इराणच्या रस्त्यावर पुन्हा एकदा गश्त-ए-इर्शाद, पण हिजाबसक्ती राबवणं ठरतंय कठीण

इराण

फोटो स्रोत, Reuters

महिलांनी हिजाब कायद्याचं पालन करावं म्हणून इराणी पोलिसांनी पुन्हा एकदा 'गश्त-ए-इर्शाद' नावाची गस्त सुरू केली आहे.

सरकारी माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, पोलिसांकडून महिलांच्या हिजाबची चौकशी सुरू करण्यात येणार आहे.

रविवारी सरकारच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, हिजाबशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 'गश्त-ए-इर्शाद' दल पुन्हा सक्रिय होईल. यावेळी पोलिस रस्त्यावर गस्त घालतील.

दहा महिन्यांपूर्वी इराणच्या तुरुंगात महसा अमिनी नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला होता. हिजाबचे नियम मोडल्याच्या आरोपावरून तिला अटक करण्यात आली होती.

अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. त्यामुळे गश्त-ए-इर्शाद तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आले.

पण ही गस्त पुन्हा सुरू करावी अशी मागणी कट्टरपंथी इस्लामिक गटांनी केली आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

इराणी कायद्यानुसार, महिलांना त्यांचे केस हिजाबने झाकणं आवश्यक आहे. याशिवाय महिला फक्त सैलसर कपडे घालू शकतात, ज्यामध्ये त्यांचे शरीर दिसणार नाही.

इराणी कायदा शरिया कायद्यावर आधारित

या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी इराणच्या गश्त-ए-इर्शाद या नैतिक पोलिस दलाकडे आहे. ज्या महिला नीट कपडे घालत नाहीत त्यांना ताब्यात घेतले जाते.

पोलिस प्रवक्ते सईद मोंटाजेरोलमहदी म्हणतात की, ज्या महिला नियमांचं पालन करत नाहीत त्यांना आधी इशारा देण्यात येईल.

त्यानंतरही त्यांनी नियम पाळले नाहीतर तर पोलिस कायदेशीर कारवाई करू शकतात.

मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 22 वर्षीय महसा अमिनी आपल्या कुटुंबासह राजधानी तेहरानला आली होती. त्यावेळी तिने हिजाब नीट घातला नसल्याच्या कारणावरून तिला गश्त-ए-इर्शादने अडवले.

त्यानंतर महसा अमिनीला तुरुंगात नेण्यात आलं जिथे ती बेशुद्ध झाली. वृत्तानुसार, अमिनीला ताब्यात घेतल्यानंतर मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमिनीच्या मृत्यूनंतर लाखो इराणी महिला हिजाबच्या नियमांविरोधात रस्त्यावर उतरल्या. इराणमध्ये कित्येक महिने हिंसक निदर्शने सुरू होती. या निदर्शनांमध्ये 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यात असे लोक सामील होते ज्यांना सरकारने फाशीची शिक्षा सुनावली होती.

आंदोलनानंतर इराणमधील अनेक महिलांनी हिजाब घालणे पूर्णपणे बंद केले. 1979 मध्ये इस्लामिक राजवट स्थापन झाल्यानंतर इराणमधील हे सर्वात मोठं आंदोलन होतं.

हल्लीच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या अनेक व्हीडिओंमधून समजतं की, महिलांनी हिजाब न घालणं सामान्य होत चाललंय.

मात्र याला प्रत्युत्तर म्हणून इराणमधील प्रशासनाने आणखीनच कडक पावलं उचलली आहेत. महिला खरेदीसाठी ज्या ज्या दुकानात हिजाब शिवाय जात होत्या ती दुकानंही प्रशासनाने बंद करून टाकली.

हिजाब कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली असली तरी, इराणमध्ये आजही कठोर इस्लामिक नियमांचे समर्थन करणारा मोठा वर्ग आहे.

अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. यात एक व्यक्ती हिजाब न घातलेल्या दोन महिलांवर दही फेकताना दिसतोय. जवळ उभ्या असलेल्या लोकांनी या व्यक्तीला विरोध केला होता. त्यानंतर या पुरुषासह दोन्ही महिलांनाही अटक करण्यात आली.

मात्र, हिजाब कायद्याची अंमलबजावणी करणं सोपं जाणार नसल्याचं इराणमधील अनेकांचं मत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना, इस्माइल विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने सांगितलं की, पुन्हा हिजाबची सक्ती करणं प्रशासनाला सोपं जाणार नाही.

"ते पूर्वीप्रमाणे या कायद्याची अंमलबजावणी करू शकणार नाहीत. कारण आता त्याचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. ते शेवटी सगळ्यांविरोधात बळाचा वापर करतील, हिंसाचार करतील. पण कायदा राबवणं शक्य होणार नाही."

गश्त-ए-इर्शाद म्हणजे काय

1979 च्या क्रांतीनंतर इराणमध्ये नैतिक पोलिस दलाचं प्रस्थ वाढलं. सध्या गश्त-ए-इर्शाद हे नैतिक पोलिसांचं नवं रूप आहे. 2006 पासून ही गस्त सुरू करण्यात आली.

बीबीसी मॉनिटरिंगच्या अहवालानुसार, 1979 च्या क्रांतीनंतर इराणमध्ये सामाजिक समस्या हाताळण्यासाठी 'नैतिक पोलिस दल' विविध स्वरूपात अस्तित्वात आले.

त्यांच्या अधिकार क्षेत्रात स्त्रियांच्या हिजाबपासून ते स्त्री-पुरुषांच्या एकत्र येण्याचे मुद्दे समाविष्ट करण्यात आले.

पण महसाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं सांगितली जाणारी सरकारी संस्था 'गश्त-ए-इर्शाद' हे नैतिक पोलिस आहेत. इराणमध्ये सार्वजनिकपणे इस्लामिक आचारसंहिता लागू करणं एवढंच त्यांचं काम आहे.

इराण

फोटो स्रोत, EPA

2006 साली 'गश्त-ए-इर्शाद'ची स्थापना झाली. ही संस्था न्यायव्यवस्था आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सशी संलग्न असलेल्या निमलष्करी दल, बासीज सोबत मिळून काम करते.

महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणच्या नैतिक पोलिस 'गश्त-ए-इर्शाद'ला 23 सप्टेंबर रोजी अमेरिकेने काळ्या यादीत टाकलं.

इराणी महिलांवरील हिंसाचार आणि शांततापूर्ण आंदोलकांच्या हक्कांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कोषागार विभागाने या निर्बंधांची घोषणा केली होती.

महसा अमिनीच्या मृत्यूनंतर डिसेंबर 2022 मध्ये, इराणच्या प्रॉसिक्यूटर जनरलने एका धार्मिक परिषदेदरम्यान गश्त-ए-इर्शाद विसर्जित करण्याची घोषणा केली होती.

मात्र इराणच्या कठोर हिजाब कायद्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता हे पोलीस दल पुन्हा सक्रिय झालं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)