वर्ल्ड कपमधला ब्राझीलचा तो पराभव ज्याची शिक्षा गोलकीपरला आयुष्यभर भोगावी लागली...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रदीप कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत. शुक्रवारी (2 नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात संभाव्य विजेता म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ब्राझीलला अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं.
कॅमेरुनने ब्राझीलचा 1-0 ने पराभव केला. कॅमेरूनच्या विन्सेट अबू बाकरने सामन्याच्या 92 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
या विजयाचा भलेही कॅमेरुनला काही फायदा झाला नाही, मात्र या विजयामुळे कॅमेरून ही ब्राझीलला हरवणारी पहिली आफ्रिकन टीम ठरली.
ब्राझीलची टीम कतार वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजमधून पुढे गेली आहे. त्यामुळे कॅमेरून विरुद्धच्या पराभवाचा त्यांना तसा फटका बसणार नाहीये. पण हा पराभव त्यांच्यासाठी धोक्याची घंटा जरूर आहे. कारण त्यामुळे ब्राझीलला हरवता येऊ शकतं हा संदेश गेला.
ब्राझीलची टीम वर्ल्ड कपमधील आतापर्यंतची सर्वांत यशस्वी टीम आहे, पण त्यांना अनेकदा अनपेक्षितरित्या पराभवाचाही सामनाही करावा लागला आहे.
पण या पराभवात एक असा पराभव आहे, जी ब्राझीलसाठी अनेक वर्षांपासून भळभळती जखम बनून राहिली आहे. या पराभवात एक पराभव असा आहे, ज्याची तुलना ब्राझीलमधले फुटबॉल रसिक इतर कोणत्याही पराभवाशी करूच शकत नाहीत.
ही मॅच 1950 च्या वर्ल्ड कपची फायनल होती. या स्पर्धेत संभाव्य विजेता म्हणून ब्राझीलला पसंती होती. स्पर्धेचं यजमानपदही ब्राझीलकडेच होतं. पण उरुग्वेनं अंतिम सामन्यात ब्राझीलला पराभूत केलं.
1950 चा हाच तो वर्ल्ड कप होता, ज्यामध्ये सहभागी व्हायला दुसऱ्या महायुद्धानंतर काही देशांनी नकार दिला होता. भारतालाही याच वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळालेली. पण ती हुकली.
पण ऐनवेळेस भारतीय फुटबॉल टीमला या स्पर्धेत सहभागी होता आलं नाही. भारताखेरीज स्कॉटलँड आणि युगोस्लाव्हियाच्या संघांनीही स्पर्धेतून माघार घेतली होती.
याच वर्ल्ड कपपासून खेळाडूंच्या जर्सीवर नंबर लिहायला सुरूवात झाली.
तर एकूणच या वर्ल्ड कपबद्दल ब्राझीलमध्ये प्रचंड उत्साह होता. ब्राझीलच्या लोकांसमोर अन्नधान्याचं संकट होतं. पण फुटबॉलने त्यांना आपल्या समस्यांचा विसर पाडला होता.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे ब्राझीलच्या सरकारचा अंदाज होता की, या स्पर्धेमुळे जगाला ब्राझीलच्या ताकदीचा अंदाज येईल. त्यामुळे ब्राझीलच्या टीमवर जिंकण्याचा दबाव होता.
ब्राझीलने आपला सर्वोत्तम संघ निवडला होता. त्यांची स्पर्धेतली कामगिरीही उत्तम होती. उरुग्वेविरूद्धच्या अंतिम सामन्याआधी ब्राझीलने स्वीडनला 7-1 आणि स्पेनला 6-1 ने हरवलं होतं.
त्यामुळे उरुग्वेविरुद्ध ब्राझीलचं पारडं जड मानलं जात होतं. ही मॅच ड्रॉ झाली असती, तरी ब्राझील वर्ल्ड चॅम्पियन बनला असता.
मैदानात विक्रमी संख्येनं प्रेक्षक जमले होते...
रिओ डि जानिरोमध्ये प्रचंड उत्साह होता. प्रत्येकाला विश्वास होता की, ब्राझील वर्ल्ड चँपियन बनेल. त्याचमुळे स्टेडिअमच्या कोपऱ्यात खास सांबा बँडही बोलवण्यात आला होता.
या बँडला एक खास गाणंही दिलं होतं- ब्राझील द विनर्स.
स्थानिक वर्तमानपत्रांनीही आपल्या हेडलाइन्स तयार ठेवल्या होत्या- चँपियन्स ऑफ द वर्ल्ड.
मरकाना स्टेडिअममध्ये पाहतात पाहता हजारो लोक जमा झाले. अधिकृतरित्या तिकीट काढून मॅच पाहायला आलेल्या प्रेक्षकांची संख्या होती- 1 लाख 75 हजार. 25 हजार लोक असे होते, जे एकतर आमंत्रित पाहुणे तरी होते किंवा घुसले तरी होते. म्हणजे स्टेडिअममध्ये जवळपास दोन लाख लोक होते.
यापूर्वी कोणत्याही एका सामन्याला इतके प्रेक्षक जमा झाले नव्हते.
ही विक्रमी प्रेक्षक संख्या होती.

फोटो स्रोत, Getty Images
फुटबॉल वर्ल्ड कपसंबंधी सॅम बर्कले यांनी 'एव्हरिथिंग यू एव्हर वॉन्टेड टू नो अबाउट द वर्ल्ड कप' या पुस्तकात या सामन्यासंबंधी रंजक माहिती मिळते.
या पुस्तकात लिहिल्यानुसार या मॅचमध्ये उरुग्वेच्या टीमवर ब्राझीलचा इतका दबाव होता की, त्यांचे टीम मिड फिल्डर ज्युलियो पेरेज यांना मॅचच्या आधी राष्ट्रगीत ऐकतानाच मूत्रविसर्जन झालं.
मॅचनंतर त्यांनी म्हटलं की, मला या गोष्टीची कधीही लाज वाटली नाही.
अर्थात, मीडियासमोर त्यांनी हे सत्य स्वीकार केलं, तेव्हा त्यांच्या टीमने इतिहास रचला होता. पण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, समोरची टीम किती दबावात होती.
ब्राझीलचे फॉरवर्ड एडमिर यांनी टूर्नामेंटमध्ये नऊ गोल केले होते. त्यांच्या टीममध्ये जिजिन्होसारखा उत्तम खेळाडू होता.
मॅच सुरू होण्याआधी स्टेडिअममध्ये ब्राझीलच्या पाठिराख्यांचा आवाज दुमदुमत होता. पण पहिल्या हाफमध्ये टीम गोल करू शकली नाही.
मॅचच्या 47 व्या मिनिटाला जिजिन्होच्या पासवर फ्रिकाने गोल केला आणि ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. पूर्ण मरकाना स्टेडिअम सांबाच्या तालावर नाचू लागलं.
पण उरुग्वेचा कर्णधार ओब्दुलो वारेलाने या गोलवर हरकत घेतली आणि रेफरींसोबत वाद घालायला सुरूवात केली. रेफरींना त्यांचं म्हणणं समजत नव्हतं, त्यामुळे मैदानावर एक ट्रान्सलेट बोलवावा लागला.
वारेला आठ मिनिटं रेफरींसोबत वाद घालत होता. त्यांना माहीत होतं की, फ्रिकाचा गोल अचूक आहे.
तरीही तो वेळ काढत होता. आठ मिनिटांपर्यंत चाललेल्या या वादामुळे स्टे़डिअममध्ये पूर्ण शांतता पसरली. नेमकं काय चाललंय हे प्रेक्षकांना कळत नव्हतं. दुसरीकडे यांमुळे उरुग्वेची टीम एकत्र आली.
खेळाडूंच्या मनातून या गोलचा दबाव दूर झाला. त्यामुळेच अनेक क्रीडा विश्लेषकांनी उरुग्वेच्या कर्णधाराची ही कृती ट्रिक असल्याचं म्हटलं, ज्यामुळे ब्राझीलचे खेळाडू आणि प्रेक्षक वैतागले.
या सगळ्या गोंधळात मॅचच्या सेकंड हाफमध्ये एक असा खेळाडू समोर आला, ज्याला ब्राझीलमध्ये 72 वर्षांनंतर आजही व्हिलनप्रमाणे पाहिलं जातं.
उरुग्वेचे राइट विंगर अल्सीडेस घिग्गियाने या मॅचआधी आपल्या टीमसाठी तीन सामन्यात तीन गोल केले होते. मात्र या सामन्यात दबावाच्या क्षणी त्यांनी आधी आपल्या सहकाऱ्याची मदत केली.
त्यांनी आपले सहकारी युआन स्केयफिनोला अचूक पास दिला. ज्यावर गोल करत उरुग्वेने सामन्यात ब्राझीलसोबत बरोबरी केली.
घिग्गियाच्या गोलमुळे ब्राझीलचा पराभव

फोटो स्रोत, Getty Images
जर ही मॅच ड्रॉ झाली असती, तरी गोलच्या सरासरीचा विचार करता ब्राझील विजेता ठरला असता. सामन्याच्या 79 व्या मिनिटाला घिग्गिया पुन्हा एकदा ब्राझीलच्या गोलपोस्टच्या दिशेने येऊ लागले.
ब्राझीलच्या डिफेंडर्सनी घिग्गियाला घेरायला सुरुवात केली, पण घिग्गियाने ब्राझीलच्या बचाव फळीला चकवा दिला, गोलकीपर बारबोसालाही चकवलं आणि त्यांनी मारलेला जोरदार शॉट गोलपोस्टमध्ये जाऊन पडला.
मरकाना स्टेडिअममध्ये जीवघेणी शांतता पसरली. त्यानंतर ब्राझीलच्या टीमने पूर्ण ताकदीनिशी गोल करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळालं नाही.
घिग्गियाने बीबीसीच्या विटनेस प्रोग्रामला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, "ब्राझीलचे गोलकीपर आणि गोलपोस्टमध्ये खूप जागा नव्हती. मी विचार केला आणि शॉट खेळलो. तो गोलकीपरच्या डावीकडे गेला. त्याला तो अडवता आला नाही.
हा माझ्या आयुष्यातला सर्वांत उत्तम गोल होता. आमचा हा दुसरा गोल होता. जेव्हा आमची टीम हा गोल सेलिब्रेट करत होती, तेव्हा स्टेडिअममध्ये शांतता होती. केवळ तीन लोकांमध्येच एका मूव्हमध्ये मरकाना स्टेडिअमला शांत करण्याची क्षमता होती. फ्रँक सिनात्रा, पोप जॉन पॉल द्वितीय आणि मी."
फ्रँक सिनात्रा एक प्रसिद्ध अमेरिकन गायक होते आणि जेव्हा घिग्गिया यांनी हा इंटरव्ह्यू दिला होता, तेव्हा पोप जॉन पॉल द्वितीय रोमन कॅथलिक पोप होते.
याच इंटरव्ह्यूमध्ये घिग्गिया यांनी एक रंजक किस्सा सांगितला होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी सांगितलं, "एकदा मी ब्राझीलला गेलो होतो. पासपोर्ट तपासण्याच्या खिडकीत एक 23-24 वर्षांची मुलगी होती. तिनं माझे कागदपत्र तपासले आणि विचारलं की, तुम्ही घिग्गिया आहात ना? मरकानावाले? मी होकारार्थी उत्तर दिलं आणि ही घटना खूप वर्षांपूर्वीचा असल्याचं म्हटलं. त्यावर तिने म्हटलं की, पण त्या पराभवाचं आम्हाला आजही वाईट वाटतं."
ब्राझीलचे नाटककार आणि स्पोर्ट्स लेखक नेल्सन रॉड्रिगेज यांनी 1950 च्या पराभवाबद्दल म्हटलं होतं, "1950 च्या पराभवामुळे आम्ही गेल्या 45 पिढ्यांचं पाप फेडलं आहे."
महान फुटबॉलपटू पेले यांनीही सांगितलं होतं की, या पराभवानंतर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना रडताना पाहिलं होतं. तेव्हा पेले यांचं वय 9 वर्षांचं होतं.
हा निकाल इतका अनपेक्षित होता की, उरुग्वेच्या संघाला कोणत्याही सेलिब्रेशनशिवाय वर्ल्ड कपची ट्रॉफी देण्यात आली. प्रेक्षकांचा नूर लक्षात घेऊन उरुग्वेच्या टीमनेही कोणत्याही प्रकारे आनंद साजरा केला नाही.
या मॅचला ग्रेट मरकाना ब्लो म्हणूनही ओळखलं जातं..म्हणजेच मरकानाचा दारूण पराभव. हा पराभव आजही ब्राझीलचे फुटबॉलप्रेमी विसरले नाहीत.
या टूर्नामेंटसाठी ब्राझीलच्या संघाला ट्रेनिंग देण्यासाठी फ्लावियो कोस्टा यांना कोच म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांना त्यावेळी दर महिन्याला एक हजार पौंड इतका पगार दिला गेला होता.
त्याकाळी ही रक्कम प्रचंड होती. त्यामुळे पराभवानंतर त्यांच्यावर प्रेक्षकांचा राग निघाला असता, म्हणून त्यांना स्टेडिअमच्या ड्रेसिंग रुममध्ये 48 तास बंद करण्यात आलं.
नंतरही त्यांना महिलेचे कपडे घालून बाहेर काढलं.
त्यांनी आपल्या 'व्हाय सॉकर मॅटर्स' या पुस्तकात म्हटलं होतं, "त्या दिवशी लाखो ब्राझिलियन लोकांसोबत मीसुद्धा आयुष्याचा एक धडा शिकलो. जोपर्यंत शेवटची शिट्टी वाजत नाही, तोपर्यंत आयुष्य आणि फुटबॉलमध्ये काहीच निश्चित नसतं."
गोल कीपरला आयुष्यभर भोगावी लागली शिक्षा

फोटो स्रोत, Getty Images
या पराभवाची सर्वाधिक किंमत संघाचा गोल कीपर मोआसिर बारबोसाला चुकवावी लागली. या स्पर्धेआधी तो या देशातला सर्वांत आदर्श गोल कीपर समजला जात होता.
वर्ल्ड कपमधील या सामन्यानंतर मात्र त्याच्याकडे देशात तिरस्काराने पाहिलं जाऊ लागलं. याच तिरस्कारासोबत त्यांना आयुष्य घालवावं लागलं.
1993 मध्ये ब्राझीलची टीम अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्ड कपची तयारी करत होती. त्यावेळी ते आपल्या खेळाडूंना भेटण्यासाठी कँपमध्ये पोहोचले. पण टीमच्या संचालकांपैकी एकाने गार्ड्सना बोलावलं आणि म्हटलं की, या माणसाला इथून बाहेर काढा. हा नेहमी सोबत बॅड लक घेऊन येतो.
असेच अनेक किस्से लुसियाने वॅरिंके यांच्या 'द मोस्ट इनक्रेडिबल वर्ल्ड कप स्टोरीज़' मध्ये 1950 च्या स्पर्धेवरील प्रकरणातही आहेत.
8 एप्रिल, 2000 ला बारबोसाचं निधन झालं. आपल्या निधनापूर्वी ते नेहमी म्हणायचे की, आपल्या देशात कोणत्याही गुन्ह्याची शिक्षा ही 30 वर्षं आहे. पण मी 50 वर्षांपासून त्या गुन्ह्याची शिक्षा भोगलीये, जो मी कधीच केला नाही."
उरुग्वेसाठीही धक्कादायक निकाल
याच पुस्तकात म्हटल्याप्रमाणे उरुग्वेसाठीही हा निकाल इतका धक्कादायक होता की, आठ लोकांचं हार्ट अटॅकनं निधन झाला. मॅचच्या दरम्यान पाच लोकांचा मृत्यू झाला आणि शेवटची शिट्टी वाजेपर्यंत तीन लोकांनी प्राण गमावले.
मरकाना स्टेडिअममधल्या डॉक्टरांच्या मते वेगवेगळ्या कारणांनी बेशुद्ध झालेल्या 169 लोकांवर सामन्यादरम्यान उपचार करण्यात आले. यामध्ये सहा जणांना गंभीर परिस्थिती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
जवळपास शंभर फॅन्सने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हा दिवसच रिओ डि जानिरोच्या इतिहासात दुःखद मानला जातो.
वर्ल्ड कपमधल्या या पराभवानंतर ब्राझीलच्या फुटबॉल टीमने पिवळ्या रंगाची जर्सी घालायला सुरूवात केली.
ज्या घिग्गिया यांनी ब्राझीलच्या फॅन्सना सर्वांत जिव्हारी लागणारा पराभव दिला, त्याच घिग्गियांना 2014 च्या वर्ल्ड कपचे ड्रॉ काढण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं. पण त्यावेळीही 1950 मधल्या पराभवाचा उल्लेख केला गेला.
घिग्गिया यांचं निधन वयाच्या 88 व्या वर्षी 16 जुलै, 2015 ला उरुग्वेतल्या एका हॉस्पिटलमध्ये झालं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








