दीक्षा पारवे : बैलगाडा शर्यतीमध्ये घाटात बैल जुंपायला अशी शिकली

दीक्षा पारवे
फोटो कॅप्शन, दीक्षा पारवे
    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"लोक म्हणायचे तू मुलगी आहेस, मुलांसारखं वागू नकोस पण आता व्हीडिओ व्हायरल झाल्यावर तेच लोक उलट शाब्बासकीची थाप देतात. तू मुलगी असून करुन दाखवलं असं म्हणतात, त्यामुळे मला अभिमान वाटतो."

बैलगाडा शर्यतीमध्ये घाटात बैलांना जुंपणारी दीक्षा पारवे सांगत होती. घाटात बैल जुंपतानाचा दीक्षाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

दीक्षा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या धालेवाडी या गावात राहते. उंच खडक या भागात झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये तिने घाटात बैल जुंपला होता.

तिचा तो व्हीडिओ व्हायरल झाला. तिच्या साहसाचं सगळ्यांकडून कौतुक करण्यात आलं. जुन्नरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुद्धा तिचा व्हीडिओ शेअर करत तिचं कौतुक केलं.

दीक्षा सध्या 10 वीची बोर्डाची परीक्षा देतीये. ज्या दिवशी पेपरला सु्टी असेल त्या दिवशी ती बैलगाडा शर्यतीला जाते. उंच खडकमध्ये झालेल्या बैलगाडा शर्यतीला ती गेली होती. तेव्हा घाटात ती एकटी मुलगी बैल जुंपत होती. बैल उडी मारत असताना त्याला तिने शांत केलं. तिचा हा व्हीडिओ कोणीतरी काढला आणि तो व्हायरल झाला.

दीक्षा सांगते, "मी 4-5 वर्षांपासून घाटात बैल जुंपतीये. आमच्या घरात सगळ्यांना बैलगाडा शर्यतीचं वेड आहे. मला पण तो नाद लागला. माझ्या आजोबांना बैलगाडा शर्यतीचा नाद होता, माझ्या वडीलांना सुद्धा होता, त्यामुळे आम्हाला पण आवड निर्माण झाली. माझा भाऊ लहान आहे त्यामुळे आम्हीच बैलांना साभांळतो. माझ्या दोन बहिणी, वडील, चुलते असे आम्ही सगळे घाटात जातो."

दीक्षा पारवे

दीक्षा आणि तिच्या बैलाचं वेगळंच नातं आहे. तिचा बैल घरात केवळ तिचंच ऐकतो. तिच्या बैलाविषयी सांगताना दीक्षा म्हणाली,

"माझ्या बैलाचं नाव 'विज्या' आहे. माझं तो सगळं ऐकतो. शर्यतीला जायचं म्हंटलं की मान हालवून हो म्हणतो, इकडे ये म्हंटल्यावर लगेच तो येतो, खा म्हंटलं की खातो, नको खाऊ म्हंटलं की नाय खात."

घाटात बैल जुंपणं हे पुरुषांच काम समजलं जातं. दीक्षाने बैल जुंपायला सुरुवात केली तेव्हा तिला सुद्धा लोकांचे टोमणे ऐकावे लागले.

तू मुलगी आहेस मुलांसारखं वागू नकोस असं लोक तिला म्हणायचे. पण दीक्षा त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती. आता तिचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर तेच लोक तिचं कौतुक करतायेत. तू मुलगी असून करुन दाखवलं असं म्हणत शाब्बासकीची थाप देतात.

दीक्षा पारवे

दीक्षाच्या मोठ्या बहिणी देखील घाटात बैल जुंपतात. दीक्षाच्या घरच्यांनी त्यांना बैल कसे धरायचे, घाटात कसे जुंपायचे हे सगळं शिकवलं. केवळ बैल जुंपणंच नाही तर दीक्षा आणि तिच्या बहिणी कुस्ती देखील खेळतात.

दीक्षा म्हणते, "मी कुस्तीसुद्धा खेळते. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. माझ्या दोन्ही बहिणीसुद्धा कुस्ती खेळतात. माझ्या बहिणी माझ्या आधी बैल जुंपायच्या. मी लहान होते तेव्हा त्याच बैल जुंपायच्या. त्यांची आधीची बैलं विकली त्यामुळे त्यांना त्यातून रस गेला. आम्ही नवीन बैल घेतल्यानंतर मला वेड लागत गेलं त्याचं. भर घाटात सगळ्या पुरुषांमध्ये मी आणि माझ्या बहिणी बैल जुंपतो, पुरुषांची कामं आम्ही करतो याचा अभिमान वाटतो."

दीक्षा पारवे

बैलगाडा शर्यत बंद असताना देखील बैलांना घाटात नेऊन दीक्षा शर्यतीचा सराव करायची.

दीक्षाला टेम्पो, पिकअप, टूव्हिलर ही सगळी वाहनं चालवता येतात. त्याचबरोबर शेतीची सगळी कामं सुद्धा ती करते.

दीक्षाला दोन सख्ख्या बहिणी, भाऊ आणि चुलत बहिण आहेत. घरदार सांभाळायला नातू हवा असं दीक्षाच्या आजीला लोक म्हणायचे. परंतु आता त्यांच्या सगळ्याच नाती पुरुषांच्या बरोबरीने उभ्या ठाकत असल्यानं नातीच श्रेष्ठ असल्याचं त्या आता म्हणतात.

दीक्षाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यापासून सर्वजण तिचं कौतुक करतायेत. शाळेत गेल्यावर मुली तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करतायेत. पुढे जाऊन बैलगाडा मालक म्हणून प्रसिद्ध व्हायचं असल्याचं दीक्षा सांगते.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)