यांच्याभोवतीची जागा जिथे सूर्याभोवती फिरण्याऐवजी दुसऱ्या कक्षेत फिरायला मोकळीत आहे ती खूपच मोठी आहे. आकाशात बघताना तर ही जागा एवढी मोठी दिसते की सीसीडी कॅमेऱ्यांच्या मदतीने कुणीच त्या मोठ्या कक्षेत काही शोधू शकणार नाही", ग्लॅडमन सांगतात.

"1997 मध्ये मी कॅमेऱ्याच्या मदतीने मी युरेनसच्या जवळचे असे दोन पहिले उपग्रह शोधले. ग्रहाचं पृथ्वीपासूनचं सापेक्ष अंतर शोधाची सापेक्ष मर्यादा ठरवतात", असंही ग्लॅडमन यांनी सांगितलं.

त्यानंतर एक निर्णायक शोध लागला. सीसीडी मोझेक कॅमेरा. यामुळे सीसीडी सेन्सर्स एका ग्रिडमध्ये एकत्र करण्यात आले. ग्लॅडमन सांगतात, "यामुळे वाइड फील्ड व्ह्यू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि हा मार्ग सापडला त्यावेळी म्हणजे 1990 आणि 2000 च्या दशकात एकामागोमाग एक नवनवे शोध लागत गेले."

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने 2000 साली ग्लॅडमन यांनाच बरेच नवे उपग्रह सापडले. "मी दोन टेसिस्कोप्सच्या मदतीने 12 उपग्रह शोधले. मल्टी सीसीडी मोझेक कॅमेरे मोठ्या अॅपरचरच्या टेलिस्कोपमध्ये उपलब्ध होऊ लागले होते. आणि त्यामुळे तुम्हाला एकाएकी आतापर्यंत न दिसलेलं अंधारातलं अवकाश दिसू लागलं", ते म्हणतात.

चंद्र शोधण्याचं काम कष्टप्रद आहे. ग्लॅडमन सांगतात, "जुन्या काळात आम्ही एक फोटो घ्यायचो. मग तासाभराने आणखी एक आणि एक तासाने पुढचा आणि मग त्यांचा अभ्यास..." या तीन फोटोतून अवकाशात दिसणाकी वस्तू जी कदाचित चंद्र असू शकेल तिचा ठराविक दिशेने प्रवास होत आहे का हे तपासलं जायचं.

"पूर्वीच्या काळी जेव्हा मोठमोठे सीसीडी कॅमेरे नव्हते तेव्हा नुसत्या डोळ्यांनी हे काम केलं जायचं. तीन डिजिटल पिक्चर घेऊन तुम्ही रॅपिड टाइम सिक्वेन्स लावून वस्तूची हालचाल पाहिली जायची. पण त्यासाठीचे डेटासेट प्रचंड असतात. आता सगळं कॉम्प्युटर प्रोग्रॅममुळे सोपं झालं आहे. हा प्रोग्रॅम सगळ्या वस्तू शोधतो. त्यातल्या न फिरणाऱ्या किंवा अविचल वस्तू वगळून फिरणाऱ्या वस्तू शोधतो. "

तुलनेने लहान चंद्र कमी प्रमाणात प्रकाश परावर्तित करतात. त्यामुळे अशा चंद्राच्या शोधावर शिक्कामोर्तब करणं कठीण जातं. शास्त्रज्ञांनी यासाठी आता नवा दृष्टिकोन शोधून काढला आहे. मे महिन्यात ज्या शनीच्या चंद्रांचे शोध लागले त्यासाठी हे 'शिफ्ट स्टॅक' तंत्र वापरलं गेलं. हे तंत्र कॅमेऱ्यावरच्या मल्टिपल एक्स्पोजर मोडप्रमाणे काम करतं.

संशोधकांना जर चंद्र कुठे आहे आणि कुठल्या दिशेला फिरणार आहे हे माहीत असेल तर ते या फोटोंच्या सीरिजमधून चंद्राची जागा कशी बदलते ते पाहू शकतात. हे शिफ्टिंग आणि स्टॅकिंग यशस्वी झालं तर चंद्राची एक पुसटशी इमेज नक्की निर्माण करता येते.

चंद्र, शनी, विज्ञान

फोटो स्रोत, NASA/JPL/Space Science Institute

पण ही पद्धत वापरण्यासाठी आधी तुम्हाला चंद्राची जागा नेमकी माहीत असायला हवी. तसंच तो अवकाशात कुठल्या दिशेने हलणार आहे हे माहिती असेल तरच तुम्ही त्याची छबी उतरवू शकता.

जागा नेमकी माहीत नसेल तर अचानक खूप साऱ्या जागेत तुम्हाला शिफ्ट फोकस करावा लागेल आणि अपेक्षित परिणाम साधणार नाही.

खगोल शास्त्रज्ञांना वाटतं की, या समस्या प्राधान्याने सोडवायला हव्यात, त्यातून सौरमालेचा भूतकाळ उलगडायला मदत होईल. कारण ज्या काही इमेज आतापर्यंत हाती आल्या आहेत. त्यातून दिसणाऱ्या खडकाळ पुसट अस्तित्वातूनही काही क्लू मिळाले आहेत.

या नव्या चंद्रांच्या शोधातून आपल्याला बरीच खगोलशास्त्रीय माहिती मिळेल. मुळात हे चंद्र का आणि कसे निर्माण झाले याच्या अभ्यासातून आपण ब्रह्मांडनिर्मितीच्या कोड्याच्या उत्तराकडेही जाऊ शकतो, असं मत खगोल संशोधक माइक अलेक्झांडरसन व्यक्त करतात.

मायनर प्लॅनेट सेंटरमध्येमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम करणारे अलेक्झांडरसन शनीच्या नव्या चंद्रांच्या शोधामध्ये सहभागी होते. "हे उपग्रह एकसारख्याच कक्षेतून फिरणारे आहेत आणि एकत्रित राहिले आहेत याचा अर्थ ते एकाच मोठ्या अवकाश वस्तूचा भाग असले पाहिजेत, असा तर्क आहे. तो अवकाशीय गोळा फुटला आणि त्याचे हे तुकडे असावेत. अनेक वर्षं ही तुकडे पडण्याची क्रिया सुरू असावी", ते सांगतात.

डमन हेसुद्धा या प्रकारच्या गृहितकाला पुष्टी देतात. याला कोलिजन कॅसकेड असं नाव ते देतात. टक्कर किंवा धडकेच्या या मालिकेतून अधिकाधिक छोटे उपग्रह किंवा चंद्र ज्याला ते मूनलेट्स असं म्हणतात ते निर्माण झाले असावेत.

काही लाख वर्षांपूर्वी यातील एक धडक झाली असावी ज्यातून आत्ता शोध लागला ते शनीचे छोटे चंद्र निर्माण झाले असावेत, असं ग्लॅडमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाटतं.

"आम्ही जाहीर केलेल्या या नवीन शोधांमुळे शनीच्या आकाराचं वितरण खूप खोलवर आहे या कल्पनेला पुष्टी मिळते. म्हणूनच गुरू आणि शनी या सर्वाधिक चंद्र असणाऱ्या ग्रहांचा विचार करता शनी चंद्रांचा आकडा एकदम वाढू शकतो. गुरूच्या उपग्रहांबाबत हे होत नाही. कारण त्यांची निर्मिती अंतराळातील वस्तू एकमेकांवर धडकून आणि मग स्थिरावून झाली आहे", ते सांगतात.

अलेक्झांडरसन यांनी कॉयपर बेल्टबद्दलही बरंच संशोधन केलं आहे. आपल्या सौरमालेच्या अशनींच्या पट्ट्यापेक्षा जवळपास वीसपट अधिक मोठा बर्फाच्छादित थंड अंतराळकचरा जमलेला पट्टा म्हणजे हा कॉयपर बेल्ट. या बेल्टमधील 4000 वस्तू मॅप केल्याने ग्रहनिर्मितीच्या काही थेअरीच पुढे आल्या आहेत. सौरमालेत एवढे छोटे छोटे चंद्र का विखुरले आहेत याचंही उत्तर यातून मिळू शकतं. "या वितरणाचा विचार केला तर, नेपच्यून सूर्याच्या जवळ निर्माण झाला असावा. आणि मग या पट्ट्यातून बाहेर फेकला जाऊन आता विखुरला गेला असावा", ते सांगतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

खूप खूप वर्षांपूर्वी प्राचीन काळात मोठा विस्फोट होऊन हे छोटे उपग्रह विखुरले गेले असावेत आणि दूरवर अंतराळात फेकले गेले असावेत. ते अशा ठिकाणी स्थिरावले असावेत जिथे ग्रहांची गुरुत्वशक्ती आता दूरवर गेलेल्या सूर्यापेक्षा अधिक प्रभावी असली पाहिजे. पण एवढ्या दूरवरूनदेखील सूर्याचा प्रभाव असणारच, अलेक्झांडरसन स्पष्ट करतात. "स्थिर कक्षेचं टोक नेमकं कुठे आहे हा अजूनही चर्चेचा विषय आहे. पण माझ्या मते, हे नव्याने गवसलेले चंद्र ते आणखी मागे सारत असावेत. त्यातल्या एकाची कक्षा सर्वांत मोठी असल्याने तो आपल्या नजरेच्या कक्षेत आला. अजून किती आहेत ते संशोधन सांगेल."

आता उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ठोसपणे दिसू शकतील असे हे नव्याने सापडलेले चंद्र आहेत. यापलिकडे जराही पोहोचणारं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध नाही. ग्लॅडमन सांगतात, "मशीन लर्निंग AI तंत्रज्ञान वापरून आपण आता कॉम्प्युटरला डेटासेट पुरवू शकतो. मग कृत्रिम बुद्धिमत्ता नव्या चंद्राचा शोध घेऊ शकेल. हे आव्हानात्मक आहे निश्चित. पण आम्ही यावर काम सुरू केलं आहे. आत्ता अगदी काही वर्षांपूर्वी तर लोक प्रगती करू लागले आहेत."

हा आशावाद खराच असणार, कारण आता नवनवे खगोलीय शोध थांबायचं नाव घेत नाहीत. मे महिन्यात 62 नव्या चंद्रांच्या शोधाची घोषणा होतेय न होतेय तोच आणखी एक नवा चंद्र शास्त्रज्ञांना दिसला आहे.

"कालच त्याची घोषणा झाली. पण आम्ही ती प्रेसला जाहीर करू शकलो नाही. कारण या उपग्रहाची नेमकी कक्षा ठरवायला आम्हाला जमलेलं नव्हतं," अलेक्झांडरसन यांनी बीबीसीला 3 जुलै रोजी ही माहिती दिली.

"पण आता आम्ही ती कक्षा ठरवण्यात यशस्वी झालोय. आता 62 नवे 63 नवे चंद्र सापडले आहेत." अलेक्झांडरसन यांनी दिलेल्या ताज्या अपडेटनंतर आता आपल्या शनीच्या चंद्रांची संख्या 146 वर पोहोचली आहे.

चंद्र कशाला म्हणायचं?

चंद्र म्हणजे नैसर्गिक उपग्रह. हा चंद्र म्हणजे खडकाळ घन अवकाशील गोल जे त्यांच्यापेक्षा मोठ्या ग्रहांसारख्या गोलांभोवती फिरत राहतात.

पारंपरिक चंद्र हे सौरमालेतील ग्रहांभोवती (आणि लघुग्रह प्लुटोभोवती)फिरतात. पण खगोल शास्त्रज्ञांनी याशिवाय 460 पेक्षा अधिक चंद्र शोधून काढले आहेत. ते कॉयपर बेल्टमध्ये सापडलेल्या अशनी आणि इतर अवकाशीय गोलांसारख्या वस्तूंभोवती फिरतात. कॉयपर बेल्ट म्हणजे आपल्या सूर्यमालेत नेपच्यूनच्या पल्याड विसावलेला बर्फाच्छादित पट्टा.

याशिवाय शास्त्रज्ञांना काही छोटे चंद्र ज्याला मूनलेट्स म्हटलं जातं तेही शनीच्या कड्यांच्या भोवती फिरताना आढळले आहेत. ते अगदी लहान असले तरी पृथ्वीच्या संदर्भात फुटबॉल स्टेडियमपेक्षा मोठेच आहेत. हे लघुचंद्र म्हणजे मोठ्या उपग्रहाचेच तुटून पडलेले तुकडे असावेत, असं शास्त्रज्ञांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)