दिएगो मॅराडोना : जेव्हा वर्ल्डकप सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी कोलकात्यामध्ये मोर्चे निघाले होते

मॅराडोना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आशिष पेंडसे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

30 ऑक्टोबर हा फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचा जन्मदिन. या निमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...

आता मला आयुष्यात काहीही नको. मी आता इथून थेट हिमालय गाठणार आहे...

...मी असा फोन केल्यानंतर आमच्या लोकसत्ताच्या ऑफिसमधील साहेब, सहकारी अवाकच झाले. पण त्याला कारणही तसंच होतं. आज मला फुटबॉलच्या देवाचं केवळ दर्शनच झालं नव्हतं तर त्याच्यासमवेत संवाद साधण्याची संधी मिळाली होती!

एक राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू, फुटबॉल लेखक, अभ्यासक, पत्रकार या नात्याने मला आणखीन काय हवं होतं? कोलकात्यामधील सोनार बांगला हॉटेलमध्ये मॅराडोनाचं वास्तव्य होतं आणि त्याच ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

दिएगो मॅराडोना, अर्जेंटिना

फोटो स्रोत, Mark Leech/Offside

फोटो कॅप्शन, दिएगो मॅराडोना

त्यावेळेस तो मेसीचा समावेश असलेल्या अर्जेंटिना संघाचा प्रशिक्षक होता आणि अवघ्या दोन वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकप होणार होता.

तसंच अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक, लॅटिन अमेरिकेतील राजकारण अशा अनेकविध विषयांवर नेहमीप्रमाणेच त्याने अत्यंत वादग्रस्त भूमिका घेतली होती.

त्यामुळे त्याच्या कोलकाता भेटीकडे केवळ फुटबॉलमधील वर्ल्ड हेडलाईन म्हणून न पाहता विविधांगी मालमसाला होता. केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील जवळपास दोनशे पत्रकार मॅराडोनाचा हा दौरा कव्हर करण्यासाठी कोलकात्यामध्ये डेरेदाखल झाले होते.

आणि त्यामध्ये मराठी माध्यमांचा मी एकमेव होतो हे सांगताना ऊर अभिमानाने भरून येतो.

प्रचंड संख्येने पत्रकार असल्याने बंदिस्त हॉलऐवजी हॉटेल मागील मोठ्या हिरवळीच्या मैदानावरच ही पत्रकार परिषद घ्यावी लागली होती.

पत्रकार परिषदेसाठी दुपारी एक वाजताची वेळ दिली होती. त्या पूर्वी तब्बल दोन तास आधीपासून आम्ही पहिल्या रांगेतील आसन पकडून बसलो होतो.

सर्वसाधारणपणे पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर, आता प्रश्न विचारा असे जाहीर केल्यावर पाच दहा सेकंदाचा पॉज असतो. पहिला प्रश्न कोणी विचारायचा याबाबत उपस्थित पत्रकारांमध्ये थोडी चलबिचल होते.

मी आधीच तो क्षण पकडण्याचं ठरवलं. बदामी कलरचा शर्ट, निळी जीन्स आणि गॉगल अशा पेहरावातील मॅराडोना त्याच्या ट्रान्सलेटर समवेत मंचावर दाखल झाला.

चमत्कारावर माझा विश्वास नाही

कम ऑन...आस्क क्वेस्चन्स, असा पुकारा झाला आणि ठरवल्याप्रमाणे मी पहिल्या रांगेतून उभे राहून दिएगो दिएगो अशी हाळी दिली.... 'ओके' असं म्हणत मला प्रश्न विचारण्यास अनुमती देण्यात आली.

1980 च्या दशकामध्ये भारतात नेहरू कप ही आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा होत असे. त्यामध्ये रशिया, हंगेरी, रोमानिया, अर्जेंटिना, उरुग्वे असे आघाडीचे संघ त्यांच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या टीमसह सहभागी होत असत.

मॅराडोनाने १९८६ साली विश्वचषक जिंकला होता. परंतु त्यापूर्वी दोन वर्षं आधी म्हणजेच १९८४ मध्ये अर्जेंटिना संघाने नेहरू कप स्पर्धेत खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता, मॅराडोना त्या संघात नव्हता. पण ८६ वर्ल्ड कप जिंकून देणारे प्रशिक्षक कार्लोस बिलार्डो हेच त्या ८४ च्या संघाचे प्रशिक्षक होते.

माझा सलामीचा प्रश्न हा त्यावरच आधारित होता... वर्ल्डकप जिंकण्यापूर्वी दोन वर्षं आधी अर्जेंटिनाचे प्रशिक्षक भारत दौऱ्यावर आले होते. आताही बरोबर दोन वर्षांनी वर्ल्डकप होतो आहे आणि तू अर्जेंटिनाचा प्रशिक्षक असताना भारत दौऱ्यावर आला आहे. दोन वर्षांनी पुन्हा इतिहास घडणार का...?

माझा हा प्रश्न ट्रान्सलेटर ने मॅराडोनाला सविस्तरपणे भाषांतरीत करून सांगितला. आणि त्या प्रत्येक वाक्यागणिक मॅराडोनाचा चेहरा फुलत गेला. प्रश्न संपल्यानंतर त्याने माझ्याकडे पाहिले. Thumbs up अशी खूण करत माझ्या प्रश्नाला दाद दिली आणि मग तो उत्तर देऊ लागला.

"अशाप्रकारचे योगायोग, चमत्कार यावर माझा विश्वास नाही. माझा विश्वास माझ्या कर्तृत्वावर आहे. माझ्या संघावर आहे. माझ्या देशवासीयांच्या माझ्यावरील, आमच्या संघावरील आणि फुटबॉलवरील प्रेमावर आहे. या शिदोरीच्या जोरावर अर्जेंटिनासारख्या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. तुम्ही म्हणता तसे भारत दौरा माझ्यासाठी लकी ठरला, तर सोन्याहून पिवळे. प्रशिक्षक म्हणून जिंकलेली वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन," असं त्याने उत्तर दिलं.

फिफा वर्ल्ड कप 1986, मॅराडोना, हँड ऑफ गॉड

फोटो स्रोत, STF

फोटो कॅप्शन, गोल ऑफ द सेंच्युरी : जेव्हा मॅराडोनाने 7 इंग्लिश खेळाडूंना चकवत गोल केला होता.

एव्हाना माझं धाडस भलतंच वाढलं होतं. त्याचं उत्तर सुरू असतानाही माझा हात वरच होता. ते पाहून त्याने खूण केली. विचार दुसरा प्रश्न...

त्यावर माझा दुसरा प्रश्न होता. तुम्हाला एक खेळाडू म्हणून आव्हान वाटतं की एक प्रशिक्षक पदाची जबाबदारी अधिक अवघड वाटते?

काहीसा विचार करून त्याने उत्तर दिलं, "कधीही एक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी अतिशय अवघड आहे, माझ्यासारख्या मनस्वी व्यक्तीला. अर्थात मी जेव्हा मैदानावर एक खेळाडू म्हणून असतो, संघाचा कर्णधार, नेता म्हणून मी संपूर्ण संघाचा विचार करीत असतो. माझी वैयक्तिक कामगिरी, मी किती गोल मारले यापेक्षाही संघातील प्रत्येक खेळाडू आपल्या विजयामध्ये कसा अधिकाधिक सहभागी होईल, यावरच माझा भर असतो. त्याचा खेळ लौकिकाला साजेसा होत नसेल तर एक लीडर या नात्याने त्याचं मनोधैर्य उंचावणं हे माझं काम असतं.

"पण प्रशिक्षक या नात्याने केवळ मैदानातील समस्याच नव्हे तर इतरही अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. खेळाडूंचा आहार, त्यांचा सराव, दुखापती, फुटबॉल संघटना, आपल्या संघाचे चाहते, अनेकविध स्तरांवर लक्ष ठेवायचं असतं. तुम्ही मला ओळखत असाल तर मी मनस्वी व्यक्ती आहे. पण मला कायमच नवीन आव्हान स्वीकारण्यास आवडतं. आणि त्याच भूमिकेतून मी प्रशिक्षकपदाची जबाबदारी, हा काटेरी मुकूट म्हणा हवं डोक्यावर चढवला आहे."

बाकीच्या पत्रकारांचे प्रश्न विचारणे सुरु असताना माझा हात परत वर गेला. पत्रकार परिषदेच्या अखेरच्या टप्प्यावर मला तिसरा प्रश्न विचारण्याची संधी मिळाली.

भारतामधून असे मॅराडोना तयार करण्यासाठी काय करावे असे तुला वाटते... माझ्या प्रश्नावर त्याने सविस्तर उत्तर दिलं.

तो म्हणाला, "मुळात कोणत्याही गोष्टीवर तुम्ही मनस्वी प्रेम केलं की ती गोष्ट तुम्हाला आत्मसात करणं सोपं जातं. एखादी आवडीची गोष्ट तुम्ही जगणं महत्त्वाचं असतं. फुटबॉल हा माझ्यासाठी केवळ एक व्यवसाय नाही. मी व्यावसायिक खेळाडू नक्कीच आहे. पण फुटबॉल हे माझं जीवन आहे. माझं संपूर्ण आयुष्य मी फुटबॉलला अर्पण केलं आहे.

फिफा वर्ल्ड कप 1986, मॅराडोना, हँड ऑफ गॉड

फोटो स्रोत, BONGARTS

फोटो कॅप्शन, ऐतिहासिक 'हँड ऑफ गॉड' गोल

"खेळाडू छोटा असो की मोठा, स्थानिक स्तरावर खेळणारा असो की आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणारा. प्रत्येक खेळाडूने अशाप्रकारची आत्मियता आणि खेळाप्रती निस्सीम श्रद्धा, भक्ती दाखवली तर नक्कीच माझ्याहीपेक्षा श्रेष्ठ खेळाडू जन्माला येऊ शकेल. मग तो अर्जेंटिनात आहे की युरोपमध्ये की भारतामध्ये हा सवालच उपस्थित होणार नाही!"

अशा सवालजवाबांनी ही पत्रकार परिषद तब्बल दीड तास सुरू होती. जणू काही एखादा फुटबॉल सामना!

म्हणूनच या पत्रकार परिषदेच्या अनुभवानंतर मी थेट हिमालयात जाण्याची इच्छा व्यक्त करणं काही अतिशयोक्तीचे नव्हतं.

कोलकात्यात फक्त मॅराडोनाचा जयघोष

5 डिसेंबर 2008, दिएगो मॅराडोना कोलकात्यामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर पुढचे तीन दिवस कोलकाता, म्हणजेच सिटी ऑफ जॉय त्याच्या भेटीच्या या आनंदामध्ये हरखून गेली होती.

या दोन-तीन दिवसांच्या भेटीमध्ये संपूर्ण कोलकाता मॅराडोनामय झालं होतं. सर्वत्र मॅराडोनाची पोस्टर्स, अर्जेंटिनाचे झेंडे-पताका झळकत होत्या.

जिथे जाऊ तिथे मॅराडोना, मॅराडोना असा जयघोष होता. वाहतूक कोंडी आणि अतिउत्साही फुटबॉल प्रेमींना आवर घालताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. परंतु ते देखील मॅराडोनाप्रेमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता सारं सुरळीतपणं पार पडलं.

कोलकात्यामधला दिएगो मॅराडोनांचा पुतळा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोलकात्यामधला दिएगो मॅराडोनांचा पुतळा

असा काय करिश्मा होता मॅराडोनाचा? का एवढे लोक त्याच्यामागे वेड्यासारखे धावत होते? वास्तविक हजारो मैल दूरवरच्या अर्जेंटिनाचा तो एक फुटबॉल खेळाडू. कोलकातामधलं फुटबॉल प्रेम कितीही मान्य केलं तरीसुद्धा असं काय नातं त्यामध्ये होते?

मॅराडोनाच्या भेटी दरम्यान या सर्व प्रश्नांची आपोआपच उकल होत गेली.

खुद्द मॅराडोनादेखील या अभूतपूर्व प्रेमाने गहिवरला होता. कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर पहाटेच्या सुमारास त्याचं विमान उतरलं, त्यावेळी सुमारे १५ हजार फुटबॉलप्रेमी त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

त्यांनी अक्षरशः मिरवणुकीने सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावरच्या हॉटेलपर्यंत साथ दिली.

दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेनंतर कोलकात्याच्या प्रसिद्ध सॉल्ट लेक स्टेडियमवर मॅराडोनाच्या उपस्थितीत एक प्रदर्शनीय सामना खेळला गेला. तब्बल १ लाख १० हजार फुटबॉलप्रेमींनी त्या वेळी गर्दी केली होती.

त्या वेळी सुरक्षारक्षकांची नजर चुकवून स्टेडियमच्या ड्रेसिंग रूमच्या दरवाजाने मी आत घुसलो आणि थेट पोहोचलो तो मैदानावरच!

त्यावेळेस मॅराडोनाच्या गाडीजवळ आम्ही काही पत्रकारांनी थेट मैदानात धाव घेतली. 'मॅराडोना... मॅराडोना' असा एकच जयघोष सुरू होता. गाडीच्या टपावर उभे राहून त्याने नेहमीच्या शैलीत उजव्या हाताची मूठ आपल्या हृदयावर ठेवत अभिवादन केलं.

दुसऱ्या दिवशी मॅराडोना मोहन बागान या ऐतिहासिक फुटबॉल क्लबला भेट देण्यास आला होता. तिथेही २५ हजार प्रेक्षक गर्दी करून होते. मैदानात आल्यानंतर त्याने मैदानाभोवती फेरी मारून उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन केलं.

इतकंच नाही तर तेथे असलेले चेंडू डाव्या पायाने किक मारून स्टेडियम मध्ये भिरकावले. मॅराडोनाला अशी किक मारताना टीव्हीवर असंख्य वेळा पाहिले होते. पण आपल्यासमोर अवघ्या काही फुटांवरून तो अशी किक मारेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. म्हणूनच माझ्यासमवेत लाखो कोलकातावासीय ते दिवस अक्षरशः स्वप्नवत जगत होते.

मॅराडोनाने १९८६ मध्ये वर्ल्ड कप जिंकला. भारतामध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला तो पहिलाच वर्ल्ड कप. त्यामुळेच एका अर्थाने मॅराडोनाने भारतवासीयांना फुटबॉल बघायला आणि जगायला शिकवलं. ते धूळपाटी प्रमाणे पहिले धडे होते.

मॅराडोना आणि ज्योती बासू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2008 च्या दौऱ्यादरम्यान मॅराडोना आणि ज्योती बासू

सामने पाहण्यासाठी मोर्चे

पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही गोष्टी आंदोलनाशी निगडित असतात. या वर्ल्डकपचं प्रक्षेपण करण्यासाठी कोलकात्यामध्ये मोर्चे काढण्यात आले होते. तेव्हा कुठे त्यांना मॅराडोनाच्या पराक्रमाचे साक्षीदार होता आलं होतं!

कोलकाता आणि मॅराडोनाचं आगळंवेगळं नातं आहे. कोलकाता म्हणजे बंगभूमी आणि बंड भूमी. कायमच डाव्यांच्या विचारसरणीचा पगडा असलेलं शहर. आणि मॅराडोना म्हणजे देखील बंड प्रवृत्तीचे प्रतीक.

तरुणांना फुटबॉलच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा पश्चिम बंगालमध्ये देण्यात आली. मोहन बागान संघाने ब्रिटिश संघाचा पराभव करून स्वातंत्र्याचं रणशिंग जणू फुटबॉलच्या मैदानावर पुकारलं. मॅराडोनानेदेखील वर्ल्डकप उंचावून युरोपच्या वर्चस्वाला धक्का दिला.

फिफा वर्ल्ड कप 1986, मॅराडोना, हँड ऑफ गॉड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 80 आणि 90चं दशक मॅराडोनाचं होतं, लोक त्यांना देव मानत होते

नाही रे घटकांचा तो स्फूर्तीदायी विजय होता. कोणताही स्टार खेळाडू नसताना थेट विश्व विजेतेपद मिळवून देणं, ही असाधारण कामगिरी होती. आणि तेव्हाच्या तिसऱ्या विश्वातील समाजाला प्रेरणादायी होती. त्यांच्यात आशेचा अंगार चेतावणारी होती.

फिडेल कॅस्ट्रोंशी मैत्री

फिडेल कॅस्ट्रो यांच्या बरोबरची मैत्री मॅराडोनाने कधीही लपवून ठेवली नव्हती. आणि त्या नातेसंबंधांमध्ये तो कोलकातावासियांच्या अधिकच जवळ पोहोचला होता. मॅराडोनाच्या ज्योती बसू यांच्या भेटीदरम्यान आणि मदर टेरेसांच्या आश्रमाच्या भेटी दरम्यान या जिव्हाळ्याची आवर्जून प्रचिती आली.

मदर टेरेसा आश्रमात मॅराडोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मदर टेरेसांच्या आश्रमाला भेट, 2008 दौरा

कोलकाताजवळच्या जाधवपूर इथे मॅराडोनाचे मंदिर आहे. तसंच अर्जेंटिना राष्ट्रीय फुटबॉल संघाचा अधिकृत फॅन क्लब या ठिकाणी कार्यरत आहे. अर्जेंटिना फुटबॉल संघटना आणि अर्जेंटिना सरकारने त्याला अधिकृत म्हणून मान्यता दिली आहे अर्जेंटिना बाहेरील अशा प्रकारचा अधिकृत फॅन क्लब हा पहिलाच!

फुटबॉलला 'ब्युटीफुल गेम' असं संबोधलं जातं. तो जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरूपात आता इतर सर्व खेळांप्रमाणे फुटबॉल हा खेळ देखील तांत्रिक आणि रणनीतीने एखाद्या बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे खेळला जात आहे. पण फुटबॉलचं मर्म टिकून आहे ते मॅराडोनासारख्या मनस्वी खेळाडूंमध्ये.

पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मॅराडोना मायदेशी परतणार होता. परंतु त्यावेळेसदेखील सुमारे पाच हजार फुटबॉल प्रेमी विमानतळावर साश्रू नयनांनी मॅराडोनाला निरोप देण्यास उपस्थित होते. आणि विशेष म्हणजे या दोन दिवसांच्या गर्दीमध्ये महिला, आबालवृद्ध सहभागी होते.

साक्षात देवदर्शन झाल्याप्रमाणे हे फुटबॉल भक्त अक्षरशः घळाघळा रडत होते. आजही त्या आठवणींनी अंग रोमांचित होतं आणि डोळ्यांत पाणी येतं.

या मॅराडोना भेटीदरम्यान झालेल्या सर्व फुटबॉल मित्रांनी मॅराडोनाच्या निधनाचं वृत्त कळताच आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

(आशिष पेंडसे हे व्हिवा फुटबॉल मासिकाचे संपादक आहेत. या लेखात मांडण्यात आलेले विचार त्यांचे वैयक्तिक आहेत.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)