मुंबईची टायटॅनिकः रामदास बोट फुटल्यानंतर 12 तास मृत्यूशी झुंज देणारे बारकूशेठ

फोटो स्रोत, FACEBOOK/ONKAR KARAMBELKAR
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
17 जुलै 1947 रोजी मुंबईवरून रेवसला जाणारी बोट बुडली होती. या बोटीतून आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या बारकूशेठ मुकादम यांचे 2020 साली निधन झाले. बीबीसी मराठीनं काही दिवसांपूर्वी केलेली ही बातमी पुन्हा शेयर करत आहोत.
'बारकूशेठ मुकादम गेले.'
शनिवारी सकाळीच अलिबाग, पनवेलच्या मित्रांनी बारकूशेठ मुकादम यांचे फोटो आणि माहिती पाठवायला सुरुवात केली. 72 वर्षांपूर्वी मुंबईवरून रेवसला चाललेली रामदास बोट बुडली होती. त्या बोटीवरचे ऊतारू बारकूशेठ आश्चर्यकारकरीत्या वाचले होते.
17 जुलै 1947 रोजी रामदास बोटीने मुंबईजवळ काशाच्या खडकाजवळ फुटून 625 लोकांसकट जलसमाधी घेतली होती. त्यातून बचावलेल्या 232 लोकांमध्ये बारकूशेठ यांचा समावेश होता.
शनिवारी बारकूशेठ त्यांच्या मृत्यूची बातमी वाचली आणि बरोबर दोन वर्षांपूर्वी मे महिन्यातच त्यांची झालेली भेट अगदी आजच घडल्यासारखी डोळ्यांसमोरून गेली.

फोटो स्रोत, FACEBOOK/ONKAR KARAMBELKAR
बारकूशेठ यांचं खरं नाव विश्वनाथ. पण सगळ्या अलिबाग शहरात त्यांचं नाव बारकूशेठ किंवा बारकू मुकादम असंच प्रसिद्ध होतं. रामदास बोटीवर लेख लिहायचा म्हणून बाहेर पडल्यावर मला बारकूशेठ यांचं नाव समजलं.
रामदास बोटीवरचा वाचलेला आणि हयात असलेला हा एकमेव माणूस अलिबागला राहातो, हे कुणीतरी सांगितल्यावर त्यांना शोधायचं ठरवलं. त्यांच्याबद्दल इंटरनेटवर आणि यूट्यूबवर माहिती मिळाली. पण त्यांचा पत्ता किंवा फोन नंबर सापडत नव्हता, म्हणून थेट अलिबाग गाठायचं ठरवलं.
अलिबागला उतरल्या उतरल्या बारकूशेठ या शहरात चांगलेच प्रसिद्ध असल्याचं जाणवलं. त्यांचा पत्ता लोकांनी सहज सांगितला. इस्रायल आळी, घट्टेबाग, कोळीवाडा असं एकेक मागं टाकत त्यांच्या घरासमोर जाऊन ठाकलो.
बाहेरच्या खोलीतच एका खाटेवर आजोबा पहुडले होते. त्यांचा फोटो पाहिला असल्यामुळं तेच बारकूशेठ असल्याचं लक्षात आलं.
बारकूशेठ आणि त्यांचं कुटुंब अगदीच मनमोकळे आणि भरपूर अगत्य असलेले होते. 'हा कोण अचानक आलाय?', 'याचं नाव माहिती नाही...', 'येण्याच्या आधी फोनही केलेला नाही...', 'आता काय बोलायचं?' असला एकही प्रश्न त्यांच्या डोळ्यात नव्हता.
चार महिन्यांपूर्वी त्यांचा पाय मोडला आणि तेव्हापासून ते झोपूनच होते. बाहेरच्या खोलीतच ते खाटेवर होते.
मंद स्मित करण्याच्या त्यांच्या नेहमीच्या शैलीत त्यांनीच 'काय बेत काढला?' असा पहिला प्रश्न विचारला. 'तुम्हाला भेटायला आलो, रामदास बोटीचा तुमचा अनुभव ऐकायचा आहे,' म्हटल्यावर त्यांची कळी खुलली. भराभर सांगू लागले.

फोटो स्रोत, KISHOR BELEKAR
माझ्या हातात 1947 साली प्रसिद्ध झालेल्या 'दर्यावर्दी' मासिकाचा अंकाच्या प्रती होत्या आणि रामदास बोट बुडण्याला 50 वर्षं झाल्यानंतर प्रसिद्ध झालेला अंकही होता. या दोन्ही अंकांमध्ये त्यांच्या मुलाखती होत्या.
रामदास बोट बुडली तेव्हा ते फक्त 12 वर्षांचे होते. पुढचा 70 वर्षांचा काळ त्यांनी रामदासची दुःखद आठवण मनाशी ठेवून काढली होती. माझ्या हातातला अंक पाहिल्यावर बारकूशेठ बोलू लागले, "गटारी अमावस्या हा कोकणी माणसासाठी एक महत्त्वाचा दिवस असतो. त्यावेळेस कुलाबा (आताचा रायगड) जिल्ह्यात जायचं म्हटलं की बोटीनं जाण्याचा पर्याय सोपा होता.
"त्यावेळेस बोटी रेवसच नाही तर पार रत्नागिरी, गोव्यापर्यंत जायच्या. गटारी अमावस्या आपल्या गावाकडच्या घरांमध्ये काढायची म्हणून धांदल उडाली. सकाळची रामदास बोट चुकवायची नाही म्हणून सगळ्या सामानासुमानासकट भाऊचा धक्का गाठला होता."
या सगळ्या लोकांच्या गर्दीमध्ये 12 वर्षांचा बारकूही होता. बोट बुडताना तुमच्या डोळ्यांसमोरतं दृश्य कसं होतं, असं विचारल्यावर मला बारकूशेठ म्हणाले होते, "मी अगदीच किरकोळ शरीराचा होतो. पण अलिबागला वडिलांचं भाजीचं दुकान होतं. त्यांच्यासाठी मी मुंबईतून भाजीपाला आणि लिंबं घेतली होती. पुन्हा माझ्या कडोसरीला वीस रुपयेही होते. बोट फुटल्यावर माझ्या हाताला एक रबरी पिशवी लागली. मी तीच धरून ठेवली आणि बारा-पंधरा तास असाच भरकटत तरंगत राहिलो."

फोटो स्रोत, KISHOR BELEKAR
मुकादम हे सांगत असतानाच मी त्यांना 1947चा 'दर्यावर्दी'च्या अंकातल्या मुलाखतीला एक परिच्छेद दाखवला. मरणाच्या दारातून परतलेल्या या कोवळ्या वयाच्या मुलाची मुलाखत दर्यावर्दीच्या 'खास प्रतिनिधी'ने घेतली होती.
समोर बुडणारे लोक, किंकाळ्या, आक्रोश, झपाट्याने बुडणारी बोट पाहून तुला काय वाटलं होतं, असं त्या प्रतिनिधीनं बारकूशेठना विचारलं होतं.
त्यावर विश्वनाथनी (बारकू) मजेशीर उत्तर दिलं होतं. "मी मरेन असं काही मला वाटलं नाही, पण जर मेलोच तर मला एका गोष्टीसाठी वाईट वाटलं असतं, ते म्हणजे माझ्या आतेभावाने तेव्हा सर्व्हिससाठी चार मोटारी घेतल्या होत्या. त्या मला पाहायला मिळणार नाहीत याचं राहून राहून वाईट वाटत होतं."

फोटो स्रोत, FACEBOOK/ONKAR KARAMBELKAR
लहानश्या बारकूच्या या उत्तरावर 'दर्यावर्दी'च्या प्रतिनिधीने विशेष टिप्पणी केली होती. "किती निर्मल मन हे. विश्वनाथ अजून बालक आहे. त्याची छाती निधड्या पुरुषाची असली तरी अजून त्याने बालवृत्तीचा त्याग केलेला नाही, हे दिसून येत नाही काय?"
1947च्या या मुलाखतीत 'विश्वनाथ अगदीच चंचल होता', असं लिहिलं आहे. एकाजागी अजिबात स्थिर बसत नसल्याचं निरीक्षण त्या 'खास प्रतिनिधी'नं लिहिलं होतं. 'मला शाळेत जाण्याऐवजी पाटी-दप्तर भाताच्या गवतात लपवून खेळायला आवडतं,' असं विश्वनाथनी त्याला सांगितलं होतं.
त्यावर प्रतिनिधीनं विश्वनाथकडून 'मी अभ्यासाचा पुन्हा श्रीगणेशा करेन' असं वचन घेतलं.
"हा मुलगा भावी आयुषयात एखाद्या बोटीचा कॅप्टन होणार की अलिबागच्या दुकानात भाजी विकीत बसणार, हा प्रश्न माझ्या मनात घर करून राहिला आहे," अशी टिप्पणी करून प्रतिनिधीनं मुलाखत संपवली होती.

फोटो स्रोत, FACEBOOK/ONKAR KARAMBELKAR
बारकूशेठना हे सगळं दाखवल्यावर ते हसले आणि म्हणाले. "संध्याकाळी सहा-साडेसहाच्या आसपास मी मुंबईजवळच्या किनाऱ्याजवळ पोहोचलो. एका लाँचमधल्या गोऱ्या अधिकाऱ्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. मग लगेच लाँच माझ्याजवळ आणून मला वर घेतलं. बारा तास पाण्यात राहून माझं शरीर थंड पडलं होतं. अतिशय अशक्तपणा आला होता.
"बोटीवर घेतल्याघेतल्या मला असंख्य प्रश्न विचारले गेले. पण माझ्या अंगात त्राण नव्हते. गोऱ्या माणसानं मला ब्रॅंडीनं मालिश केल्यावर थोडं बरं वाटू लागलं होतं. मला थोडी ब्रॅंडी पिण्यास देऊन बिस्किटं खायला दिली.
"बलार्ड पिअरच्या गोदीत गेल्यावर मला रोज हजार-दीड हजार लोक पाहायला येत असतं. पोलीस चौकशी झाल्याशिवाय सोडले जाणार नाही, असं समजलं. मी सुखरूप असल्याची तार तीन दिवसांनी अलिबागला गेली. मग माझी आत्या आणि बाबा मला शोधायला आले."
"आधी त्यांना मेलोच असणार असं वाटलं होतं पण तेवढ्यात एक बाई म्हणाली, या माणसारखा दिसणारा एक मुलगा इथं जिवंत आहे. तोपर्यंत मीच सगळ्या लोकांना बाजूला करत पुढे गेलो आणि आत्याला मिठी मारून रडायला लागलो. आत्याकडे माझगावला काही दिवस काढल्यावर अलिबागला आलो."

फोटो स्रोत, FACEBOOK/ONKAR KARAMBELKAR
या अपघातानंतर इंग्रज अधिकाऱ्यांच्या हस्ते बारकूशेठ मुकादम यांचा सत्कार करण्यात आला होता. तो फोट पेपरमध्ये प्रसिद्ध झाल्यावर बारकूशेठनी तो जपून ठेवला. सत्तर वर्षांपूर्वीचा तो फ्रेम केलेला फोटो बारकूशेठ यांनी भिंतीवर लावला होता. बोलतबोलत त्यांनी तो मला दाखवला.
आमचं सगळं बोलणं त्यांची मुलगी ऐकत होती. त्यांचं बोलून झाल्यावर बाबांनी आयुष्यभर मासेविक्रीचा व्यवसाय करायचे. मागच्या वर्षापर्यंत ते अॅक्टीव्हा चालवायचे आम्ही जबरदस्तीने बंद केलं.
आपल्या तक्रारी सांगणं चालू आहे म्हटल्यावर बारकूशेठ गप्प राहिले आणि हळूच गालात हसत होते.
मधला बराच काळ बारकूशेठ फारसे चर्चेत नव्हते. पण टायटॅनिक सिनेमा आल्यावर रामदास बोटीला भारताची टायटॅनिक म्हटलं जाऊ लागलं आणि पुन्हा एकदा बारकूशेठ यांची गोष्ट बातम्यांमध्ये येऊ लागली.

फोटो स्रोत, Getty Images
भरपूर गप्पा झाल्यावर त्यांचा आणि कुटुंबाचा निरोप घेतला आणि निघालो. रामदास फुटल्यानंतर पुढची 72 वर्षे बारकूशेठ यांनी स्वतःचं नाव अलिबागेत कमावलं होतं.
सहा-साडेसहाशे माणसं एकाचवेळी बुडताना पाहिलेल्या माणसाच्या मनावर आणि आयुष्यावर या प्रसंगाचा खोलवर परिणाम झाला असणार. पुढची दोन वर्षे त्यांच्याबद्दल अधूनमधून व्हीडिओ, माहिती वाचायला मिळायची आणि आता रामदास बोटीवरचा शेवटचा प्रवासीही कायमचा निघून गेला.
अशी होती रामदास बोट...
कॅप्टन जनार्दन सावंत यांनी रामदास बोटीचे वर्णन लिहून ठेवले आहेत. ही बोट अत्यंत डौलदार होती. ही बोट मुंबई-गोवा अशी फेरी करत असे आणि आठवड्यातून एकदा मुंबई-रेवस प्रवास करायची.
चाकरमानी या बोटीने कोकणातल्या आपल्या बायका-मुलांना भेटायला जायचे म्हणून या बोटीला 'हजबंडस् बोट' म्हटलं जायचं.
स्कॉटलंड यार्डच्या विख्यात 'स्वान अँड हंटर' जहाजबांधणी कारखान्यात 1936 साली ती बांधली गेली. 179 फूट लांब आणि 29 फूट रुंदीच्या या बोटीची 406 टन वजन वाहून नेण्याची क्षमता होती.
रामदासला अपघात कसा झाला?
17 जुलै 1947 रोजी चाकरमान्यांना घेऊन रामदास बोटीने भाऊचा धक्का सोडला. पण करंजा बॉयजवळ येताच काही पिंपे वाहून येताना बोटीचा कप्तान सुलेमानला दिसली.
ही पिंपं बोटीवर आदळू नये म्हणून त्यांनं पिंपाना वळसा घेण्याचा सल्ला दिला. पण बोट जरा जास्तच कलली आणि तेवढ्यात बोटीच्या उजव्या बाजूवर एक मोठी लाट आदळली.
बोट तिरकी झाल्यावर प्रवाशी घाबरले आणि ते दुसऱ्या बाजूला धावले. प्रवाशांना पळू नका असे कॅप्टन शेख आणि चिफ ऑफिसर आदमभाई सांगू लागले. पण लोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तितक्यात दुसरी मोठी लाट बोटीवर आदळली आणि काही मिनिटांमध्ये बोट बुडाली.

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीच्या काळात युद्धासाठी वापरल्यानंतर प्रवासी वाहतुकीसाठी असणाऱ्या या बोटीवर दुर्दैवाने संपर्काची कोणतीच साधने नव्हती. त्यामुळे दोन्ही किनाऱ्यांवर अपघाताची काहीच कल्पना नव्हती.
प्रवाशांमध्ये काही चांगले पोहणारे लोक होते, त्यांनी पोहत दुपारपर्यंत ससून डॉक गाठला आणि या भीषण अपघाताची बातमी मुंबईला दिली. कॅप्टन शेख आणि आदमभाई कसेबसे बाहेर पडले आणि रेवस बंदरावर पोहोचले. त्यांनीही जवळच्या तार ऑफिसातून मुंबईला तार केली.
तोपर्यंत इकडे उत्तरेस उरण आणि दक्षिणेस रेवस परिसरामध्ये मृतदेह मोठ्या संख्येने वाहून जाऊ लागले. त्याच दिवशी रेवसचे कोळी समुद्राची वादळाची स्थिती पाहून समुद्रात गेले नव्हते.
पाणी थोडे शांत झाल्यावर, त्यांनी समुद्रात बोटी घातल्या, पण अचानक इतके मृतदेह वाहून येऊ लागल्यावर, काहीतरी अघटित घडल्याची कल्पना कोळ्यांना आली.

फोटो स्रोत, Getty Images
मागचा-पुढचा विचार न करता, त्या कोळ्यांनी काश्याच्या खडकाच्या दिशेने बोटी हाकारल्या. तिथले भीषण दृश्यं पाहून त्यांना परिस्थितीचा अंदाज आला. अजूनही पाण्यावर काही तरंगणाऱ्या लोकांना पाहून कोळ्यांनी लोकांना वाचवायला सुरुवात केली.
मुंबईचे तेव्हाचे गव्हर्नर जनरल सर जॉन ऑबव्हील मदतीसाठी धावून आले. त्यांनी दुर्घटनेला बळी पडलेल्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली. मेयर साबावाला आणि मुंबईचे शेरीफ माथान लाम यांनी मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेनंतर प्रत्येक शिपवर वायरलेस यंत्रणा अनिवार्य करण्यात आली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








