बुडत्या जहाजांची राणी : तीन मोठ्या जहाज अपघातात सापडूनही ही महिला जिवंत कशी राहिली?

- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
'टायटॅनिक बुडत होतं, सर्वात आधी महिला आणि मुलांना लाईफबोटींमध्ये बसवलं जात होतं. बोटीत मध्ये एक लहान बाळ, एक छोटा मुलगा आणि महिला बसल्या होत्या. ते बोट पाण्यात सोडायच्या आधी बोटीवरच्या अधिकाऱ्याने ओरडून विचारलं, अजून कोणी महिला डेकवर शिल्लक आहे का?'
कोणीच पुढे आलं नाही.
'दुसऱ्या अधिकाऱ्याने पुन्हा एकदा विचारलं, कोणी महिला नक्की मागे राहिली नाहीये ना? मग एक बाई चाचरत पुढे आली आणि म्हणाली मी. पण मी या जहाजावरची प्रवासी नाही तर इथली कामगार आहे. त्या अधिकाऱ्याने तिच्याकडे क्षणभर बघितलं आणि म्हणाला, हरकत नाही, तु बाई आहेस, तुला या बोटीत जागा आहे.'
शेवटच्या क्षणी व्हायोलेटचं नशीब पालटलं होतं, तिला लाईफबोटीत जागा मिळाली होती आणि तिचा जीव वाचणार होता.
पण जीवावरच्या प्रसंगातून वाचण्याची ही तिची ना पहिली वेळ होती ना शेवटची.
एप्रिल 1912 ला टायटॅनिक जहाज बुडालं. त्यानंतर एका वर्षांनी प्रसिद्ध झालेल्या 'द ट्रुथ अबाऊट टायटॅनिक' या पुस्तकात वरच्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे.
काही पुस्तकांमध्ये उल्लेख आढळतो की टायटॅनिकवरच्या इंग्लिश न बोलणाऱ्या लोकांनी व्हायोलेटकडे पाहून लाईफबोटीत बसावं म्हणून जहाजावरच्या अधिकाऱ्यांनी तिला लाईफबोटीत बसवलं.
इतिहासात तिला 'मिस अनसिंकेबल' किंवा 'बुडत्या जहाजांची राणी' म्हणून ओळखतात. एक अशी नर्स, जी त्या काळातल्या आश्चर्य ठरलेल्या जहाजांवरून प्रवास करत होती. या आश्चर्यांना जलसमाधी मिळाली पण ही बाई कधीच बुडली नाही. तिचं नाव व्हायलेट जेसोप आणि ही तिची कहाणी.
1998 साली व्हायोलेट यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. जॉन मॅक्सटोन-ग्रॅहम यांनी ते संपादित केलं होतं. तेव्हा जगाला कळलं की, व्हायोलेट फक्त टायटॅनिकच नाही तर जगातल्या तीन मोठ्या जहाज दुर्घटनांमधून सहीसलामत वाचल्या होत्या.
कोणी होती ही महिला ?
व्हायोलेट यांचा जन्म अर्जेंटिनात स्थलांतरित झालेल्या आयरिश कुटुंबात झाला होता. घरातली सगळ्यांत मोठी मुलगी असल्याने लवकरच त्यांच्यावर आपल्या सहा भावंडाच्या पालनपोषणाची जबाबदारी आली.
वडील ती लहान असतानाचा गेले होते आणि आई जहाजावर नर्स म्हणून काम करायची. काही काळाने त्यांची आईही आजारी पडली आणि वारली.
वयाच्या 21 व्या वर्षीच त्या जहाजावर स्टुअर्डेस म्हणून काम करायला लागल्या. जहाजवरच्या श्रीमंत प्रवाशांच्या दिमतीला राहणं, त्यांना जेवायला वाढणं, त्यांच्या रूम स्वच्छ करणं, त्यांची कामं करणं असं त्यांच्या कामाचं स्वरूप होतं.
टायटॅनिक बुडलं तेव्हा व्हायोलेट अवघ्या 25 वर्षांची होत्या. त्यांनी 40 वर्षं जहाजावर काम करण्यात घालवली आणि या काळात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं.
टायटॅनिक बुडालं ती रात्र
बरोबर 110 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. टायटॅनिक या जहाजातून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी तर झोपेतचं होते. त्या अंधाऱ्या रात्री टायटॅनिक हिमनगावर जाऊन आदळलं.
टायटॅनिक इंग्लंडच्या साउथहॅम्पटन येथून 41 किलोमीटर प्रतितास वेगाने अमेरिकेतल्या न्यूयॉर्ककडे जात असताना हा अपघात घडला. अवघ्या तीन तासातच म्हणजे 14 आणि 15 एप्रिल 1912 च्या मध्यरात्री टायटॅनिक अटलांटिक महासागरात बुडालं.

फोटो स्रोत, Getty Images
असं एक जहाज जे कधीच बुडणार नाही अशा चर्चा असायच्या त्याच जहाजाला जलसमाधी मिळाली. या अपघातात सुमारे 1500 लोकांचा मृत्यू झाला. 110 वर्ष उलटून गेली तरी हा सर्वात मोठा सागरी अपघात मानला जातो.
टायटॅनिक दुर्घटनेतील सुरक्षिततेच्या तरतुदींवर भर देण्यात आला होता. टायटॅनिक दुर्घटनेत अनेक लोक मरण पावले कारण त्यांच्याकडे लाइफबोट नव्हती.
त्या रात्रीचं वर्णन 'टायटॅनिक सर्व्हायवर : न्यूली डिस्कव्हर्ड मेमोअर्स ऑफ व्हायोलेट जोसेप' या पुस्तकात केलं आहे.
त्या म्हणतात, "एका क्षणी एकदम शांतता पसरली, सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता आणि नंतर एकच आक्रोश उठला. तो मी कधीच विसरू शकणार नाही. त्या बर्फाळ समुद्रात आमचं जहाज हेलकावे खात होतं."
व्हायोलेट आपल्या पुस्तकात म्हणतात की, "एका अधिकाऱ्याने एक बाळ माझ्या हातात दिलं आणि मला लाईफबोटीत जाऊन बसायला सांगितलं. तोवर मी इंग्लिश न बोलता येणाऱ्या लोकांना लाईफ जॅकेट कसं घालायचं ते आणि लाईफ बोटीत बसायला सांगत होते. माझ्या हातात बाळ दिल्यानंतर मला लाईफबोटीत जाऊन बसावं लागलं."
जहाजावरच्या गोंधळात त्या बाळाची आई सापडत नव्हती.
व्हायोलेट लिहितात की, "दुसऱ्या एका जहाजाने त्यांच्या लाईफबोटीतल्या लोकांना वाचवलं आणि न्यूयॉर्कपर्यंत आणलं. तिथे एका बाईन त्यांच्या हातातून ते बाळ घेतलं आणि काही न बोलता रडत रडत पळून गेली."
असा जीवावरचा प्रसंग एखाद्यावर आला असता तर त्याने जहाजावरचं आयुष्य कधीच सोडलं असतं. पण व्हायलेटने असं केलं नाही. उलट टायटॅनिक बुडण्याच्या आधीच्या वर्षी त्या जहाज अपघातात सापडल्या होत्या.
ऑलिम्पिकचा अपघात
टायटॅनिक जहाज ज्या कंपनीचं होतं त्याच व्हाईट स्टार लाईन कंपनीचं ऑलिम्पिक नावाचं जहाज चालायचं. हे जहाज टायटॅनिकची मोठी बहीण होती असं म्हटलं जायचं.
टायटॅनिक तयार होईपर्यंत हे जगातलं सर्वात मोठं, सर्व सुखसोयींनी युक्त, प्रवासी जहाज होतं.
20 सप्टेंबर 1911 साली हे जहाज ब्रिटनच्या साऊथ हॅम्पटन किनाऱ्यावरून निघालं आणि थोड्याच वेळात ब्रिटिश युद्धनौका एचएमएस हॉकवर आदळलं. सुदैवाने या अपघातात कोणाचा मृत्यू झाला नाही पण जहाजाचं चांगलंच नुकसान झालं आणि बुडता बुडता वाचलं.
किनाऱ्यापासून फार लांब नसल्याने जहाज किनाऱ्यावर परत आलं. याची दुरुस्ती करून हे जहाज काही दिवसांनी पाण्यात उतरवलं गेलं.
व्हायोलेट 8 महिने ऑलिम्पिकवर काम करत राहिल्या आणि नंतर त्यांची बदली टायटॅनिकवर झाली.

फोटो स्रोत, Getty Images
टायटॅनिकची वाताहत झाल्यानंतर कोणीही नोकरी सोडली असती पण व्हायोलेटने आपल्या डोळ्यासमोर अनेक जीव जाताना पाहिले आणि त्यांनी ठरवलं की, आपल्या आयुष्यात शक्य तेवढे जीव वाचवायचे. त्यांनी नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलं.
ब्रिटानिकची वाताहत
टायटॅनिक बुडल्यानंतर चार वर्षांनी, 1916 साली व्हायोलेट ब्रिटिश रेडक्रॉस संस्थेत नर्स म्हणून काम करत होत्या. पहिलं महायुद्ध ऐन भरात होतं.
अनेक प्रवासी जहाजं आता सैनिकांची ने-आण करणं, फिरती हॉस्पिटल म्हणून सैनिकांवर उपचार करणं अशा कामांसाठी वापरली जात होती.
व्हाईट स्टार कंपनीचं ब्रिटनिक या जहाजाला फिरत्या हॉस्पिटलचं रूप दिलं होतं. हे जहाज टायटॅनिकची 'दुसरी मोठी बहीण' म्हणून ओळखलं जायचं.
युद्धामुळे समुद्रात अनेक पाणसुरूंग टाकलेले असायचे. अशातच ब्रिटनिक एका सुरुंगावर आदळलं आणि अगिअन समुद्राच्या तळाशी गेलं.
हा अनुभव व्हायोलेटसाठी आणखी भयानक होता. आपल्या या अनुभवाचं वर्णन करताना त्या म्हणतात, "आयुष्य एका मोठ्या गर्तेत अडकलं होतं. मला काहीच दिसत नव्हतं. मी कशीबशी पाण्याच्या वर येऊन श्वास घेण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या नाका-तोंडात पाणी जात होतं."
या जहाजवर हजाराहून जास्त माणसं होती आणि त्यातली 32 मरण पावली. बाकी सगळ्यांना वाचवण्यात आलं. टायटॅनिक दुर्घटनेनंतर प्रत्येक जहाजावर पुरेशा लाईफबोट असाव्यात हा नियम होता.
पण दोन लाईफबोट वेळेआधीच खाली उतरवल्या गेल्या. जहाजाचे प्रोपेलर्स (जहाज चालवणारे पाण्याखालचे पंखे) तोवर बंद झाले नव्हते. या बोटींमधली माणसं प्रोपलर्सकडे खेचली गेली आणि त्यांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.
यातल्याच एका लाईफबोटीत तीन माणसं होती. योगायोग पहा, ही तिन्ही माणसं टायटॅनिकवर होती आणि जिवंत वाचली होती. व्हायोलेट, आर्ची जोवेल आणि जॉन प्रीस्ट. ही तिन्ही माणसं याही वेळेस वाचली.
बोट प्रोपलर्सच्या दिशेला ओढली जात होती तेव्हा काय वाटलं याचं वर्णन आर्ची जोवेल यांनी आपल्या बहिणीला लिहिलेल्या पत्रात केलं आहे.
ते लिहितात, "आमच्यापैकी अनेकांनी पाण्यात उड्या मारल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही, प्रोपेलर्सची ताकद इतकी जास्त होती की ते संपूर्ण पाण्याचा प्रवाह आपल्या दिशेला खेचत होते आणि पर्यायाने आम्हालाही."

फोटो स्रोत, Getty Images
"मी डोळे मिटले आणि जगाचा निरोप घेतला. पण मला जहाजाच्या एका तुटून पडलेल्या भागाने जोरात ढकललं आणि मी त्या पात्यांच्या एकदम खाली फेकला गेलो, पात्यांमध्ये अडकलो नाही. मी वर पाण्यावर यायची धडपड करत होते पण वरती जहाजाचे भाग तुटून पडले होते, ते बाजूला करता येत नव्हते. मला अंधारी यायला लागली इतक्यात वरतून कोणीतरी तो मलबा बाजूला केला आणि मला पाण्यावर जायला फट मिळाली. पण खाली एकाने माझा पाय धरला. तो बिचाराही बुडत होता, पण मला त्याला झटकून टाकावं लागलं. तो बुडाला."
ब्रिटनिकला 55 मिनिटात संपूर्ण जलसमाधी मिळाली. त्या 55 मिनिटात काय झालं असेल याची कल्पना वरच्या पत्रावरून येते.
व्हायोलेटही त्या लाईफबोटीत होत्या आणि त्यांचा जीव धोक्यात होता, पण त्यांना काय घडतंय याचा लवकर अंदाज आला आणि त्यांनी लाईफबोटीतून बाहेर उडी घेतली. त्या प्रोपेलर्सच्या पात्यात अडकल्या नाही, तर पाण्याच्या प्रवाहाने खाली फेकल्या गेल्या. एका मोठ्या लाकडाच्या ओंडक्यावर त्यांचं डोकं आदळलं आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.
पण त्यांचं नशीब त्यांना आणखी एकदा साथ देणार होतं, व्हायोलेटला एका दुसऱ्या लाईफबोटीने वर खेचलं आणि वाचवलं.
तिन्ही वेळा व्हायोलेटचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
1920 साली त्यांनी पुन्हा व्हाईट स्टार लाईनसाठी काम करायला सुरुवात केली.
आयुष्यात इतके धोक्याचे प्रसंग येऊनही त्यांनी समुद्राची साथ सोडली नाही. 40 वर्षं त्यांनी जहाजांवर काम केलं. वयाच्या 62 व्या वर्षी त्या निवृत्त झाल्या तर वयाच्या 83 व्या वर्षी, 1971 साली त्यांना मरण आलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








