'तुम्ही माझ्या डोळ्याला गोळी मारलीत, पण माझं हृदय अजूनही धडधडतंय'

गझल म्हणते, की मी एका डोळ्याने मिळालेलं स्वातंत्र्य पाहीन

फोटो स्रोत, GHAZAL RANJKESH

फोटो कॅप्शन, गझल म्हणते, की मी एका डोळ्याने मिळालेलं स्वातंत्र्य पाहीन

(सूचना- या बातमीतले काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतात.)

एक तरुणी हॉस्पिटलच्या एका बेडवर पडून विव्हळते आहे. दुखण्याने तिला बेजार केलंय. तिच्या उजव्या डोळ्यावर बँडेज बांधलंय, तर तिचा डावा डोळा बंद आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इराणच्या मशहाद शहराजवळ निषेध सुरू होता. या निषेधात सहभागी झालेल्या इलाही तावोकोलियन या पीएचडीच्या विद्यार्थिनीवर इराणी सुरक्षा दलांनी गोळ्या झाडल्या.

गोळी तिच्या उजव्या डोळ्याला लागल्यामुळे तिला आपली दृष्टी गमवावी लागली.

या घटनेच्या तीन महिन्यांनंतर तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराचा व्हीडिओ पोस्ट केला.

त्या पोस्टमध्ये ती लिहिते की, "तुम्ही माझ्या डोळ्यावर गोळी झाडलीय, मात्र माझं हृदय आजही धडधडतंय. माझी दृष्टी हिरावून घेतल्याबद्दल धन्यवाद, या प्रसंगामुळे आज सगळ्यांचे डोळे उघडलेत."

"भविष्यात चांगले दिवस येतील या आशेवर मी आनंदाने जगत राहीन. पण तुमची मनं दिवसेंदिवस खोल अंधारात ढकलली जातील."

"लवकरच मला काचेचा डोळा मिळेल आणि हे काम केल्याबद्दल तुम्हाला पदक मिळेल."

एक डोळा गमावल्यानंतर इलाहेने इराण सोडलं. तिच्या डोळ्यात लागलेली गोळी काढण्यासाठी तिला इटलीला जाऊन ऑपरेशन करावं लागलं.

तिने हॉस्पिटल मध्ये असताना एक व्हीडिओ पोस्ट केला होता. यात ती म्हणते "हे सगळं सांगण्यासाठी मी जगेन."

ऑपरेशननंतर बीबीसी पर्शियनशी बोलताना ती म्हणाली की, हे प्रकरण भविष्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यासाठी ती प्रयत्न करेल.

इलाहीसारख्या अनेकांवर गोळ्या झाडण्यात आल्या

इराणमधील आंदोलकांनी आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, इराणमधील आंदोलकांनी आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सप्टेंबर महिन्यात महसा अमिनी या तरुण कुर्दिश महिलेचा कोठडीत मृत्यू झाला. या तरुणीने हिजाब घातला नसल्यामुळे तिला शिक्षा झाली होती. तिच्या मृत्यू नंतर हजारो लोक इराणी सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले.

आजही हे आंदोलन सुरूच आहे.

ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सीच्या मते, सरकारचा निषेध करणाऱ्या सुमारे 20 हजार लोकांना अटक करण्यात आली, तर 500 लोक यात मारले गेले.

बऱ्याच तरुणांवर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यातून त्यांना अंधत्व आलंय.

इराणचे पोलीस प्रमुख ब्रिगेडियर जनरल हसन करमी यांनी हे आरोप फेटाळून लावलेत.

ते म्हणाले की, पोलिसांवर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.

इलाही

फोटो स्रोत, ELAHE TAVOKOLIAN

फोटो कॅप्शन, इलाही

गझल रंजकेश ही कायद्याची विद्यार्थीनी आहे. नोव्हेंबरमध्ये दक्षिण इराणमधील बंदर अब्बास या शहरात तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

21 वर्षीय गझल ही पहिली व्यक्ती होती जिने या अत्याचाराबाबत उघडपणे बोलण्यास सुरुवात केली. तिने सोशल मीडियावर या संबंधी पोस्ट केली होती.

हॉस्पिटलमधून शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये तिच्या उजव्या डोळ्यातून रक्तस्त्राव होताना दिसत आहे. पण तरीही तिने हसत हसत ‘विक्ट्री साईन’ दाखवलं होतं.

'मोठ्या आवाजापेक्षा डोळे जास्त बोलतात'

तिचा व्हीडिओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. इराणी अधिकारी तरुणांना कशा पद्धतीने लक्ष्य करतात हे परदेशात राहणाऱ्या लोकांनी पाहिलं.

व्हीडिओ अपलोड करताना गझलने लिहिलं होतं की, "माझ्यावर गोळ्या झाडताना तुम्ही का हसलात?"

पण या व्हीडिओमध्ये वैद्यकीय कर्मचार्‍यांचा आवाजही ऐकू येत असल्याने नंतर तो डिलिट करण्यात आला.

त्यानंतर तिने वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवायला सुरुवात केली.

गझल रंजकेश

फोटो स्रोत, GHAZAL RANJKESH

फोटो कॅप्शन, गझल रंजकेश

अशा प्रकारची दुखापत झालेल्यांना ते एकटे नसल्याची जाणीव झाली. या घटनेतून सावरण्यासाठी त्यांनी ऑनलाईन मदत घ्यायला सुरुवात केली.

गझलने इंस्टाग्रामवर लिहिलं होतं की, "कोणत्याही मोठ्या आवाजापेक्षा डोळे जास्त बोलतात."

नुकताच तिने आणखीन एक फोटो पोस्ट केलाय. प्रथमदर्शनी तो फोटोशूटसाठी काढलेला फोटो वाटतो. पण त्याकडे बारकाईने पाहिल्यास त्याचे दोन पैलू समोर येतात.

गझलने या फोटोसोबत कॅप्शनही दिलंय. ती लिहिते की, "या वेदना असह्य आहेत, पण मी त्याच्यासोबत जगायला शिकेन. मी माझं आयुष्य जगेन कारण माझी गोष्ट संपलेली नाही. आम्हाला विजय मिळालेला नाही, मात्र तो जवळ आहे."

आता तिला कृत्रिम डोळा बसविण्यात आलाय. या डोळ्याची सवय व्हावी म्हणून केलेल्या धडपडीविषयी ती लिहिते की, चेहऱ्यावरच्या जखमांची आता मला सवय झाली आहे आणि त्याचा अभिमान आहे.

शेवटी ती लिहिते की, "मी एका डोळ्याने स्वातंत्र्य पाहीन."

'स्वातंत्र्यासाठी मी माझ्या डोळ्याचं बलिदान दिलंय याचा मला अभिमान आहे.'

असे किती जखमी?

मोहम्मद फरजी

फोटो स्रोत, MOHAMMAD FARZI

फोटो कॅप्शन, मोहम्मद फरजी

इराणमध्ये असे किती जखमी आहेत याचा निश्चित आकडा कोणालाच माहीत नाही.

उपचार घेतानाच अटक होईल या भीतीमुळे कित्येक आंदोलकांनी वैद्यकीय मदत घेतलेली नाही.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान तेहरानमधील तीन रुग्णालयांमध्ये 500 जखमींवर उपचार करण्यात आले होते.

वय वर्षं 32 असलेल्या मोहम्मद फरजी या स्ट्रीट परफॉर्मरला देखील डाव्या डोळ्यात गोळी लागली होती.

तो म्हणतो, "गोळी लागलीय याची मला खंत नाही. स्वातंत्र्यासाठी मी माझ्या डोळ्याचं बलिदान दिलंय आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे."

धोका असूनही तो हॉस्पिटलमध्ये गेला. त्याचा डोळा वाचवता आला असता पण पैशाअभावी ऑपरेशन राहिलं. आणि त्याने उपचार घेणंही थांबवलं.

मोहम्मद सांगतो, "मुख्य मुद्दा आर्थिक, मानसिक आणि वैद्यकीय मदतीचा होता."

त्याने त्याच्या उपचारांवर 2,500 डॉलर्स म्हणजेच दोन लाख रुपयांहून अधिक खर्च केल्याचं सांगतो.

मोहम्मद फरजी

फोटो स्रोत, MOHAMMAD FARZI

फोटो कॅप्शन, मोहम्मद फरजी

डॉ. मोहम्मद जाफर हे नेत्रतज्ज्ञ आहेत. ते सांगतात की, एका डोळ्याने अंध असलेले आंदोलक समाजात ठळकपणे उठून दिसतील.

व्हायरल झालेल्या एका व्हीडिओमध्ये ते म्हणतात, "जोपर्यंत या तरुणांचा मृत्यू होत नाही तोपर्यंत ते इराणमध्ये घडलेल्या घटनेचे साक्षीदार असतील."

स्ट्रीट परफॉर्मर असलेल्या मोहम्मद फरजीने ऑनलाईन मिळालेली मदत मैत्रीत बदलायला हवी म्हणून भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली.

यातूनच त्याने 900 किलोमीटर प्रवास करून इलाहीची भेट घेतली. यावेळी त्याच्यासोबत एक डोळा गमावलेली कोसर आफ्तेखारी सुद्धा होती.

या भेटीचा एक फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.

यात तो लिहितो, "आम्हाला वेदना, दु:ख आणि आघात या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे माहिती आहेत. त्यामुळे एकमेकांना साथ देण्याशिवाय आम्ही दुसरं काही करू शकत नाही."

इलाहीने देखील ऑपरेशन नंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात तिने मोहम्मद आणि कोसर यांनी भेट घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानलेत.

तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटलंय, "माझ्या जखमेतून आशा फुलत राहील."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)