कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक, पंजाब-हरियाणात परिस्थिती चिघळली

फोटो स्रोत, Gettyimgaes/Hindustan Times
केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी सुधारणा कायद्यांना विरोध करण्यासाठी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्राचा कायदा शेतकरीविरोधी आहे, असा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन अधिकच तिव्र केलं आहे
26 आणि 27 नोव्हेंबरला शेतकरी संघटनांनी 'चलो दिल्ली' ची हाक दिली आहे.
हरियाणा-दिल्ली सीमेवर सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. दिल्लीकडे निघालेल्या या शेतकऱ्यांना हरियाणा सरकारने सीमेवर अडवून धरलं आहे. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही.
शिवाय 25 नोव्हेंबरला दिल्लीत पोहोचून गुरूद्वारामध्ये रहात असलेल्या काही शेतकऱ्यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं आहे.
शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा
पंजाब-हरियाणाच्या शंभू बॉर्डरजवळ पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला. तसंच अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. हरियाणाहून दिल्लीकडे येणाऱ्या सीमा पोलिसांनी बॅरिकेड घालून बंद केल्या आहेत.

फोटो स्रोत, ANI
पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी टॅक्टर, ट्रॉली आणि इतर वाहनांनी दिल्लीकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये शिरण्यापासून थांबवण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तयार ठेवला आहे.
पंजाबमध्ये परिस्थिती काय?
बीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी सत सिंह यांच्याशी चर्चा करताना, पोलीस अधीक्षक जनशदीप रंधावा म्हणाले, "शेतकऱ्यांच्या संघटनांनी मोर्चासाठी प्रशासनाची परवानगी घेतली नाही. पोलीस कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहेत."
दरम्यान, भारतीय शेतकरी युनिअनचे गुरनाम सिंह यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेने रवाना झाला असून सद्यस्थितीत तो करनालला पोहोचल्याची माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, नवीन कृषी कायद्यांमुळे कृषीक्षेत्र श्रीमंत कॉरपोरेट कुटुंबाच्या हाती जाईल. ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. त्यांच्या माहितीप्रमाणे, ज्या उत्पादनांवर हमीभाव मिळत नाही त्यांना कमी किमतीत विकावं लागतं.
दिल्लीत मेट्रोसेवा थांबवली
शेतकऱ्यांचं तिव्र आंदोलन लक्षात घेता दिल्ली मेट्रो रेल्वे प्रशासनाने दिल्ली मेट्रो पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्लीहून नोएडा, फरीदाबाद, गाजियाबाद आणि गुरुग्रामकडे जाणारी मेट्रोसेवा बंद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या 'चलो दिल्ली' आंदोलनामुळे पोलिसांनी फरीदाबाद-दिल्ली सीमा सील केली आहे. फरीदाबाद पोलिसांच्या माहितीनुसार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिल्लीत पाय ठेऊ द्यायचे नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
हरियाणाची सीमा सील
हरियाणा सरकारने पंजाबची सीमा गुरूवार आणि शुक्रवारी सील करण्याचा निर्णय घेतलाय. बुधवारी अंबालामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा अडवण्यासाठी प्रशासनाने त्याच्यावर पाण्याचा मारा केला. दोन दिवसांकरिता पंजाबमधून येणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिल्ली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना दिल्लीत न येण्याची सूचना केली होती. दिल्लीत आल्यास आंदोलनकर्त्यांना कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला होता.
मुख्यमंत्र्यांमध्ये ट्वीटर वॉर
शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून पंजाब आणि हरियाणाचे मुख्यमंत्री आमने-सामने आले आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह आणि मनोहरलाल खट्टकर यांच्यात ट्विटर वॉर सुरू झालं आहे.
पंजाबमधील शेतकऱ्यांचा कृषी कायद्याला विरोध आहे. त्यामुळे शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या मुद्यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचं नाव घेऊन ट्विटरवर म्हटलं,
"गेल्या दोन महिन्यांपासून पंजाबमध्ये शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. त्यांना कोणताही त्रास होत नव्हता. मग, हरियाणा सरकार शेतकऱ्यांना मारहाण का करत आहे? त्यांच्यासोबत जबरदस्ती का केली जात आहे? शेतकऱ्यांना सर्वसामान्यांसाठी असलेल्या हाय-वेवर का जाता येत नाही? मनोहरलाल जी, त्यांना जाऊ द्या. शांततेत त्यांना दिल्लीपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्यासाठी जाऊ द्या"
यावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पलटवार केलाय.
ट्विटवर ते म्हणतात, "कॅप्टन अमरिंदर जी, मी याआधीच स्पष्ट केलं होतं आणि आता पुन्हा सांगतो. शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यास त्रास झाला तर मी राजकारण सोडेन. त्यामुळे शेतकऱ्यांना फूस लावणं बंद करा. मी गेल्या तीन दिवसांपासून तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. पण, तुम्ही चर्चेसाठी उपलब्ध नाही. शेतकऱ्यांच्या मुद्यावर तुम्ही गंभीर नाही?"
"तुम्ही फक्त ट्विट करता, पण चर्चा करण्यासाठी पुढे न येता पळून जाता का," असा सवाल खट्टर यांनी विचारला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








