ट्रेकिंग करताना मधमाशांनी हल्ला करू नये म्हणून काय करावं?

- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून
आठवीत शिकणाऱ्या रियावर मधमाशांनी केलेला हल्ला इतका मोठा होता की तिचा चेहऱ्यावर, नाका-तोंडात मधमाशा चावत होत्या. पुण्यातल्या जुन्नर तालुक्यात मानमोडी डोंगररांगेत वसलेल्या भूतलिंग लेण्यांमधली ही घटना.
मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेली रिया घाटघरे त्या घटनेविषयी सांगत होती.
''आम्ही भूत लेणीला गेलो. भूत लेणीवर गेल्यावर माश्यांचा हल्ला झाला. सगळे मुलंमुली घाबरले. तो छोटा रस्ता होता त्यामुळे त्या गोंधळात एकमेकांचा धक्का लागला. आणि मी पडले. त्यामुळे त्या माशा माझ्याजवळ जास्त आल्या आणि चावल्या.''
पुण्याच्या खेड तालुक्यातील डायनामिक इंग्लिश मीडियम शाळेची सहल 27 फेब्रुवारीला गेली होती. लेण्यांजवळच्या आग्या मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात 23 विद्यार्थी जखमी झाले होते.
स्थानिक भाषेतील आग्या मधमाशीचं शास्त्रीय नाव एपिस डॉरसेटा असं आहे. भारतात आढळणाऱ्या मधमाशांच्या आकारमानाने ही मधमाशी मोठी असते. या मधमाशांचं पोळं म्हणजेच मोहोळ सह्याद्रीत डोंगरमाथ्यापासून उतरणीवर आढळतं. आग्या मोहोळमधल्या मधमाशांनी विद्यार्थ्यांना डंख केले.

मधमाशांचा हल्ल्याचा प्रसंग आठवला की रियाला आजही धडकी भरते. रिया सांगते, "हडसर किल्ला पाहून आम्ही अंबिका लेणी पाहिली त्यानंतर आम्ही भूत लेण्यांकडे गेलो. अचानक मधमाशा आल्या आणि आम्ही सगळे घाबरलो. सगळे पळायला लागल्याने धक्का लागून मी खाली कोसळले, त्यामुळे मी मागे राहिले आणि माशांनी माझ्यावर हल्ला केला."
मधमाशा चावल्याने रिया गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी इतकी खाली गेली की ऑक्सिजन सपोर्ट द्यावा लागला. ती काही वेळ बेशुद्धही झाली होती. तीन दिवस तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सहा दिवसांनतर तिला घरी सोडण्यात आलं.
मधमाशा जीवावर कशा बेतल्या?
या घटनेत रियाबरोबरच तिच्या आणखी दोन मैत्रिणी आणि शाळेच्या संस्थापिका देखील गंभीर जखमी झाल्या. तनिष्का ढमाले तिच्या हातावर मधमाशांनी डंख केल्याच्या खुणा दाखवत होती.
तनिष्का सांगत होती, "माशांनी इतका जबरदस्त हल्ला केला होता की त्या माशा आमच्या केसांमध्ये, तोंडात गेल्या होत्या. आम्हाला त्या ओढून बाहेर काढाव्या लागल्या. हॉस्पिटलमध्ये गेलो तरी त्या माशा आमच्या केसांमध्ये सापडत होत्या. तब्बल अर्धा किलोमीटर त्या आमच्या मागे-मागे आल्या होत्या."

मधमाशा ज्यांना चावल्या त्या मुलींच्या डोळ्यांसमोर काही वेळातच अंधारी आल्यासारखं झालं, असं डायनामिक इंग्लिश मीडियम शाळेच्या संस्थापिका जयश्री गारगोटे सांगतात. इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी विद्यार्थिनींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
मधमाशांच्या हल्ल्याची पुणे जिल्ह्यातली ही पहिलीच घटना नाही. याआधी लोणावळ्यामध्येही ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणांना मधमाशा चावल्या होत्या. त्यांनाही रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
कमी वेळातच प्रकृती गंभीर
मधमाशांचा हल्ला ही गंभीर घटना असल्याचं जुन्नरमधील विद्यार्थ्यांवर उपचार करणारे डॉ. सदानंद राऊत सांगतात. वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो असं ते सांगतात.
डॉ. सदानंद राऊत हे सर्पदंश विषबाधा तज्ज्ञ आहेत. जुन्नरमध्ये त्यांचं रुग्णालय आहे. त्यांच्या रुग्णालयात मधमाशांच्या हल्ल्याच्या अनेक केसेस येतात.
मधमाशांच्या हल्ल्याचा शरिरावर होणारा परिणाम सांगताना डॉ. राऊत सांगतात, "मधमाशा डंख मारतात तेव्हा त्यांचा काटा म्हणजेच स्ट्रिंगर शरिरात टोचला जातो. त्यामुळे तीव्र वेदना होतात आणि सूज येते. एकाच वेळी अनेक मधमाशा अनेक जागी दंश करतात. त्यामुळे चेहऱ्यावर, अंगावर सूज येते, पुरळ येतं. मधमाशांचे जास्त दंश असले तर रुग्णाच्या नाडीचे ठोके वाढतात आणि रक्तदाब कमी होऊ शकतो."
श्वसननलिकेच्या तोंडाशी सूज येते आणि रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. त्याची फुफ्फुसं आकुंचन पावतात. रक्तदाब कमी झाल्याने त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन रुग्ण गंभीर होतो. ही लक्षणं काही मिनिटांत दिसू लागतात. अशावेळी तातडीच्या उपचारांची गरज असते."
विद्यार्थिनींवर मधमाशांनी हल्ला केला त्या जुन्नरच्या डोंगरांमधील लेण्यांजवळ बीबीसी मराठीची टीम गेली.
मधमाशा माणसांवर हल्ला का करतात?
भूत लेणीजवळ मधमाशांची मोठी पोळी होती. भूतलेणीसह जुन्नरच्या या परिसरात सातवाहनकालीन बौद्ध धर्मातील हीनयानपंथीय 180 हून अधिक लेणी आहेत. भारतातला बौद्धकालीन लेण्यांचा हा मोठा परिसर समजला जातो.
याच लेणीसमूहाचा भाग असणाऱ्या भीमाशंकर लेण्यांजवळ पाच भलीमोठी मधमाशांची पोळी आम्ही पाहिली. फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यांमध्ये वसंत ऋतू दरम्यान मधमाशा आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात मध गोळा करतात. फुलांचा बहर असलेला हा काळ मधमाशांसाठी 'गोल्डन पिरिअड' असतो.

आमच्यासोबत जुन्नरचे वनरक्षक रमेश खरमाळे होते. मधमाशांची पोळी दिसत असतील तर अशा ठिकाणी काय खबरदारी घ्यायला हवी, याविषयी ते माहिती देत होते. मधमाशांच्या पोळ्यांपासून सुरक्षित अंतरावर त्यांनी आम्हाला उभं केलं होतं.
खरमाळे म्हणाले, "साधारण ट्रेक करताना मधमाशाच नाही तर सर्पदंशापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे प्रथमोपचाराची साधनं म्हणजेच फस्ट एड किट हवं. मी एक बॅग सोबत ठेवतो. एकटं फिरत असताना माशांचा हल्ला झाला तर वाचवायला कोणी येऊ शकत नाही. त्यासाठी बॅगेत एक चादर असते. हात, तोंड झाकण्यासाठीचं साहित्य असतं. डोंगररांगांमध्ये फिरत असताना अत्तर/ परफ्युम, वासाचं तेल आम्ही वापरत नाही."
"परफ्युमचा वासाने, कोणी सिगारेट ओढली किंवा जाळपोळ केला तर मधमाशा हल्ला करत असतात. आपण त्यांच्या अधिवासात आलोय त्यामुळे मोबाईलचा फ्लॅशही वापरू नयेत. पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी एखादी मधमाशी आपल्याला चावली आणि आपण ती चुरगळली तर त्यातील कंपलहरी इतर मधमाशांपर्यंत पोहोचत असतात. मधमाशा धोका समजून लगेच हल्ला करतात."
मधमाशी चावली तर काय कराल?
एखाद्या मधमाशीने डंख केला तर काय करायला हवं, हे आम्ही त्यांना विचारलं, याबद्दल सांगताना खरमाळे म्हणाले, "एखादी माशी आपल्याजवळ आली तर कुठलीही हालचाल आपण करायची नाही. आपण हाताने त्यांना दूर करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना वाटतं त्यांच्यावर हल्ला होतोय. तेव्हा ती डंख करते.
डंख केल्यानंतर ती तिचा गंध त्या ठिकाणी सोडते. मग त्याच ठिकाणी इतर माशा येऊन डंख करतात. त्यामुळे अशावेळी मधमाशीने डंख केल्यानंतर त्या ठिकाणी जवळचा एखादा पाला चोळायला हवा जेणेकरुन त्या मधमाशीने सोडलेला गंध निघून जाईल आणि इतर माशा डंख करणार नाहीत."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








