Euro Cup : ख्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनेल मेस्सी यांच्यासारखे खेळाडू भारताकडे का नाहीत?

ख्रिस्तियानो रोनाल्डो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, शिवकुमार उलगनाथन आणि शरद बेहरा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जगभरात जवळपास 7.6 अब्ज इतके लोक राहतात. 2018 मध्ये झालेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या होती 736 आणि यात किती खेळाडू भारतीय होते? याचं उत्तर आहे शून्य.

फिफा वर्ल्ड कपमध्ये भारताच्या सहभागाबद्दल नेहमीच चर्चा होत आली आहे. पण यामागे कारण काय आहे? उच्च कोटीचे व्यावसायिक खेळाडू निर्माण करण्यासाठी काय करावं लागतं? भारत असे खेळाडू निर्माण करू शकेल का?

व्यावसायिक फुटबॉलपटू होण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. शारीरिक, मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या तगडं असावं लागतं. पण या तगडेपणासाठी उत्तम प्रशिक्षण, सोयी-सुविधा आणि हजारो तासांचा सराव पाठीशी असावा लागतो.

फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी एकदा भारताला फुटबॉलचा 'स्लीपिंग जायंट' असं संबोधलं होतं. म्हणजे भारतात फुटबॉल फुलायला एवढी क्षमता आहे. पण तरीही भारत फुटबॉलमध्ये जगाच्या नकाशावर अद्याप नाही.

गेल्या 4 वर्षांत भारतीय पुरुष फुटबॉल टीमचं रँकिंग काहीसं सुधारलं आहे. 2014मध्ये 170व्या क्रमांकावर असलेला भारतीय फुटबॉल संघ 2018मध्ये 97व्या क्रमांकावर आला आहे.

ISL, आय-लीग आणि यूथ लीग या स्पर्धा भारतात फुटबॉलला प्रमोट करत आहेत. पण इतकंच पुरेसं आहे का? फिफा वर्ल्ड कपमध्ये आपल्या देशाला खेळताना बघण्यासाठी भारतीयांना अजून किती काळ वाट पाहावी लागेल?

यासंबंधी जाणून घेण्यासाठी बीबीसीनं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी संपर्क साधला.

फुटबॉलसाठीची शारीरिक तयारी

फुटबॉल या खेळात चपळतेला महत्त्व असतं. यासाठी प्रत्येक खेळाडूचा स्टॅमिना, लेग पॉवर, फूटवर्क, दिशा बदलण्याचं कसब, त्यासाठीचा वेग यासारख्या बाबी यशासाठीच्या पायऱ्या मानल्या जातात.

धावणं हा फुटबॉलचा आत्मा आहे. काही खेळाडू तर एका सामन्यात 14.5 किलोमीटर धावू शकतात आणि त्यांचा वेग ताशी 35 किलोमीटर असतो.

ख्रिस्तियानो रोनाल्डो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ख्रिस्तियानो रोनाल्डो

डॉ. विजय सुब्रमण्यम हे आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे फिटनेस तज्ज्ञ. ते सांगतात, "सॉकरसाठी तुम्हाला विशिष्ट प्रकारची शारीरिक तंदुरुस्ती लागते. पाठ, पोट आणि मांडीचे स्नायू मजबूत लागतो. चेंडूला ताकदीनं किक मारण्यासाठी तुमच्या शरीराचे सगळेच सांधे आणि स्नायू मजबूत असावे लागतात."

"खेळाडूंसाठी विशिष्ट उंची असावी असं काही नाही. खेळाडूची उंची कमी असेल तरी ते चेंडूसोबत चांगल्या प्रकारे खेळू शकतात. उंच खेळाडू चांगलं धावू शकतात आणि चेंडूला हवेत उडवू शकतात. कमी उंचीच्या खेळाडूचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्जेंटिना आणि बार्सिलोनाचा स्टार खेळाडू मेस्सी," डॉ. विजय सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

मेस्सी याच्याप्रमाणे अनेक दक्षिण अमेरिकन खेळाडू उंचीनं कमी आहेत आणि त्यामुळे त्यांना बॉलवर ताबा ठेवून तो ड्रिबल करणं सोपं जातं.

"शारीरिक फिटनेसबाबत म्हणायचं तर भारतीय खेळाडूंनी यात गेल्या काही वर्षांत चांगली प्रगती केली आहे. हे फक्त सॉकरच नाही तर अन्य खेळांच्या बाबतही लागू होतं. ख्रिस्तियानो रोनाल्डो हा एक फिट खेळाडू आहे. ज्या पद्धतीनं हा खेळाडू मैदानावर झेप घेतो ते वाखाणण्याजोगं असतं. ख्रिस्तियानोची शैली त्याला मैदानातला एक मजबूत विरोधकही बनवते," विजय पुढे सांगतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी एखाद्या खेळाडूची उंची आणि स्नायूंची ताकद किती महत्त्वपूर्ण घटक आहेत, यावर All India Football Federation (AIFF)चे तांत्रिक संचालक सॅवियो सांगतात, "डिफेंडरसाठी चांगली उंची नक्कीच मदतकारक असते. पण धावण्यासाठी मात्र उंची आणि स्नायूंच्या ताकदीपेक्षा खेळाडूची स्ट्रेंथ आणि रणनीतीची क्षमताच खेळाडूला घडवत असते."

मानसिक ताकद

"सामान्यत: लोक पाश्चिमात्य आणि भारतीय खेळाडूंमधील शारीरिक क्षमतांच्या फरकाबाबत विचार करतात. पण माझ्या मते, खेळातील रणनीती आणि तांत्रिक क्षमता यात दोन गुणांमध्ये भारतीय खेळाडू मागे पडत आहेत," सॅवियो सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळलेले आणि VIVA Football Magazineचे कार्यकारी संपादक आशिष पेंडसे यांच्या मते, फुटबॉल हा खेळ फक्त मैदानात खेळला जात नाही तर तो खेळाडूच्या मनातही खेळला जात असतो.

"अनुवांशिकरीत्या मजबूत असणं कोणत्याही खेळाडूसाठी महत्त्वपूर्ण असतं. पण याबाबत युरोपीयन खेळांडूच्या तुलनेत भारतीय खेळाडूंची गैरसोय होते. खेळामधल्या तांत्रिक बाबी शिकून यावर मात करता येऊ शकते. उत्कृष्ट व्यावसायिक फुटबॉलपटूकडे खेळासाठी कुशलता असणं, स्पेस तयार करण्याचं कसब असणं, आक्रमण करण्याची क्षमता असणं आणि इतर काही तांत्रिक कौशल्य असणं महत्त्वाचं असतं," पेंडसे सांगतात.

फुटबॉलमध्ये मानसिक ताकदीशिवाय शारीरिक तंदुरुस्ती काही कामाची नसते असंही काही तज्ज्ञ म्हणतात. आणि हीच बाब आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सामान्य खेळाडूंपेक्षा वेगळं ठरवते.

मूल खेळायला केव्हा सुरुवात करू शकतं?

"व्यावसायिक खेळाडू व्हायचं असल्यास मुलाला वयाच्या पाचव्या, सहाव्या अथवा सातव्या वर्षी प्रशिक्षण द्यायला सुरुवात करायला हवी, असं अनेक पालकांना वाटतं. पण हा म्हणजे फक्त एक समज आहे आणि यातून काहीही निष्पन्न होत नाही," असं स्पोर्ट्स कमेंटेटर, लेखक आणि फुटबॉल तज्ज्ञ नॉवी कपाडिया सांगतात.

सुनील छेत्री

फोटो स्रोत, Getty Images

"मुलांना वयाच्या 12 अथवा 13व्या वर्षापर्यंत फुटबॉलच्या मैदानावर न्यायला हवं आणि खेळायला परवानगी द्यायला हवी. तोपर्यंत त्यांची प्रगती कशी आहे, हे ओळखायला हवं आणि त्यानुसार पुढचा निर्णय घ्यायला हवा," कपाडिया सुचवतात.

पण सेवियो यांचं मत मात्र वेगळं आहे. "युरोपीयन आणि इतर आशियाई टीमसोबत लढण्यासाठी कमी वयात खेळायला सुरुवात करायला हवी. यामुळे मुलांची निर्णय घेण्याची क्षमता आणि तांत्रिक समजूत याचा विकास होऊ शकतो," असं सॅवियो यांना वाटतं.

सोयीसुविधा आणि प्रशिक्षण

पेंडसे यांच्या मते, "खेळात नियंत्रण, ड्रिबलिंग, चेंडूसोबत धावणं आणि इतर तांत्रिक बाबी हे फक्त एक चांगला प्रशिक्षकच शिकवू शकतो. दुर्दैवानं याबाबतीत आपल्याकडे त्रुटी आहेत आणि आपल्याकडे गुणवंत प्रशिक्षकांची गरज आहे."

"आपल्याकडे नुकतीच यूथ कप स्पर्धा झाली. यात इतर अनेक देशांनी सहभाग घेतला होता. यूएसची टीम खेळत असताना त्यांच्या टेक्निकल टीमचे 7 सदस्य खेळाचं विश्लेषण करत होते. भारतीय टीमकडे मात्र व्हीडिओ अथवा डेटा विश्लेषक नाहीत. या काही मूलभूत बाबी आहे ज्या इतर देश अवलंबित आहेत तर भारत मात्र याबाबतीत मागे आहेत", पेंडसे सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

"चांगल्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी भारताला खूपच कमी वेळा मिळाली आहे. उदाहरणार्थ भारत बेल्जियमसारख्या संघासोबत खेळल्यास प्रदर्शनाचा स्तर उंचावू शकतो. पण बेल्जियमसारखा देश भारतासारख्या लो रँक देशासोबत कसाकाय खेळेल?" पेंडसे विचारतात.

उत्कृष्ट मैदानं आणि स्पर्धा यांचा शोध घेणं भारतात एक आव्हान आहे.

"भारतात फुटबॉलमध्ये कोणतीच स्पर्धा नसते. भारताच्या अंडर-17 टीममध्ये 8 खेळाडू हे नॉर्थ-ईस्ट राज्यातले आहेत तर 5 ते 6 खेळाडू इतर दोन-तीन राज्यातले आहेत. त्यामुळे अख्खा देश फुटबॉल खेळत आहे, असं आपण कसं काय म्हणू शकतो," कपाडिया विचारतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

1960 आणि 1970च्या दशकात अनेक फुटबॉलची मैदानं होती. पण कालांतरानं त्यांचं रुपांतर क्रिकेटच्या मैदानांमध्ये झालं, कपाडिया पुढे सांगतात.

फुटबॉलच्या जगात उत्तम प्रतीचे प्रशिक्षकच काय तो बदल घडवून आणत आहेत.

"भारतीय संघाला चांगल्या प्रशिक्षकांची गरज आहे. कारण चांगले प्रशिक्षकच चांगले खेळाडू घडवू शकतात," सॅवियो सांगतात.

माजी फुटबॉलपटू प्रकाशसुद्धा या बाबीशी सहमत दिसतात.

"दशकापूर्वी एक चांगला प्रशिक्षक शोधण्यासाठी तरुण खेळाडूंना संघर्ष करावा लागत असे. आता परिस्थिती काहीशी सुधारली आहे," प्रकाश सांगतात.

10,000 अवर्स थेअरी

10,000 अवर्स थेअरीप्रमाणे, जास्तीत जास्त तास केलेला सराव तुम्हाला व्यावसायिक खेळाडू म्हणून विकसित करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो, असं अनेक खेळाडू आणि प्रशिक्षक मानतात.

पण ही थिअरी सगळ्यांनाच लागू होते असं नाही तर ती व्यक्तीपरत्वे बदलत जाते, असंही काहींचं म्हणणं आहे.

बेकहॅम आणि रोनाल्डो यांसारख्या खेळाडूंना ते करत असलेल्या सरावासाठी ओळखलं जातं. फ्री किक्स आणि चेंडूला वेगळ्या प्रकारे हाताळून गोलमध्ये पोहोचवण्यासाठी हे दोघं करत असलेला सराव सर्वपरिचित आहे.

भारतात मेस्सी होईल?

सध्या भारतीय संघ नवनवीन ध्येय गाठत आहे. पण भारताकडे स्वत:चा मेस्सी आणि रोनाल्डो निर्माण करण्यासाठीचं टॅलेंट आहे का?

"भारतात चांगलं फुटबॉल कल्चर विकसित केल्यास त्यातून स्टार खेळाडू निर्माण होतील. त्यानंतर मग हा प्रश्नच उरणार नाही," सॅवियो सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

"मेस्सी हे फक्त एक नाव आहे. बायचुंग भुतिया, आय. एम. विजयन, पीटर थंगराज यांसारखे अनेक चांगले खेळाडू भारतानं दिले आहेत. सुनील छेत्रीला आपण इथे विसरू शकत नाही. मेस्सी आणि रोनाल्डो हे त्यांच्या स्टार पॉवर क्लब्स आणि त्यांच्या देशांत फुटबॉलप्रती असलेल्या वेडामुळे इतके प्रसिद्ध झाले आहेत."

"नेयमार, मेस्सी आणि मॅराडोना यांसारखे खेळाडू खेळाला वेगळ्याच स्तरावर घेऊन जातात. त्यांनी युवकांमध्ये या खेळाप्रती आवड निर्माण केली आहे. पण बायचुंग भुतिया, आय. एम. विजयन आणि सुनील छेत्री यांसारखे लोक हे आपापल्या मार्गानं हीरो झाले आहेत," पेंडसे सांगतात.

भारतात बदल होतोय?

"भारतात फक्त क्रिकेटच नव्हे तर फुटबॉलही खेळता येऊ शकतो, हे आयएसएलनं जगाला दाखवून दिलं आहे. उच्च प्रतीच्या युवा टीम तयार करण्यासाठी भारतीय क्लब्सनी मेहनत घेणं गरजेचं आहे," सॅवियो सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

"1990च्या दशकात आपल्याकडे पायाभूत सुविधा नव्हत्या. पण आता वरिष्ठ पातळी गाठण्यासाठी योग्य अशा युवा टीमसोबत खेळणं अनिवार्य झालं आहे. आपल्याकडे जवळपास 30 प्रमुख अकॅडमी आहेत आणि तितक्याच सीनियर टीमही आहेत. यातून जवळपास 1500 ते 2000 फुटबॉलपटू बाहेर पडतात," भारतातल्या फुटबॉल विश्वाबद्दल पेंडसे सांगतात.

फुटबॉलच्या बाबतीत भारताचं भविष्य आशादादायी आहे, असं सॅवियो यांना वाटतं.

"भारतात स्पोर्टिंग कल्चर आहे पण फुटबॉल कल्चर मात्र अद्याप नाहीये. एकदा ते तयार झालं की मागे वळून बघायची गरज नाही," सॅवियो सांगतात.

हा वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)