देशासाठी लढताना युक्रेनी सैनिकांचे मोडले जाताय संसार, काय आहे कारण?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, इलोना ह्रोमलियुक
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, युक्रेन
युद्धावर निघालेल्या गणवेशात असलेल्या आपल्या प्रियकराला अलिंगन देणारी, त्याचे चुंबन घेणारी एक हाय हिल सँडल्स घातलेली तरुणी - हे दृश्य पाहिलं तर असं वाटण्याची शक्यता आहे की दुसरे महायुद्ध हा विषय असलेल्या हॉलिवूडच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. पण हे दृश्य आहे रशियाविरोधात लढण्यासाठी सीमेवर निघालेल्या एका युक्रेनी दाम्पत्याचे.
सीमेवर तणाव आणि त्या तणावाचा कुटुंबावर परिणाम हे युक्रेनचे भीषण वास्तव बनले आहे.
या फेब्रुवारीत रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला तीन वर्षे पूर्ण होतील. या युद्धामुळे युद्ध आघाडीवर लढणाऱ्या युक्रेनच्या सैनिकांसाठीच फक्त आव्हानं निर्माण केलेली नाहीत तर त्या सैनिकांची वाट पाहणाऱ्या त्यांच्या पत्नींसाठी सुद्धा ते अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायक आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं होतं तेव्हा ओक्साना आणि आरतेम यांच्या लग्नाला 18 महिने झाले होते. युद्ध सुरू झाल्यानंतर आरतेम यांना युक्रेनच्या सैन्यात भरती व्हावं लागलं होतं.
लग्नानंतर कोणत्याही जोडप्याची जशी इच्छा असते तशीच या दोघांची देखील इच्छा होती की त्यांना मूल व्हावं. मात्र, युद्धामुळे दोघांच्या गाठीभेटी होत नव्हत्या. युद्ध आघाडीवरील सैनिकांच्या आवश्यकतेमुळे आरतेम यांना काही दिवसांपूर्वीच सुट्टी मंजूर झाली आहे.
अशा परिस्थितीत ओक्साना त्यांच्या पतीला म्हणजे आरतेम यांना भेटण्यासाठी मोठा प्रवास करायच्या. युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्हजवळ असणाऱ्या बिला त्सेरकवा शहरात त्यांचं घर आहे.
तिथून त्या शेकडो किलोमीटर अंतरावर खारकीव्ह भागात प्रवास करायच्या. तिथून मग त्या पूर्व युक्रेनमधील दोनेत्स्कला जायच्या.
आरतेम यांची तैनाती दोनेत्स्कमध्ये होती. तिथे ओक्साना यांना त्यांच्या पतीबरोबर थोडा वेळ घालवता यायचा.
ओक्साना आणि त्यांच्या पतीची पहिली 'डेट' एप्रिल 2022 मध्ये झाली होती. तर दुसऱ्यांदा नोव्हेंबर महिन्यात ते दोघे डेटवर गेले होते. यादरम्यान आरतेम जखमी झाले होते आणि ओक्साना यांना गर्भपाताला तोंड द्यावं लागलं होतं.

दोघांसाठी तो कठीण काळ होता. ओक्साना त्यांच्या पतीला भेटण्यासाठी युद्ध आघाडीवर यायच्या. मात्र त्यांच्या पतीला त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटायची.
ओक्साना यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "पतीला पाहिल्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. त्यांना जेव्हा भेटते तेव्हाच मला जिवंत असल्यासारखं वाटतं."
युद्ध आघाडीजवळ असलेल्या एखाद्या गावात किंवा शहरात हे जोडपं भेटायचं. हे दोघे तिथल्याच स्थानिक घरांमध्ये रात्रभर मुक्काम करायचे. तिथे घरमालक रात्रभर मुक्काम करण्याचे त्यांच्याकडून फारसे पैसे घेत नसत.
युद्ध सुरू होण्यापूर्वी त्या गावात, शहरात, तिथल्या घरांमध्ये जीवन ऊर्जा सळसळत होती. लोकं सुखानं नांदत होती.


युक्रेनमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढलं
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं होतं. तेव्हापासून युक्रेनमध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलं आहे की युद्धामुळे 60 लाख लोकांनी युक्रेन सोडला आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी युक्रेनची जितकी लोकसंख्या होती, त्याच्या 15 टक्के इतकं हे प्रमाण होतं.
युक्रेन सोडणाऱ्यांमध्ये बहुतांश महिला आणि मुलं आहेत. कारण मार्शल लॉनुसार 18 ते 60 वर्षे वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी आहे.
एका वर्षात युक्रेनच्या सैनिकांना फक्त 30 सुट्ट्या घेता येतात. याशिवाय एखादी कौटुंबिक समस्या आल्यास त्यांना अतिरिक्त 10 दिवसांची सुट्टी मिळू शकते.
युक्रेनमधील जन्मदर किंवा प्रजनन दर देखील घटतो आहे.
1991 मध्ये सोविएत युनियनचं विभाजन झालं होतं. त्यानंतर युक्रेन हा एक स्वतंत्र देश झाला. त्यावर्षी युक्रेनमध्ये 6,30,000 मुलं जन्माला आली होती. तेव्हापासून तिथल्या जन्मदरात सातत्यानं घट होते आहे.
2019 मध्ये युक्रेनमध्ये 3,09,000 मुलांचा जन्म झाला होता. तर 2023 मध्ये रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा युक्रेनमध्ये 1,87,000 मुलांचा जन्म झाला होता.
युक्रेनमध्ये घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ होते आहे. युक्रेनच्या न्याय मंत्रालयानुसार, 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये जितके घटस्फोट झाले होते, त्यापेक्षा 2024 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये घटस्फोटांच्या प्रमाणात 50 टक्के वाढ झाली आहे.
अनेक महिलांसाठी युद्ध आघाडीवर तैनात असलेल्या त्यांच्या पतीकडे जाणं हाच संसार टिकवण्याचा आणि कुटुंब एकत्र ठेवण्याचा मार्ग आहे.
कर्तव्याच्या बंधनात अडकलेले पती-पत्नी
युद्ध आघाडीवर जाणं कठीण आहे. तिथे पोहोचण्यासाठी अनेकांना शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक धोके पत्करावे लागतात.
युद्ध आघाडीच्या जवळ पोहोचण्यासाठी महिला नेहमी रेल्वेनं प्रवास करतात. त्यानंतर पुढील प्रवास त्या बस आणि टॅक्सीनं करतात.
त्यांच्या पतीची त्यांना जितके दिवस भेट घेता येते, त्यापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाचे दिवस अधिक असतात. सैनिक जेव्हा सुट्टीवर नसतात तेव्हा त्यांना एक छोटासा ब्रेक मिळतो.
नतालिया या अशाच एक पत्नी आहेत. त्या पतीची भेट घेण्यासाठी पश्चिम युक्रेनमधील लवीव या शहरातून प्रवास करून देशाच्या पूर्वेला असणाऱ्या क्रामाटोरस्कला जातात. यासाठी त्यांना 1,230 किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागतो.
त्यांना लवीवहून क्रामाटोरस्कला पोहोचण्यासाठी दोन दिवसांहून अधिक (50 तासांहून अधिक) वेळ लागतो. मात्र इतका मोठा प्रवास केल्यानंतरसुद्धा त्यांना त्यांच्या पतीची फारच थोडा वेळ भेट घेता येते.
कारण सीमेजवळ असणाऱ्या जवळपासच्या पाच शहरांमध्ये सातत्यानं गोळीबार होत असतो.

डोळ्यातील अश्रू पुसत नतालिया म्हणतात, "आम्ही प्लॅटफॉर्मवर फक्त 50 मिनिटं भेटतो. त्यानंतर मी ज्या रेल्वेनं आले होते, त्यामध्येच परतीच्या प्रवासासाठी त्यांनी मला बसवलं."
"मात्र, ही 50 मिनिटंसुद्धा खूप असतात."
महत्त्वाची बाब म्हणजे या प्रवासासाठी जवळपास 120 डॉलरचा खर्च येतो. ही रक्कम युक्रेनमधील सरासरी मासिक पगाराच्या एक चतुर्थांश इतकी आहे. नतालिया यांनी सांगितलं की दर दोन-तीन महिन्यांनी त्यांनी त्यांच्या पतीला भेटण्याचा प्रयत्न केला.
नतालिया यांच्या लग्नाला 22 वर्षे झाली आहेत आणि त्यांना दोन मोठी मुलं आहेत.
त्या म्हणाल्या, "या प्रवासामुळे पुन्हा एकदा कुटुंब एकत्र आल्यासारखं वाटण्याची संधी मिळते."

फोटो स्रोत, Getty Images
युद्ध आघाडीजवळ 'डेट' करणाऱ्या किंवा भेट घेणाऱ्या प्रत्येक प्रेमी जोडप्याचा अंत सुखद नसतो. त्यांचा संसार टिकतोच असं नाही. काही महिला त्यांच्या जोडीदाराला भेटण्यासाठी धोकादायक प्रवास करत आहेत.
2014 मध्ये रशियानं युक्रेनविरुद्ध छुपं युद्ध करत पूर्व युक्रेनवर ताबा मिळवला. मारिया (नाव बदलण्यात आलं आहे) यांचे पती तेव्हा युद्ध आघाडीवर तैनात होते.
पूर्व युक्रेनमध्ये युद्ध आघाडीवर असलेल्या पतीला भेटण्यासाठी मारिया कीव्हहून तीन दिवसांचा प्रवास करायच्या. मात्र, परिस्थिती वाईट होत चालली होती. त्यांच्या पतीला पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस सिंड्रोमचा (पीटीएसडी) त्रास होऊ लागला होता.
सैन्यात काम करून ते घरी परतले की पत्नी (मारिया) आणि मुलांशी हिंसक पद्धतीनं वागायचे. त्यानंतर त्यांचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.
मारिया यांनी आणखी एका सैनिकाशीच लग्न केलं. मात्र, आता पतीबरोबर 'डेट' वर जाण्याचा विचार त्यांच्या मनात येत नाही.
त्या म्हणतात, "युद्ध आघाडीवर जाऊन भेटल्यानं कुटुंब किंवा संसार टिकत नाही. तुमच्याकडे जेव्हा एकसारखा विचार, दृष्टीकोन असतो आणि आयुष्यात जेव्हा तुम्ही तुमच्या उद्दिष्टांबद्दल बोलू शकता, तेव्हाच तुमचा संसार टिकतो."
न संपणारी प्रतीक्षा
ओक्साना यांचा दोन वेळा गर्भपात झाला आहे. मात्र, अलीकडेच त्यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. पहिल्या बाळाची त्या बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होत्या.

ओक्साना यांना आशा होती की त्यांच्या गरोदरपणात आणि प्रसूतीच्या वेळेस त्यांचे पती आरतेम त्यांच्यासोबत असतील. मात्र, आरतेम यांना सुट्टी मिळाली नाही.
ओक्साना यांनी मुलाला जन्म देण्याच्या काही दिवस आधी मला सांगितलं होतं की, "हो! अशा वेळेस प्रत्येक पत्नीला त्यांचा पती त्यांच्याजवळ हवा असतो."
यावेळेस त्या पतीला भेटण्यासाठी त्यांच्या मुलासोबत आल्या आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











