‘चंद्रावरील माणसांच्या पावलांचे ठसे अनंतकाळ टिकतील’, आता जाणाऱ्या माणसांचे ठसे कसे असतील?

चंद्रावरील पावलांचे ठसे

फोटो स्रोत, NASA

    • Author, रिचर्ड ग्रे
    • Role, बीबीसीसाठी

अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अपाेलाे मोहिमेला आज 50 वर्षांहून अधिक काळ लाेटला आहे. या माेहिमेतून मानवाने प्रथमच चंद्राच्या भूमीवर पाऊल ठेवलं. माेहिमेच्या इतक्या वर्षांनंतरही चंद्रावर अंतराळवीरांच्या पावलांचे ठसे कायम आहेत.

1969 ते 1972 दरम्यान चंद्रावर पाऊल ठेवलेल्या 12 अंतराळवीरांच्या पावलांचे ठसे आजही अस्तित्वात आहेत.

आणि जितकी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार सांगायचं झालं तर वारा आणि पाऊस नसल्यामुळे या पावलांचे ठसे आणखीन लाखो वर्षं चंद्राच्या पृष्ठभागावर शाबूत राहू शकतात.

आता नासा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नवीन अंतराळवीर पाठविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आता इथे देखील मानवी पावलांचे ठसे उमटून कायम राहू शकतात.

पण 50 वर्षांपूर्वी चंद्रावर उमटलेल्या पहिल्या पावलांच्या ठशांचं काय? ते अपोलो अंतराळवीरांच्या पायाच्या ठशांपेक्षा वेगळे असतील का?

नासा आणि त्यांच्या व्यावसायिक भागीदारांनी पुढच्या पिढीतील मूनबूट विकसित करण्यासाठी अनेक वर्षे घालवली आहेत. आर्टेमिस प्रकल्पाद्वारे 2025 पर्यंत चार नवीन अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवतील.

त्यांनी परिधान केलेले हे बूट अपोलो अंतराळवीरांच्या बूटांपेक्षा अद्ययावत असतील. या बुटांमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणाऱ्या या अंतराळवीरांना आराम आणि सुरक्षितता मिळेल.

त्यांना -225 (-373°F) तापमानात खूप वेळ व्यतीत करावा लागणारं असल्याने त्यांना संरक्षणाची आवश्यकता भासणार आहे. शिवाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील प्रचंड खड्डे असलेल्या भूभागावर त्यांना स्थिर राहणं आवश्यक असेल.

त्यामुळे या बूटांवर तंत्रज्ञानावर आधारित उपकरणं बसावण्यवर अभियंत्यांचा जोर आहेच. शिवाय चंद्रावर या बूटांचे ठसे कसे उमटतील यावरही तज्ज्ञांनी लक्ष केंद्रित केलं आहे. आधी म्हटल्याप्रमाणे, या पावलांचे ठसे चंद्राच्या पृष्ठभागावर शेकडो वर्षे राहू शकतात.

नासा मोहीम

फोटो स्रोत, NASA

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ज्याप्रमाणे चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवणाऱ्यांच्या पावलांचे ठसे लगेच मिळाले त्याप्रमाणे याही पावलांचे ठसे लगेचच दिसावेत यासाठी तज्ज्ञांची मोठी फळी काम करत आहे.

नासा जॉन्सन स्पेस सेंटरचे स्पेससूट डिझाइन अभियंता झॅक फेस्टर म्हणतात, या बुटांमध्ये काही मूलभूत वैशिष्ट्ये नक्कीच असतील. अंतराळवीरांच्या बुटांची रचना करण्याच्या कार्यक्रमाचे ते नेतृत्व करत आहेत.

झॅक सांगतात, या बुटांच्या सोलमध्ये 'ग्रिप' असणं आवश्यक आहे. कारण अंतराळवीरांना चंद्राच्या खडबडीत पृष्ठभागावर चांगली पकड राखणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या बूटांचं सौंदर्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण याचे ठसे चिरस्थायी स्मृतीप्रमाणे असतील.

आर्टेमिस प्रकल्पात अंतराळवीरांसाठी वापरण्यात येणारे स्पेस सूट एक्सिओम स्पेस कंपनी डिझाईन करणार आहे. ही एक व्यावसायिक अंतराळ संस्था असून त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला स्वतःची दूसरी अंतराळ मोहीम आयोजित केली होती.

या वर्षी मार्चमध्ये समोर आलेल्या नवीन स्पेस सूटचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मूनबूट. पण हे मूनबूट कसे असतील याचं तपशीलवार वर्णन नंतर प्रसिद्ध केलं जाईल.

पण या मूनबूट मध्ये कोणती वैशिष्ट्ये असावीत याबद्दल नासाने प्रकाशित केलेल्या अभ्यासातून काही माहिती मिळते.

नासा मोहीम

फोटो स्रोत, NASA

अपोलो मोहिमेच्या तुलनेत या अंतराळवीरांना ज्या तापमानाला सामोरं जावं लागणार आहे तेच मोठं आव्हान असणार आहे. कारण अपोलो मोहीम चंद्राच्या विषुववृत्तीय प्रदेशात आयोजित करण्यात आली होती.

दक्षिण ध्रुवाच्या तुलनेत हा सपाट भूप्रदेश आहे. पण आर्टेमिस-3 मोहिमेतील अंतराळवीरांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अगदीच विरुद्ध वातावरणात उतरावं लागणार आहे.

झॅक फेस्टर म्हणतात की, "दक्षिण ध्रुवावर जास्त थंड तापमान असण्याची शक्यता आहे "

या भागात हजारो वर्षं सूर्याचं दर्शन झालेलं नाही. या भागात 48 अंश केल्विन किंवा उणे 225 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असण्याची शक्यता आहे. आणि स्पेसवॉक चार ते आठ तासांपर्यंत असू शकते, त्यामुळे त्या काळात तापमानात मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात.

याचा अर्थ इन्सुलेशन महत्त्वाचं ठरणार आहे. नासा आणि एक्सिओम नवीन प्रकारच्या इन्सुलेटिंग फोम्स आणि कोटिंग्जची चाचणी करत आहेत जेणेकरुन बूटांच्या आतील तापमान आरामदायक ठेवण्यास मदत होईल.

एक्सिओम स्पेसचे रसेल रॅल्स्टन सांगतात की, "अपोलो दरम्यान अस्तित्वात नसलेलं तंत्रज्ञान आताच्या मूनबूटमध्ये वापरण्यात येत आहे."

तसंच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या अत्यंत थंड परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही बूटांच्या निर्मितीमध्ये अनेक अद्वितीय सामग्री वापरली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पण जड उपकरणं जसं की बूटमध्ये बॅटरी जोडल्याने बुटांचे वजन वाढू शकतं आणि अंतराळवीरांना चालताना ताण येऊ शकतो, असं झॅक फेस्टर म्हणतात.

नासा मोहीम

फोटो स्रोत, Axiom Space

आर्टेमिस कार्यक्रमात पहिली महिला अंतराळवीर असेल. म्हणजे बूट वेगवेगळ्या आकारात बनवावे लागतात. अपोलो कार्यक्रमातील जवळजवळ सर्व अंतराळवीर समान उंची, वय आणि वजनाचे होते हे उल्लेखनीय आहे.

आम्ही प्रत्येक व्यक्तीला बसेल असे शूज तयार करण्याचा प्रयत्न करू, असं झॅक फेस्टर यावेळी म्हणाले.

"चंद्रावर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यासाठी अंतराळवीरांना बूटांच्या प्रशिक्षणासाठी जास्त वेळ दिला जाईल. त्यांना हे बूट नीट बसत नाहीत किंवा त्यात त्यांना नीट चालायला जमत नाही तोपर्यंत त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी प्रशिक्षण दिलं जाईल.

आणि ज्यांना आरामाची आवड असते ते नेहमीच तांत्रिक दृष्टिकोनातून समाधानी असतात असं नाही. म्हणजे सहा तासांपेक्षा जास्त काम असेल तर मी स्वतः एका पायात दोन मोजे घालतो," असं फेस्टर सांगतात.

इथे आणखी एक आव्हानात्मक मुद्दा देखील आहे. चंद्राच्या असमान पृष्ठभागावर जमा होणारी धूळ वेगवेगळ्या आकाराची आणि तीक्ष्ण असते.

चंद्राचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत आहे. त्याचप्रमाणे त्या धूलिकणांवर विद्युत प्रभार असल्यामुळे धूळ सहज चिकटते. त्याचा परिणाम विद्युत उपकरणांवरही होऊ शकतो.

त्यामुळे आताचे मूनबूट अशा पद्धतीने डिझाइन केले आहेत जेणेकरून विद्युत प्रभार असणारी धूळ चिकटू नये.

नवीन मूनबूटांचे ठसे कसे असतील?

अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी जड ओव्हरबूट घातले होते. ते त्यांच्या स्पेससूटचा भाग असलेल्या मऊ बुटांच्या आवरणावर बांधलेले होते. या ओव्हरबूट्सनेच चंद्रावर पावलांचे ठसे सोडले. जेव्हा सर्व अंतराळवीर कॅप्सूलमध्ये परतले तेव्हा त्यांनी ओव्हरबूट चंद्रावरच काढून ठेवले.

सध्याच्या मोहिमेसाठी मूनबूट ओव्हरबूट म्हणून डिझाइन केले जातील की नाही हे अद्याप ठरलेलं नाही. रॅल्स्टनने या मूनबूट बद्दल सगळे तपशील उघड केले नसले तरी, त्यांनी संकेत देताना म्हटलंय की, चंद्रावर मानवाच्या परतण्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी काही प्रतिमा बुटांच्या तळव्यामध्ये लावल्या जाऊ शकतात.

पण एकच गोष्ट निश्चित आहे. चंद्रावरील पुढच्या पाऊलाचा ठसा पूर्वीसारखाच इतिहास घडवेल. अवकाश संशोधनातील हा आणखी एक मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)