फिफा वर्ल्डकप 2022 : बिअर आणि फुटबॉलमधील एका मोठ्या संघर्षाची गोष्ट

फिफा

फोटो स्रोत, EPA

इक्वाडोराचा एक फुटबॉल चाहता आपल्या टीमचा सामना पाहून परतत होता. त्याच्या टीमने फिफा वर्ल्डकपमध्ये यजमान असलेल्या कतारला 2-0 ने पराभूत केलं होतं.

बीबीसीने या चाहत्याशी स्टेडियमच्या आत बिअरवर असलेल्या बंदीबाबत विचारलं. होजे नामक या चाहत्यानं अगदी थोडक्यात उत्तर दिलं. तो म्हणाला, “अत्यंत निराशाजनक.”

“मला आत एक अशी बिअर मिळाली, ज्यात शून्य टक्के अल्कोहोल होतं. फ्लेव्हर तर फ्लेव्हर, पण किमान मिळाली तरी,” असंही तो चाहता पुढे म्हणाला.

फुटबॉल पाहण्यासाठी आलेले आणखी एक प्रेक्षक एमीलियो यांनी म्हटलं की, “हे कुठेतरी चुकीचं आहे. लोक स्टेडियमच्या आत बिअरसाठी घोषणा देतानाही मी ऐकलंय.”

फुटबॉल वर्ल्डकप सुरू होण्याच्या काही दिवस आधी म्हणजे जवळपास शेवटच्या क्षणी कतारनं स्टेडियममध्ये बिअरवर बंदी आणली. फिफा आणि दारू यांच्यातील संघर्ष हा काही आजचा नाहीय. या संघर्षालाही काही दशकांचा इतिहास आहे.

याआधी बिअर कंपन्यांच्या स्पॉन्सरशिपचे आरोप फिफावर झाले होते. असं म्हटलं गेलं होतं की, फिफा फॅन्सच्या सुरक्षेपेक्षा पैशांना महत्त्व देतंय.

‘फिफा’चं बंदी आणण्याचं धोरण

गेल्या काही वर्षांपासून फिफा यजमान देशांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतं की, वर्ल्डकपदरम्यान अल्कोहोलला परवानगी द्यावी. मात्र, यापूर्वी फिफा स्टेडियमला ड्राय म्हणजेच दारूविना ठेवण्याची शिफारस करत असे.

2004 सालापर्यंत फिफाच्या नियमांनुसार, आयोजक स्टेडियमच्या आता दारूची विक्री करू शकत नव्हते. त्याचसोबत, स्टेडियममध्ये दारू पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखवण्याचाही नियम होता.

मात्र, या नियमांमध्ये बदल आणि स्टेडियमच्या आता बिअर पिण्याची परवानगीसाठी मनधरणी केल्यानं फिफा प्रशासन आणि यजमन देशांमध्ये संघर्ष झाल्याचेही पाहायला मिळालं.

फिफा

फोटो स्रोत, Getty Images

ब्राझीलमध्ये बिअरवरील बंदी हटवावी लागली

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2014 साली ब्राझीलनं फुटबॉल वर्ल्डकपचं यजमानपद भूषवलं होतं.

ब्राझीलमध्ये फुटबॉलला एखाद्या धर्मापेक्षा कमी मानलं जात नाही. पाच वेळा वर्ल्डकप विजेता देश म्हणून ब्राझीलमध्ये त्यावेळी वर्ल्डकप होणं मोठी गोष्ट मानली जात होती. मात्र, त्यावेळी एक अडचण आली होती.

बिअर ब्राझीलमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र, इतर अनेक देशांप्रमाणे ब्राझीलमध्येही फुटबॉल चाहत्यांमधील उत्साह हिंसेत रुपांतरीत होतो.

त्यामुळे 2003 साली ब्राझीलमध्ये फुटबॉल सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये बिअरवर बंदी आणण्यात आली. स्टेडियममध्ये हिंसा आणि गुंडगिरी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं.

मात्र, फिफाचे प्रमुख स्पॉन्सर बिअरची मोठी कंपनी असलेली बडवायजर होती.

त्यावेळी फिफानं ब्राझीलला सांगितलं की, बिअरबाबत तुमचे नियम तुम्हाला बदलावे लागतील.

त्यावेळी फिफाचे सरचिटणीस जेरोम वाल्क यांनी म्हटलं होतं की, “दारू फिफाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आम्ही ती उपलब्ध करून देऊ. माफ करा, मी थोडा अहंकारी वाटू शकेन. पण या विषयावर आणखी काहीही चर्चा होणार नाही. आणि बिअर विक्रीची परवानगी नियमांनुसार असली पाहिजे.”

ब्राझीलच्या आरोग्यमंत्र्यांनी याबाबत आक्षेप नोंदवला. तसंच, राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मार्को गार्सिया यांनी फिफाच्या सरचिटणीसांना खडे बोल सुनावले.

मात्र, अनेक आक्षेपांनंतरही ब्राझीलला आपल्या नियमांमध्ये बदल करावे लागले. तसंच, सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये बिअर विक्री आणि पिण्यासही परवानगी दिली गेली.

वर्ल्डकपच्या दरम्यान अनेक चाहत्यांमध्ये संघर्ष झाला. कोलंबिया आणि उरुग्वेमधील सामन्यादरम्यान अनेक प्रेक्षकांना स्टेडियममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

जेव्हा टीका वाढू लागली, तेव्हा फिफाचे सरचिटणीस वाल्क यांनी एका टीव्ही चॅनलशी बोलताना म्हटलं की, “दारू पिणाऱ्या लोकांची संख्या पाहून मीच हैराण होतो. अनेक लोक नशेत होते.”

भविष्यात फिफा आपलं धोरण बदलेल का, असा प्रश्न विचारल्यावर फिफाच्या सरचिटणीसांनी सांगितलं की, “जर आम्हाला वाटलं की, अल्कोहोलची विक्री नियंत्रित करणं आवश्क आहे, तर आम्ही नक्कीच नियंत्रित करू.”

फिफा

फोटो स्रोत, Getty Images

रशियावर दबाव

मात्र, 2018 साली रशियात झालेल्या वर्ल्डकपमध्ये फिफाच्या धोरणात कुठलाही मोठा बदल दिसून आला नाही. ब्राझीलप्रमाणेच रशियातही मोठ्या क्रीडा कार्यक्रमांदरम्यान अल्कोहोलच्या सेवनास नियंत्रित करण्याचं धोरण आहे.

रशियानं 2005 साली स्टेडियमच्या आत दारूच्या विक्री, सेवन आणि जाहिरातीस बंदी घातली होती.

2014 साली रशियाच्या सोचीत झालेल्या विंटर ऑलिम्पिकमध्ये कोणत्याच मद्य कंपन्या स्पॉन्सर नव्हत्या.

2012 मध्ये रशियाने टीव्ही, ऑनलाईन आणि प्रिंट मीडियात दारूच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घातली होती.

मात्र, पुढच्याच वर्षी म्हणजे 2013 साली राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी वर्ल्डकपच्या सामन्यांदरम्यान दारू विकण्याची परवानगी देणाऱ्या कायद्यावर शिक्कामोर्तब केलं. त्याचसोबत, जाहिरातींबाबत नियमही सौम्य केले.

फिफा

फोटो स्रोत, Getty Images

धर्मामुळे आक्षेप

वर्ल्डकपदरम्यान मद्यप्राशन करावं की नाही, यासाठी केवळ फिफा आणि यजमान देश यांमध्येच संघर्ष होत नाही.

युरो 2022 मध्ये फिफा आणि खेळाडूंमध्येही संघर्ष दिसून आला होता.

खेळाडूंच्या पत्रकार परिषदेदरम्यान हायनेकेन ब्रँडची बिअर टेबलवर ठेवल्यानं आक्षेप घेण्यात आले होते.

फ्रान्सचा प्रसिद्ध मिडफील्डर पॉल पोग्बा याने त्याच्या पत्रकार परिषदेदरम्यान कंपनीची बॉटल हटवून आपलं बोलणं सुरू केलं होतं. त्याच्याच टीममधील करीम बेंजोमानेही बिअरच्या बॉटलविना पत्रकारांशी बोलण्यास सुरुवात केली होती.

मात्र, दोन्हीवेळा ज्या हायनेकेन बिअरची बॉटल टेबलवर ठेवली होती, त्यात अल्कोहोलचं प्रमाण शून्य होतं. मात्र, दोन्ही खेळाडूंनी ब्रँडसोबत असोसिएट करण्यासही आक्षेप घेतला होता.

त्यानतंर युरो आयोजित करणारी संस्था यूएफा खेळाडू आणि प्रशिक्षकांना टेबलवर बिअर ठेवण्याबाबत विचारू लागले.

फिफा

फोटो स्रोत, Getty Images

कतारमध्ये बिअरवर बंदी

आता आपण सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपकडे येऊ.

फिफा वर्ल्डकप 2022 चा यजमान असलेल्या कतार देशानं धार्मिक कारणांमुळे बिअरवर आक्षेप घेतलाय.

कतारमध्ये दारू विक्री अत्यंत मर्यादित आणि नियंत्रित आहे. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी फिफा स्टेडियमच्या आता बिअरच्या विक्रीवर बंदी आणण्यास फिफा तयार झालंय.

मात्र, अजूनही व्हीआयपी तिकीट असणारे लोक त्यांच्या एक्झिक्युटिव्ह बॉक्समध्ये मॅचच्या आधी, मॅचदरम्यान आणि मॅचनंतरही दारू पिऊ शकतात.

आता फिफाच्या या निर्णयामुळे त्यांचे पार्टनर स्पॉन्सर बडवायजरच्या संबंधांवर काय परिणाम होतात, हे पाहावं लागेल.

1980 च्या दशकापासूनच फिफाचा प्रमुख स्पॉन्सर राहिलेली बडवायजर कंपनी प्रत्येक वर्ल्डकपमध्ये 75 मिलियन अमेरिकन डॉलर संस्थेच्या खात्यात टाकते. बडवायजर अमेरिकन ब्रँड आहे. 2026 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये यजमान देशात अमेरिकेचाही समावेश आहे.

या कंपनीला आता आशा आहे की, किमान अमेरिकेत बिअर विक्रीस परवानगी दिली जाईल.