कॉलरवाली : भारतातली ती 'सुपरमॉम' वाघीण, जिने 29 बछड्यांना जन्म दिला

वाघीण, भारत

फोटो स्रोत, VARUN THAKKAR

फोटो कॅप्शन, कॉलरवाली एक धोकादायक शिकारी असली तरी स्वभावाने खेळकर होती
    • Author, शरण्या हृषिकेश
    • Role, बीबीसी न्यूज

देशातल्या सगळ्यांत प्रसिद्ध वाघिणींपैकी एक, कॉलरवाली, गेल्या आठवड्यात वारली. देशातल्या वाघांच्या संवर्धनात तिची फार महत्त्वाची भूमिका होती, विशेषतः ती राहत असलेल्या पेंच या अभयारण्यात तिच्यामुळे वाघांची संख्या वाढली.

तिचं नाव कॉलरवाली पडलं कारण एक रेडियो कॉलर तिच्या गळ्याभोवती बांधली होती. तिने तिच्या आयुष्यात 29 बछड्यांना जन्म दिला.

बीबीसीने तिच्यावर आणि तिच्या चार बछड्यांवर 'स्पाय इन द जंगल' नावाची डॉक्युमेंट्री केली होती. यानंतर कॉलरवाली संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली.

या डॉक्युमेंट्रीनंतर पेंच अभयारण्यात पर्यटकांची संख्या वाढली. लोक कॉलरवाली आणि तिच्या आईला पाहण्यासाठी आग्रह करायचे, असं निसर्गवादी प्रबीर पाटील सांगतात. ते 2004 पासून पेंच अभयारण्याशी संलग्न आहेत.

कॉलरवालीचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला.

निसर्ग अभ्यासक, वन विभागाचे अधिकारी आणि वन्यजीव फोटोग्राफर सगळेच कॉलरवालीची आठवण काढतात. त्यानी कॉलरवालीला मोठं होताना पाहिलं, जंगलात वावरताना पाहिलं. रूडयार्ड किपलिंग या लेखकाचं 'द जंगल बुक' हे पुस्तक याच जंगलावर आधारित आहे, असं म्हणतात.

या वाघिणीचा जन्म 2005 साली झाला होता. तिच्या आईचं नाव 'बडी माता'. ही पण फार प्रसिद्ध वाघीण होती. जन्म झाला तेव्हा तिला T-15 या नावाने ओळखलं जाऊ लागलं. तिच्या वडिलांचं नाव होतं T-1.

पण नंतर तिला रेडियो कॉलर बसवण्यात आली ज्यामुळे अभ्यासकांना तिच्या हालचालींवर लक्ष ठेवणं सोपं झालं. अशी कॉलर बसवलेली ती इथली पहिली वाघीण होती, त्यामुळे तिचं नाव पडलं कॉलरवाली.

वाघीण, भारत

फोटो स्रोत, ANIRUDDHA MAJUMDER

फोटो कॅप्शन, 2008 साली कॉलरवालीला रेडियो कॉलर बसवण्यात आली

तिला लोक प्रेमाने 'माताराम' अशीही हाक मारत. माताराम म्हणजे आदरणीय आई. या नावाची बूज तिने आयुष्यभर राखली.

पाटील म्हणतात, "कॉलरवालीच्या जन्माच्या आधी पेंच अभयारण्यात वाघ दिसणं दुर्मिळ होतं. पण ती पेंचमध्ये सर्वाधिक दृष्टीस पडणारी वाघीण ठरली."

निसर्ग संवर्धनाचं काम करणारे विवेक मेनन यांच्यामते ही वाघीण 'पेंच अभयारण्याचा चेहरा' होती.

याचं श्रेय ते तिच्या स्वभावाला देतात ज्यामुळे अनेक वन्यजीव अभ्यासकांना, फोटोग्राफर्सला तिचा आणि तिच्या बछड्यांचा अभ्यास करणं, त्यांचे फोटो काढणं शक्य झालं.

रफिक शेख निसर्ग अभ्यासक आहेत आणि अगदी पेंचच्या उंबरठ्यावर लहानेचे मोठे झाले आहेत. तिथलेच राहाणारे आहेत. त्यांनी अनेक पर्यंटकांसाठी गाईड म्हणूनही काम केलेलं आहे. त्यांच्या मते पेंचला भेट देणाऱ्या कोणत्याही पर्यटकाला, अभ्यासकाला कॉलरवालीने निराश केलं नाही.

"ती खेळकर होती. पर्यटकांच्या वाहनांच्या अगदी जवळ येऊन उभी राहायची. तिला कधी भीती वाटली नाही."

जगातले 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाघ भारतात आहेत. आधी वाघांची संख्या कमी कमी होत चालली होती पण सरकारच्या प्रयत्नांनी ती वाढून आता 2976 इतकी झाली आहे. दरवर्षी हजारो पर्यटक भारतातल्या 51 व्याघ्र प्रकल्पांना भेटी देतात. प्रत्येकाची इच्छा असते की या शाही प्राण्याची एक झलक पाहाता यावी.

कॉलरवाली खास होती हे नक्की. तिच्या तारूण्यात तिने जंगलात आपलं साम्राज्य उभं केलं. जंगलाचा तो भाग जिथे आधी तिच्या आईचं राज्य होतं, तिथेच तीही राहिली. या भागातून ती क्वचितच बाहेर पडली. तिच्या आयुष्याच्या अंतापर्यंत या भागाची ती राणी होती.

वाघीण, भारत

फोटो स्रोत, VARUN THAKKAR

फोटो कॅप्शन, पेंचला भेट देणाऱ्या पर्यंटकांना कॉलरवालीची एक झलक पाहायची असायची

पाटील म्हणतात, "ती धिप्पाड होती. तिच्याशी मारामारी करायला इतर सगळे वाघ घाबरायचे. पेंच बाहेरचे कोणी वनाधिकारी आले तर तिला नर वाघ समजायचे कारण तिचा आकार मोठा होता."

तिने जन्म दिलेल्या 29 बछड्यांपैकी 25 बछडे जगले. हा भारतातला आणि कदाचित जगातला रेकॉर्ड असावा.

तिचे पहिले तीन बछडे 2008 साली न्युमोनियाने मेले. पण लवकरच तिने आणखी बछड्यांना जन्म दिला. 2010 साली तर तिने एकाच वेळेस 5 बछड्यांना जन्म दिला. अभ्यासकांच्या मते ही घटना दुर्मिळ होती.

बहुतांश वाघिणी आपल्या बछड्यांना दोन वर्षांचे होईपर्यंत सांभाळतात, स्वतः बरोबर ठेवतात. पण कॉलरवाली वेगळी होती. ती तिच्या बछड्यांना लवकर स्वतंत्र होण्यासाठी प्रोत्साहन द्यायची. यासाठी जिथे भरपूर शिकार मिळेल अशा भागात ती त्यांना एकटं सोडायची.

पेंचमध्ये वन्यप्राण्यांचे डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ. अखिलेश मिश्रांनी अनेकदा कॉलरवालीवर उपचार केले आहेत.

ते म्हणतात, "ती एक कणखर आई होती. आपल्या पिल्लांना व्यवस्थित खायला मिळावं म्हणून ती अनेकदा दिवसाला दोनदा शिकार करायची."

ते स्वतःला सुदैवी समजतात कारण त्यांना कॉलरवालीसोबत काम करण्याची संधी मिळाली.

वाघीण, भारत

फोटो स्रोत, VARUN THAKKAR

फोटो कॅप्शन, कॉलरवालीने तिच्या आयुष्यात 29 बछड्यांना जन्म दिला

मेनन यांच्यासारखे अभ्यासक पेंचच्या प्रतिमेचं श्रेय कॉलरवालीला देतात. "पेंचमध्ये वाघांची चांगली संख्या तिच्यामुळे आहे. आता तिचे बछडे आपल्या बछड्यांना जन्म देत आहेत आणि पर्यायाने इथली वाघांची संख्या वाढतेय."

बीबीसीशी बोललेल्या प्रत्येकाकडे कॉलरवालीची एक आठवण आहे.

पाटील यांना कॉलरवाली आणि तिची तीन भावंड एका भुकेल्या बिबट्याला पळवून लावताना आठवतात.

वन्यजीव फोटोग्राफर वरूण ठाकूर यांना 2011 साली तिच्या प्रसिद्ध पाच बछड्यांसोबत पेंच नदीच्या काठावर आराम करणारी वाघीण आठवते. आज अकरा वर्षं होऊन गेले तरी कॉलरवालीची ती छबी त्यांच्या मनात ताजी आहे.

डॉ. मिश्रा म्हणतात की कॉलरवाली हुशार होती. ती जखमी झाली किंवा तिला काही त्रास होत असला की ती उघड्यावर शांत पडून राहायची. जणू काही माणसं येतील आणि तिची मदत करतील, अशी तिला खात्री होती.

तिच्या शेवटच्या दिवशीही तिने असंच केलं असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. "ती खूपच कमजोर झाली होती आणि चालूही शकत नव्हती."

रविवारी, 16 जूनला कॉलरवालीचं दहन करण्यात आलं. वन्यजीव अभ्यासक, पेंचचे वन कर्मचारी आणि स्थानिक गावकऱ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि तिला फुलं वाहिली.

वाघीण, भारत

फोटो स्रोत, PENCH RESERVE

फोटो कॅप्शन, कॉलरवालीचं दहन करण्यात आलं

तिच्या आठवणीत कर्मचाऱ्यांनी एक व्हीडिओ बनवला ज्यात ती गवतावर आराम करतेय. हे तिचं घर होतं जिथे ती अखेरपर्यंत रमली.

लोकांच्या आठवणीत ती अशीच राहील.

कॉलरवालीसारखी दुसरी वाघीण किंवा वाघही कोणी नव्हता पण तरी तिच्या जाण्याचं दुःख करण्यापेक्षा तिच्या आयुष्याचा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत असं डॉ. मिश्रा म्हणाले.

"ती एक आनंदी, पूर्ण आयुष्य जगली. तिच्या जाण्याने आम्हाला वेदना झाल्या असल्या तरी ती आमच्या मनात सदैव जिवंत राहील."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)