तिला हात नाही, त्याला पाय नाही; प्रेमाच्या ताकदीवर जिंकलं पॅरालिम्पिकमध्ये पदक

- Author, लेसया केसारचुक
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, युक्रेन
युद्धातील वीरकथा, साहसकथा अनेकदा चर्चिल्या जातात. मात्र रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना एक अत्यंत विलक्षण प्रेम कहाणी फुलली आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेला, एखाद्या कादंबरीला शोभून दिसेल अशी ही मधुर आणि त्याचबरोबर प्रेरणादायी प्रेमकथा आहे.
जन्मत:च एक हात नसलेली एका पॅरालिम्पिक अॅथलीट एका पाय गमावलेल्या सैनिकाच्या प्रेमात पडते आणि त्यामुळे त्या दोघांचंही आयुष्य बदलून जातं, बहरून जातं. त्या अद्भूत प्रेमकथेविषयी...
"त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी पॅरालिंपिकमध्ये कधीच पदक जिंकू शकले नसते," असं मारिया श्पातकिवस्का (Maria Shpatkivska) म्हणतात.
मारिया (Maria) आणि त्यांचे पती एवजेन बक्शा (Evgen Buksha), दोघेही एकमेकांना पाहता क्षणीच प्रेमात पडले होते. त्यानंतर नऊ महिने डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं.
मारिया 24 वर्षांच्या असून त्यांच्यात जन्मत: एक अपंगत्व होतं. त्यांना डावा हाताचा काही भाग नव्हता. यावर्षी पॅरिसमध्ये झालेल्या पॅरालिंपिक गेम्समध्ये त्यांनी पदार्पण केलं होतं आणि पदापर्णातच गोळाफेकीत रौप्यपदक पटकावलं होतं.


एवजेन हे युक्रेनच्या सैन्यातील एक सैनिक आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरच्या सुरूवातीच्या काळात युक्रेनच्या लुहान्स्क प्रांतात झालेल्या लढाईमध्ये एवगेन जखमी झाले होते.
त्यात एका बॉम्बस्फोटात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना एक पाय गमवावा लागला.
मारिया आणि एवजेन, दोघांची भेट एका ऑर्थोपेडिक केंद्रात झाली होती. तिथे मारिया एक पुनर्वसनतज्ज्ञ म्हणून काम करत होत्या. जखमी झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या लोकांचं मनोधैर्य वाढवून, त्यांना मार्गदर्शन करून पुन्हा जगण्याची नवी उमेद द्यायचं त्यांचं काम होतं.
मारियाचं बालपण
मारिया फक्त आठ वर्षांच्या असताना त्यांचा खेळांच्या दुनियेशी परिचय झाला. त्यांच्या गावातील एका स्थानिक प्रशिक्षकामुळे त्या खेळांशी जोडल्या गेल्या.
ते प्रशिक्षक अनेक वर्षांपासून शारीरिक अपगंत्व असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेल्या खेळाडूंना प्रशिक्षण देत होते. त्यांनी मारिया मधील क्षमता पाहिली. त्यांनी मारियाला पोहण्याकडे लक्ष देण्यास सांगितलं.

"मी पोहण्यास सुरूवात केली. मात्र त्यानंतर स्थानिक जलतरण तलाव दुरुस्तीसाठी म्हणून खूप काळ बंद पडला. त्यामुळे मग मी अॅथलेटिक्सकडे वळण्याचं ठरवलं," असं मारिया सांगतात.
सुरूवातीला मारिया यांनी धावणं आणि भालाफेकीसाठी प्रयत्न केले. तेव्हापासून त्यांचा बहुतांश वेळ जिममध्ये व्यायाम करण्यात आणि स्टेडिअम मधील स्पर्धांमध्ये भाग घेण्यात गेला.
मारिया झाल्या पुनवर्सन तज्ज्ञ
वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत मारिया एक प्रसिद्ध अथॅलीट झाल्या होत्या. तोपर्यंत त्यांनी युक्रेनमधील आणि युरोपमधील सर्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप जिंकल्या होत्या.
कृत्रिम अवयव बदलण्यासाठी आणि तो जुळवून घेण्यासाठी मारिया मध्य युक्रेनमधील विनीत्सिया इथं असणाऱ्या ऑर्थोपेडिक केंद्रात जायच्या.
त्यांच्या या अनुभवामुळे विशिष्ट प्रकारचे सिम्युलेटर्स कशा प्रकारे वापरायचे याचं मार्गदर्शन करण्यासाठी देखील त्यांना बोलावलं जात होतं. नंतर जेव्हा युक्रेन युद्ध सुरू झालं, तेव्हा पुनर्वसन केंद्रात रुजू होण्या विषयी त्यांना विचारण्यात आलं.
"मी जेव्हा पहिल्यांदाच ऑर्थोपेडिक सेवा केंद्रात काम करण्यासाठी आले, तेव्हा तिथे मला फक्त 19 वर्षांच्या तरुण सैनिकांचे दोन्ही पाय कापलेले पाहायला मिळाले. ही गोष्ट माझ्यासाठी धक्कादायक होती," असं मारिया म्हणतात.
"खेळांच्या स्पर्धांमध्ये मी शारीरिक अपंगत्व असलेल्या लोकांना भेटले आहे. मात्र ही गोष्ट माझ्यासाठी नवीनच होती. कालांतरानं मला त्याची सवय झाली," असं त्या पुढे म्हणतात.

पुनवर्सनतज्ज्ञ म्हणून मारिया, जखमी झालेल्या सैनिकांशी खेळांबद्दल बोलतात.
त्या सैनिकांना कृत्रिम अवयव असलेल्या खेळाडूंचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ दाखवतात. त्यात ते खेळाडू त्यांच्या अपंगत्वावर मात करून धावताना, उड्या मारताना आणि भालाफेक करताना दिसत असतात.
इतरांना पाहिल्यावर, अपंगत्वावर मात करणाऱ्या खेळाडूंना पाहिल्यावर, सैनिकांना देखील प्रेरणा मिळते, नवी उर्मी मिळते असं मारिया यांना वाटतं. त्या देखील अशाच प्रकारे प्रेरित झाल्या होत्या.
2018 च्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये मारियानं गंभीर सेरेब्रल पाल्सी (cerebral palsy)झालेल्या अॅथलीट्सना धावताना पाहिलं होतं. या गोष्टीचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला होता.
(सेरेब्रल पाल्सीमध्ये शरीराच्या हालचाली नीट करता येत नाहीत. हा आजार जन्मत:च असतो. यात मेंदूची वाढ व्यवस्थित न झाल्यानं किंवा मेंदूला अपाय झाल्यामुळे स्नायूंवर नियंत्रण ठेवण्याची क्षमताच कमी झालेली असते.)
त्यामुळेच इतरांना याप्रकारे जिद्दीनं संघर्ष करताना पाहिल्यास त्या केंद्रातील सैनिकांनाही तशीच प्रेरणा मिळेल असं मारिया यांना वाटत होतं.
मारिया यांनी सेरेब्रल पाल्सी झालेल्या या खेळाडूंना जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना प्रेरणा मिळाली. त्यातून हाताचा कृत्रिम भाग न घालण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली.
मारिया आणि एवजेन यांची पहिली भेट
मारियाची एवजेन यांच्याशी पहिली भेट तिच्या रुग्णांबरोबर बिलियर्ड्स खेळत असताना झाली. ऑर्थोपेडिक केंद्रानं रुग्णांसाठी आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमात ही भेट झाली होती.
युद्ध आणि स्वत:च्या दुखापतींबद्दल बोलत असताना त्या दोघांचे सूर लगेचच जुळले.
एवजेन आधी मशीनचं उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात इलेक्ट्रिशियन होते. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युद्ध सुरू झाल्यावर ते सैन्यात भरती झाले होते.
फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनमधील लुहान्स्क प्रांतात बॉम्बस्फोट झाल्यानंतर छर्रे लागून ते जखमी झाले होते. त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती.

लुहान्स्क हा युक्रेनच्या पूर्वेकडील प्रांत रशियाच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे युद्धाच्या सुरूवातीच्या काळात इथेच लढाया झाल्या होत्या.
एवजेन यांना तो प्रसंग चांगलाच आठवतो. जखमी झाल्यानंतर एवजेन यांच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे रक्तस्त्राव रोखण्यासाठी असणारी खास पट्टी (tourniquet)त्यांनी पायाला बांधली होती.
त्या तशाच अवस्थेत ते दहा तासांपेक्षा जास्त काळ पडून होते. त्यांना तिथून हलवता आलं नव्हतं. कारण रशियाचे ड्रोन त्या भागात सातत्यानं वरून घिरट्या घालत होते.
कित्येक तास तशाच जखमी अवस्थेत पडून राहावं लागल्यामुळे एवजेन यांच्या जखमी पायावर वेळेवर उपचार झाले नाहीत. परिणामी त्यांना त्यांचा पाय कायमचा गमावावा लागला.
प्रेम आणि लग्न
मारिया आणि एवजेन यांची पहिली भेट झाल्यानंतर तीन महिन्यांनी एवजेन त्याच ऑर्थोपेडिक केंद्रात उपचार घेण्यासाठी दाखल झाले, जिथे मारिया काम करत होत्या.
मारिया यांनी लगेचच एवजेन यांच्या पुनवर्सन तज्ज्ञाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर या दोघांमधील नातं पटकन घट्ट होत गेलं.
एवजेन यांची चिकाटी, दयाळूपणा आणि प्रामाणिकपणा पाहून मारिया त्यांच्यावर मोहित झाल्या. त्याचवेळी त्यांचा उत्साह, ऊर्जा आणि आत्मविश्वासा यामुळे एवजेन देखील मोहित झाले.
आपलं नातं कसं फुलत होतं, याबद्दल मारिया सांगतात.
"आम्ही दोघे सोबत पायी फिरायला जायचो. अनेकदा एकमेकांकडे टक लावून पाहत राहायचो. एक हात नसलेली तरुणी, एका पाय नसलेल्या, काठी टेकत चाललेल्या माणसाबरोबर चालायची," असं मारिया सांगतात.

"मला जन्मत:च हात नव्हता. त्यामुळे लोकांचं आपल्याकडे पाहणं, लोकांच्या नजरा या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास मी फार पूर्वीच शिकले होते. मात्र एवजेनसाठी ही गोष्ट कठीण होती. कारण त्यांची जखम अजून ताजी होती."
"एकदा ते म्हणाले होते: मला पाय नाही, मी चालू शकत नाही."
त्यावर मी उत्तर दिलं होतं, "मग काय झालं!" "मलाही हात नाही."
आपली दुखापत, पायाची जखम याचं मारियाला ओझं होत नाही या गोष्टीच्या जाणीवेनं एवजेन प्रभावित झाले होते. त्यामुळे लवकरच त्यांनी मारियाला मागणी घातली.
पॅरालिंपिक पदक विजेती
कृत्रिम पायाचा वापर करून एवजेन यांनी सायकलिंगला सुरूवात केली. यासाठी त्यांना मारिया कडून मोठं प्रोत्साहन मिळालं. मारियानं जेव्हा एवजेन यांना पॅरालिंपिक स्पर्धेत भाग घेण्याच्या आपल्या जुन्या स्वप्नाबद्दल सांगितलं, तेव्हा एवजेन त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
मारिया वर्षाच्या सुरूवातीपासून त्यासाठी सराव करत होत्या, प्रशिक्षण घेत होत्या. त्यांनी परदेशात क्रीड शिबिरात महिनाभर भाग घेतला होता. त्यांच्या या मेहनतीमुळे, जिद्दीमुळे अखेर आपलं स्वप्न पूर्ण होत असल्याचं त्यांना जाणवलं.
पॅरालिंपिकच्या दोन आठवडे आधी, मारिया यांना सराव करताना पाठीला दुखापत झाली होती. मात्र त्यामुळे पॅरालिंपिक स्पर्धेत भाग घेऊन पदक जिंकण्याच्या त्यांच्या दृढनिश्चयावर काहीही परिणाम झाला नाही.
"माझ्याकडे युक्रेनचा एक झेंडादेखील आहे. या झेंड्यावर माझ्या सैनिक रुग्णांच्या सह्या आहेत. त्यावर माझ्या पतीची देखील सही आहे. तो झेंडा कायम माझ्याजवळ असायचा. या झेंड्यानं मला लढण्याची आणि सावरण्याची जिद्द, ऊर्जा दिली," असं मारिया म्हणतात.
आणि त्यांनी खरोखरच जिद्द दाखवली.

आपल्या आयुष्यातील पहिल्या वहिल्या पॅरालिंपिक स्पर्धेत मारियानं अंतिम फेरीत धडक मारली. इतकंच नाही तर 12.35 मीटर लांब गोळाफेक करत रौप्यपदक देखील पटकावलं.
आता इथेच न थांबता पुढची भरारी घेण्याचे मारिया यांचे बेत आहेत. त्या आता सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी तयारी करत आहेत.
2025 च्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेऊन जोरदार कामगिरी करून दाखवण्याची जिद्द मारिया यांनी बाळगलेली आहेच. त्यासाठी त्या जोमानं सराव देखील करत आहेत.
मात्र आता सध्या त्यांनी त्यांच्या पतीबरोबर वेळ घालवण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यांचे पती हेच त्यांचे सर्वात मोठे चाहते आणि खंदे पाठिराखे बनले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











