बिबट्याचं तोंड प्लॅस्टिकच्या बरणीत अडकतं तेव्हा...

फोटो स्रोत, Maharashtra Forest dept
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
13 फेब्रुवारी 2022 ची रात्र. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरजवळ एक बिबट्या प्लॅस्टिकच्या बरणीत तोंड अडकलेल्या अवस्थेत फिरत होता.
वनविभागाला याची माहिती मिळाताच मोठी शोधमोहीम सुरू झाली आणि अवघ्या 48 तासांत बिबट्याची सुटकाही करण्यात आली. ही त्याचीच कहाणी आहे.
"बदलापूर वांगणी रस्त्याला गोरेगाव नावाचं एक गाव आहे. तिथे रस्त्याच्या पश्चिमेला वनक्षेत्र आहे आणि आसपास अनेक फार्म हाऊसेस आहेत. वांगणीचं एक कुटुंब रविवारी (13 फेब्रुवारी) तिथून परतत होतं.तेव्हा रस्त्यावर त्यांना एक बिबट दिसलं," बदलापूरचे उप वनसंरक्षक तुकाराम हिरवे माहिती देतात.
ते पुढे सांगतात, "गाडी थांबवून त्या कुटुंबातील एका मुलीनं बिबट्याचा व्हीडिओ काढला. तो व्हीडिओ त्यांच्या परिचयातील एकानं आमच्या स्थानिक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवला."
व्हीडिओमध्ये बिबट्याचं तोंड प्लास्टिकच्या बरणीसारख्या भांड्यात अडकल्याचं दिसतं.गाडीच्या उजेडात तो माणसांच्या आवाजाच्या दिशेनं रोखून पाहतो, तेव्हा त्याचे डोळे प्लॅस्टिकच्या बरणीतूनही चमकताना दिसतात. काही सेकंदांतच बिबट्या मागे फिरून निघून जातो, पण त्याच्या हालचाली मंद झाल्या असल्याचं जाणवतं.
एका बिबट्याच्या अशा अवस्थेविषयी माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बचावपथकाची जुळवाजुळव सुरू केली आणि सोमवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू झाली.
बिबट्याचा शोध कसा लागला?
बिबट्याच्या शोधमोहिमेसाठी बदलापूरच नाही तर आसपासच्या वनक्षेत्रातील कर्मचारी, स्थानिक आदिवासी आणि काही वन्यजीवप्रेमींनीही मदत केली.
ठाण्याचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे त्याविषयी माहिती देतात. "वनविभागाचा बदलापूरक्षेत्राचा पूर्ण स्टाफ, कल्याण वन परिक्षेत्राचा पूर्ण स्टाफ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची (SGNP) लेपर्ड रेस्क्यू टीम यात सहभागी झाली होती. आम्ही साधारण 50 लोक होतो.

फोटो स्रोत, Avinash Harad
"सोमवारी त्या परिसरातील जलाशयाच्या आसपासचं संपूर्ण क्षेत्र आमच्या टीम्सनी अक्षरशः पिंजून काढलं. रात्री दोन वाजेपर्यंत अगदी बॅटरीच्या उजेडात आमचा शोध सुरू होता. मंगळवारी स्थानिक गावातले 20 तरुणही सोबत घेतले, ज्यांना या परिसराची माहिती आहे. म्हणजे साधारण 70 जण या बिबट्याचा शोध घेत होते."
वांगणी परिसरातला भूभाग आणि जंगल पाहता वन विभागासमोरचं आव्हान किती खडतर होतं, याविषयी ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड माहिती देतात.
"हा टेकड्यांचा परिसर आहे. इथे सगळा उंचसखल भाग आहे. त्यात करवंदीच्या जाळ्या, बांबूची बेट, गच्च झाडी आणि खालच्या बाजूला तलाव आणि त्याला लागून असलेला तलाव, असा हा परिसर होता. एवढ्या मोठ्या परिसरात वनविभागानं ही मोहीम आखली."
ते सांगतात, "वनविभागानं स्थानिक स्वयंसेवकांचीही मोर्चेबांधणी केली, म्हणजे मंगळवारी रात्रीही ही मोहीम सुरू राहिली असती. स्थानिक पत्रकारांनी, लोकांनीही संयम दाखवला आणि एकप्रकारे या प्रयत्नांना मदतच केली आहे. कारण गर्दी जमा झाली, तर बचाव कार्यात अडथळे येण्याची शक्यता असते."
कॅमेरा ट्रॅप लावून आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं वनविभागाला अखेर यश आलं. मंगळवारी सायंकाळी एके ठिकाणी बिबट्या दिसला. तेव्हा SGNP च्या बचाव पथकाला तिथे पाचारण करण्यात आलं.
बिबट्याला डार्ट मारून आधई ट्रँक्विलाईज केलं गेलं. त्यानंतर त्याच्या डोक्यात अडकलेली प्लॅस्टिकची बरणी काढण्यात आली.
"बिबट्या 48 तास तसाच असल्यानं त्याला काही खाता किंवा पिता आलं नसेल. त्यामुळे तो डिहायड्रेट झालेल्या अवस्थेत होता. त्याच्यावर प्राणीतज्ज्ञांनी लगेच उपचार सुरू केले," अशी माहिती गजेंद्र हीरे देतात.
या बिबट्याला त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आलं. त्याची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. लवकरच त्याला पुन्हा जंगलात सोडून दिलं जाणार असल्याची माहिती वनविभागानं दिली आहे.
पण भविष्यात असं काही पुन्हा होऊ नये, यासाठी काय करायचं?
प्लॅस्टिकचा कचरा आणि पर्यटकांसाठी इशारा
वन्य जीवांना धोका निर्माण होऊ नये यासाठी प्लॅस्टिकचा कचरा असा कुठेही टाकू नका, असा सल्ला वनविभागानं दिला आहे.

फोटो स्रोत, Maharashtra Forest Dept
"या परिसरात वनक्षेत्राजवळच लोकवस्ती, फार्म हाऊसेस आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवाला अपाय होतील अशा गोष्टी टाळायला हव्या. कचरा असा कुठेही न टाकणे, प्लॅस्टिकची किंवा धातूची भांडी बाहेर उघड्यावर न ठेवणे, पाण्याची व्यवस्था न करणे जेणेकरून वन्य प्राणी आकर्षित होणार नाहीत किंवा अन्नाचा कचरा न टाकणे अशा गोष्टींची माहिती आम्ही इथल्या लोकांना देणार आहोत," असं गजेंद्र हीरे सांगतात.
फक्त रहिवाशांनीच नाही, तर पर्यटकांनीही अशी काळजी घ्यायला हवी, हे अविनाश हरड नमूद करतात. ते सांगतात, "बेकायदेशीररित्या जंगलात शिरून पार्टी करणारे पर्यंटक वन्यजीवांसाठी मोठा धोका ठरतात. आपण जंगलातील कुठल्याही परिसरात जात असू तर इथे-तिथे कचरा न टाकण्याची काळजी घ्यायला हवी. कारण त्यामुळे प्राण्यांना इजा होऊ शकते."

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









