FIFA World Cup : जेव्हा फुटबॉल स्टेडियमखाली दुसऱ्या महायुद्धातला न फुटलेला बॉम्ब सापडला होता...

- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
मार्च 1995 मधली गोष्ट. दुपारची वेळ होती. पोर्टलंड युनायटेड या युकेमधल्या फुटबॉल क्लबच्या स्टेडियमवर काही लोक काम करत होते.
या क्लबने नुकतंच दुसऱ्या ठिकाणी आपलं बस्तान हलवलं होतं पण या ग्राऊंडवर त्याआधी कित्येत वर्षं त्यांनी प्रॅक्टिस केली होती, मॅचेस खेळल्या होत्या.
पोर्टलंड युनाटेडच्या मॅनजमेंटने हे ग्राऊंड एका खाणकंपनीला विकून टाकलं होतं.
या खाणकंपनीला तिथून दगड माती काढायची होती आणि त्याचंच काम 22 मार्च 1995 च्या दुपारी चाललं होतं. यंत्रं माती उकरत होते, कामगार मोठे दगड, राळ बाजूला करत होते. गडबडीचा दिवस होता.
तेवढ्यात एका कामगाराला खाली खोदलेल्या खड्ड्यात काहीतरी वेगळं दिसलं. जवळ जाऊन पाहिलं तर तो चक्क 500 किलोपेक्षाही अधिक वजनाचा जर्मन बॉम्ब होता.
हा बॉम्ब जवळपास 50 वर्षं पोर्टलंड युनायटेडच्या स्टेडियमखाली गाडला गेला होता.
जिवंत बॉम्बच्या, बॉम्ब कसला क्षेपणास्त्रच ते, वरती असलेल्या फुटबॉल स्टेडियमवर पोर्टलंड युनायटेडच्या दर रविवारी मॅचेस व्हायच्या. हजारो लोक त्या बघायला, आपल्या टीमला प्रोत्साहन द्यायचे.
यातल्या एखाद्या जरी मॅचच्या दिवशी, एखाद्या धक्क्याने किंवा कंपनाने हा बॉम्ब फुटला असता तर? कल्पनाही करवत नाही.
दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीने ब्रिटनवर लाखो, हो अक्षरशः लाखो बॉम्ब टाकले होते. त्यातले अनेक बॉम्ब फुटलेही नाहीत.
काळाच्या ओघात ते जमिनीखाली गाडले गेले आणि त्यामुळे यूकेत अधूनमधून सापडत असतात.
युरोपातल्या इतरही ठिकाणी जिथे हल्ले झाले होते, उदा. इटली किंवा फ्रान्स, तिथेही एखादं वेळेस दुसऱ्या महायुद्धात टाकला गेलेला पण न फुटललेला बॉम्ब सापडतो.
त्या दिवशी काय झालं?
आता परत येऊ 22 मार्च 1995 या दिवसाकडे. दगड माती काढण्याचं काम सुरू असताना पोर्टलंड युनायडेटच्या स्टेडियममध्ये एक महाकाय बॉम्ब सापडला आणि सगळीकडे एकच घबराट पसरली. हा बॉम्ब सापडल्यानंतर तो डिफ्युज करणं गरजेचं होतं.
आसपासचा भाग निवासी होता, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, ऑफिस, खेळायची ग्राऊंड्स असं सगळं इथे होतं. मग सुरू झाली यूकेच्या इतिहासातली शांततेच्या काळातली सर्वात मोठी बचाव मोहीम.
हा बॉम्ब सापडून जेव्हा 25 वर्षं पूर्ण झाली तेव्हा बीबीसी ब्रेकफास्टने एक खास कार्यक्रम केला होता.

फोटो स्रोत, TOPICAL PRESS AGENCY/GETTY IMAGES
त्यात बीबीसीचे स्टीव्ह हॅरिस म्हणतात, "या बॉम्बचं वर्णन राक्षस (मॉन्स्टर) असं केलं गेलं होतं. हा बॉम्ब 50 वर्षं जमिनीत गाडला गेला होता आणि वरती मोठ्यांपासून शाळकरी मुलांपर्यंत अगणित फुटबॉलच्या मॅचेस खेळल्या गेल्या."
समजा बॉम्ब फुटलाच त्याच्या परिघात जेवढे लोक आले असते त्या सगळ्यांना तडकाफडकी आपली घरं सोडून सुरक्षित स्थळी न्यायला सांगितलं. हे ऑपरेशन आठवडाभर चाललं.
बचाव मोहीम
एकदा बॉम्ब सापडल्यानंतर तो तसाच ठेवून उपयोग नव्हता. तो डिफ्युज करावा लागणार होता, पण 50 वर्षं जुना बॉम्ब डिफ्युज करताना फुटला म्हणजे? रहिवाशांचं आयुष्य धोक्यात आलं होतं. त्यामुळे स्फोटाच्या परिघात असणाऱ्या लोकांनी आपली घरं सोडून जाण्याचं आवाहन करण्यात आलं.
50 वर्षांपूर्वी हा बॉम्ब का फुटला नाही याचं कारण कोणालाच माहिती नव्हतं, आणि म्हणूनच तो बॉम्ब अधिकच धोकायदायक झाला होता.
पण हेही इतकं सोपं नव्हतं. लोक आपली घरं सोडून जायला तयार नव्हते. ब्रायन थोर्नली तत्कालीन पोलीस सुपरिटेंडंट होते आणि या मोहिमेचे कोऑर्डिनेटर होते. यासाठी सैन्यालाही पाचारण करण्यात आलं होतं.
पण सैन्याने स्पष्ट सांगितलं, एकन एक माणूस इथून निघून जाणार नाही तोवर आम्ही काहीही करणार नाही.
शेवटी थोर्नली यांनी जनतेला उद्देशून मीडियावर संदेश दिला. बीबीसीच्या कार्यक्रमात तुम्ही तो ऐकू शकता. ते म्हणाले, "हे पाहा, जर मला शक्य असतं की लोकांना इथून सुरक्षित स्थळी न हलवता हा बॉम्ब डिफ्युज करायचा, तर मी ते नक्कीच केलं असतं.
रॉयल इंजिनयर्सचे कॅप्टन माईक लॉब यांच्याकडे तो बॉम्ब डिफ्युज करण्याची जबाबदारी होती. ते म्हणाले होते, "हा बॉम्ब निष्प्रभ करण्यासाठी आम्हाला त्याचा फ्युज वेगळा करावा लागेल आणि मग त्यातली स्फोटकं काळजीपूर्वक बाजूला काढावी लागतील. पण ज्यांनी हा बॉम्ब बनवला ते जर्मन लोक अतिशय हुशार होते. बॉम्ब डिफ्युज करण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी एक फ्युज एक्स्टेंशन बनवलेले असायचं. जे दिसताना फ्युजसारखं दिसतं. खरं फ्युज कुठेतरी भलतीकडेच लपवून ठेवलेला असायचा. जर चुकीचा फ्युज काढला तर मग अनर्थ होईल."
सगळीकडे घबराट पसरली होती. लोकांचं प्रबोधन करण्यासाठी घाईघाईने सभा आयोजित केल्या गेल्या. पण तरीही काही लोक आपली घरं सोडायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की एक किलोमीटरच्या परिघातल्या सगळ्यांनी घर सोडायची गरज नाहीये.
काहींना वाटत होतं की सैन्य आपल्या हक्कांवर गदा आणतंय, तर काहींना लुटमारीची भीती होती.
शेवटी रहिवाशांना हलवण्याचा दिवस उजाडला. 1 एप्रिलला जवळपास चार हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं. एवढं करूनही सात जणांनी घर सोडायला नकार दिला, पण तरीही बॉम्ब डिफ्युज करण्यासाठी सैन्याला गो अहेड देण्यात आला.
माईक लॉब आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या बॉम्ब डिफ्युज केला.
पण या जर्मन बॉम्बचं कवित्व नंतरही संपलं नाही. ज्या दिवशी बॉम्ब डिफ्युज होणार होता त्या दिवशी तिथल्या एका शाळेची ट्रीप जाणार होती, ती रद्द झाली.
ती ट्रीप रद्द झाली म्हणून त्या शाळेच्या पालक-शिक्षक सभेने चक्क त्या ट्रीपच्या खर्चाची भरपाई जर्मन दूतावासाकडे मागितली.
जर्मन दुतावासाने अधिकृत पत्रक काढून म्हटलं की, "तुम्हाला नुकसान भरपाई हवीच असेल तर तुमच्या सैन्याकडून घ्या, कारण तुमची ट्रीप होती त्या दिवशी बॉम्ब डिफ्युज करण्याचा निर्णय तुमच्याच सैन्याने घेतलाय."
पुढे त्यांनी असंही म्हटलं की जर्मनीवर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात टाकलेले अनेक न फुटलेले बॉम्ब आम्हालाही सापडतात. पण त्याची भरपाई मागायला आम्ही तुमच्याकडे येत नाही.
दुसऱ्या महायुद्धातले न फुटलेले बॉम्ब अजूनही का सापडतात?
या घटनेनंतर पुढेही युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धात न फुटलेले बॉम्ब सापडत राहिले. सर्वात ताजी घटना म्हणजे यूकेच्याच एक्स्टर भागात मागच्या वर्षी असा बॉम्ब सापडला. तो डिफ्युज करणं शक्य नसल्याने त्याचा नियंत्रित स्फोट घडवण्यात आला.

फोटो स्रोत, UK MINISTRY OF DEFENCE/PA MEDIA
यानंतर बीबीसीशी बोलताना इंपिरियल म्युझियमच्या दुसऱ्या महायुद्धातल्या वस्तुंच्या क्युरेटर एमिली चार्ल्स म्हणाल्या होत्या की असे न फुटलेले नक्की किती बॉम्ब संपूर्ण युरोपभर पसरले असतील हे सांगणं खूपच अवघड आहे.
त्यांच्यामते जर्मनी जेव्हा ब्रिटनवर सतत बॉम्बहल्ले करत होतं (याला ब्लिट्स असा शब्द आहे) तेव्हा नक्की किती बॉम्ब पडले आणि त्यातले किती फुटले-किती फुटले नाहीत याचा अंदाज लावता आलेला नाही.
त्यामुळे असे बॉम्ब अधून मधून सापडत राहातात.
एमिली म्हणतात की, "युद्ध संपल्यानंतर मित्रराष्ट्रांनी ब्रिटनच्या कोणकोणत्या शहरांमध्ये बॉम्ब टाकले गेले, त्यातून काय नुकसान झालं याची सविस्तर नोंद ठेवली आहे. यालाच बॉम्बगणना असंही म्हणतात. सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांचे त्यांनी नकाशे बनवले. यातून न फुटलेले बॉम्ब कुठे आहेत याची कल्पना येऊ शकते."
पण दुसऱ्या महायुद्धात टाकलेल्या हे बॉम्ब बेभरवशाचे आहेत. ते फुटतील की नाही, फुटले तर कशा परिस्थितीत फुटतील याबद्दल काहीच सांगता येत नाही. म्हणूनच ते फार धोकादायक असतात असं एमिली यांना वाटतं.
"काळाच्या ओघात या बॉम्बची कार्यक्षमत कमी होते का? खूप काळ उलटून गेला तर ते कसे वागतात, याबद्दल कोणतेच शास्त्रीय अभ्यास झाले नाहीयेत," त्या म्हणतात.
त्यामुळे जिथे असे बॉम्ब सापडण्याची शक्यता आहे त्या लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्या करतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








