'मार खाल्ला, लोकांची भांडी घासली, बिस्किटांवर भूक भागवली; पण फुटबॉलपटू झालेच'

अंजू तुरंबेकर

फोटो स्रोत, ANJU TURAMBEKAR

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"मी दुसरीत होते तेव्हापासून शेतात कामाला जायचे. घरच्यांना वाटायचं की मुलींना शिकण्याची गरजच काय? त्यामुळे मग शेतीत मदत करणं, म्हशी राखायला रानावनात भटकणं अशी कामं अगदी लहान असतानाच करत होते. ही सगळी कामं करत आणि शाळेतल्या मुली खेळतात ते लंगडी, धावण्याची स्पर्धा, खो-खो असे खेळ खेळत मी शिक्षण घेत होते."

"घरच्यांचा माझ्या शिकण्याला विरोध असल्यामुळे माझ्यासाठी तो काळ प्रचंड संघर्षाचा होता. शाळेतून घरी परतायला उशीर झाल्यावर वडिलांचा बेदम मार ठरलेला असायचा.”

“अशातच नववीत असताना शाळेच्या भिंतीवर एक पोस्टर पाहिलं आणि माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. ते पोस्टर होतं गडहिंग्लज शहरातल्या 'मास्टर्स स्पोर्ट्स क्लब'चं. त्यांना मुलींची फुटबॉल टीम बनवायची होती. मला फुटबॉलची तशी काही माहिती नव्हती, करोडो भारतीयांप्रमाणे मलाही क्रिकेटच आवडायचं पण मी फुटबॉलच्या मैदानावर पाय ठेवला आणि मला माझ्या दुःखांपासून जणू कायमची सुटका मिळाली, फुटबॉलमध्ये मला माझा आनंद गवसला होता...."

ही गोष्ट आहे अंजू तुरंबेकर यांची. आपल्या आजवरच्या प्रवासातले अनुभव त्या सांगत होत्या.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यात असणाऱ्या बेकनाळ या छोट्याशा गावातल्या अंजू तुरंबेकर आज आशियाई फुटबॉल महासंघाच्या 'अ' श्रेणीच्या प्रशिक्षक बनल्या आहेत.

भारतीय फुटबॉल महासंघासोबत तळागातील घटकांपर्यंत फुटबॉल पोहोचवण्यासाठी त्यांनी सहा वर्षे काम केलं आहे.

आशियाई फुटबॉल महासंघाच्या ग्रासरूट डेव्हलपमेंट समितीवर सदस्य म्हणून निवडली जाणारी पहिली भारतीय महिला म्हणूनही अंजू तुरंबेकर यांना ओळखलं जातं.

गोव्यातला अत्यंत प्रतिष्ठित फुटबॉल क्लब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेम्पो क्लबच्या त्या तांत्रिक संचालक (टेक्निकल डायरेक्टर) राहिल्या आहेत. एखाद्या पुरुष संघाच्या टेक्निकल डायरेक्टर झालेल्या अंजू या पहिल्याच महिला होत्या.

अंजू तुरंबेकर

फोटो स्रोत, ANJU TURAMBEKAR

फोटो कॅप्शन, अंजू तुरंबेकर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

फुटबॉलमध्ये या सगळ्या महत्वाच्या पदापर्यंत त्यांना पोहोचवलं ते त्यांच्या फुटबॉलवर असणाऱ्या निखळ प्रेमाने. देशातल्या फुटबॉल महासंघाचा एक भाग होण्यापूर्वी अंजू तुरंबेकर महाराष्ट्राच्या महिला फुटबॉल संघाच्या कर्णधार राहिल्या होत्या.

लहानपणापासूनच अंगात असलेली चिकाटी, जिद्द आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे अंजू तुरंबेकर यांनी आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाचा हसत हसत सामना केला. सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये महिलांचा फुटबॉल विश्वचषक सुरु आहे. भारत या विश्वचषकाच्या चर्चेत कुठेही नसला तरी भारतात फुटबॉल खेळणाऱ्या मुली काही कमी नाहीत.

ईशान्येकडील राज्ये, कोलकत्ता, मुंबई, चेन्नई एवढंच काय तर महाराष्ट्राच्या कोल्हापुरातही शेकडो मुली फुटबॉल खेळत असतात.

हे सगळं असलं तरी जगाच्या तुलनेत भारतीय महिला फुटबॉल खेळाडूंना हा खेळ खेळत असताना किंवा या खेळात करियर करत असताना नेमक्या कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, भारतीय महिला फुटबॉलची नेमकी परिस्थिती काय आहे आणि एकीकडे जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा सुरु असताना भारतीय महिला खेळाडूंचा झगडा नेमका काय आहे या प्रश्नांची उत्तरं बेकनाळ गावातल्या अंजू तुरंबेकर यांच्या गोष्टीतून सापडतील.

कठीण बालपण, शिक्षणाचा संघर्ष

"मी लहान असल्यापासूनच वेगवेगळ्या गोष्टी करत असायचे. शाळेतल्या मोठ्या मुलांची बाईक चालवायला शिकणं, वेगवेगळे खेळ खेळणं मला आवडत होतं. पण घरी मात्र प्रचंड कडक वातावरण होतं. मी साधं कोणत्याही मुलाला बोलताना जरी दिसले तरी प्रचंड मार बसायचा.

त्यामुळे शाळेतून घरी परतायला उशीर झाला किंवा बस मिळाली नाही तर घरी जाऊन मार खाण्याची मानसिक तयारी मला आधीच करावी लागायची. मी चौघा भावंडांमध्ये लहान होते. त्यामुळं घरातलं वातावरण अगदीच कठोर होतं," स्वतःच्या बालपणाबद्दल सांगताना त्यांचा आवाज जड झाला होता.

अंजू यांचं प्राथमिक शिक्षण बेकनाळमध्येच पूर्ण झालं पण पुढच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं. मात्र त्यांना तिथे शिकायला पाठवण्याची घरच्यांची अजिबात तयारी नव्हती.

गडहिंग्लजला पाचवीला जाण्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत एक तडजोड करावी लागली आणि ती तडजोड म्हणजे शिकायला जायचं असेल तर पहाटे चार वाजता उठून शेतात जावं लागेल, शेतातली सगळी कामं करावी लागतील आणि मग त्यांना शिकायला गडहिंग्लजला जाता येईल.

हे करून लहानपणी अंजू शाळेत तर जाऊ लागल्या पण त्यांना शिक्षणापेक्षा खेळच जास्त आवडायचे. 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे अशा स्पर्धांमध्ये अंजू जिंकू लागल्या होत्या.

पोस्टर पाहिलं आणि

नववीत आल्यावर त्यांनी शाळेच्या नोटीस बोर्डावर एक कागद चिकटवलेला पाहिला. त्या छोट्याशा शहरात फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या काही पोरांनी 'मास्टर्स स्पोर्ट्स क्लब' नावाने एक क्लब सुरु केला होता.

त्या क्लबला मुलींची फुटबॉल टीम बनवायची होती. ते पोस्टर पाहिलं आणि अंजू थेट मैदानावर पोहोचल्या. खरंतर फुटबॉल म्हणजे काय हे त्यांना त्यावेळी माहीतही नव्हतं. त्यांना क्रिकेट आवडायचं पण अखेर त्या तिथे गेल्या आणि पायात बूटही नसताना त्यांनी पहिल्यांदाच फुटबॉलला स्पर्श केला.

आधीपासूनच वेगवेगळे खेळ खेळत असल्याने अर्थातच फुटबॉल साठी लागणारी चिकाटी आणि शारीरिक क्षमता त्यांच्यामध्ये एव्हाना तयार झाली होती. त्यामुळे सगळ्यांनाच त्यांचा खेळ आवडू लागला मात्र मास्टर्स स्पोर्ट्स क्लबमध्ये सराव करणंदेखील त्यांना कितीतरी महागात पडणार होतं.

याबाबत बोलताना अंजू म्हणतात की, "रोज शाळा सुटल्यानंतर सराव करायला लागायचा. त्यामुळे अर्थातच घरी परत जायला उशीर व्हायचा. मी फुटबॉल खेळतेय हे काही घरी सांगू शकत नव्हते. पण शेवटी व्हायचं तेच झालं आणि माझ्या फुटबॉल खेळण्याबद्दल घरी कळलं. त्यानंतर वडिलांनी मला बेदम मारलं, तू पोरांचा खेळ का खेळतेस, गावातले लोक चर्चा करायला लागलेत, तू वाया चाल्लीयेस असं म्हणून अंगावर वळ उमटेपर्यंत मला मार खावा लागला.

मात्र मी काही फुटबॉल सोडला नाही. मी शाळेतून पळून जाऊन का होईना पण फुटबॉल खेळू लागले. कारण या रोजच्या मारहाणीपासून, घरातल्यांच्या भेदभावापासून मला फुटबॉलने थोड्या प्रमाणात का होईना मुक्त केलं होतं. माझ्या दुःखाने ओतप्रोत भरलेल्या आयुष्यात फुटबॉल हाच एकमेव आनंद होता. त्यामुळे मी फुटबॉल खेळत राहिले."

अंजू तुरंबेकर

फोटो स्रोत, ANJU TUMBEKAR

एकदा तर त्यांच्या वडिलांनी मास्टर्स स्पोर्ट्स क्लबच्या शिक्षकांनाच येऊन दटावलं होतं. "माझ्या पोरीला का बिघडवताय?" असं म्हणून त्यांनी प्रचंड शिवीगाळ केली होती.

याबाबत बोलताना अंजू म्हणतात की, "माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला अनेकांनी कसलीही अपेक्षा न ठेवता, मनात कसलेही वाईट भाव न ठेवता मदत केली आहे.

मास्टर्स स्पोर्ट्स क्लबमधल्या रियाज मुजावर, विजय थोरात आणि अण्णाप्पा गाडवी यांनी माझ्या वडिलांचं प्रचंड बोलणं खाऊनही कधीच तक्रार केली नाही. त्यांना माझं फुटबॉल खेळणं आवडायचं आणि त्यामुळं त्यांनी मला सराव करू दिला. माझ्या शाळेतल्या चौगुले सरांनी तर केवळ मी फुटबॉल खेळते म्हणून शाळेत मुलींचा एक फुटबॉल सामना आयोजित केला होता. त्याच सामन्यात मी माझा पहिला गोल केला."

...आणि मुंबईचा 'कॉल' आला

गडहिंग्लजच्या या क्लबमध्ये फुटबॉल खेळत असताना तिथून तब्बल चारशे किलोमीटर दूरवर असणाऱ्या मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या अंडर 19 महिला फुटबॉल संघाची निवड असल्याचे अंजू तुरंबेकर यांना कळलं. त्यांच्यासोबत फुटबॉल खेळणाऱ्या, त्यांचं फुटबॉल खेळणं माहित असणाऱ्या प्रत्येकाला असं वाटायचं की त्यांनी मुंबईला जायला हवं.

पण पुन्हा त्यांना मुंबईला पाठवायला घरचे लोक मात्र तयार नव्हते. त्यामुळे मग अक्षरशः कुटुंबासोबत भांडून अंजू मुंबईला गेल्याच.

त्याबाबत सांगताना अंजू म्हणतात की, "बेकनाळ सारख्या छोट्या गावातल्या एका पोरीसाठी मुंबईला जाणं म्हणजे स्वप्नच असतं. मी सुद्धा मुंबईला घाबरत घाबरतच गेले. तिथं सगळं इंग्रजाळलेलं वातावरण पाहून घाबरून गेले. फुटबॉल खेळायला तर येत होता पण या सगळ्यांसारखं बोलायला येत नव्हतं त्यामुळे थोडी भीती वाटत होती.

आमचे कोच संतोष कश्यप यांनी मात्र आम्हा गावाकडून आलेल्या मुलींना आपलंस करून घेतलं. भाषांतर करून माहिती समजावून सांगितली आणि मी माझी चाचणी दिली. अखेर महाराष्ट्राच्या अंडर-19 संघात निवडही झाली. महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याची बातमी पेपरमध्ये आली. आम्हाला राष्ट्रीय स्पर्धेसाठी आसामला जायचं होतं. मग मला वाटलं की आतातरी माझ्या घरचे खुश होतील. पण कशाचं काय, काहीच बदललं नाही."

अंजू तुरंबेकर

फोटो स्रोत, ANJU TUMBEKAR

त्यांच्या शॉर्ट्स घालण्यावरून, मुलांचा खेळ खेळण्यावरून घरी वाद सुरूच होते. महाराष्ट्राच्या संघात निवड होऊनही कुटुंबात मात्र त्याचं काहीच कौतुक होत नव्हतं. अशातच अंजू दहावीत असताना पुन्हा एकदा वरिष्ठ संघाच्या निवडीसाठी त्यांना मुंबईला जावं लागलं.

दहावीत नापास झालीस तर तुझं लग्न लावून देऊ अशी धमकी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती आणि फुटबॉलमुळे अभ्यासाकडे तर दुर्लक्ष झालंच होतं. त्यामुळे नापास होण्याची भीती त्यांच्या मनात होती.

मग झालं असं की परीक्षा दिल्यानंतर त्यांची निवड चाचणी होणार होती. तेव्हा 15-16 वर्षांच्या असणाऱ्या अंजूने ठरवलं होतं की जर निवड झालीच तर घरी परतायचंच नाही.

तिथे निवड तर झाली पण योगायोगाने अंजू दहावीच्या परीक्षेत पास झाल्या आणि पुन्हा बेकनाळला परत आल्या.

आणि पोलीस भरती सोडून अंजू पळून आल्या

अकरावीत अंजू तुरंबेकर महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधार बनल्या होत्या, चार राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. आता त्यांच्या वडिलांना आणि कुटुंबाला असं वाटत होतं की राष्ट्रीय स्पर्धा खेळलीच आहेस तर पोलिसात भरती हो.

याबाबत बोलताना अंजू सांगतात की, "आमच्या घरची आर्थिक परिस्थिती काही बरी नव्हती. त्यामुळे आता मुलगी एवढी शिकलीच आहे तर तिचं एकतर लग्न लावून द्या किंवा नोकरीला लावा अशा मानसिकतेत माझे कुटुंबीय होते. त्यामुळे मग मला त्यांनी कोल्हापूरला पोलीस भरतीला पाठवलं. राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळं तिथे ग्राउंड अगदी आरामात क्लिअर झालं त्यानंतर मग दिसेल तो माणूस म्हणू लागला की आता अंजू पोलीस झालीच म्हणून समजा.

आता केवळ लेखी परीक्षा बाकी होती. एकीकडं माझी पोलीस भरती सुरु होती आणि दुसरीकडं गुजरातला राष्ट्रीय स्पर्धा होत्या. मी लेखी परीक्षा दिली असती तर माझ्या आयुष्याचा मार्गच बदलला असता. मी खूप विचार केला आणि लेखी परीक्षा सोडून गावी परत आले. माझी बॅग भरली आणि बेकनाळ ते कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून मुंबईमार्गे थेट अहमदाबादला पोहोचले."

"मी घरी याबाबत कुणालाही सांगितलं नव्हतं त्यामुळं त्यांना वाटलं की मी एखाद्या मुलासोबत पळूनच गेले. मी मुलासोबत तर पळून आले नव्हते पण मी आता घरी कधीही न परतण्याचा निर्णय घेतला होता."

अंजू तुरंबेकर

फोटो स्रोत, ANJU TURAMBEKAR

"गुजरातला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ उपविजेता ठरला. एकीकडे चांगली कामगिरी केल्याचा आनंद होता तर दुसरीकडे आता नेमकं कुठे परत जाणार हा प्रश्न होता. तिथे आमच्या टीमच्या प्रशिक्षकांनी विचारलं की पुण्यात येऊन फुटबॉल खेळणार का?

त्यांना मी माझी संपूर्ण परिस्थिती सांगितली आणि मला शिक्षणही घ्यायचंय असं म्हणाले. त्या सरांनी माझी राहण्याची सोय केली आणि पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये मला पदवीसाठी प्रवेशही मिळवून दिला आणि पुण्यातल्या विद्यापीठात सराव सुरु केला."

ग्लुकोज आणि पाण्याशी गट्टी

पुण्यात फुटबॉल खेळत असताना अंजू तुरंबेकर यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न होताच त्यामुळे मग त्या जिथे राहायच्या तिथे शेजाऱ्यांची भांडी घासणे, पेट्रोल पंपावर काम करणे अशी कामे करून त्या स्वतःचं पोट भरू लागल्या.

पुण्यातल्या अनुभवाबाबत बोलताना त्या म्हणतात की, "पुण्यात खायचे काय हा प्रश्न नेहमी असायचा, जवळ पैसेही नसायचे. माझी पूजा राणी नावाची एक पंजाबी मैत्रीण होती ती माझ्यासाठी आवर्जून डबा घेऊन यायची पण ज्या दिवशी ती आली नाही त्यादिवशी ग्लुकोज बिस्कीट पाण्यात बुडवून मी खायचे आणि माझी भूक शांत करायचे. अवघड दिवस होते ते."

दुसऱ्या देशांमध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना मिळणारं पोषण, इतर सुविधा अंजूंच्या नशिबी कधी नव्हत्याच. भारतासाठी फुटबॉल खेळण्याचं स्वप्न कायम मनात असलं तरी थोडेफार पैसे कमावणे गरजेचं होतं. त्यामुळे अंजू नोकरीच्या शोधात होत्या.

मॅजिक बस आणि मुंबईत पुनरागमन

अंजू तुरंबेकर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना 'मॅजिक बस' नावाच्या एका जागतिक एनजीओने त्यांना मुंबईला येऊन नोकरी करण्याची संधी दिली. त्या संस्थेमध्ये वंचित घटकातील मुलांना फुटबॉल शिकवण्याचं काम त्यांना दिलं गेलं आणि अंजू तुरंबेकर फुटबॉल शिकवू लागल्या.

तिथे मिळणारा पगार कमी असला तरी अनेक नवीन गोष्टी त्यांना शिकता येत होत्या. राष्ट्रीय पातळीवरची शिबिरं घेताना इंग्रजी बोलावं लागणार होतं. आत्तापर्यंत नवनवीन आव्हानं पेलवत इथवर पोहोचलेल्या अंजूंनी मग इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेतला.

त्या ज्या हॉस्टेलमध्ये राहत होत्या तिथे राहणाऱ्या मुलींच्या मदतीने त्यांनी इंग्रजी भाषा अवगत केली आणि त्यांचा फुटबॉल प्रशिक्षणाच्या क्षेत्रातला प्रवास सुरु झाला.

अंजू तुरंबेकर

फोटो स्रोत, ANJU TURAMBEKAR

'मॅजिक बस'तर्फे त्यांना एकदा हॉलंडला जाण्याची संधीही मिळाली. बेकनाळच्या अंजू तुरंबेकर यांच्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारा हा प्रवास होता.

तिथे जागतिक पातळीवरील लोकांशी बोलता आलं, कोचिंग आणि ट्रेनिंगचं तंत्र शिकता आलं आणि मुख्य म्हणजे तोडकं मोडकं का असेना पण भरपूर इंग्रजी बोलता आलं.

एव्हाना भारतीय फुटबॉल क्षेत्रातील अनेक लोक त्यांना ओळखू लागले होते.

आणि अंजूने फुटबॉल खेळणं सोडण्याचा निर्णय घेतला

राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या कर्णधार राहिलेल्या अंजू भारताकडून मात्र खेळू शकल्या नाहीत. बीबीसीसोबत बोलताना त्यांनी पहिल्यांदाच यामागचं कारण सांगितलं.

त्याबाबत सांगताना त्या म्हणाल्या की, "2008ला मी शेवटची राष्ट्रीय स्पर्धा खेळले. तुम्ही कितीही राष्ट्रीय पातळीवर खेळला असला तरी दरवर्षी महाराष्ट्राच्या संघात निवड होण्यासाठी तुम्हाला निवड चाचणी द्यावी लागत असे. मी त्यावर्षी निवडीसाठी गेले तर तिथे असलेल्या प्रशिक्षकाने खेळाडूंना शिवीगाळ करायला, शिवराळ भाषेत बोलायला सुरुवात केली.

मी निवड होण्यासाठीच तिथे गेले होते पण त्यांची भाषा मला सहन झाली नाही आणि मी त्यांना विरोध केला. त्यानंतर त्यांनी माझी अंतिम संघात निवड केलीच नाही. म्हणजे विचार करा चार वर्षे महाराष्ट्राची कर्णधार राहिलेल्या खेळाडूची साधी निवडसुद्धा झाली नाही."

"मी त्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण मलाच बेशिस्त आणि अनफिट ठरवून संघाबाहेर ठेवण्यात आलं. त्याचदिवशी मी ठरवलं की पुन्हा फुटबॉलच्या मैदानावर परतणार नाही."

भारतीय फुटबॉल महासंघात निवड

मॅजिक बसमध्ये काम करत असताना अंजू तुरंबेकर फुटबॉल खेळायला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मध्ये जायला लागल्या.

त्या संस्थेतील अधिकाऱ्यांनी त्यांचा खेळ पाहून त्यांना कोलकत्याला ग्रासरूट डेव्हलपमेंटच्या एका शिबिराला पाठवले आणि पाच दिवसांच्या त्या शिबिरानंतर भारतीय फुटबॉल महासंघानेच थेट त्यांना नोकरीचीच ऑफर दिली.

याबाबत बोलताना अंजू म्हणतात की, "एकेकाळी महासंघासाठी खेळणारी मी आज त्याच महासंघात नोकरी करणार होते. या नोकरीच्या माध्यमातून मला देशभर तळागाळात फुटबॉलच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळाली. 2012 पासून मी फुटबॉल महासंघाच्या 'ग्रासरूट इंडिया प्रोग्रॅम'मध्ये काम करू लागले."

2019 मध्ये अंजू तुरंबेकर या आशियाई फुटबॉल महासंघाच्या ग्रासरूट डेव्हलपमेंट पॅनलवर निवड झालेल्या पहिल्या भारतीय महिला होत्या.

गोव्याच्या डेम्पो क्लबने टेक्निकल डायरेक्टर म्हणून निवड केली

अंजु तुरंबेकर यांना आता फुटबॉल महासंघात कामाचा अनुभव आला होता. त्यामुळे पुन्हा फुटबॉलचं मैदान त्यांना खुणावत होतं. 2018 मध्ये एएफसीतर्फे घेण्यात आलेली आंतरराष्ट्रीय ‘ए’ लायसन्स परीक्षा पास होण्याचा मान देखील त्यांनी मिळवला होता.

त्यामुळे गोव्याच्या अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या डेम्पो स्पोर्ट्स क्लबने त्यांच्या संघाच्या टेक्निकल डायरेक्टर म्हणून त्यांची निवड केली.

खरंतर एखाद्या पुरुष संघाची टेक्निकल डायरेक्टर एखादी महिला होणं ही घटना भारतीय फुटबॉल इतिहासात आजवर घडलेली नव्हती. त्यामुळेही ही निवड ऐतिहासिक म्हणावी लागेल.

अंजू तुरंबेकर

फोटो स्रोत, ANJU TURAMBEKAR

याबाबत बोलताना अंजू म्हणतात की, "डेम्पो स्पोर्ट्स क्लबसोबत काम करण्याचा अनुभव महत्वाचा होता. कोणत्याही क्षेत्रात महिलांना होतो तसा विरोध मलाही झाला.

पण आजवर अनेक गोष्टींशी कधी जुळवून घेत तर कधी संघर्ष करत मी इथपर्यंत आले होते त्यामुळे अशी परिस्थिती नेमकी कशी हाताळायची हे मला चांगलंच माहित झालं होतं. माझ्या कार्यकाळात आम्ही अनेक खेळाडू घडवले. वेगवेगळ्या स्पर्धा या संघाने जिंकल्या."

मी तर घडले पण ग्रामीण भागातून हजारो अंजु तयार व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे

"22 फेब्रुवारी 2022 ला मी माझ्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. 22 हा आकडा माझ्यासाठी खूपच महत्वाचा आहे कारण ती माझी जन्म तारीख आहे. माझ्या फाउंडेशनचं नावही 'AT फाउंडेशन' असं आहे.

या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक वयोगटाच्या माणसांना खेळात करीयर घडवण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. माझी एवढीच इच्छा आहे की मला आलेल्या अडचणी खेळात करियर करू पाहणाऱ्या मुलींना येऊ नयेत आणि बिनदिक्कतपणे हजारो खेळाडू घडत राहावेत. बस्स."

सध्या भारतातल्या महिला फुटबॉलच्या परिस्थितीबाबत बोलताना अंजू म्हणतात की, "मी खेळत होते त्या काळात आणि आताच्या काळात बराच बदल झालेला आहे. आता स्पर्धांची संख्या, सहभाग घेणाऱ्या संघांची संख्या ही देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

छोट्या छोट्या गावांमधून शहरांमधून खेळाडू तयार होत आहेत. दोनदा भारताने वेगवेगळ्या वयोगटातील फुटबॉल विश्वचषक आयोजित केलेले होते. जेवढ्या स्पर्धा वाढतील तेवढे चांगले आणि दर्जेदार खेळाडू तयार होतील."

फुटबॉलचा विकास करणे ही केवळ महासंघांची किंवा सरकारची जबाबदारी नसल्याचं त्यांचं मत आहे.

"आपण सध्या सुरु असलेल्या महिलांच्या फुटबॉल विश्वचषकासोबत भारताची तुलना केली तर नक्कीच एक मोठा पल्ला अजून गाठायचा बाकी आहे पण भारतात फुटबॉलच्या विकासाची जबाबदारी केवळ भारतीय फुटबॉल महासंघाची नसून यासाठी माध्यमे, राजकारणी, पालक, खेळाडू, प्रशिक्षक सगळ्यांनीच चहुबाजूंनी प्रयत्न करणे अत्यंत महत्वाचं आहे.

केवळ काही स्पर्धा किंवा तत्कालिक कार्यक्रम घेऊन नाही तर सतत सुरु असणारी एक प्रक्रिया बनवावी लागेल आणि मगच हे स्वप्न आपण पूर्ण करू शकू."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)