2022 फुटबॉल वर्ल्डकपच्या यजमानपदासाठी 'कतारने केली इतरांची बदनामी'

फोटो स्रोत, Getty Images
कुठलाही वर्ल्डकप जिंकणं हा जितका मोठा मान असतो, तितकीच मोठी जबाबदारी असते त्या वर्ल्डकपच्या यजमानपदाची. हे यजमानपद आपल्याबरोबर नवे मोठमोठाले प्रकल्प, पर्यटन आणि बांधकाम क्षेत्रात हजारो नवीन रोजगार आणतं, भरघोस प्रमाणात परकीय चलन येतं आणि एकंदरच अर्थव्यवस्थेला गती मिळवून देतं.
म्हणून अनेकदा देशांमध्ये हे पद मिळवण्यासाठी चढाओढ लागलेली असते. पण त्यासाठी कुणी प्रतिस्पर्ध्यांची बदनामी करण्याची गोष्ट आजवर ऐकिवात नव्हती. पण आज असा एक आरोप झाला आहे.
2022चं FIFA वर्ल्डकपचं यजमानपद मिळावं म्हणून कतारच्या प्रतिनिधी टीमने गैरकृत्ये केल्याचा आरोप एका वृत्तपत्राने केला आहे.
2010 साली झालेल्या या लिलाव प्रक्रियेत, आपल्या प्रतिस्पर्धी देशांना यजमानपद मिळू नये म्हणून कतारनं एक छुपी मोहीम राबविली होती, असा दावा संडे टाइम्सने केला आहे. यासाठी आपल्याकडे पुरावे आहेत, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
संडे टाइम्सच्या वृत्तानुसार, या लिलाव प्रक्रियेच्या आधी कतारनं अमेरिकेतल्या एका जनसंपर्क कंपनीला तसंच काही माजी CIA अधिकाऱ्यांना नियुक्त केलं. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना, मुख्यत्वे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला, यजमानपद मिळू नये म्हणून त्यांच्याविरोधात अपप्रचार करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली होती.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्डकप आयोजनाला स्थानिकांचा विरोध आहे, असं वातावरण या जनसंपर्क एजन्सीमार्फत तयार करण्यात आलं, असा आरोप करण्यात आला आहे.
2010 साली झालेल्या या लिलाव प्रक्रियेत कतारनं अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि जपानला हरवून 2022चं यजमानपद खेचून आणलं होतं.
हे आरोप खरे ठरल्यास, कतारची ही कृत्यं FIFAच्या नियमांचं उल्लंघन असेल. फिफाच्या नियमावलीत स्पष्ट लिहिलं आहे की ज्या देशाला वाटतं वर्ल्डकपचं यजमानपद हवं आहे, त्यांनी आपल्या स्पर्धक देशांविरोधात अपप्रचार अथवा खोट्या गोष्टी पसरवू नयेत.

फोटो स्रोत, Getty Images
या लिलाव प्रक्रिेयेत भाग घेणाऱ्या कतारच्या टीमवर याआधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. FIFAच्या दोन वर्षांच्या चौकशीनंतर या टीमची आरोपांतून मुक्तता झाली होती.
प्रतिस्पर्धांना यजमानपद मिळू नये म्हणून कतारने ही कृत्यं केल्याचा आरोप आहे -
- कतारने एका प्रतिष्ठित अभ्यासकाला तब्बल 9,000 डॉलर देऊन त्याच्याकडून एक नकारात्मक लेख लिहून घेण्यात आला. अमेरिकेत वर्ल्डकप झाला तर अमेरिकेला खूप आर्थिक नुकसान सोसावं लागेल, असा त्यांच्या त्या लेखाचा आशय होता. हा लेख जगभरातल्या प्रसारमाध्यमांमध्ये वितरित करण्यात आला.
- यजमानपदासाठी प्रतिस्पर्धी देशांमध्ये ठराविक पत्रकार, ब्लॉगर्स आणि प्रतिष्ठित लोकांना नियुक्त करून त्यांच्याकडून यजमानपदाबद्दलचा नकारात्मक प्रचार करण्यात आला.
- अमेरिकेत शाळांमधल्या क्रीडा प्रशिक्षकांचाही या अपप्रचारासाठी वापर करण्यात आला. त्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधीकडे जाऊन हा वर्ल्डकप देशात होऊ नये, अशी विनंती त्यांना करण्यास प्रोत्साहित केलं. वर्ल्डकपवर एवढा खर्च करण्याऐवजी तोच निधी शाळांमध्ये लावावा, अशी मागणी या क्रीडा प्रशिक्षकांच्या गटाने केली.
- ऑस्ट्रेलियामध्ये रग्बी मॅचेसच्या वेळी यजमानपदासाठी ऑस्ट्रेलिया अर्ज करतोय म्हणून सामूहिक निषेध नोंदवण्यात आले.
- प्रतिस्पर्धक देशांच्या लिलाव टीममधल्या सदस्यांविरुद्धची गुप्त माहिती गोळा करण्यात आली होती.
संडे टाइम्सच्या हाती जी कागदपत्रं लागली आहेत, ती कतारच्याच बिडिंग टीमच्या व्यक्तीनं दिल्याचा दावा संडे टाइम्सनं केला आहे. ही कागदपत्रं FIFAनं सुरू केलेल्या चौकशीच्या वेळी उपलब्ध नव्हती.
ब्राउन लॉयड जोन्स (आता BLJ वर्ल्डवाईड) ही जनसंपर्क एजन्सी आणि गुप्तहेर संघटनांच्या काही माजी अधिकाऱ्यांना हे काम देण्यात आलं होतं. त्यांनीच नकारात्मक वातावरण तयार करण्याचं आणि स्पर्धकांची माहिती मिळवण्याचं काम हाती घेतलं होतं.

फोटो स्रोत, Reuters
कतारच्या सुप्रीम कमिटी फॉर डिलेव्हरी अँड लेगसीने एका निवेदनात संडे टाइम्सचा एकूण एक आरोप फेटाळून लावला आहे.
"आम्ही याआधी पूर्ण चौकशीला सामोरं गेले आहोत आणि त्यासंदर्भातला एक अहवाल मायकल गार्शिया यांनी दोन वर्षं चौकशी करून बनवला होता," असं ते पुढे म्हणाले.
तर FIFAने देखील एका प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे की, "मायकल गार्शिया यांनी दोन वर्षं केलेली चौकशी आणि त्यांचा निष्कर्ष त्यांनी बनवलेल्या अहवालात आहेतच."
BLJ वर्ल्डवाईडने संडे टाइम्सला प्रतिसाद दिलेला नाही.
बीबीसीचे क्रीडा संपादक डॅन रोअन यांच्यानुसार, कतारचं विश्वचषक यजमानपद काही पहिल्यांदाच वादाच्या भोवऱ्यात अडकलं नाहीये. "कतारमध्ये वर्ल्डकपची तयारी सुरू आहे. नव्याने तथ्यं समोर आल्यावर तिथं वर्ल्डकप होईल की नाही याबाबत शंका आहे. पण आता तयारीसाठी बराच पैसा आणि वेळ खर्च झाला आहे. त्यामुळे त्यांचं यजमानपद जाण्याची शक्यता कमी असल्याचं दिसत आहे," असं ते पुढे म्हणाले.
हा लिलाव झाला तेव्हा 2018चा विश्वचषक रशियामध्ये होईल हेही जाहीर करण्यात आलं होतं. रशियात नुकत्याच आटोपलेल्या फुटबॉल वर्ल्डकपच्या सुरुवातीला 2026 फुटबॉल वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत होणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








