जेव्हा अमेरिकेने चुकून स्वतःच्याच देशावर अणुबॉम्ब टाकला आणि जगाला कळलंही नाही

अणुबॉम्ब
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी रिल्स

युद्धात अणुबॉम्बचा वापर करणारा अमेरिका पहिला देश होता. दुसरं महायुद्ध चालू होतं आणि 1945 च्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले. मानवजातीचं भवितव्य इथे बदललं.

लाखो लोक मेले, त्याहून जास्त जखमी झाले आणि किरणोत्सर्गामुळे नंतरच्या कित्येक पिढ्या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अपंग म्हणून जन्माला आल्या.

एक अणुबॉम्ब संपूर्ण मानवजात नष्ट करू शकतो हे लक्षात आल्यानं अणुबॉम्बच्या वापरावर, त्याच्या निर्मितीवर बंधन आली. पण तरीही जगातल्या अनेक देशांकडे आज अणुबॉम्ब आहेत आणि संपूर्ण जग भीतीच्या छायेत वावरत असतं.

युद्ध सोडा, पण माणूस म्हटल्या की चुका होणारच. समजा अणुबॉम्बजवळ काम करणाऱ्या कोणत्या व्यक्तीकडून चूक झाली आणि चुकीने बॉम्ब टाकला गेला तर? जगाचं भवितव्य काय असेल?

आताचे जे सुरक्षेचे नियम आहेत, ते पुरेसे आहेत का? की जग विनाशाच्या उंबरठ्यावरच उभं आहे फक्त एका वेड्या माणसाने कळ दाबायची गरज आहे?

हे सगळे प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे इतिहासातली ती घटना जेव्हा अमेरिकेने स्वतःवरच अणुबॉम्ब टाकला होता आणि जगाला कळलं पण नव्हतं.

बीबीसी रिल्सच्या एका खास एपिसोडमध्ये याबद्दल सविस्तर सांगितलं आहे.

स्वतःच्याच देशात टाकला अणुबॉम्ब

जानेवारी 1961 ची गोष्ट आहे. अमेरिका आणि सोव्हियत युनियनमध्ये कोल्डवॉरची सुरूवात झाली होती. 20 तारखेला अमेरिकेचे नुकतेच निवडून आलेले अध्यक्ष जॉन एफ केनेडींनी पदाची शपथ घेतली होती.

त्यानंतर तीनच दिवसांनी एक प्रसंग घडला. या घटनेविषयी फारसं कोणाला माहिती नाही, पण अमेरिकेचा आणि पर्यायाने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची ताकद या एका प्रसंगात होती.

नेहमीसारखा दिवस होता. अमेरिकाच्या B-52 या क्षेपणास्त्रांचा मारा करणाऱ्या विमानाने नॉर्थ कॅरोलिना राज्याच्या सिमोर जॉन्सन सैन्यतळावरून उड्डाण केलं.

या विमानात दोन अणुबॉम्ब होते. कोणतंही युद्ध सुरू नसताना हे विमान अणुबॉम्ब घेऊन का फिरत होतं, तर अमेरिकेच्या सैन्य रणनितीचा एक भाग म्हणून.

B-52 विमानाचं मॉडेल
फोटो कॅप्शन, B-52 विमानाचं मॉडेल

त्या काळात अमेरिकेचं धोरण होतं की अणुबॉम्ब टाकायला सज्ज असं एक विमान सतत आकाशात हवं. म्हणजे जर सोव्हिएत रशियाने अमेरिकेवर हल्ला केलाच तर ते त्यांना लगेच अणुबॉम्बने प्रत्युत्तर देता येईल.

अमेरिकेच्या अटलांटिक समुद्रकिनाऱ्याला लागून असणाऱ्या किनारपट्टीवर हे विमान घिरट्या घालत असायचं.

त्या दिवशी विमानाची एक चक्कर मारून झाली, आणि दुसरी चक्कर सुरू होती. विमान हवेत उडून जवळपास 10 तास झाले होते आणि विमानातलं इंधन संपत आलं होतं.

इंधनवाहू विमानाने हवेतल्या हवेत या अणुबॉम्ब असलेल्या विमानात इंधन भरायचं ठरलं आणि इथेच गोची झाली.

सॅम फिंच कोल्ड वॉरच्या काळात B-52 या विमानाचे पायलट होते. त्यांनी बीबीसी रिल्सशी बोलताना सांगितलं, "विमानाच्या पंख्यात काहीतरी बिघाड झाला होता आणि टाकीत इंधनही गळायला लागलं. इंधन भरणाऱ्या विमानातल्या कर्मचाऱ्याच्या हे लक्षात आलं आणि त्याने B-52 च्या पायलटला सांगितलं."

पायलटने कंट्रोल रूमशी संपर्क केला आणि विचारलं काय करू? त्याला उत्तर मिळालं की समुद्रावर जा, तिथे थांबा तोवर आपण काय करता येईल ते पाहू.

यात हेतू असा होता की भूभागावरून विमान उडत असताना कोसळायची भीती नको.

पायलटने विमान समुद्रावर आणलं पण त्याच्या लक्षात आलं की फक्त तीन मिनिटात त्याच्या विमानातलं जवळपास 18 हजार किलो वजनाचं इंधन लीक झालं आहे.

विमान

फिंच सांगतात, "प्रचंड प्रमाणात इंधन गळती झाली होती आणि आता विमानाला जमिनीवर उतरवण्याखेरीज पर्याय नव्हता. विमान 10 हजार फुटांवर आलं असताना पायलटचा विमानवरचा कंट्रोल सुटला. विमानात तेव्हा 8 जण होते. त्यातले 6 जण बाहेर पडले पण दोघं जण विमानाबरोबरच खाली कोसळले."

पुढे काय झालं?

पुढे काय घडलं असेल याची माहिती आण्विक शस्त्रांच्या इतिहासाचा अभ्यास करणारे अॅलेक्स वेलरस्टीन सांगतात.

"विमानाचे हवेतल्या हवेत तुकडे झाल्यामुळे अणुबॉम्ब विमानातून घरंगळून बाहेर पडले."

"पण हे बॉम्ब जमिनीवर पडल्यापडल्या त्यांचा स्फोट होईल अशा प्रकारे डिझाईन केलेले नव्हते. सुरक्षिततेसाठी त्यात अनेक खबरदाऱ्या घेण्यात आल्या होत्या," वेलरस्टीन पुढे म्हणतात.

या बॉम्बमध्ये एक पुलआऊट स्वीच होता. आपण युएसबी प्लग करतो तो जसा स्वीच असतो आणि मागे वायर असते त्याप्रमाणे. हा स्वीच ओढल्याशिवाय बॉम्ब पडला तरी फुटणार नव्हता. पण...

हवेच्या दाबाने एका बॉम्बमधल्या पुलआऊट स्वीच ओढला गेला, अगदी एखाद्या माणसाने ओढला असता तसा.

खाली अमेरिकन भूमी होती आणि अमेरिकेनेच तयार केलेले दोन अणुबॉम्ब वेगाने खाली येत होते.

कठीण प्रसंग होता, या बॉम्बपैकी एक बॉम्ब अॅक्टिव्हेट झाला नव्हता आणि आकाशातून एखादा दगड पडावा तसा सरळसोट खाली येत होता.

पण दुसऱ्या बॉम्बला वाटत होतं की आपल्याला शत्रूपक्षावर डागलंय. याचा स्वीच खेचला गेल्यामुळे हा अॅक्टिव्हेट झाला होता. या बॉम्बला असलेलं पॅरेशूट उघडलं होतं आणि आता तो फुटायची तयारी करत होता. त्याच्या सिस्टिममध्ये काही गोष्टी होत्या, ज्या योग्य असल्या, मॅच झाल्या की… धडाम!

विमानातले 8 पायलट, ज्यातले 2 वाचू शकले नाहीत
फोटो कॅप्शन, विमानातले 8 पायलट, ज्यातले 2 वाचू शकले नाहीत

काय होती ही चेकलिस्ट? वेलरस्टीन सांगतात, "बॉम्बचा वेग योग्य आहे का, बॉम्ब विमानातूनच खाली पडतोय का, मी योग्य ठिकाणी आहे का? बॉम्बची सिस्टिम या सगळ्या प्रश्नांची उत्तर होकारार्थी देत होती, बॉम्बला फुटण्यासाठी आता एकाच प्रश्नाच्या उत्तराची गरज होती. या बॉम्बमध्ये एक स्वीच होता, आताच्या दृष्टीने फारच मागासलेला. पण त्यावर एक नॉब होता आणि दोन पर्याय होते - सेफ आणि आर्म्ड."

सुदैवाने या नॉबची सुई सेफवर होती. मग बॉम्बच्या यंत्रणेला कळलं अरे फुटायचं नाहीये. बॉम्बच्या इतर सिस्टिम बंद होत गेल्या आणि पॅराशूटने तो बॉम्ब अलगदपणे मातीवर आणून ठेवला.

त्या एका स्वीचने अमेरिकेतल्या लाखो लोकांचे प्राण वाचले.

दुसऱ्या बॉम्बचं काय झालं?

पण आयुष्य इतकं सोपं असतं का? दुसरा बॉम्ब आठवतोय? त्याची कुठलीच यंत्रणा कार्यन्वित झाली नव्हती, त्याचा पॅरेशूटपण उघडला नव्हता, तो गुरूत्वाकर्षणाच्या वेगाने खाली येत होता आणि दाणकन जमिनीवर आदळला.

सुदैवाने खाली मानवी वस्ती नव्हती आणि जंगल होतं. एक बॉम्ब पॅरेशूटने चिखलात उतरवला तर दुसरा त्याच दलदलीत येऊन आदळला.

तंत्रज्ञ जेव्हा या बॉम्बशी शोधाशोध करायला लागले, तेव्हा त्यांना पॅराशूट न उघडलेल्या बॉम्बचे तुकडे तुकडे सापडले. एका तुकड्यात तो नॉबही होता आणि त्याच्या सुईची दिशा होती - आर्म्ड.

पहिल्या बॉम्बचा पुलआऊट स्वीच खेचला गेला, दुसरा आधीपासून आर्म्ड होता. दोनही अणुबॉम्ब अमेरिकेच्या भूमीवर पडले पण दैवाच्या कुठल्यातरी प्रभावाने दोन्हींचा स्फोट झाला नाही.

हे दोन्ही बॉम्ब अमेरिकेच्या गोल्ड्सबर्ग शहरापाशी पडले होते. दोन्ही बॉम्बची क्षमता होती प्रत्येकी 3.8 मेगाटन म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेनेच टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा अडीचशे पट जास्त विध्वंसकारी क्षमता या बॉम्बची होती.

हिरोशिमावर पडलेला अणुबॉम्ब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिरोशिमावर पडलेला अणुबॉम्ब

या बॉम्बचा स्फोट झाला असता तर 32 किलोमीटरच्या परिसरातल्या प्रत्येक गोष्टीची राखरांगोळी झाली असती. माणसं, प्राणी, झाडं, किडे-मुंगी... काहीच जिवंत उरलं नसतं.

ज्या बॉम्बचं पॅराशूट उघडलं नाही तो जमिनीवर आदळला तेव्हा थेट 70 फुट खाली घुसला. त्या बॉम्बमधलं युरेनियमच्या भोवती असलेलं आवरण फुटलं आणि युरेनियमचा कंटेनर कुठेतरी हरवला. तो आजतागायत सापडलेला नाही.

अमेरिकेच्या त्या भागात अॅक्टिव्ह युरेनियमचा कंटेनर अजूनही कुठेतरी गाडलेला आहे. नॉर्थ कॅरोलिनाच्या या भागात शेतकऱ्यांना अजूनही 5 फुटापेक्षा खाली खोदण्याची परवानगी नाही.

1950 ते 1980 या काळात आण्विक बॉम्बचे अपघात, किंवा ते हरवणं असे कमीत कमी 30 प्रकार झाल्याचं अमेरिकन सैन्याने मान्य केलं आहे. जगात इतरत्रही असे अनेक अपघात झाले आहेत.

त्यामुळेच गेल्या 60-70 वर्षांत जगात एकदाही अपघाताने किंवा चुकीने अणूबॉम्बचा स्फोट झाला नाही हा निव्वळ मानवाच्या नशिबाचा भाग आहे असं काही अभ्यासकाचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)