लामिन यमाल आणि निको विल्यम्स, स्पॅनिश फुटबॉल सुपरस्टार बनलेली स्थलांतरित कुटुंबातील मुलं

फोटो स्रोत, Reuters
- Author, डेरिओ ब्रूक्स आणि मार्गारिटा रॉड्रिग्स
- Role, बीबीसी न्यूज
स्पेनच्या फुटबॉल संघातले निको विल्यम्स आणि लामिन यमाल यांचं नातं अगदी सख्ख्या भावंडांसारखं.
निको शुक्रवारी (12 जुलै) 22 वर्षांचा झाला आणि लामिन 13 तारखेला 17 वर्षांचा होणार आहे. दोघंही अफ्रिकेतील स्थलांतरितांच्या कुटुंबातील. दोघंही स्पेनसाठी मॅचविनर म्हणून ओळखले जातात.
इंग्लंडच्या विरुद्ध युरो कपच्या अंतिम सामन्यात या दोघांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीत स्पेननं जॉर्जियाचा 4-1 नं पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्या सामन्यात दोघांनी अतिशय चमकदार कामगिरी केली होती. उपांत्य फेरीत लामिनने एक ऐतिहासिक गोल केला आणि स्पेनला 2-1 असा विजय मिळवून दिला. युरो कपमध्ये गोल करणारा तो सर्वांत तरुण खेळाडू ठरला आहे.
मैदानाशी नाळ हे स्पेनच्या यशाचं रहस्य आहे. स्पेनचं आता चौथ्यांदा विजेतेपदावर लक्ष आहे.
मैदानाच्या बाहेरही ते एकमेकांचे उत्तम मित्र आहेत. टिकटॉकवर ते कोरिओग्राफी करताना दिसतात. त्यांना वेगळं करताच येणार नाही. स्थलांतरामुळं देशाची जी ओळख बदलली आहेत, त्याची ही दोघं प्रतिकं आहेत.
“ही दोघं स्पेनसाठी अभिमानाचा विषय आहेत आणि त्यांनी नवीन स्पेनमध्ये एक सकारात्मक बदल आणला आहे,” असं युरोपियन विद्यापीठातले लीडरशीप अँड कम्युनिकेशन विषयाचे प्राध्यापक मॉईस रुईझ यांनी बीबीसी मुंडोला सांगितलं.
“या दोघांच्याही कुटुंबाला बरंच सहन करावं लागलं आहे. ही दोघं म्हणजे नम्रपणा आणि प्रतिभेचे उदाहरणं आहेत,” असं ते पुढे म्हणाले.
पण या दोन्ही सुपरस्टार्सची गोष्ट काय आणि ते सुपरस्टार्स कसे झाले?

चांगल्या जीवनाच्या शोधात
निको आणि त्याचा भाऊ इनाकी विल्यम्स यांचा जन्म स्पेनमध्ये झाला. तिथेच ते लहानाचे मोठे झाले.
त्यांची गोष्ट म्हणजे आशा, स्थलांतर, त्रास, कष्ट, जिद्द, कणखरपणा यांचा मेळ.
त्यांची आई मारिया गर्भवती असताना त्यांनी नवरा फेलिक्स यांच्याबरोबर घाना सोडलं. तेव्हा इनाकी त्यांच्या पोटात होता. 1994 साली एका चांगल्या जीवनाच्या शोधात ते युरोपात गेले.
त्यांचा बहुतांश प्रवास सहारा वाळवंटातून झाला.
सीमा ओलांडून ते मेलिया या स्पेनच्या भागात पोहोचले असं इनाकीने स्पॅनिश प्रसारमाध्यमांना सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
“आम्ही लोक एका युद्धजन्य भागातून पळून आलो आहोत आणि आम्ही लिबेरिया मधून आलो आहोत असं सांगायला सांगितलं होतं. बरीच वर्षं आम्ही तिथूनच आलो असं अनेकांना वाटायचं. त्यावेळी मी एक ख्रिश्चन विद्यार्थी होतो आणि स्थलांतरितांच्या कार्टियास केअर या गटात होतो,” असं इनाकीनं बीबीसी मुंडोला सांगितलं.
त्यावेळी धर्मगुरू आणि आता सामान्य व्यक्ती असलेले, तसंच मार्कस डि वॅलिडेसिलिया हॉस्पिटल येथील कॅथलिक रिलिजियस सर्व्हिस येथे काम करणाऱ्या मार्डोन्स यांनी सांगितलं की, "त्यावेळी सरकारनं जे स्थलांतरित मेलिलिला भागात होते त्यांना स्पेनच्या वेगवेगळ्या भागात पाठवलं होतं.
“निकोचे पालक कार्टियास डे बिलाबोतून बिलाबो येथे आले. मला इंग्लिश येत असल्यामुळे मला त्यांनी ग्रुपमध्ये घेतलं,” असं ते पुढे म्हणाले.
'हा माझा सन्मान'
मार्डोन्स मारिया गरोदर असताना एकदा त्यांची चौकशी करायला गेला होता. तेव्हा तिने सांगितलं की, 'तिला अस्वस्थ वाटतंय.'
मार्डोन्स यांनी पुढचा मागचा विचार न करता मारियाला रुग्णालयात नेलं. लवकरच तिला एक मुलगा झाला. त्याचं नाव इनाकी असं ठेवण्यात आलं.
“जे मूल जन्माला येणार आहे त्याला तुमचं नाव देणार आहे का? असं विचारणं हा खूप मोठा सन्मान आहे. त्यानंतर या मुलाने जे यश मिळवलं ते खास आहे.”
“आमच्यात फरक कळावा म्हणून आमच्या आईने आम्हाला इनाकी मोठा आणि इनाकी छोटा अशी नावं दिली. मी त्यांना जेव्हा मागच्या वर्षी भेटलो तेव्हा सांगितलं की, हा इनाकी आता खऱ्या अर्थाने मोठा झाला आहे,” ते हसत सांगत होते.

फोटो स्रोत, Inaki Mardones
आठ वर्षांनी 2002 साली विल्यम्स यांचा लहान मुलगा निकोचा जन्म झाला.
“आमच्या आई-वडिलांनी आमच्यासाठी जे केलं आहे ते मी कधीच विसरू शकणार नाही. ते योद्धे आहेत, त्यांनी आमच्यात सन्मानाची, कष्टाची भावना पेरली आहे. तेही अशा वेळी जेव्हा तुम्हाला कोणीच विचारत नव्हतं,”असं निकोने स्पेनच्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
“खरंतर माझ्या पालकांचा मला खूप गर्व वाटतो. त्यांनाही माझा गर्व वाटावा यासाठी मी सगळं काही करायला तयार आहे,” असं तो म्हणाला.
भाऊ, संपूर्ण प्रवासाचा साक्षीदार
चांगली नोकरी मिळून कुटुंबाला आधार देता यावा यासाठी फेलिक्स विलियम्स लंडनला शिफ्ट झाले. त्यांनी तिथे टेबल स्वच्छ केले, सुरक्षारक्षक म्हणून काम केलं. अगदी चेल्साच्या फुटबॉल क्लबच्या स्टेडिअमवरही त्यांनी हे काम केलं.
जेव्हा ते घरापासून दहा वर्षं दूर होते तेव्हा इनाकी हा निकोसाठी वडिलांसारखा होता. मारिया यांनी कुटुंबासाठी एका वेळी तीन नोकऱ्या केल्या.
मोठा भाऊ निकोला शाळेतून घेऊन यायचा आणि त्याला खायला द्यायचा. जर चांगला खेळाडू म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर त्याने कसं वागायला हवं याचेही धडे दिले.

फोटो स्रोत, Getty Images
“माझ्यासाठी तो सर्वस्व आहे,” असं निको इनाकीबद्दल सांगतो. “त्याच्यामुळे माझ्या पालकांना आणि मला खायला मिळालं, क्लासला जायला मिळालं, चांगले कपडे मिळाले.
“आमचं खूप छान जमतं. तो माझा भाऊ असला तरी तो कधीकधी माझ्या वडिलांसारखा वागतो.”
28 एप्रिल 2021 ला ते दोघंही फुटबॉलर झाले. अथलेटिक बिलबाओ वि. रिअल वॅल्डोलिड (निकाल 2-2) या सामन्यातून त्यांनी फुटबॉलमध्ये प्रवेश केला.
निकोसारखा इनाकी स्पेनसाठी खेळत नाही. आपल्या मातीला आपण काही देणं लागतो या भावनेतून तो घानासाठी खेळतो.
'लामिन स्टार होणार हे माहिती होतं'
लामिनच्या पालकांनीही अफ्रिकेतून स्थलांतर केलं आहे.
त्याचे वडील मोनिर नारसॉई यांचा जन्म मोरोक्कोमध्ये झाला. तर त्याची आई शीला इबाना या ग्विना देशातील आहेत. ते बार्सिलोनाच्या बाहेरील भागात राहिले.
“ज्या क्षणी तो जन्माला आला तेव्हाच आम्हाला माहिती होतं की तो स्टार होणार आहे,” असं त्याच्या वडिलांनी पत्रकारांना युरो कपच्या अंतिम फेरीच्या आधी अभिमानानं सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
तो लहान होता तेव्हाच तो फुटबॉलमधील सार्वकालिक श्रेष्ठ खेळाडू लिओनेल मेस्सीला भेटला होता. अर्जेंटिनाचा हा खेळाडू तेव्हा फक्त वीस वर्षांचा होता आणि युनिसेफच्या एका कार्यक्रमाला आला होता. बार्सिलोना फुटबॉल क्लबमध्ये त्याने लामिनबरोबर फोटो काढला होता.
“हा त्याच्या आयुष्यातला योगायोग आहे की, त्याने लामिनला आशीर्वाद दिला,” असं लामिनचे वडील मिश्कील पद्धतीने सांगतात.
उज्ज्वल भविष्य
त्याची प्रतिभा पाहून त्याला बार्सिलोनाला नेण्यात आलं आणि ला मॅसिया इथं त्याला प्रवेश मिळाला. ते बर्का क्लबचं क्लबहाऊस होतं. मेस्सीचं प्रशिक्षणही तिथेच झालं होतं. लामिनला तिथे राहणं, खाणं, शिक्षण आणि फुटबॉल प्रशिक्षण सगळ्याची सोय झाली.
मग तो एकामागे एक विक्रम करू लागला. तो बार्सिलोनासाठी खेळणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. तेव्हा तो 15 वर्षं 290 दिवसांचा होता. 16 वर्षं 57 दिवसांचा असताना तो स्पेनसाठी खेळणारा आणि गोल करणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला आणि या स्पर्धेत गोल करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला.

फोटो स्रोत, JOAN MONTFORT/AP
या प्रसिद्धीशिवाय कधीही गोल साजरा करताना रोकाफोंडा कायम त्याला आठवतं. ते त्याचं शेजार होतं. तो बोटाने कायम 304 हा आकडा काढतो. हा आकडा त्या जागेचा झिप कोड होता. यमाल त्याच्या मुळांना घट्ट धरून आहे.
अगदी भावासारखे
स्पेनच्या या टीममध्ये निको आणि लामिन हे एकमेकांचे अतिशय घट्ट मित्र आहेत. निको हा लामिनसाठी मोठ्या भावासारखा आहे. इनाकी जसा त्याच्याशी वागतो तसाच निको लामिनशी वागतो.
“एकाच टीममध्ये एकत्र हसतखेळत राहणारे, आनंदी असणारे, मूल्यांची जाण असणारे खेळाडू असणं हे खेळण्याइतकंच महत्त्वाचं आहे,” असं स्पॅनिश वर्तमानपत्र स्पोर्टचे संचालक जोन वॅलिस बीबीसी मुंडोशी बोलताना म्हणाले.
ते जे काही करतात ते सगळं वैशिष्ट्यपूर्ण झालं आहे. त्यांचा डान्स, ला रोजा बरोबर गोल केल्यावर आनंद व्यक्त करणं हे सगळं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
राष्ट्रीय टीमच्या निवडीच्या वेळी मार्चमध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली, ब्राझील आणि कोलंबियाविरुद्ध मैत्री सामने होण्याच्या आधी ही भेट झाली तेव्हा कोच लुईस दे फनेटे यांनी निकोला लामिन यमालकडे विशेष लक्ष द्यायला सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
निकोने या 16 वर्षीय खेळाडूला मार्गदर्शन करण्यास मान्यता दिली.
निको जसा इनाकीशी बोलतो त्याच धाटणीचा संवाद या दोघांचा अनेकांना वाटतो. मात्र निकोसाठी हे वेगळं आहे. “मी त्याला आधीच सांगितलं आहे की त्याला माझ्याकडून शिकायचं आहे,” निको हसत हसत सांगतो.
मार्डोन्स म्हणतात, “ज्या लोकांना नवं आयुष्य सुरू करावं लागलं किंवा पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी या दोघांची कहाणी म्हणजे खेळ आणि रोजच्या जगण्यासाठीसुद्धा आदर्शवत आहे.”











