26/11 मुंबई हल्ल्याचा कथित मास्टरमाईंड हाफिज सईद सध्या काय करतो?

हाफिज सईद

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, इबाद-उल-हक
    • Role, बीबीसी न्यूज, लाहोर

बंदी घालण्यात आलेल्या जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद पाकिस्तानात सध्या तुरुंगवास भोगत आहे.

हाफिज सईदविरोधात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वेगवेगळ्या शहरांमध्ये सात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी तीन गुन्ह्यांच्या अंतर्गत त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

नजरकैद/अटक/शिक्षा

हाफिज सईद हाच मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जात होता. यामुळे गेली अनेक वर्षं हाफिजच्या अटकेची मागणी भारतासह अमेरिकेतूनही केली जात होती.

गेल्या 20 वर्षांत पाकिस्तानच्या प्रशासनाने हाफिज सईदला अनेकवेळा ताब्यात घेतलं. त्याला अनेकवेळा नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. पण त्याच्याविरोधात कोणताही खटला भरण्यात आला नव्हता. अखेर प्रत्येकवेळी त्याला मुक्त केलं जात होतं.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरावर झालेल्या 9/11 हल्ल्यानंतरही हाफिजला पाकिस्तानात काहीवेळा अटक झाली होती. त्याला अनेकवेळा नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.

डिसेंबर 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ला प्रकरणाचा आरोपही भारताने हाफिज सईदवर लावला होता. त्यानंतर 2006 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातही त्याच्यावर आरोप करण्यात आले.

2008 मध्ये लष्कर-ए-तोयबाने घडवून आणलेल्या मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यानंतर 2008-2009 दरम्यान हाफिज सईद अनेकवेळा नजरकैदेत होता.

मुंबई हल्ला,
फोटो कॅप्शन, मुंबई हल्ला

या प्रत्येकवेळी पाकिस्तानी सरकारने हाफिजविरोधात एकही खटला भरला नाही.

त्याऐवजी प्रत्येकवेळी त्याची नजरकैद वाढवून घेतली जायची. ही मागणी कोर्टाने फेटाळल्यानंतर हाफिजची पुन्हा मुक्तता करण्यात येत असे.

पण गेल्यावर्षी जुलै महिन्यात पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने हाफिजला अटक केली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हाफिज सईदवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत खटला चालवण्यात आला. लाहोरच्या दहशतवादविरोधी विशेष कोर्टाने त्याला दोन खटल्यांमध्ये दोषी ठरवून साडेपाच वर्षांची शिक्षा ठोठावली.

हाफिज सईद भारताच्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत आहे. तसंच संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीतही हाफिजचं नाव आहे.

त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं.

गेल्या वर्षी हाफिजला अटक झाल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीट केलं, "मुंबई हल्ल्याच्या दहा वर्षांनंतर कथित मास्टरमाईंडला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. त्याला पकडण्यासाठी गेल्या दोन वर्षांत प्रचंड दबाव टाकण्यात आला होता."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

पुलवामा हल्ल्यानंतरचे निर्बंध

फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ला प्रकरणानंतर पाकिस्तानने काही कट्टरवादी संघटनांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यामध्ये हाफिज सईदच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या संघटनांचाही समावेश होता.

पुलवामा

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पुलवामा हल्ला

या घटनेनंतर जमात-उद-दावा संघटनेच्या बड्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं. पंजाबच्या विविध शहरांमध्ये हाफिज सईदविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या संघटनेचं सदस्यत्व आणि संघटनेसाठी निधी गोळा केल्याचा आरोप हाफिजवर ठेवण्यात आला.

जुलै 2019 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर डिसेंबर महिन्यात हाफिजविरोधातील खटला सुरू करण्यात आला. त्यानंतर दोन महिन्यांच्या आत न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

संघटनेकरिता बेकायदेशीररित्या निधी गोळा करणं, बंदी घालण्यात आलेल्या संस्थेशी संबंधित मालमत्तांची मालकी या कलमांअंतर्गत हा खटला चालवण्यात आला.

हाफिजच्या अटकेचं अमेरिकेने स्वागत केलं. "हाफिज सईदच आणि त्याच्या साथीदाराला केलेली शिक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या दोघांसह लष्कर-ए-तोयबा गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे. दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक मदतीविरोधात लढण्याचा शब्द दिलेल्या पाकिस्तानसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे," असं अमेरिकेने ट्वीट करून म्हटलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

हाफिजविरोधातील खटले

हाफिज सईदविरोधात सात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोन लाहोरमध्ये, दोन गुजरानवाला जिल्ह्यात, दोन साहिवालमध्ये तर एक गुन्हा मुलतान येथे दाखल करण्यात आला होता.

यामध्ये तीन खटल्यांमध्ये हाफिज दोषी ठरला. त्याला सर्व मिळून एकूण 21 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हाफिजला लाहोर आणि गुजरानवाला अशा दोन खटल्यांमध्ये प्रत्येकी साडेपाच वर्षं अशी अकरा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने आणखी एका खटल्यात हाफिजला शिक्षा सुनावली. या खटल्यात हाफिजला दहा वर्षं आणि सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हाफिजविरोधातील इतर चार खटल्यांची सुनावणी होणं अद्याप बाकी आहे.

मुंबई हल्ला,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 26/11च्या मुंबई हल्ला प्रकरणी हाफिज सईदला अद्याप शिक्षा झालेली नाही.

पण हाफिजला मुंबई हल्ल्याप्रकरणी अद्याप शिक्षा झालेली नाही. मुंबई हल्ला प्रकरणात भारताच्या बाजूने योग्य समन्वय राखला जात नसल्यामुळे हाफिजविरोधातील खटला अडकून पडला आहे, असा दावा पाकिस्तानकडून केला जातो.

या प्रकरणातील पाकिस्तानातील साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पाकिस्तानने भारताच्या साक्षीदारांची उलट-तपासणी करू देण्याची मागणी केलेली आहे. पण भारताने ही मागणी अद्याप मान्य केलेली नाही.

हाफिजला आता शिक्षा का होतेय?

फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) दबावामुळे पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या दबावामुळे पाकिस्तानचा नाईलाज झाला. इतर कोणताही पर्याय नसल्यामुळे पाकिस्तानने ही कारवाई केली, असं तज्ज्ञांना वाटतं.

जून 2018 मध्ये FATF ने पाकिस्तानला ग्रे यादीत टाकलं होतं. जे देश आर्थिक व्यवहार आणि दहशतवादाला पैसा पुरवणं रोखणं यांसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवण्यात आलेल्या मानकांचं पालन करत नाहीत, त्यांना ग्रे यादीत टाकलं जातं.

यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थांकडून होणाऱ्या मदतीवर विपरीत परिणाम होतो. काही महिने ग्रे यादीत राहिल्यामुळे पाकिस्तानला याचा फटका बसला.

यामुळेच पाकिस्तानला दहशतवादविरोधी कारवाई करावी लागली, हाफिज सईदची अटक हा त्याचाच एक भाग आहे, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत असतं.

सध्या पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात अडकला आहे. ग्रे यादीतून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानला फेब्रुवारी महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)