ब्राझीलच्या इतिहासातली भळभळती जखम ज्यावरून देश अजूनही दुभंगलेला आहे

- Author, मार्कस अल्वारेज
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नक्की काय घडतंय हे कळायला चार्ल्स फॅबियनला काही मिनिटं जाऊ द्यावी लागली.
ब्राझीलच्या या खेळाडूचं नुकतंच रात्रीचं जेवण झालं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांची व्हेनेझुएलाच्या विरोधात मॅच होती.
तेवढ्यात ब्राझीलच्या बाहिया प्रदेशाचा नेता पाऊलो माराकजा ठणठण करत आत घुसला, चार्ल्सच्या हाताला धरून उठवलं आणि ओरडला... “उठ इथून, चल चालता हो. काही खेळणार नाहीयेस तू.” जून 1989 मधली गोष्ट. चार्ल्स अल्वारेज फक्त 21 वर्षांचा होता आणि कोपा अमेरिका स्पर्धा नुकतीच सुरू होत होती.
चार्ल्स स्वतः बाहियाचाच राहाणारा होता. त्याने उठून ब्राझीलच्या फुटबॉल असोसिएशनचं कोणी दिसतंय का शोधलं, कोणीच भेटलं नाही आणि काय करावं ते न सुचल्याने तो सामानसुमान बांधून निघाला.
झालं असं होतं की माराकजाला कळलं होतं, ब्राझीलच्या 20 जणांच्या नॅशनल टीममधून तिघांना काढलं होतं. त्यात चार्ल्सचं नाव होतं.
बाहियाचा नेता असलेल्या माराकजाला सात्विक संताप आला होता की आमच्या खेळाडूंना काढता म्हणजे काय? म्हणून तो तरातरा टीम राहात होती त्या हॉटेलमध्ये आला आणि ओरडून म्हणाला, “चार्ल्स, तू घरी निघ. या लोकांना तुझी गरज नाहीये.”
त्यानंतर जे घडलं ते ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासातले काळे क्षण म्हटले जातात. अजूनही त्यावरून वाद होतो.
शतकानुशतकं जे लोक वंचित शोषित होते, त्याच्यावर केलेला हा आणखी एक अन्याय होता अशी प्रतिक्रिया जनतेतून निघाली. आजही अनेकांना त्या घटनेबद्दल तसंच वाटतं.
दुसऱ्या दिवशी ब्राझीलची पहिली मॅच व्हेनेझुएलाच्या विरोधात होती.
मॅच ब्राझीलच्याच साल्वाडोर शहरात होणार होती आणि हे शहर चार्ल्सचा क्लब बाहियाचं घर होतं. इथल्याच स्टेडियमवर खेळत चार्ल्सने नाव कमावलं होतं.

चार्ल्स फॅबियन बाहियाचा हिरो होता. स्थानिक तसंच प्रादेशिक स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत होता म्हणूनच त्याला कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझीलच्या राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळाली होती. पण या स्पर्धेत तो खेळू शकला नाही.
पहिल्याच मॅचच्या आधी त्याला टीममधून काढलं. व्हेनेझुएलाविरोधातली मॅच ब्राझीलने जिंकली खरी, पण या सामन्याला फक्त 13 हजार प्रेक्षक आले होते.
कोपा अमेरिका स्पर्धा म्हणजे दक्षिण अमेरिकन देशांमध्ये वेडेपणा असतो. लाखालाखाने प्रेक्षक आलेले असतात. त्या तुलनेत 13 हजार म्हणजे काहीच नाही.
ब्राझीलचे लोक चार्ल्स फॅबियनला गाळलं म्हणून चिडले होते. त्यांनी आपल्या अनुपस्थितीतून स्पष्ट संदेश दिला, चार्ल्सला गाळल्याचे गंभीर परिणाम होतील.
तसंच झालं. मॅच चालू असताना चार्ल्सच्या पाठीराख्यांनी, म्हणजे ब्राझीलच्याच लोकांनी ब्राझीलचे झेंडे जाळले, राष्ट्रगीत सुरू असताना हुल्लडबाजी केली आणि कोच तसंच इतर स्टाफ उभा असतो तिथे पेटलेले फटाके आणि जळत्या वस्तू फेकून त्यांना तिथून पळवून लावलं.
त्या दिवसाची आठवण काढताना चार्ल्स म्हणतात, “माझ्या मनात संमिश्र भावना उमटत होत्या. एका बाजूला मला मिळणारा पाठिंबा पाहून आनंदही होत होता आणि दुसऱ्या बाजूला जे घडलं त्याबद्दल वाईटही वाटत होतं. कोणालाच आपल्या देशाचा झेंडा जळताना पाहावत नाही.”
“निदर्शनं झाली ती योग्यच होती पण ती वेगळ्या प्रकारे करता आली असती.”

फोटो स्रोत, Getty Images
पण हा वाद फक्त फुटबॉलचा नव्हता. चार्ल्सच्या निमित्ताने अनेक दशकं खदखदणाऱ्या जुन्या वादाला नव्याने तोंड फुटलं होतं.
ब्राझीलची जनता दोन भागात विभागली गेली आहे. श्रीमंत असा आग्नेय (दक्षिण-पूर्व) भाग आणि गरीब, वंचित ईशान्य (उत्तर-पूर्व)भाग. ईशान्य भागाला आग्नेय भागापेक्षा सगळंच कमी मिळालं आहे, तो भाग मागासलेला आहे.
या भागात अजूनही भूकबळी जातात, हजारो लोक उपाशीपोटी झोपतात आणि इथले लाखो लोक महिन्याला 2000 रुपयांपेक्षा कमी कमावतात.
कोव्हिड महामारीच्या काळात इथल्या जवळपास 50 टक्क्यांहून अधिक लोकांच्या नोकऱ्या, कामधंदे गेले होते.
त्या तुलनेत आग्नेय भाग श्रीमंत आहे, लोकांकडे पैसा आहे, नोकऱ्या आहेत, आर्थिक, सामाजिक स्थैर्य आहे. त्यामुळे ईशान्य भागातले लोक पोटापाण्यासाठी आग्नेय भागातली शहरं साओ पाओलो किंवा रिओ दे जानिरोसारख्या शहरांमध्ये येतात. पण तरीही त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी कमी होत नाही. उलट मोठ्या शहरांत आल्यावरही त्यांना पूर्वग्रहाचा सामना करावा लागतो.
अनेकांनी याबद्दल बोलून दाखवलं आहे. बार्सिलोनाचा स्टार खेळाडू रिव्हाल्डो यांनी माध्यमांकडे तक्रार केली होती की त्याला इतर ब्राझीलचे फुटबॉल सुपरस्टार्स रोमारिया आणि रोनोल्डोसारखी सन्मानाची वागणूक मिळत नाही.
रिव्होल्डो ब्राझीलच्या ईशान्य भागातला होता तर इतर दोघं आग्नेय भागातले. आपण गरीब भागातले असल्यामुळेच आपल्याला कमी लेखतात असा त्याचा आरोप होता.
रिव्हाल्डो 2015 साली खेळातून निवृत्त झाला तेव्हाही म्हणाला होता की त्याच्यातल्या क्षमतांची पारख कोणी पूर्णपणे केलीच नाही.
रिओ दे जानिरोमध्ये ब्राझीलच्या उत्तर-पूर्व भागातून आलेल्या लोकांना ‘पाराइबास’ या नावाने हिणवलं जातं. याचा अर्थ आहे पाराईबा राज्यातू आलेले, भले मग ते प्रत्यक्षात कोणत्या का राज्यातून आले असेना.
साओ पाओलोमध्ये असंच काहीसं घडतं, तिथे ईशान्य भागातून आलेल्यांना ‘बाहियानोज’ म्हणजे बाहिया राज्यातून आलेले असं हिणवतात.

फोटो स्रोत, Reuters
देशातले उच्चपदस्थ, राजकीय नेतेही ईशान्य ब्राझीलमधल्या लोकांचा उल्लेख करताना त्यांना कमी लेखतात याची अनेक उदाहरणं आहेत.
2019 साली ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आणि अतिउजव्या विचारसरणीचे नेते जैर बोल्सोनारो यांची एक ऑडियो टेप लीक झाली होती. यात ते ईशान्येकडच्या राज्यपालांना ‘पाराईबा गव्हर्नर्स’ असं तुच्छतेने संबोधताना ऐकू येतं.
बोल्सोनारो स्वतः साओ पाओलो म्हणजे आग्नेय भागातले आहेत.
ब्राझीलच्या दक्षिण किंवा दक्षिण-पूर्व (आग्नेय) भागात उत्तर-पूर्व भागातून आलेल्या लोकांकडे तुच्छतेने पाहातात. त्याच्या बोलण्याच्या ढंगाची, भाषेची अनेकदा टर उडवली जाते. अनेकांना वाटतं त्यांची बुद्धी कमी आहे.
ब्राझीलचा आणखी एक स्टार खेळाडू हल्क. 2014 सालाचा त्याचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. हल्क स्वतः ईशान्य भागात जन्माला आला, त्याचं बालपण तिथेच गेलं. एका पत्रकाराने हल्कला विचारलं, “ईशान्येकडचे लोक त्यांच्या बोलण्याच्या ढंगामुळे हास्यास्पद ठरतात का?” एका राष्ट्रीय खेळाडूला, मोठ्या पत्रकार परिषदेत कोणीही असा प्रश्न कसा विचारू शकतो असा प्रश्न हल्कला पडला होता.
तो म्हणतो, “जिथे जाल तिथे ईशान्य भागातून आलेल्या लोकांबद्दल पूर्वग्रह आहे. भले तुम्ही फुटबॉल खेळा किंवा दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात असा.”
“पण ईशान्येतले लोक लढवय्ये आहेत. या सगळ्यावर मात करून ते जिंकतात. मी ब्राझीलच्या ईशान्य भागातला आहे याचा मला अभिमान वाटतो. मला कायम जे प्रेम आणि पाठिंबा मिळालाय त्यासाठी मी लोकांचा ऋणी आहे,”हल्क पुढे म्हणतो.
ब्राझीलचा ईशान्य भाग देशाचा दुसरा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश आहे. इथली लोकसंख्या साधारण 5.7 कोटी आहे आणि या भागात 9 राज्य आहेत. पण या भागात खेळणारा कोणताही स्थानिक खेळाडू अजून वर्ल्डकपपर्यंत पोचू शकला नाहीये.
गेल्या 15 वर्षांत ईशान्येतल्या फुटबॉल क्लब्समधून फक्त दोन खेळाडूंना राष्ट्रीय टीममध्ये निवडलं होतं. 2013 साली डग्लस सँटोस आणि 2017 साली डिएगो डिसुझा.
इथल्या स्थानिक क्लबमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना पुढे संधी का मिळत नाही याचं कारण म्हणजे चांगलं खेळणारे आणि उत्तम क्षमता असणारे खेळाडू लहानपणीच आग्नेय भागाकडे जातात.
तिथले श्रीमंत क्लब त्यांना आधीच आपल्याकडे विकत घेतात. यातले अनेक खेळाडू किशोरवयीन असतात.
ईशान्य भागात जन्मलेले अनेक खेळाडू – रिव्हाल्डो, बेबिटो, जुनिहो पेर्नाबुकांओ, डिडा आणि रॉबर्ट फर्मिनो सगळे किशोरवयीन असतानाच दक्षिण-पूर्वेतल्या क्लब्सकडे गेले.
ईशान्येत तेवढा पैसाच नाही की आपल्या खेळाडूंना रोखू शकेल.
ईशान्य भागात जन्मलेले पण लहानपणापासून आग्नेय भागातल्या क्लब्समध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना संधी मिळते पण जे ईशान्येत खेळतात, तिथेच मोठे झालेत त्यांना कोणी निवडत नाही.
युरोपातले क्लबही त्यांना क्वचितच संधी देतात. यालाही एक महत्त्वाचं कारण आहे असं फ्रेंच-अल्जिरियन फुटबॉल एजंट फ्रँक हेन्यूडा यांना वाटतं.
त्यांनी 13 ब्राझीलच्या फुटबॉलपटूंना युक्रेनच्या क्लबमध्ये संधी मिळवून दिल्या पण यातला एकही जण ईशान्येकडून आला नव्हता.

फोटो स्रोत, Reuters
“समजा माझ्याकडे कोणताही क्लब आला आणि त्यांनी विचारलं की आमच्या नजरेत दोन खेळाडू आहेत – एक आग्नेय भागातला आणि एक ईशान्य भागातला. दोघांची क्षमता उत्तम आहे, दोघंही प्रतिभावंत आहेत, कोणाला निवडावं? मी सरळ सांगतो, आग्नेय भागातून, ब्राझीलच्या दक्षिण-पूर्व भागातून जो आलाय, त्याला निवडा.”
“दक्षिण-पूर्व भागातले खेळाडू जास्त ताकदवान असतात कारण त्यांनी लहानपणी उपासमार अनुभवलेली नसते. त्यांचं जेवण, विशेषतः सकाळचा नाश्ता युरोपियन पद्धतीचा असतो, याचा त्यांना फायदा होतो. ईशान्य भागातून आलेले, तिथेच वाढलेले गरीब घरांमधून आलेले असतात, त्यांचे जेवणाचे हाल झालेले असतात, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात.”
“एक उदाहरण घ्या,” फ्रँक हेन्यूडा पुढे म्हणतात. “मी अॅटलेटिको गोईनासेन्सला खेळताना पाहात होतो. तो मला फार आवडतो, पण तो कृश आहे, त्याची उंची कमी आहे आणि त्याची हाडं बारीक आहेत. का? कारण तो मोठा होत असताना त्याला योग्य ती पोषणमुल्यं, मुख्य म्हणजे कॅल्शियम मिळालं नाही. त्याला दुखापत लवकर होण्याची शक्यता आहे.”
“तुम्ही जेव्हा एका मोठ्या युरोपियन क्लबसोबत डील करत असता तेव्हा बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. अगदी कोणत्या प्रकारचे फुटबॉलचे शूज हे खेळाडू वापरत असतील याकडे लक्ष द्यावं लागतं. जर तो खेळाडू ब्राझीलच्या ईशान्य भागातून आला असेल तर त्याने रबरी खिळे असलेले शूज घातले असतील. आयुष्यभर तशांच बुटांमध्ये वावरला असेल. युरोपात आल्यावर त्याला स्टीलचे खिळे असलेले शूज वापरावे लागतील. त्यांची या खेळाडूला सवय नसेल. ती सवय करण्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि कोणताच क्लब 10 मिलियन युरो मोजल्यानंतर खेळाडूला वेळ देणार नाही.”
सध्या फुटबॉल क्लबचा बहुतांश पैसा टीव्ही कॉलॅबरेशन आणि जाहिरातींमधून येतो. पण ईशान्येकडच्या क्लब्सच्या नशिबात हेही नाहीये.
पैसा नाही म्हणून चांगल्या सुविधा नाही, चांगले खेळाडू टिकत नाही, चांगले खेळाडू नाही म्हणून जिंकत नाही आणि जिंकत नाही म्हणून पैसा नाही हे दुष्टचक्र अनेक दशकं चालू आहे.
पण आता गोष्टी थोड्याफार बदलत आहेत. ईशान्येतला मोठा क्लब फॉर्टलेझाचं उत्पन्न 2014 ते 2019 या काळात दहापट वाढलं. ते पहिल्यांदाच ब्राझीलच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या सेमीफायनलपर्यंत पोचले. गेल्या 102 वर्षांत पहिल्यांदा.

फोटो स्रोत, Getty Images
बाहियाची अवस्था 2006 साली सर्वात वाईट होती. त्यांचं रँकिंग घसरलं होतं. बाहियातले लोक इतके चिडले होते की 50 हजार लोक साल्वाडोरच्या रस्त्यांवर आले होते.
या क्लबच्या चँपियनशीप ट्रॉफी कचऱ्यात सापडल्या होत्या. पण आता त्यांनी स्वतःत अनेक बदल घडवलेत.
बाहिया क्लबचे उपाध्यक्ष व्हिक्टर फेराझ म्हणतात, “अजूनही पूर्वग्रह आहे. खेळाडूंना त्याचा फटका बसतोय. चार्ल्सच्या बाबतीत जे झालं ते पूर्ण देशाने पाहिलं. पण मी एक नक्की सांगू शकतो की गेल्या 15 वर्षांच्या तुलनेत आज आमचे खेळाडू चांगल्या परिस्थितीत आहेत. आता आमचे खेळाडू त्यांच्या खेळाने परिस्थिती बदलतील.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








