आनवी कामदार : रील करायला धबधब्याजवळ गेली आणि 300 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

फोटो स्रोत, Social Media
पावसाळा सुरु झाला की, बरसणाऱ्या धारांचा, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायची स्वाभाविकच इच्छा निर्माण होते. पण पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना आपण स्वत:साठी आणि दुसऱ्यांसाठीही धोका तर निर्माण करत नाहीये ना, याची काळजी घेणं आवश्यक आहे.
रायगडमधल्या माणगावमधील कुंभे धबधब्याजवळ आनवी कामदारचा दरीत पडून मृत्यू झाला आहे.
हा धबधबा अलीकडे एका चित्रपटामुळे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईला राहणारी आनवी 16 जुलैच्या दिवशी इथे मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी इन्स्टाग्राम रिल्स बनवण्यासाठी आली होती.
27 वर्षीय आनवी स्वतः सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. तिचे इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
धबधब्याच्या समोर असलेल्या कड्याच्या टोकाकडे अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना पाय घसरून ती 300 फूट खोल दरीत पडली. माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजता ही घटना घडली.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, गावातले लोक आणि जवळच्या जलविद्युत केंद्रातले महावितरणचे कर्मचारी तिथे पोहोचले. पण दाट धुक्यामुळे अंदाज येत नव्हता. दरम्यान, कोलाड, माणगाव आणि महाडमधील बचावपथकांनाही पाचारण करण्यात आलं.
पाऊस, धुके आणि कोसळणारे दगड यांमुळे बचावपथकांनाही अडचणी आल्या. आनवीला स्ट्रेचरवरून वर काढण्यात आले, तेव्हा तिचा श्वास सुरू होता. पण रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला.
तामिळ अभिनेता विजयाच्या ‘विरासू’ या चित्रपटातील एका दृष्यात कुंभे धबधबा झळकल्यापासून इथे अलीकडे मोठ्या संख्येनं पर्यटक येतात, पण उत्साहाच्या भरात धोकादायक ठिकाणी गेल्यानं ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी लोणावळ्याजवळ भुशी धरणाजवळील एका धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक लोक वाहून जाण्याची घटना घडली होती.
गेल्या वर्षी म्हणजे 2023मध्ये पुणे जिल्ह्यातल्या लोणावळ्याजवळ असलेल्या लोहगडावरचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर मध्यंतरी व्हायरल झाला. रविवार असल्याने गडावर प्रचंड गर्दी झाली. गर्दी इतकी होती की,महादरवाज्याजवळ पर्यटक जवळपास चार तास अडकून पडले होते.
सरकायला जागा नसल्याने जवळपास चार तास पर्यटक एकाच जागी उभे होते. सुदैवाने भर पावसात इथे चेंगराचेंगरी झाली नाही. ही एकमेव घटना नाही. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांहून सातत्याने अशाप्रकारच्या घटना समोर येतात.

फोटो स्रोत, getty images
काही ठिकाणी तर पर्यटक बेपत्ता होणे किंवा त्यांना इतर धोका निर्माण होण्यासंदर्भातल्या घटनाही समोर येतात. अशा परिस्थितीमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासोबतच काही काळजी बाळगणंही गरजेचं आहे.
या संदर्भात बीबीसी मराठीने बचाव कार्य करणारे तज्ज्ञ, पर्यटन स्थळाच्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी, पर्यटक यांच्याशी संवाद साधला. सुरक्षिततेसाठी कोणती काळजी बाळगावी यासंदर्भात त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

ट्रिप प्लॅन करताय? ठिकाण निवडताना विचार करा
फिरायला जाताना कुठे जायचं यावर विचार करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पोहोचण्यासाठी सोपे असलेल्या ठिकाणांवर सुट्टीच्या दिवशी किंवा विकेंडला प्रचंड गर्दी होते. तसंच काही अवघड ठिकाणी पोहोचणं आपल्याला शक्य आहे का किंवा तिथे सुरक्षिततेसाठी व्यवस्था आहे का यावर नक्की विचार केला जाणं आवश्यक आहे, असं गिर्यारोहक आणि बचाव टीम्सचे समन्वयक ओंकार ओक यांनी सांगितलं.
“लोहगडावर जे झालं ती काही एकच घटना नाही. सुट्टीच्या दिवशी, पटकन पोहोचता येणाऱ्या ठिकाणांवर प्रचंड गर्दी दिसते. काही ठिकाणी तर पोहोचतानाच ट्रॅफिक जॅमही होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पावसाळ्यात गर्दी टाळणं हे कधीही श्रेयस्करच असतं. त्याचबरोबर गर्दी टाळण्यासाठी किंवा जास्त एडव्हेंचर म्हणून दुर्गम ठिकाणी, एकांताच्या ठिकाणी अनुभव नसताना जाणं धोकादायक ठरू शकतं.
एखाद्या किल्ल्यावर पोहोचणं आपल्याला झेपणार आहे का, याचाही विचार केला पाहिजे. थ्रिलसाठी न झेपणाऱ्या गोष्टी टाळणं कधीही योग्य आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी फिरायला जायचा विचार आहे, तिथली माहिती काढणे, तिथल्या सोयी, सुविधा आणि काय काय तयारी लागेल याचा विचार करणे जास्त आवश्यक आहे,” असं ओंकार ओकने बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.

‘आपण कुठे फिरायला जातोय याची कुणाला तरी कल्पना देणं आवश्यक’

फोटो स्रोत, Onkar Oak
फिरायला जाताना प्लॅनिंग करताना कुठल्यातरी जवळच्या व्यक्तीला त्याची कल्पना देऊन ठेवणं आवश्यक असल्याचं ओंकार ओक यांनी सांगितलं.
“हल्ली आम्ही हे पण सांगतो की, तुम्ही कुठे जाताय हे घरी सांगायचं नसेल, किंवा घरी त्याची कल्पना द्यायची नसेल तरीही कोणालाही न सांगता जाऊ नये. खरंतर घरच्यांना माहिती द्यावी. पण ते जर शक्य नसेल तर जवळच्या कुणाला तरी मग मित्र-मैत्रिणी असोत, नातेवाईक असोत किंवा शेजारी असोत कुठे जातोय, कुणासोबत जातोय याची कल्पना असणं आवश्यक आहे.
"त्याच सोबत त्यांना हे पण सांगून ठेवलं पाहिजे की,जर 24-48 तासांत माझ्याशी संपर्क झाला नाही तर स्थानिक बचाव टीम किंवा पोलिसांशी संपर्क करा. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे,” असं ओंकार ओक यांनी सांगितलं.

सेल्फी, रिल्स, फोटोच्या नादात सुरक्षिततेचा विसर नको
रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधबा हा भेट देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे झालेल्या काही दुर्घटनांनंतर तिथल्या पर्यटनावर गदा आली होती. पण तेथील स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत, पर्यटकांची सुरक्षितता आणि निसर्ग सौंदर्य जपण्यासाठी उपक्रम हाती घेतला. गेल्या सात वर्षांपासून ते पर्यटकांसाठी गाईड, आणि गार्ड म्हणून काम करत आहेत.
धबधबा, दऱ्या यांसारख्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी किंवा रिल्स बनवण्यासाठी नको ते धाडस करणं टाळायला पाहिजे असं तेथील स्थानिक अर्जुन म्हामुणकर याने सांगितलं.
“आम्ही पर्यटकांसाठी मार्गदर्शनपर सुविधा सुरु केल्याला7 वर्ष झालेली आहेत. आम्ही रस्ता दाखवण्यापासून ते कुंडाच्या जवळ काही मदत लागली तर ती करण्यापर्यंत सगळ बघतो. कुंडाच्या जवळ एका पाइॅटनंतर कुणालाही जाऊ देत नाही. तिथे दोरखंड लावलेले आहेत. त्यामुळे सुरक्षितपणे आनंद घेता येतो. तसंच दारु पिऊन कुणी असल्यास त्यांना आम्ही पुढे सोडत नाही.
सुरक्षिततेसाठी या गोष्टी आवश्यक आहेत. तसेच पर्यटकांनीही स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. मुसळधार पाऊस असेल तर देवकूंड पर्यटकांसाठी बंदच ठेवतो,” असं अर्जुन म्हामुणकर याने सांगितलं.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडूनही पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काही आवाहने करण्यात आलेली आहेत.
“वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी उत्साही पर्यटकांची रेलचेल सुरु झाली आहे. तथापि, वर्षा पर्यटन करताना धोकादायक ठिकाणांपासुन सावध राहणे, शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे.
जीव धोक्यात घालुन सेल्फी काढणे, निसरडया धबधब्यांच्या ठिकाणी जाणे, अनोळखी जंगलातुन भ्रमंती करणे सर्वतोपरी टाळावे यासाठी महामंडळ आग्रही असुन त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना महामंडळांच्या पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटकांना दिल्या जात आहेत,” असं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी म्हटलं.

गिर्यारोहणासाठी खास गाईडलाईन्स

फोटो स्रोत, Onkar Oak
ज्यांना पावसाळ्यात गिर्यारोहणाचा आनंद लुटायचा आहे, त्यांच्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने काही महत्त्वाच्या सूचना असलेले पत्रक प्रसारित करण्यात आलेलं आहे.
“अलीकडे दरवर्षी पावसाळ्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये, गडकोट किल्ल्यांवरती भटकंतीसाठी, ट्रेक साठी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामध्ये अनेक वेळा काही ठिकाणी सातत्याने दुर्घटना होताना पाहायला मिळत आहेत. यामधील अनेक घटनांमध्ये मानवी चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे.
हे सर्व टाळणे सहज शक्य आहे. ही भटकंती सुरक्षित व्हावी यासाठी काही गोष्टींचं पालन आवश्यक आहे,” असं अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सांगितलं.
गिर्यारोहकांसाठी गिर्यारोहण महासंघाकडून खास टिप्स :
- ओळखीच्या व अनुभवी ग्रुप सोबत ट्रेकला जावे
- ट्रेक मधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल एवढीच असावी
- ग्रुप कडे First Aid चे साहित्य असावे.
- ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लीडर/ग्रुप यांची माहिती घरी/जवळच्या व्यक्तीस द्यावी.
- ट्रेक मध्ये First man व Last man यांच्या मध्येच चालावे
- ट्रेक एक दिवसाचा असला तरी सोबत चांगली टॉर्च ठेवावी
- आवश्यक वाटल्यास स्थानिक वाटाड्या (गाईड) सोबत घ्यावा.
- पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे
- पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते. धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी
- किल्ल्यांवरील तट, दरवाजे, इतर पडीक अवशेष यांवर चढू नये, एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो
- walking stick सोबत ठेवावी, त्यामुळे मुळे चढणे, उतरणे व चालणे सोपं होतं
- शेवाळलेल्या जागा व पायऱ्यांवर जपून चालावे

फोटो स्रोत, Getty Images
- आपत्कालीन स्थितीत उपयोग व्हावा, म्हणून मोबाईल जपून वापरावा
- अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे
- शहरी गोंगाट या ठिकाणी करू नये
- किल्ल्यावर, जंगलात, धबधब्यांजवळ कचरा करू नका. आपला निसर्ग आपणच स्वच्छ ठेवा
- पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यास समजून येत नाही. अचानक पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती असते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नये. धबधब्याच्या प्रपात सोबत वरून दगड पडण्याची शक्यता असते.
- डोहात, धरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ शकतो. त्यात उतरणे टाळावे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








