एक बुडतं जहाज, मृत्युच्या उंबरठ्यावरचे हजारो जीव आणि त्यांना वाचवणारा एक संगीतकार

फोटो स्रोत, BBC Sport
- Author, सारा मॅकडर्मोंट
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ओशनोज नावाचं एक भलंमोठं, सर्व सुविधांयुक्त, आलिशान, जहाज होतं. शेकडो माणसं त्यात बसून प्रवासाला निघाले होते. हे जहाज दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्याला पोहचलं तेव्हा बुडायला लागलं.
त्यावेळी जहाजावर असणारे संगीतकार मॉस हिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं की आता जहाजावर असणाऱ्या प्रत्येकाचा जीव वाचवण्याची जबाबदारी आपली आहे.
4 ऑगस्ट 1991ची संध्याकाळ उलटून गेली होती. लोक रात्रीच्या जेवणासाठी जमले होते, आणि तेव्हा मॉस हिल यांच्या लक्षात आलं की बाहेर घोंघावणारं वादळ किती भयानक आहे.
एरवी जहाजावर जेवण वाढणाऱ्या वेटर्सला डुचमळणाऱ्या जहाजाची सवय असते. त्यांच्या हातातून कधी अन्नाचं शित सांडत नाही की पाण्याचा थेंब. पण यादिवशी मात्र वेटर्स हातातला ट्रे सांभाळण्यासाठी प्रचंड मोठी कसरत करत होते. मॉस आणि त्यांची पत्नी ट्रेसी दोघंही जहाजावरच्या ऑर्केस्ट्रात होते, त्यांनी कधीही जहाजावरच्या वेटर्सच्या हातून खाण्याचे ट्रे पडताना पाहिलं नव्हतं, पण आज ते झालं.
त्याच दिवशी सकाळी जहाज डर्बनहून निघालं होतं. पण वातावरण चांगलं नव्हतं, सोसाट्याचा वारा होता आणि पाऊस पडत होतं. जहाजाच्या कॅप्टनने बंदरावर जहाज बराच वेळ थांबवून ठेवलं पण पाऊस उघडत नाही आणि वाराही थांबत नाही हे पाहून आहे त्या परिस्थितीत निघण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी ओशनोज जहाजावर 581 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. जहाजाचा नांगर उचलला गेला तेव्हा 30 फूट उंच लाटा उसळत होत्या.
मॉस आणि ट्रेसी सहसा जहाजाच्या डेकवर, मोकळ्या हवेत संगीत वाजवायचे, पण त्यादिवशीची परिस्थिती पाहाता त्यांनी आपला कार्यक्रम आतल्या हॉलमध्ये ठेवला. मॉसला ना गिटार सांभाळता येत होती ना स्वतःचा तोल.
त्या दिवसाची आठवण काढताना मॉस म्हणतात, "वादळ भयानक होत चाललं होतं." त्यांची पत्नी ट्रेसी आपल्या केबीनमध्ये गेल्या आणि त्यांनी आवश्यक गोष्टींची बॅग भरली, आणिबाणीची परिस्थिती उद्भवलीच तर असू द्यावी म्हणून.
"अचानक लाईट गेले," मॉस म्हणतात,
पण जहाजावरचे कोणीच अधिकारी सूचना द्यायला आले नाही. मॉस आता बैचेन झाले होते.
"तुम्ही समुद्राच्या मध्यभागी एका जहाजावर आहात. बाहेर वादळ घोंघावतंय आणि आत मिट्ट अंधार. माझ्या पोटात खड्डा पडला."
जेव्हा एक बारीकसा इमर्जन्सी लाईट लागला तेव्हा मॉस आपली वाद्य बघायला स्टेजवर गेले. माईक आणि त्याचा स्टँड इतस्ततः पडले होते. अचानक त्यांच्या लक्षात आलं की त्यांना जहाजाच्या इंजिनाचा सतत येणारा भरीव, घुर्रर्र असा आवाज येत नाहीये.
जहाजाचं इंजिन बंद पडलं होतं आणि त्याचा वेग हळूहळू कमी होत होता.
153 मीटर लांब असणारं ते भलंमोठं जहाज लाटांमुळे मार्ग भटकून समुद्रात फेकलं जातं होतं.
जहाजावरचे लोक आता घाबरले होते. कुंड्यांतली झाडं, अॅशट्रे, खुर्च्या सगळंच घरंगळत होतं. लोक आता खुर्च्यांवरून उठून जमिनीवर बसले कारण जहाज वेगाने हिंदकळायला लागलं होतं.
असाच एक तास गेला आणि लाऊन्जमध्ये बसलेले लोक अजून घाबरले. लोकांना शांत ठेवण्यासाठी मॉस यांनी आपली गिटार उचलली आणि गाणं म्हणायला लागले. बँडमधले इतर गायक, संगीतकारही यात सहभागी झाली.

थोडा वेळ असाच गेला, पण मॉसच्या लक्षात आलं की जहाज भरकटलं आहे आणि त्याच्या आधीच्या मार्गावर येत नाहीये.
काहीतरी वाईट घडत होतं नक्की. मॉस त्यांच्या पत्नीला म्हणाले, "मी जाऊन पाहून येतो, काय झालंय."
मॉस आणि त्यांचे सहकारी कसबसे आधार घेत खालच्या डेकवर पोहचले. तिथे खूप आवाज येत होते, अनेक जण एकाच वेळी बोलत होते, अधिकारी इकडून तिकडे पळत होते. कोणाच्या हातात बॅगा होत्या, कोणी लाईफ जॅकेट घातले होते कोणी ओलेगच्च झालं होते.
"सगळे इतके गडबडीत, घाबरलेले आणि आश्चर्चचकित झालेले दिसले. आम्ही विचारत होतो, काय झालंय, काय झालंय पण आम्ही कोणाच्याही खिजगणतीतही नव्हतो."
ज्युलियन आणि मॉस इंजिनरूमच्या दिशेने निघाले जी जहाजावरची सगळ्यांत खालची जागा होती.
"आम्ही जहाजाच्या पाण्याखाली असणाऱ्या भागात शिरलो होतो आणि तिथे कोणीच नव्हतं. असं कधीच घडत नाही, शक्यच नाही. जहाज बंदरावर थांबलं असेल तरी नाही."
जहाजात पाणी शिरलं तर एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ नये म्हणून मोठमोठी, जड, धातूची दारं असतात. ती दारं घट्ट बंद केलेली दिसली. पण त्याच्यामागे पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता.
"असं वाटलं की त्या दाराच्या मागे असणाऱ्या भागात पाणी शिरलंय."
ओशनोज बुडायला लागलं होतं.
काय घडतंय याची वरती लाऊंजमध्ये कोणालाच काही कल्पना नव्हती. मॉसला क्रुझच्या संचालिका भेटल्या आणि म्हणाल्या की आता जहाज सोडून पाण्यात उडी मारावी लागेल.
आम्हाला कळलं की एका लाईफबोटमध्ये जहाजावरचे अधिकारी आणि वरिष्ठ कर्मचारी बसून कधीच निघून गेलेत.
मॉस आणि इतरांना जहाज सोडून जीव कसा वाचवायचा याची काहीच कल्पना नव्हती. त्यांना लाईफबोटी पाण्यात कशा उतरवायच्या, कशा चालवायच्या याबद्दलही काहीच माहिती नव्हतं. पण ते करण्याचा अनुभव असणारं कोणीच जहाजावर शिल्लक नव्हतं.
एकेक करून त्यांनी एका बाजूच्या लाईफबोट खाली उतरवायला सुरूवात केली. पण हेलकावणाऱ्या जहाजात त्या बोट स्थिर कशा ठेवायच्या हा यक्षप्रश्न होता.
मॉस आपला एक पाय बोटीत आणि एक जहाजावर ठेवून उभे राहायचे. एकेका लाईफबोटमध्ये 90 लोक बसून समुद्रात उतरवले जात होते. ते लोक भयग्रस्त होते, किंचाळत होते. समुद्रात बोट तर उतरवली पण आता मॉसला ती बोट सुरू कशी करायची, किंवा तिच्या चाव्या कुठे असतात हेही माहिती नव्हतं.,
"आम्ही त्यांना तसंच सोडून दिलं. लाईफबोटीतली माणसं समुद्रात भरकटत गेली. लाटांचा तडाखाही जबरदस्त होता. अंधार पडला होता, उसळणारं पाणी आमच्या तोंडावर फटके मारत होतं. पण सगळ्या लाईफबोट खाली उतरवल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नव्हतं."
ओशनोज बुडत चाललं होतं, त्यात मिनिटागणिक पाणी भरत होतं. त्यामुळे ते एका बाजूला झुकत चाललं होतं. आता लाईफबोटीही काढता येत नव्हत्या.

"लाईफबोटींना खाली पाण्यात उतरवता येत नव्हतं. मग लोक बसलेली असायची, एक मोठी लाट यायची, जहाजावर आदळायची, आणि त्या लाटेच्या प्रहाराने ती लाईफबोट त्यात बसलेल्या माणसांसकट 13 फुट खाली कोसळायची," मॉस म्हणतात.
हा प्रकार खूपच भयानक होता.
"आम्ही असंच करत बसलो असतो तर लोकांना वाचवण्याऐवजी त्यांना मृत्यूच्या दाढेत लोटलं असतं."
लोकांना वाचवायला हातात खूपच कमी वेळ शिल्लक होता.
लाईफबोटी तर आता पाण्यात उतरवता येत नव्हत्या, तरीही शेकडो लोक जहाजावर अडकले होते. मॉस धावत धावत जहाजाच्या कंट्रोल रूममध्ये गेले, तिथे कॅप्टन असतील अशी त्यांना आशा होती. पण ती खोलीही रिकामी होती.
"कोणीच नव्हतं आणि मग मला लक्षात आलं की आता फक्त आम्हीच शिल्लक आहोत, बाकी कोणी नाही."
त्या खोलीत मशीन्सचे लाल-केशरी लाईट्स चमकत होते. ते काय आहे, कसं काम करतं याची कोणालाच माहिती नव्हती पण मॉस आणि सहकाऱ्यांनी 'SOS' (आम्हाला वाचवा) असा सिग्नल पाठवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.
"मी ओरडत होतो, मेडे, मेडे, मेडे…"
अचानक समोरून उत्तर आलं.
"बोला, काय झालंय?"
मॉसचा जीव भांड्यात पडला. त्यांनी समोरच्याला समजावून सांगितलं की कसं ओशनोज जहाज बुडतंय.
"अच्छा तुम्ही किती वेळ तरंगू शकता?"
"ते नाही सांगता येणार. पण जहाजाच्या मधल्या कठड्यांना पाणी लागलं लागलं आहे. आम्ही हेलकावे खातोय. जहाजातही बरंच पाणी शिरलं आहे," मॉस म्हणाले.
"अच्छा. तुमची पोझिशन काय आहे?"
"लंडन आणि डर्बनच्या मध्ये कुठेतरी."
"अहो, म्हणजे अक्षांश, रेखांश काय आहेत?"
मॉसला या अक्षांश रेखांशबद्दल काहीच माहिती नव्हतं.
"तुमचं पद काय आहे?"
"पद? अहो मी जहाजाचा कर्मचारी नाही, गिटारवादक आहे."
पलीकडे शांतता पसरली.

"तुम्ही कंट्रोल रूममध्ये काय करताय?"
"आता इथे कोणीच नाहीये, मग काय करणार?"
"तुमच्या बरोबर कंट्रोल रूममध्ये कोण आहे?"
"मी, माझी बायको, बास गिटार वाजवणारा, इथे एक जादूगारपण आहे आमच्याबरोबर..."
पलीकडच्याची काय अवस्था झाली असेल हे ऐकून कल्पना न केलेलीच बरी.
वायरलेस रेडियोवर बोलणाऱ्याने मॉसचा संपर्क जवळूनच जाणाऱ्या दोन लहान नौकांशी करून दिला.
त्यांनी मॉसला सांगितलं की तुमच्या कॅप्टनला शोधा आणि कंट्रोल रूममध्ये आणा. पण कॅप्टन कुठे आहेत याची जराही कल्पना मॉस यांना नव्हती.
"मला हे माहिती होतं की ते तळघरात, इंजिन रूममध्ये नसणार, कारण आम्ही बुडत होतं. तिथे आधीच पाणी शिरलेलं होतं. मी सारखा सारखा जाऊन चेक करत होतो की पाणी कुठवर आलंय. आमच्या खालच्या डेकपर्यंत पाणी भरलं होतं. आता फक्त वरचा भाग शिल्लक होता."
बरीच शोधाशोध केल्यानंतर मॉसला कॅप्टन सापडला. जहाजाच्या मागच्या भागात सिगार ओढत होता. मॉसनी त्याला म्हटलं की तुझी मदत हवीये - तातडीने.

"तो माझ्याकडे बघतच राहिला. भकास नजरेने आणि म्हणाला - त्याची गरज नाही, त्याची गरज नाही," मॉस म्हणतात.
"मला वाटतं त्याला जबरदस्त शॉक बसला होता."
ओशनोजच्या जवळ असणाऱ्या दोन छोट्या नौका तिथे पोहचल्या, पण त्यांच्याकडे प्रत्येकी एकच लाईफबोट होती त्यामुळे ते काही करू शकले नाही. पण त्यांनी या बुडणाऱ्या जहाजाचं लोकेशन दक्षिण आफ्रिकेतल्या बचाव यंत्रणेला दिलं. आता या लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवावे लागले असते.
वादळ जहाजाला झोडपून काढत होतं. मॉस आणि ट्रेसी दोघं अंधारात एकमेकांचा हात हातात धरून देवाचा धावा करत बसले.
"मी बायकोला म्हणालो, जहाज बुडणार आणि आपल्याला इथेच जलसमाधी मिळणार."
मॉस आणि ट्रेसीला 15 वर्षांची मुलगी होती. तिचं नाव अँबर. ती आधी ओशनोज जहाजावरच सुट्टी घालवत होती पण काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेला उतरली. तिची बोर्डिंग स्कुल दक्षिण आफ्रिकेत होती.
"तिचे दोन्ही पालक मरायला नकोत," मॉस हाच विचार करत होते. "आमच्यापैकी एकजण तरी वाचला पाहिजे."
वादळ रोंरावत होतं, पाणी वाढत होतं... तीन तास गेले आणि पहिला आशेचा किरण दिसला.
पहिलं रेस्क्यू हेलिकॉप्टर पोहचलं. दोन नेव्ही डायव्हर्स ओशनोजच्या डेकवर उतरले. आता जहाज बुडायच्या आत त्यांना सगळ्यांना जहाजावरून उचलायचं होतं. त्यांनी हेलिकॉप्टर एअरलिफ्ट कसं करतात हे मॉसला सांगितलं - फक्त 5 मिनिटात.
"लक्षात ठेवा, ही हार्नेस लोकांच्या काखेतून आली पाहिजे आणि घट्ट बांधली गेली पाहिजे. नीट बांधा नाहीतर लोक हवेतल्या हवेत उलटे होतील आणि खाली पडतील. मग ते मेलेच समजा. एका वेळेस दोघांना बांधा, आपल्याकडे वेळ नाही. चला.. पळा.. लागा कामाला," नेव्ही डायव्हरने फटाफट मॉसला सुचना दिल्या.
जहाजाच्या एका बाजूला नेव्हीचे लोक लोकांना दोरीने बांधून वर पाठवत होते, तर दुसऱ्या बाजूला ट्रेसी आणि मॉस हे काम करत होते. पण जहाज जवळपास पूर्ण बुडालं होतं, आता लाटा लोकांच्या डोक्यावरून जात होत्या. लोक घाबरले आणि दणदण खाली उड्या मारायला लागले.
शेवटी त्यांना वाचवण्यासाठी हवेने फुगवता येणारे जॅकेट आणि टायर टाकावे लागले. ज्या लोकांना वरती खेचलं जात होतं तेही हवेच्या माऱ्याने जहाजाच्या वरच्या खांबांना आदळत होते, कोणाला किती इजा झालीये हे पाहाणं शक्यही नव्हतं ना त्यासाठी वेळ होता.
आहे त्या परिस्थितीत प्रत्येकाला वर पाठवणं इतकाच पर्याय होता.

फोटो स्रोत, Getty Images
एकूण 5 हेलिकॉप्टर्स बचावकार्यासाठी आली आणि ती लोकांना पाळीपाळीने भरून नेत होती. एकावेळी 12 लोक त्यात बसत होती.
पहाट झाली तोवर संपूर्ण बुडालेल्या जहाजाच्या वरच्या भागात पूर्णपणे थकलेले ट्रेसी आणि मॉसच शिल्लक राहिले.
"जसं आम्हाला हेलिकॉप्टरने हवेत उचललं मला दिसलं की जिथे काही तासांपूर्वीच आम्ही लोकांना हार्नेसने बांधत होतो ती जागा लाटांनी पूर्ण उद्ध्वस्त केलीये," मॉस म्हणतात.
मॉसला घेऊन जेव्हा शेवटचं हेलिकॉप्टर हिरव्या जमिनीवर उतरलं तेव्हा जहाजावरच्या प्रवाशांनी एकच जल्लोष केला. गाणी गात, ओरडत ते त्यांच्या दिशेने धावले.
"मला भरून आलं, मी हुंदके द्यायला लागलो आणि धाडकन जमिनीवर पडलो," ते म्हणतात.
4 ऑगस्ट 1991 च्या पहाटे, शेवटच्या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर जवळपास 45 मिनिटांनी ओशनोज जहाजाला संपूर्ण जलसमाधी मिळाली.
जे लोक लाईफ बोटींवर होते त्यांना आसपासच्या जहाजांनी वाचवलं. जगात घडणाऱ्या अशा काही सुदैवी क्षणांपैकी ही रात्र होती कारण या अपघातात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








