शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस: जुन्नरची बिबट सफारी बारामतीला कोणी पळवली?

फोटो स्रोत, TARIQ MAHMOOD/getty
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्या आढळून येतात. आधी बिबट्या आणि मानव संघर्ष होत होता. कालांतराने जुन्नरवासियांनी बिबट्याशी जुळवून घेतले. जुन्नरला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देखील प्राप्त झाला आहे. त्यामुळे इथलं पर्यटन वाढावं आणि स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून पहिला बिबट सफारीचा प्रकल्प जुन्नरमध्ये व्हावा अशी जुन्नरवासियांची मागणी होती.
परंतु आता हा प्रकल्प बारामती येथील गाडीखेल इथल्या 100 हेक्टर जागेत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी 60 कोटींच्या निधीची तरतूद देखील केली आहे. या निर्णयामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्नरचा प्रकल्प बारामतीला पळवल्याचा आरोप जुन्नरचे शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी केला आहे.
त्याचबरोबर बिबट सफारीचा प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा अशी मागणी जुन्नरमधील विविध संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मानव आणि बिबट्याचा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. उस तोडणीच्या वेळेस उसाच्या फडात अनेकदा बिबट्यांची बछडे आढळून आली आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक बिबट्यांचा अधिवास असलेलं ठिकाण म्हणून जुन्नर ओळखलं जातं.
जुन्नरमधील निसर्गसंपदा, इथलं ऐतिहासिक, धार्मिक वैशिष्ट्ये यामुळे जुन्नरला 2018 साली राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले होते. या घोषणेमुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळेल असं सांगण्यात येत होतं.
जुन्नरला बिबट्यांची संख्या जास्त असल्याने जुन्नरमध्ये बिबट सफारी व्हावी यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरवठा करत असल्याचे जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांचे म्हणणे आहे. गेल्या सरकारच्या काळात जुन्नरमधील आंबेगव्हाण येथील 550 हेक्टर जागा योग्य असल्याचे वनविभागाच्या मुख्य सचिवांनी गेल्या सरकारच्या काळात कळवले होते असे देखील सोनवणे यांनी सांगितले.
तर जुन्नर तालुक्यात बिबट्या सफारीचा कुठलाही प्रस्ताव नव्हता बारामतीतचा प्रकल्प वेगळा असल्याचे पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.
बिबट सफारीसाठी आमरण उपोषण करणार - शरद सोनवणे
बिबट सफारीसाठी आमरण उपोषण करणार असल्याचे शरद सोनवणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले. सोनवणे म्हणाले, ''जुन्नर तालुका हा बिबट्याचा अधिवास असलेला तालुका आहे. या तालुक्यात बिबट्यांची संख्या अधिक आहे. वारंवार या बिबट्याने नागरिकांवर, शेतकऱ्यांवर हल्ले केलेले आहेत. आम्ही तरी बिबट्याला कसं सुरक्षित करता येईल यासाठी ताडोबा, आफ्रिका या ठिकाणच्या अभयारण्याची पाहणी करुन आपल्या इथे बिबट सफारीचा विचार पुढे आणला आहे. आमच्या इथे बिबट निवारा केंद्र आहे. पण ते जनतेला पाहता येत नाही.''

फोटो स्रोत, Getty Images
''जुन्नरमध्ये 500 च्या आसापास बिबट्यांची संख्या असेल. बिबट्यासाठी हॉस्पिटलची निर्मिती देखील केली. 2016 ला विधीमंडळात जुन्नरमध्ये बिबट सफारीचा पायलेट प्रोजेक्ट करण्याची मागणी सुद्धा मी केली होती. 31 मार्च 2018 ला जुन्नरला विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आणखी जोरदार आम्ही मांडली. त्यानंतर अनेक बैठका झाल्या.
बिबट सफारीसाठी त्यावेळच्या शासनाने देखील अनुकुलता दाखवली होती. जुन्नरमधील आंबेगव्हाण 550 हेक्टर साठी योग्य असल्याचं वन सचिव म्हणाले होते. परंतु यानंतर निवडणुका लागल्यानंतर नवीन सरकार आलं आणि हा विषय मागे पडला.

फोटो स्रोत, facebook
अजित पवार यांनी बिबट सफारीचे महत्त्व ओळखून हा प्रकल्प जुन्नचा बारामतीला हलवला. इथले बिबटे ते तिथे नेण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे बिबट्या असतील तर त्यांनी त्यांच्याकडे जरुर बिबट सफारी करावी. बारामतीला बिबट सफारी जुन्नरला व्हावी म्हणून दोन दिवसांमध्ये आमरण उपोषण आम्ही किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी करणार आहोत'' असं देखील सोनवणे सांगतात.
बारामतीचा प्रकल्प हा वेगळा - उपवनसंरक्षक
याबाबत आम्ही पुण्याचे उपवनसंक्षक अधिकारी राहुल पाटील यांच्याशी संपर्क केला. पाटील म्हणाले, ''सोनवणे हे जुन्नरला बिबट सफारीसाठी प्रयत्न करत होते, याबाबत त्यांच्याकडे काय पुरावे आहेत ते त्यांनी दाखवावेत. ही माझ्या डोक्यातील कल्पना आहे. सफारी करण्याचा नुसता विचार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं यात फरक असतो. बिबट्याचं निवारण केंद्र जुन्नरला आहे ते तिथेच राहणार आहे.
जुन्नरला बिबट्या सफारी प्रकल्प होणार होता की नाही या वादात मला पडायचे नाही. बारामतीचा प्रकल्प हा वेगळा प्रकल्प आहे, याचा आणि त्याचा काही संबंध नाही. बिबट्या जास्त आहेत तिथे सफारी तयार करावी असा कुठलाही नियम नाही. आम्ही बारामतीमध्ये केवळ बिबट सफारी नाही तर वाघ सफारी देखील करत आहोत. त्याचबरोबर एखादा आफ्रिकन प्राणी देखील आणण्याचा विचार आहे.''
बारामतीला बिबट सफारी प्रकल्प स्थगित केला?
सध्याचा बारामतीचा बिबट सफारी प्रकल्प अजित पवार यांनी स्थगित केला आहे अशी माहिती जुन्नरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी बीबीसी मराठीला दिली.
बेनके म्हणाले, ''बिबट सफारी जुन्नरमध्येच व्हायला हवी. जु्न्नरमध्ये बिबट्यांची संख्या अधिक आहे. बिबट्या आणि मानवाचा संघर्ष इथे खूप काळापासून सुरु आहे. उपवनसंरक्षक अधिकारी यांना आज मी भेटलो. विधानभवनात देखील मी आवाज उठवला होता. अजित पवार यांनी मला आश्वासन दिलं आहे की अधिवेशनानंतर पुढील महिन्यात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
यात वनविभाग, पर्यटनविभाग आणि वित्तविभागाचे अधिकाऱ्यांना बोलवण्यात येणार आहे. त्याचबरोबर जुन्नरमधील पर्यटनप्रेमी संघटनांना देखील बैठकीला बोलवण्यात येणार आहे. या बैठकीनंतरच निर्णय घेतला जाईल. सध्याचा बारामतीचा बिबट सफारी प्रकल्प स्थगित केल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले आहे. या बैठकीनंतर जुन्नरलाच बिबट सफारी प्रकल्प होईल याबाबत देखील अजित पवार सकारात्मक आहेत. आम्ही देखील हा विषय लावून धरणार आहोत.''

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








