रशिया आणि युक्रेनचा संयुक्त इतिहास : जो पुतिन यांना पुन्हा प्रत्यक्षात आणायचाय

फोटो स्रोत, Getty Images
12 जुलै 2021 - रशियाच्या सरकारी वेबसाइटवर युक्रेनबद्दल जवळजवळ साडेसहा हजार शब्दांचा एक लेख प्रकाशित झाला. या लेखात रशिया आणि युक्रेनच्या गेल्या अनेक शतकांच्या संयुक्त इतिहासाची माहिती सविस्तर लिहिण्यात आली होती.
यात दावा करण्यात आला होता की रशिया, युक्रेन आणि बेलारूसमध्ये राहणाऱ्यांचे पूर्वज हे मुळात प्राचीन रशियन लोकच होते आणि कोणे एके काळी हा विशाल प्राचीन स्लाव्हिक देश युरोपातला सर्वांत मोठा देश होता.
ही गोष्ट तुम्ही इथे ऐकूसुद्धा शकता - इथं क्लिक करा
हा लेख लिहिला होता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वतः. त्यांच्यानुसार 20व्या शतकाच्या सुरुवातीला युक्रेनने आपली एक वेगळी 'काल्पनिक' ओळख निर्माण करायला सुरुवात केली. आणि मग रशियाविरोधी पाश्चात्त्य शक्तींचा प्रभाव युक्रेनवर पडत गेला, ज्यामुळे युक्रेन रशियाला शत्रू समजू लागला.
पण पुतिन यांचा हा दावा कितपत खरा आहे? रशिया आणि युक्रेन यांचा संयुक्त इतिहास नेमका काय आहे?
रशिया - एका देशाचा जन्म
रशिया आणि युक्रेन दोन्हीचे पूर्वज कीव्हन रुस नावाच्या एका स्लाव्हिक देशाचा भाग होते. याची स्थापना व्हाइकिंग्सने नवव्या शतकात केली होती.
युनिवर्सिटी ऑफ शिकागोमध्ये रशियन इतिहासाच्या प्रोफेसर फेथ हिलिस सांगतात की बाल्टिक समुद्र आणि काळ्या समुद्राच्या मधल्या भागात जी जागा आहे, जिथे आजचा युक्रेन आहे. तिथे जवळजवळ हजार वर्षांपूर्वी छोट्या-छोट्या समूहांमध्ये लोक राहायचे.
"हे स्लाव्हिक समूह वेगेगळ्या गटांमध्ये राहायचे, ते संघटित असे नव्हते. काही प्रचलित गोष्टींमध्ये सांगण्यात आलंय की, या संघर्ष करणाऱ्या आदिवासी समूहांनी नीप्रो नदीच्या वाटे स्कँडिनेव्हियाहून बाइझेंटियमला येणाऱ्या-जाणाऱ्या स्कँडिनेव्हियन व्यापाऱ्यांच्या नेतृत्वात एकत्रित येऊन एक नवीन राष्ट्र बनवायचा निश्चय केला. या नवीन देशाला कीव्हन रशिया म्हटलं गेलं. हे लोक ना युक्रेनी होते ना रशियन. यात निसर्गदेवतेची पूजा करणारे समूह होते, भटक्या जमाती आणि बंजारे, मुस्लीम आणि ज्यूंसारखे समूहसुद्धा होते, जे स्लाव्हिक समाजाचे होते," असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, AFP
प्राचीन रशियाची राजधानी कीव्ह होती. रोमन साम्राज्याच्या पूर्वेला जन्मास आलेल्या एका ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माने इथल्या वेगवेगळ्या समूहांना एकत्र आणलं. इथल्या अनेक समुदायांनी हा ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्म स्वीकारला, पण इथे वेगवेगळे धर्म आणि पंथसुद्धा होतेच.
13व्या शतकात कीव्हन रशियावर मंगोलियन आक्रमण झालं. यानंतर इथली स्लाव्हिक लोकसंख्या तीन मोठ्या गटांमध्ये विभागली गेली. पुढे चालून हेच तीन गट आधुनिक जगतातले रशिया, युक्रेन आणि बेलारूस बनले.
मंगोलियन साम्राज्याचा अस्त 14व्या शतकात होऊ लागला, आणि याच दरम्यान कीव्हसाठी आणखी एक धोका उदयास येत होता. पोलंड आपल्या सीमांपलीकडे वेगवेगळे भाग काबीज करत होता आणि तिथे ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन नव्हे तर रोमन कॅथलिकांचं वर्चस्व होतं.
फेथ हिलिस सांगतात की, "पोलंड आणि लिथुएनियाने हाथमिळवणी केली आणि 16व्या शतकात ते दक्षिणेकडे आपला विस्तार करू लागले. त्यांनी कीव्ह काबीज केलं. मग त्यांच्या प्रभावाखाली इथे एका ऑर्थोडॉक्स समाज वाढू लागला. हे होते कोसाक्स, जे स्वतःला त्या ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांमध्ये सर्वांत शक्तिशाली मानायचे. या लोकांना पोलंड-लिथुआनियाची संस्कृती पटत नव्हती. त्यांना वाटायचं की पोलंड आणि कॅथलिक लोक छळ करतायत."
17व्या शतकाच्या मध्यात रशिया आणि युक्रेनच्या इतिहासात एक महत्त्वाचं वळण आलं. पोलंडच्या राज्यातील कीव्हच्या स्लाव्हिक लोकांनी आणि रशियन झारच्या शासनातील रशियाच्या स्लाव्हिक लोकांनी एक ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन आघाडी तयार केली.

फोटो स्रोत, Getty Images
"हेच ते महत्त्वाचं वळण होतं, जेव्हा राष्ट्रीयतेचा मुद्दा पहिल्यांदा चर्चेत आला आणि तोच आजवर कळीचा मुद्दा बनलाय. कोसाक लोकांनी त्यावेळी पहिल्यांदा युक्रेन हा शब्द वापरला होता. त्यांनी रशियाचा उल्लेख करत म्हटलं होतं की हा ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांचा वारसा आहे, जो जतन करायचा ते प्रयत्न करत आहेत. पण हो, ना त्यांनी स्वतःला कधी रशियन म्हणवलं ना त्या भागाला रशिया, ज्याला ते वाचवायचा प्रयत्न करत होते. ते त्याला युक्रेन म्हणायचे," असं हिलिस सांगतात.
18व्या शतकात जेव्हा झारच्या शासनकाळात रशियाने औपचारिकरीत्या रशियन साम्राज्याचा अवतार घेतला, तेव्हा त्यात युक्रेनचा पूर्वेकडचा भागही होता. यात युक्रेनची स्वतःची वेगळी संस्कृती काही काळ स्वीकारली गेली, इथे स्वायत्त सरकार होतं आणि नेतेसुद्धा. पण 1762मध्ये रशियाच्या साम्राज्ञी बनल्या कॅथरीन द ग्रेट. त्यांना असं वाटायचं की हा भाग जर स्वतंत्र राहिला तर पुढे चालून तो त्यांच्या साम्राज्यासाठी मोठं आव्हान उभं करू शकतो.
हिलिस सांगतात की, कॅथरीन यांनी या भागावर दबाव टाकला. "त्या काळी युक्रेनचा एक औपचारिक भूभाग होता, त्यांनी त्याच्या सीमा पुसून टाकल्या. त्यांनी कोसाकने उभी केलेली स्वायत्त शासन यंत्रणा मोडीत काढली, आणि इथल्या धनाढ्य उच्चभ्रू लोकांना एकूण साम्राज्याच्या लोकांमध्ये स्थान दिलं, पण युक्रेनमध्ये असलेलं त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं."
म्हणजे काय झालं, तर पूर्व युक्रेनमध्ये राहणाऱ्यांच्या त्या प्रदेशाला आता लिटिल रशिया असं नाव देण्यात आलं. तर पश्चिमेकडेचा भाग आधी ऑस्ट्रिया आणि नंतर ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याचा भाग बनला, जिथे हॅप्सबर्ग घराण्याचं राज्य होतं. आणि या दोन साम्राज्यांमध्ये एकप्रकारची स्पर्धा सुरु होती.
हिलिस यांच्यानुसार, 19व्या शतकाच्या अखेरीस हॅप्सबर्ग सम्राटाला हे लक्षात आलं होतं की युक्रेनी राष्ट्रवादाचा वापर ते रशियाविरुद्धच्या लढ्यात करुन घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना यासाठी आर्थिक मदत पुरवायला सुरुवात केली.
युरोपात वेगवेगळ्या साम्राज्यांमधले असलेच संघर्ष 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाचं कारण ठरले. चार वर्षांनंतर जेव्हा युद्ध संपलं तेव्हा ना ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य उरलं होतं, ना रशियन. एकाची पराभवानंतर ताटातूट झाली होती तर दुसऱ्याचा पाडाव रशियन क्रांतीमुळे झाला होता. त्यानंतरच्या काळात इथं एका महाशक्तीचा उदय झाला, ती म्हणजे रशियन सोविएत संघ किंवा USSR.
सोविएत संघाचा जन्म
पहिलं महायुद्ध आणि रशियन क्रांतीनंतर अशी उलथापालथ झाली की युरोपचा अख्खा नकाशाच बदलून गेला. युक्रेनी लोक युरोपातला सर्वांत मोठा वांशिक गट म्हणून उदयास आला आणि त्यांनी आपल्या स्वतंत्र देशासाठीची मोहिम सुरू केली.
1917 मध्ये युक्रेन सोवियत सोशलिस्ट रिपब्लिक बनला खरा, पण हा काही फार काळ टिकला नाही, असं हार्वर्ड युनिवर्सिटीमध्ये इतिहासाचे प्रोफेसर सर्ही प्लॉखी सांगतात. ते युक्रेनियन रिसर्च इंस्टिट्यूटचे संचालक आहेत.
"1921 मध्ये पोलंड-सोवियत युद्ध संपवायला रीगा करार झाला. या कराराअंतर्गत युक्रेनचा काही भाग पोलंड, चेकस्लोवाकिया आणि रोमेनियामध्ये गेला, तर काही सोवियत सोशलिस्ट रिपब्लिकच्या रूपात व्लादिमीर लेनिन आणि बोल्शेविकच्या नेतृत्वात सोवियत संघात सामील झाले," असं प्लॉखी सांगतात.

फोटो स्रोत, EPA
रशियाचे आजचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन याच घटनेला एक ऐतिहासिक चूक मानतात. त्यांना वाटतं की सोव्हिएत रिपब्लिक म्हणजेच पूर्व युक्रेन, विशेषतः दोनेत्स्क आणि लुहान्स्क हे दोन प्रदेश नेहमीपासूनच रशियाचा भाग होते.
"बोल्शेविक आधी फार काही शक्तिशाली नव्हते. त्यांना आधीच्या रशियन साम्राज्याशी जुळलेल्या वेगवेगळ्या आंदोलनांना सोबत घेऊन वाटचाल करायची होती. यासाठी त्यांनी त्यांना स्थानिक भाषा आणि संस्कृतीसारख्या गोष्टींमध्ये मुभा दिली. त्यांनी युक्रेनी लोकांना वेगळी एक ओळख दिली आणि एक वेगळं प्रजासत्ताक बनवायच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेचाही आदर केला. जमिनीवर काय चाललंय, याचा वेध घेऊन ते पुढची पावलं टाकत होते," असं ते सांगतात.
कालांतराने युक्रेनवर सोवियत संघाची पकड मजबूत होत गेली. 1930च्या दशकात सोवियत संघाने औद्योगिकीकरणाचं एक धोरण आखलं, त्यात युक्रेनमधल्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीला लक्ष्य करण्यात आलं होतं. परिणामी युक्रेनमध्ये दुष्काळ पडला.
सर्ही प्लॉखी सांगतात सांगतात की 1932-33च्या दरम्यान पडलेल्या दुष्काळामुळे जवळजवळ 40 लाख लोकांचे जीव गेले होते. या मृतांमध्ये सर्वाधिक संख्या होती युक्रेनी लोकांची, जवळजवळ पूर्ण युक्रेनी लोकसंख्येपैकी दहा टक्के लोक.
याच्या जवळजवळ पाच दशकांनंतर सोवियत युनियनचं विघटन झालं, पण त्याआधी आणखी एका संघर्षाला जग तोंड देणार होतं. युक्रेनच्या इतिहासातला हासुद्धा एक महत्त्वाचा अध्याय आहे, ज्याचा अनेकदा उल्लेख करताना व्लादिमीर पुतिन म्हणतात - जेव्हा युक्रेनने नाझी जर्मनीसोबत हातमिळवणी केली होती.
1939मध्ये हिटलरने पोलंडवर हल्ला केला, तेव्हा पोलंडमधला सर्वांत मोठा वांशिक अल्पसंख्याक गट म्हणजे युक्रेनी लोकांचा. त्यामुळे युक्रेनी राष्ट्रवादी लोकांनी तेव्हा नाझी सैन्यासाठी तांत्रिक हेरगिरीचंही काम केलं होतं. कारण त्यांच्या दृष्टीने पोलंड त्यांचं शोषण करत होता आणि जर्मनी युक्रेनचा सहकारी होता. म्हणून युक्रेनी राष्ट्रवादी आंदोलक नाझींबरोबर एकत्र पोलंडविरुद्ध काम करू लागले, असं सर्ही प्लॉखी सांगतात.
पण ही आघाडी काही फार काळ टिकली नाही. कारण युक्रेनी लोकांची नाझींबद्दलची धारणा चुकीची ठरली.
सर्ही प्लॉखी सांगतात की पोलंडच्या पलीकडे जात जेव्हा जर्मन लष्कर युक्रेनमध्ये घुसली तेव्हा तिथल्या राष्ट्रवादी नेत्यांनी युक्रेनच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. जर्मनीने या नेत्यांना अटक केली. 1941च्या अखेरीस सर्व युक्रेनी राष्ट्रवादी संघटना नाझी जर्मनीच्या विरोधात गेल्या होत्या. त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा हिटलरने युक्रेनच्या इतर भागांकडे मोर्चा वाळवला, तेव्हा त्या युद्धात लाखो युक्रेनी सहभागी झाले, ते रेड आर्मीचा भाग होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा एखदा युरोपचा नकाशा पूर्णपणे बदललेला होता. आता युक्रेनचा विस्तार आधी पोलंडमध्ये राहिलेल्या काही भागापर्यंत झाला होता. युक्रेन पुन्हा एकदा एक मोठा प्रांत म्हणून एकवटला होता, पण अजूनही ते एक स्वतंत्र राष्ट्र नव्हतच. ते सोवियेत युनियनचाच भाग होतं.
"जेव्हा स्टालिन आले तेव्हा अख्ख्या युक्रेनला सोवियत युनियनमध्ये सामिल करून घेतलं. युद्धापूर्वी याचे जे भाग पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी आणि रोमानियासोबत होते, तेसुद्धा आता सोवियत संघात सामिल करून घेण्यात आले होते. हे बऱ्याच अंशी आजचं युक्रेन होतं, पण तेव्हा हा पूर्ण भाग सोवियतच्याच नियंत्रणात होता," असं सर्ही प्लॉखी सांगतात.
युक्रेनमध्ये सोवियत रशियाचा सतत विरोध सुरू होताच. जवळजवळ सात दशकांच्या सोवियत नियंत्रणानंतर 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि तिथून सोवियत युनियनचा पाडावही सुरू झाला.
युक्रेनचं स्वातंत्र्य
डिसेंबर 1991 मध्ये बेलारूसमध्ये रशिया, बेलारूस आणि युक्रेनचे नेते एका तातडीने बोलवलेल्या बैठकीसाठी एकत्र आले. तिघांमध्ये सोवियत युनियनमधून बाहेर पडण्यावर एकमत झालं. सोवियत युगाचा अंत झाला. युक्रेन आता एक स्वतंत्र राष्ट्र बनायला आता तयार होतं.
युक्रेन स्वतंत्र झाला खरा, पण त्यामुळे सामान्यांचं जगणं आणखी अवघड झालं, असं अमेरिकेच्या सीटन हॉल युनिवर्सिटीमध्ये प्रोफेसर मार्गरीटा बामासेडा सांगतात.

फोटो स्रोत, AFP
"युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर खाणकाम व्हायचं. त्या काळात खाणींकडे मजुरांना आणि सप्लायर्सना द्यायला पैसे नव्हते. स्टील कंपन्यांकडे कोळसा विकत घ्यायला पैसे नव्हते. चलनाचा तुटवडा तर होताच, शिवाय, वेगवेगळ्या यंत्रणांना एकसंध आणि समन्वयाने कसं काम करता येईल, असले प्रश्नसुद्धा होतेच," असं प्रो. बामासेडा सांगतात.
रशिया पश्चिम युरोपला जो नैसर्गिक गॅस विकतो, त्याचा 80 टक्के पुरवठा युक्रेनमार्गे होतो. यासाठी युक्रेनला रशियाकडून स्वस्त इंधन मिळायचं. याने काही दिलासा तर मिळाला पण भ्रष्टाचार वाढू लागला. आणि मग रशिया कधीही यावरून युक्रेनवर दबाव टाकू शकत होता.
पण हो, युक्रेनवर दबाव टाकायला रशियाकडे आणखी एक मार्ग होता. युक्रेनचे बहुतांश उद्योग देशाच्या पूर्वेकडच्या भागात होते, जिथे रशियन भाषा बोलणारे मोठ्या प्रमाणावर होते.
प्रो. बामासेडा सांगतात की त्या काळात युक्रेनबद्दल असं म्हटलं जायचं की इथलं राजकारण कीव्हमधून चालतं आणि पैसा दोनेत्स्कमधून येतो. म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत दोनेत्स्कचा वाटा मोठा होता, इथल्या श्रीमंतांनी राजकारण पूर्णपणे कीव्हवर सोडून दिलं होतं.
हे म्हणजे आपल्या दिल्ली आणि मुंबईसारखं म्हणता येईल - एक देशाची प्रशासकीय राजधानी आणि दुसरी आर्थिक. पण 2004मध्ये युक्रेन पुन्हा एकदा परिवर्तनाच्या उंबरठ्यावर होता. इधल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकीकडे होते रशियाधार्जिणे व्हिक्टर यानुकोविच आणि दुसरीकडे होते पाश्चात्त्य देशांचे समर्थक व्हिक्टर यूशचेन्को.
यानुकोविच यांना विजयी घोषित करण्यात आलं. पण त्यांच्यावर निवडणुकीत हेराफेरीचे आरोप झालेत आणि त्यांच्याविरोधात निदर्शनं सुरू झाली. या निदर्शनांना ऑरेन्ज रिवोल्यूशन म्हटलं गेलं. ऑरेंज किंवा नारंगी हा पराभूत उमेदवार यूशचेन्कोंच्या निवडणूक प्रचाराचा रंग होता.
लोकांनी पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची मागणी केली, आणि यात जिंकले ते व्हिक्टर युशचन्को. ते राष्ट्राध्यक्ष बनले. हे त्या काळचं एक मोठं राजकीय आंदोलन ठरलं होतं, ज्यात प्रजासत्ताक आणि भ्रष्टाचारमुक्त देशाची संकल्पना मांडण्यात आली होती, असं प्रो. बामासेडा सांगतात.
यानंतर अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली, देशात गुंतवणूक वाढली. राष्ट्रीयत्वाचा लोकांच्या मनातला विचार आणखी पक्का झाला. पण पुन्हा 2008मध्ये जगभरात आर्थिक मंदी आली आणि अर्थव्यवस्था गडगडू लागली.
प्रा. बामासेडा यांच्यानुसार युक्रेनच्या राजकारणात नक्कीच ऑरेंज रिवोल्यूशन खूप यशस्वी ठरलं, यात कोणतीही शंका नाही. "मी स्वतः ते क्षण अनुभवले होते. पण खरंतर यामुळे लोकांच्या आयुष्यात फार काही बदल नाही झाला. कदाचित याचमुळे काही वर्षांनंतर यानुकोविच पुन्हा एकदा सत्तेत परतले."
2010 मध्ये विक्टर यानुकोविच यांना युक्रेनच्या पूर्व भागांमध्ये पाठिंबा मिळाला आणि ते निवडणुका जिंकले. पण युक्रेनमध्ये याच दरम्यान आणखी एक क्रांतीची तयारी सुरू झाली होती.
मैदान स्वेअर आंदोलन
सर्गेई राडचेन्को हे कार्डिफ युनिवर्सिटीमध्ये विझिटिंग प्रोफेसर आहेत. ते सांगतात की मुळात युक्रेनला दोन भागांमध्ये पाहता येईल. पहिला - पश्चिमेकडचा भाग, जिथे युक्रेनी भाषा बोलणारे लोक राहतात आणि दुसरा भाग पूर्वेकडचा, जिथे मूळ रशियन वंशाचे लोक राहतात. आणि निवडणुकांदरम्यानही मतदारांचे हेच दोन गट प्रामुख्याने दिसतात.
व्हिक्टर यानुकोविच यांचं राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणं, ही काही अभूतपूर्व घटना नव्हती. जर युशचेन्को यांच्या कार्यकाळात अर्थव्यव्स्थेत मोठ्या सुधारणा झाल्या असत्या तर कदाचित यानुकोविच जिंकले नसते. पण मला वाटतं की यानुकोविच खरोखरंच लोकप्रिय नेते होते. त्यांना लुहान्स्क, दोनेत्स्क आणि क्रायमियासारख्या पूर्वेकडच्या भागांमधून पाठिंबा मिळाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
असं म्हणता येईल का की यानुकोविच यांच्या कार्यकाळात युक्रेनचं परराष्ट्रीय धोरण पूर्वेकडे जास्त झुकणारं होतं?
सर्गेई राडचेन्को सांगतात, "यानुकोविच हे कोणत्या एका बाजूने झुकलेले नव्हते, ना पूर्व ना पश्चिम. आज त्यांना रशियाच्या हातातली बाहुली म्हणून पाहिलं जातंय, पण त्या काळी असं नव्हतं. ते दोन्हीकडे तितकेच झुकलेले होते असं म्हणता येईल, त्यांना युरोपियन युनियन आणि रशिया असे दोघांशीही चांगले संबंध हवे होते."
2013 मध्ये परिस्थिती आणखी किचकट झाली. यानुकोविच यांना निवडायचं होतं की त्यांना युरोप हवाय की रशिया. तेव्हा युरोपियन युनियनसोबत करार करायचं ठरलंसुद्धा होतं, पण सही करायच्या अगदी एका रात्रीपूर्वी त्यांनी माघार घेतली, आणि यासाठी रशियन दबावाला जबाबदार ठरवण्यात आलं होतं.
पश्चिमी भागात राहणाऱ्या लोकांना वाटलं की यानुकोविच यांच्या या निर्णयामुळे एका उज्ज्वल भविष्याचं स्वप्न भंगलं होतं. त्यांच्याविरोधात लोक रस्त्यावर उतरले आणि कीव्हच्या मैदान स्क्वायरमध्ये एकत्र आले. अनेक आठवडे हे आंदोलन चाललं आणि त्याला हिंसाचाराचं गालबोट लागलं. जवळजवळ शंभर लोकांचा मृत्यू झाला. यानंतर यानुकोविच यांनी देशातून पलायन करत रशियामध्ये आश्रय घेतला.
रशियचा आरोप होता की युक्रेनमध्ये सरकार पाडण्यामागे पाश्चात्य शक्तींचा हात होता. त्यांना हीसुद्धा भीती होती की पाश्चात्त्य शक्तींची नेटो संघटना रशियाच्या जवळ येऊ पाहतेय. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सक्रिय झाले. त्यांनी क्राइमिया रशियाचा भाग असल्याची घोषणा केली आणि लुहान्स्क आणि दोनेत्स्कवर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली.
पण सर्गेई राडचेन्को सांगतात की "युक्रेनी लोक कधी आपली एक अशी राष्ट्रीय ओळख नाही बनवू शकले, ज्याने पूर्व आणि पश्चिम अशा दोन्हीकडच्या लोकांना एकत्र आणता येईल. 2014 मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर डोनबास, लुहान्स्क आणि दोनेत्स्कमध्ये रशियाधार्जिणे फुटीरतावाद्यांची शक्ती वाढली आणि रशियन समर्थक या भागांकडे जाऊ लागले. तसंच पूर्वेकडूनही पश्चिम भागात लोकांचं पलायन सुरू झालं."
2014च्या नंतर रशिया आणि युक्रेनच्या सीमेवरच्या भागांमध्ये संघर्ष कधी थांबलाच नाही. आणि त्यानंतर अनेक महिन्यांनंतर रशियाने सैनिक आणि दारुगोळा युक्रेनी सीमेवर आणायला सुरुवात केली. त्यानंतर अखेर 24 फेब्रुवारी 2022ला युक्रेनवर रशियाने आक्रमण केलं.
मग युक्रेन आणि रशियाचं सत्य काय?
तर नेहमीच रशियाचा भाग होता, हा पुतिन यांचा दावा कितपत खरा आहे?
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी युक्रेन आणि रशिया यांचा संयुक्त इतिहास ही काही भूतकाळातली गोष्ट नाही, त्यांना हाच इतिहास भविष्यातही सत्यात उतरताना पाहायचाय. त्यांना गेल्या तीन दशकांपासून स्वतंत्र असलेल्या आपल्या शेजाऱ्याची स्वतंत्र ओळख मान्य करायची नाहीय.
सर्गेई राडचेन्को यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर ते फक्त भूतकाळाकडे पाहत नाहीयेत, ते तो काळ परत आणू पाहतायत.
"एक प्रकारे पुतिन पुन्हा एकदा रशियन साम्राज्य उभं करू पाहतायत. असं वाटतं की ते 21व्या शतकात एक असं साम्राज्य बनवू पाहतायत, ज्याची यापूर्वीच इतिसाहात नोंद झाली आहे. आणि यासाठी ते काहीही करायला तयार आहेत."
दरआठवड्याला अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी नक्की ऐका बीबीसी मराठीचा विशेष मराठी पॉडकास्ट - गोष्ट दुनियेची. दर शनिवारी नवीन एपिसोड ॲपल पॉडकास्ट, गाना, जिओ सावन आणि स्पॉटिफायवर.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









