FIFA World Cup 2022 : कतारमध्ये भारतीय आणि इतर परदेशी मजुरांना कशी वागणूक मिळाली?

Worker at Al Bayt stadium in Qatar

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कतारच्या अल बायत स्टेडियममध्ये

यंदाच्या हिवाळ्यात कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धा भरणार आहे. या निमित्ताने नवीन हॉटेल्स व सुविधांचे बांधकाम करण्यासाठी कतारने हजारो परदेशी मजुरांना कामावर ठेवले आहे. पण त्यांना मिळणारी वागणूक वारंवार चर्चेचा आणि चिंतेचा विषयही बनते आहे.

ऑगस्टमध्येच कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे अनेक मजुरांनी आंदोलन केलं होतं. त्यांना कतारने देशातून हद्दपार केलं.

मानवी हक्क कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत की, कतारमध्ये परदेशी मजुरांना वाईट वर्तनाला सामोर जातंय तसंच अनेक मजुरांचा तिथे मृत्यू झाला.

विश्वचषक प्रकल्पांसाठी किती परदेशी मजूर काम करत आहेत?

विश्वचषक स्पर्धेसाठी कतारनं सात स्टेडियमची उभारणी केली आहे, तसंच इथे नवीन विमानतळ, नवीन मेट्रो यंत्रणा, नवीन रस्ते आणि सुमारे 100 हॉटेल्स बांधण्यात येत आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणिस्तानची अख्खीच्या अख्खी महिला फुटबॉल टीम युरोपात कशी पोहोचली?

अंतिम सामना ज्या स्टेडियममध्ये होणार आहे, त्याभोवती एक संपूर्ण शहरच उभारले जात आहे.

कतार सरकारनं दिलेल्या माहितीनुसार फक्त स्टेडियम बांधण्यासाठी 30,000 परदेशी मजुरांना कामावर घेण्यात आले आहे. यापैकी बहुतेक मजूर भारत, बांगलादेश, नेपाळ आणि फिलिपिन्समधील आहेत.

अलीकडेच, कतारची राजधानी दोहा येथील अल बंदारी इंटरनॅशनल ग्रुपच्या मुख्य कार्यालयाबाहेर ६० मजुरांनी मजुरी न दिल्याबद्दल आंदोलन केले.

अल बंदारी ही कंपनी कतारमध्ये डझनवारी हॉटेल्स, मॉल्स आणि निवासी इमारती बांधत आहे.

आंदोलन करणाऱ्या मजुरांपैकी काहींचा दावा होता की, त्यांना सात आठवड्यांपासून पगार मिळालेला नाही.

Protesters outside headquarters

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, मजुरांच्या आंदोलनाचे व्हीडियो इंटरनेटवर पोस्ट करण्यात आले होते.

अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि काहींना देशातून हद्दपार करण्यात आले. त्यांचा आकडा मात्र समजू शकलेला नाही.

सरकारनं स्पष्टीकरण दिलं की, सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांनाच हद्दपार करण्यात आले आहे. सरकारनं असंही म्हटलं की वेतन विलंबाने देण्याबद्दल या कंपनीची चौकशी केली जाते आहे.

परदेशी मजुरांना कतारमध्ये कशी वागणूक मिळते आहे?

2010 साली कतारने विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क जिंकले. तेव्हापासूनच मानवी हक्क कार्यकर्ते परदेशी मजुरांना मिळणाऱ्या वर्तणुकीबद्दल टीका करत आले आहेत.

2016 मध्ये अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने कतारमधील कंपन्यांवर वेठबिगारीचा आरोप केला होता.

अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने तेव्हा म्हटलं होतं की अनेक मजूरांची राहण्याची व्यवस्था ज्या शिबीरांमध्ये केली होती, ती अगदी घाणेरड्या अवस्थेत आहेत, मजुरांना नोकरीसाठी खूप जास्त भरती शुल्क देण्यास भाग पाडले गेले, त्यांचे वेतन रोखले गेले आणि पासपोर्ट जप्त करण्यात आले.

बांगलादेशी मजूर कतारमधील खासगी मजूर शिबिरात विश्रांती घेताना

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, मजूर शिबिरांमधील परिस्थिती सुधारण्याचे वचन कतार सरकारने दिले आहे.

कतारच्या खूप उष्ण वातावरणात परदेशी मजुरांना काम करताना संरक्षण मिळावे यासाठी सरकारने 2017 पासून काही उपाययोजना राबविल्या, त्यांचे कामाचे तास कमी केले आणि मजूर शिबिरांमधील परिस्थितीत सुधारणा केल्या.

पण, ह्युमन राइट्स वॉच या गटानं 2021 साली जाहीर केलेल्या अहवालानुसार, परदेशी मजुरांना अजूनही दंडात्मक व बेकायदेशीर वेतन कपातीला सामोरे जावे लागत होते आणि अनेक महिने विनापगार प्रचंड कष्टाचे काम करावे लागत होते.

कतारी कंपन्या 'काफला' नावाची कार्यपद्धत चालवत होत्या. या अंतर्गत त्यांनी परदेशी मजूरांना त्यांच्या देशात येण्यासाठी प्रायोजकत्व दिले, पण नंतर नोकरी सोडण्याला प्रतिबंध केला.

इंटरनॅशनल लेबर ऑरगनायझेशनसारख्या गटांच्या दबावामुळे कतार सरकारने 'काफला' रद्द केली, पण अॅम्नेस्टी इंटरनॅशनल म्हणते की, कंपन्या अजूनही मजुरांना आपले रोजगारदेते (एम्प्लॉयर्स) बदलण्यापासून थांबविण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकतात.

याचा अर्थ हा की अजूनही कतारमध्ये वेठबिगारी अस्तित्वात आहे.

कतारमध्ये किती परदेशी मजुरांचा मृत्यू झाला आहे?

फेब्रुवारी 2021 मध्ये गार्डियनने म्हटले होते की, कतारने विश्वचषकाचे यजमानपद प्राप्त केल्यापासून तेथे भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेमधील 6,500 स्थलांतरीत मजुरांचा मृत्यू झाला आहे.

कतारमधील दूतावासांकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवर ही संख्या आधारित आहे.

पण, कतार सरकारच्या म्हणण्यानुसार ही आकडेवारी दिशाभूल करणारी आहे. कारण या मृत्यूनोंदी असलेल्या सर्व व्यक्ती विश्वचषकाशी संबंधित प्रकल्पांमध्ये काम करत नव्हत्या.

या मृत व्यक्तींपैकी अनेक व्यक्ती कतारमध्ये मागील अनेक वर्षांपासून कतारमध्ये राहत होत्या आणि काम करत होत्या. या व्यक्तींचा मृत्यू वृद्धापकाळामुळे किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे झालेला असू शकतो.

Lusail Stadium

फोटो स्रोत, KARIM JAAFAR/Getty Images

फोटो कॅप्शन, लुसेल स्टेडियम, जिथे विश्वचषकाची फायनल खेळवली जाईल

सरकारच्या म्हणण्यानुसार त्यांच्या अपघात नोंदींनुसार दिसून येते की, 2014 ते 2020 या कालावधीत विश्वचषकासाठी बांधण्यात येणाऱ्या स्टेडियम्सच्या बांधाकामच्या ठिकाणी 37 मजुरांचा मृत्यू झाला. त्यांच्यापैकी केवळ ३ मृत्यू हे कामाशी संबंधित होते.

पण, आंतराराष्ट्रीय कामगार संघटना (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अर्थात) आयएलओला वाटते की हा आकडा खूपच कमी आहे. कारण हृदयविकाराचा झटका व श्वसनक्रिया निकामी झाल्याने होणाऱ्या मृत्यूंना कतार सरकार कामाशी संबंधित मृत्यू मानत नाही. पण या दोन्ही गोष्टी उच्च तापमानात अत्यंत मेहनतीचे काम केल्यामुळे येणाऱ्या हार्टस्ट्रोकची सामान्य लक्षणे आहेत.

आयएलओनं कतारमधील वर्ल्डकपशी निगडीत मृत्यू आणि दुर्घटनांची माहिती देणारा अहवाल तयार केला आहे, ज्यासाठी त्यांनी सरकारी हॉस्पिटल्स आणि अँब्युलन्स सर्व्हिसेसकडून माहिती मिळवली आहे.

आयएलओच्या अहवालानुसार 2021 या एका वर्षातच 50 परदेशी मजुरांचा मृत्यू झाला आणि 500 जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय 37,600 जणांना जणांना सौम्य ते मध्यम स्वरुपाच्या इजा झाल्या आहेत.

बीबीसी अरेबिकनेसुद्धा काही पुरावे गोळा केले. या पुराव्यांमध्ये दिसून येते की कतार सरकारने परदेशी मजुरांच्या मृत्यूंची संख्या कमी दाखवली आहे.

परदेशी मजुरांच्या मृत्यूंबद्दल कतार सरकारचे काय म्हणणे आहे?

आयएलओच्या सोबतीनं कतार सरकारने अलीकडेच कामगार कायद्यांमध्ये सुधारणा केल्या आहेत.

त्यात उद्योगांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन द्यावे यासाठी वेतन संरक्षण योजनेचाही समावेश आहे.

एका सरकारी प्रवक्त्याने बीबीसीला सांगितले की, या बदलांमुळे कतारमधील बहतेक परदेशी मजूरांची कामची स्थिती सुधारत आहे.

"या बदलांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात आली आहेत.", असे या प्रवक्त्याने सांगितले.

"जसजशा या सुधारणा होत जातील तसतशी, नियम मोडणाऱ्या कंपन्यांची संख्या कमी होत जाईल."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)