उद्धव ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला नरेंद्र मोदी पुण्यात

नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात कोव्हिड-19 ची लस बनवणाऱ्या 'सीरम इन्स्टिट्युट'ला भेट देणार आहेत.

'सिरम इन्स्टिट्युट' मध्ये तयार होणाऱ्या कोरोना विरोधातील लशीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान पुण्याचा दौरा करणार आहेत.

ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असल्याने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

काय सांगतो राजकीय शिष्ठाचार

राजकीय शिष्ठाचारानुसार देशाचे पंतप्रधान राज्यात शासकीय कामासाठी येत असतील तर, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचं स्वागत आणि कार्यक्रमाला उपस्थित रहाणं अपेक्षित असतं.

त्यामुळे नरेंद्र मोदींच्या स्वागताला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना उपस्थित रहाणं अपेक्षित आहे, असं राजकीय विश्लेषकांच मत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या शासकीय दौऱ्याआधी पंतप्रधान कार्यालयाकडून मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून दौऱ्याबाबत माहिती दिली जाते.

नरेंद्र मोदींचा पुणे दौरा

पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत पत्रकारांना माहिती देताना पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, "पंतप्रधान 28 नोव्हेंबरला पुण्यात 'सीरम इन्स्टिट्युट'ला भेट देणार आहेत. दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान पुण्याला पोहोचतील त्यांनंतर हेलिकॉप्टरमधून 'सिरम इन्स्टिट्युट' ला रवाना होतील"

एका तासाच्या आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या 'सिरम इन्स्टिट्युट' मध्ये सुरू असलेल्या कोरोना विरोधातील लशीची माहिती घेणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसपीजीची टीम पुण्यात आली असून सुरक्षेची तयारी करण्यात येत असल्याची माहिती राव यांनी दिली आहे.

कोरोनाबाबतची सर्व काळजी घेऊन का दौरा आखण्यात आला आहे. पुण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान हैद्राबादला रवाना होणार आहेत.

दरम्यान, 4 डिसेंबरला पुण्यात 100 देशांचे राजदूत 'सीरम इन्स्टिट्युट' आणि 'जिनिव्हा बायोफार्मास्युटीकल'ला भेट देणार आहेत.

ठाकरे सरकारची वर्षपूर्ती

29 नोव्हेंबर 2019ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. भाजपशी फारकत घेऊन ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत सत्तास्थापन केली आहे.

कोव्हिड काळात शिवसेनेने सामना मुखपत्रातून मोदी-शहा यांच्यावर टीका केली होती.

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जीएसटीच्या मुद्यावर हल्लाबोल केला होता.

दोन दिवसांपूर्वीच, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत राज्यात कोरोना विरोधी लशीबाबत टास्क फोर्स स्थापन केल्याची माहिती दिली होती. त्याचसोबत भाजपकडून वीजबिलाबाबत होणाऱ्या आंदोलनांवरून मोदींकडे तक्रार केली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)