'बॉम्बवर पाय पडला आणि अंधत्व आलं, पण धावण्याच्या शर्यतीनं माझं आयुष्य वाचवलं'

पदकांसह वली नूरी.

फोटो स्रोत, वली नूरी

फोटो कॅप्शन, अंधत्व आल्यानंतर वलीनं धावण्यासाठी 21 आणि पोहण्यासाठी 3 पदकं मिळवली आहेत.

वाली नुरी हा 2009 मध्ये अफगाणिस्तान येथे ब्रिटिश आर्मीसाठी दुभाषी म्हणून काम करत होता. त्याच काळात एका स्फोटकावर पाय पडल्याने झालेल्या स्फोटात वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्याला पूर्ण अंधत्व आलं.

लहानपणापासून वालीला रनिंग (धावायला) खूप आवडायचं. विशेषतः काबूल मधील डोंगरांवर; परंतु त्या घटनेनंतर आपण पुन्हा कधीही धावू शकणार नाही असं त्याला वाटलं. मात्र, त्यानंतर युकेमध्ये स्थायिक होण्याचा योग आला आणि आपलं संपूर्ण आयुष्य कसं बदलून गेलं हे तो स्वतः सांगतोय...

"कदाचित माझं मरण मला स्वीकारावं लागेल याचा काहीसा अंदाज मला होता...

काबूलमध्ये लहानाचा मोठा होत असताना मला बॉक्सिंगची फार आवड होती. मी एक उत्तम बॉक्सर होतो. त्यासाठी स्वतःला सुदृढ ठेवण्याच्या उद्देशाने मी धावत असे.

पुढील शिक्षणासाठी मला युनिव्हर्सिटीत जावे लागणार होते. परंतु माझ्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने मी ते करू शकलो नाही. कारण माझ्या कुटुंबाची जबाबदारीही माझ्यावरच येऊन पडली.

वडील काही कारणास्तव काम करू शकत नव्हते. मला पाच बहिणी आणि चार भाऊ अशी भावंडे आहे. यामुळे मी वयाच्या 18 व्या वर्षी ब्रिटिश आर्मीमध्ये दुभाषी आणि सांस्कृतिक सल्लागार म्हणून रुजू झालो.

मी शाळेत असताना इंग्रजी शिकलो होतो व त्यात मी निपुण होतो. ब्रिटिश आर्मीत रुजू झाल्यावर माझे काम हे अफगाणी सैन्य, स्थानिक रहिवासी व ब्रिटिश आर्मी यांच्यात भाषेचा अडथळा येऊ न देता संवाद घडवून आणणं हे होतं. हे अतिशय जोखीमीचं काम होतं.

त्यानंतर मला हेलमंड प्रांतात जाण्यासाठी विचारणा करण्यात आली. तेथे माझ्या जीवाला धोका होऊ शकतो हे माहित असूनदेखील मी तेथे जाण्यासाठी होकार दिला

ग्राफिक्स

ते अतिशय विचित्र जग होतं. रोजच्या रोज छुपे हल्ले आणि त्यात मरणारी माणसं बघणं विदारक होतं. तरीही मी खचलो वा घाबरलो नाही.

एव्हाना मी तेथे रुजू होऊन दोन वर्ष होत आली होती आणि त्या दरम्यान एकदा गस्त घालत असताना माझा पाय एका स्फोटकावर पडला.

मी अचानक हवेत दूरवर जोरदार उंच फेकलो गेलो आणि तितक्याच गतीने जमिनीवर आदळलो. मला वाटलं कदाचित माझं जीवन संपलं. परंतु तसं घडलं नाही. माझा संपूर्ण चेहरा छिन्नविछिन्न झाला होता.

या घटनेत मी माझे सगळे अठ्ठावीस दात गमावले. माझा श्वासोच्छवास जवळपास थांबला होता तरीही हिंमत एकवटून मी घशातून अडकलेला स्फोटकाचा तुकडा काढला.

त्यानंतर मला काहीही दिसलं नाही. मला तेथून बाहेर काढण्यात आलं व काबूलमध्ये आर्मी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं . तेथे मी दोन आठवडे कोमात होतो.

पण ती एक नवी सुरूवात होती

मी जगू शकेन अशी डॉक्टरांना अजिबात खात्री नव्हती. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा बोलू शकत नव्हतो. मला डॉक्टरांना माझे नाव लिहून दाखवावे लागले. त्यानंतर डॉक्टरांनी माझ्या कुटुंबीयांना व मित्रांना माझ्यासोबत घडलेली हकीकत कळवली.

माझे पालक मला जेव्हा ह्या घटनेनंतर प्रथमच भेटायला आले तेव्हा त्यांच्यासाठी हे सगळं पचवणं फार कठीण होतं. त्यांना अजून दुःख होऊ नये म्हणून मी चेहऱ्यावर स्मित आणत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागलो. तरीही मला बोलता मात्र येत नव्हतं.

त्यानंतर मला बग्राम हॉस्पिटल व हवाईतळ येथे हलवण्यात आलं. तेथे असलेल्या अमेरिकेन्सने माझ्या चेहऱ्यावरच्या जखमा, फ्रॅक्चर्स इत्यादी बरे करण्याचा प्रयत्न केला. मी घशातून नळीच्या साहाय्याने श्वास घेत होतो.

मी तेथे जवळपास महिनाभर राहिलो. डोळ्यांची दृष्टी परत येण्यासाठी मी भारत आणि पाकिस्तान येथील काही हॉस्पिटलच्या वाऱ्या देखील केल्या पण ते शक्य झालं नाही. हे सगळं कठीण होतं.

आयुष्याचा तो एक कठोर काळ होता. मला धावायला प्रचंड आवडत होतं. परंतु, आता आपले धावण्याचे दिवस संपले असं मला वाटलं

वली नूरी.

फोटो स्रोत, Wali Noori

फोटो कॅप्शन, काबूलमध्ये लहानाचे मोठे होत असताना वली यांना धावण्याची आवड होती.

मी अविवाहित होतो आणि अगोदर कुटुंबासमवेत राहत होतो. आपले आता आयुष्यात पुढे कसे होणार? आपल्याशी कुणी लग्न करेल की नाही अशा अनेक चिंता मला भेडसावू लागल्या.

परंतु 2012 मध्ये माझं लग्न जमलं. त्या दिवसापासून माझी पत्नी हा माझा सगळ्यात मोठा आधार बनली.

वली नूरी

फोटो स्रोत, Wali Noori

फोटो कॅप्शन, वली यांना जीवनात प्रचंड संघर्षाचा सामना करावा लागला.

तिने मी आधारासाठी वापरत असलेली सफेद काठी फेकून दिली आणि 'आजनंतर मीच तुझी काठी आहे' असे म्हणत मला मोठा आधार दिला.

जेव्हाही मी दुःखाने व्यथित होतो, त्या क्षणी ती माझी समजूत काढते. आपल्याला तीन मुलं आहेत, आपण किती नशीबवान आहोत असं ती मला धीरापोटी समजावून सांगते.

युकेमध्ये स्थायिक झालो आणि धावण्याचं स्वप्न पुन्हा पाहता आलं

मी अफगाणिस्तानमध्ये असताना माझ्या अपंगत्वामुळे काम करू शकत नव्हतो. ब्रिटिश आर्मीने मला वर्षभराचा पगार देऊ केला होता. पण पुढे काय? हा विचार सतावत होता.

शिवाय अफगाणिस्तानमध्ये दुर्बल लोकांसाठी कोणत्याही विशेष सुविधा नसल्याने तेथे उदरनिर्वाह करणे कठीण होते.

प्रिन्स हॅरी यांच्यासह वली नूरी.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रिन्स हॅरी यांना भेटणं हा माझ्या आयुष्यातला मोठा क्षण होता, असं वली सांगतात.

2014 मध्ये, दोन वर्ष अनेक अटी पूर्ण केल्यावर ब्रिटिश सरकारने मला युकेमध्ये कुटुंबासह स्थायिक होण्यास पात्र ठरवलं.

त्यानंतर आम्ही कोलचेस्टर येथे स्थायिक झालो ते पुन्हा कधीही मागे वळून न बघण्यासाठी. इथे मी स्वतःला अतिशय सुरक्षित समजतो.

ही एक छान जागा असून मला अनेक मित्र-मैत्रिणी मिळाले. विशेषत: कोलचेस्टर हरियर म्हणून रनिंगक्लबमध्ये.

इथे मला मी पुन्हा धावू शकतो याची जाणीव झाली. इथे गाईड रनर्स असल्याने मला माझे एक स्वातंत्र्य, मानसिक स्वास्थ्य पुन्हा मिळालं.

जखमांमुळे मला भयंकर डोकेदुखी जाणवते परंतु धावताना हे सगळं विसरायला होतं.

द ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्सबरोबर वलीची मुलं.

फोटो स्रोत, Wali Noori

फोटो कॅप्शन, द ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्सना भेटून वलीच्या मुलांना आनंद झाला.

इन्व्हिक्ट्स गेम्समध्ये निवड होण्यासाठी मी पाच वर्ष वाट पाहिली आणि अभिमानाने मागच्या सप्टेंबरमध्ये युकेचं प्रतिनिधित्व केलं. मी त्यात 100 मी, 200 मी, 400 मी, 1500 मीटरमध्ये चार सुवर्णपदके पटकावली. मी तेव्हा प्रिन्स हॅरी आणि मेगन यांना भेटलो. त्यांच्यात अतिशय मित्रभाव आणि सौहार्द आहे.

हॅरीने मला शेकहॅन्ड केलं तेव्हा समोर नेमकं कोण आहे ते मला कळलंच नाही. कोण आहे ते समजलं तेव्हा आम्ही हसलो आणि गप्पा मारल्या.

हा माझ्या आयुष्याचा अतिशय अविश्वसनीय असा क्षण होता.

मी अंधत्वासमोर कधीही झुकणार नाही

माझ्याकडे आता रनिंगमध्ये 21 आणि स्विमिंगमध्ये 3 मेडल्स आहेत. मला आता आयुष्यात कधीही मागे वळून बघायचं नाहीये. मी नेहमी स्वतःत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आणि खचून जाणार नाही याची काळजी घेतो.

माझे स्वप्न एक दिवस पॅरा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे आहे. यावेळी मी त्यात पात्र होण्याच्या अनेक निकषात बसत होतो, परंतु माझ्याकडून अर्ज करण्याची अंतिम तारीख टळली. पण मी एकदिवस तिथे नक्की जाईन.

स्पर्धेत धावताना वली नूरी
फोटो कॅप्शन, धावण्यामुळं जीव वाचला असं वली नूरी सांगतात.

मला प्रमुख अशा सहा मॅरेथॉनमध्ये देखील भाग घ्यायचा आहे. अगोदर त्या 2019 मध्ये लंडन येथे पार पडल्या होत्या.

मी नुकतेच माझ्या आयुष्यावर एक पुस्तक देखील लिहिले आहे जे येत्या 12 सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे.

त्या पुस्तकाचे नाव, "15 years to the day I went blind" असे आहे.

मी अनेक शाळा, कॉलेज, विविध ग्रूप्स येथे माझी गोष्ट सांगायला जातो. मी युक्रेनमध्ये जखमी झालेल्या आर्मीतील अनुभवी सैनिकांना नुकतेच भेटलो.

मुलांसह वली नूरी

फोटो स्रोत, Wali Noori

फोटो कॅप्शन, वलीच्या मुलांना वडिलांच्या यशाचा अभिमान आहे.

मला मिळालेल्या भाषणाचे पैसे मी अफगाणिस्तान येथील विधवा महिला आणि अनाथ मुले यांच्यासाठी पाठवतो.

माझ्यासोबत ब्रिटिश आर्मीत जे घडलं, ज्या कामासाठी मी तेथे रुजू झालो होतो त्याची मला कधीही खंत नसेल.

माझ्यासाठी आयुष्य हे आधी फार खडतर होतं आणि आता ते बऱ्याच अंशी सुरळीत सुरू आहे. मी माझ्या अंधत्वासमोर कधीही झुकणार नाही.

मला लोकांना नेहमी या गोष्टीची प्रेरणा द्यायची आहे.

दुर्बलता तुम्हाला कधीही तुमचं ध्येय साध्य करण्यापासून रोखू शकत नाही."