'रेप रूम' ते जिवंत जाळणं; लिबियातील सुदानी महिलांची थरकाप उडवणारी आपबिती

लिबिया
फोटो कॅप्शन, चांगलं आयुष्य आणि नोकरीच्या शोधात स्वत:चा देश सोडून पलायन केलेल्या सुदानी महिला आता लिबियात लैंगिक अत्याचाराला तोंड देत आहेत
    • Author, अमीरा महाध्बी
    • Role, बीबीसी अरेबिक सर्व्हिस

(टीप : या बातमीतला काही भाग तुम्हाला विचलित करू शकतो)

"आम्ही मृत्यूच्या छायेत जगतो," असं लायला फोनवर दबक्या आवाजात सांगतात. कोणी त्यांचं बोलणं ऐकू नये म्हणून ते काळजी घेत असतात.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला लायला त्यांचे पती आणि सहा मुलांसह सुदानमधून पळून आल्या होत्या. त्या आता लिबियात राहत आहेत.

सुदानच्या ज्या महिलांनी लिबियातील तस्करीबद्दलचे त्यांचे अनुभव बीबीसीला सांगितले, सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून त्यांची नावं बदलण्यात आली आहेत.

'लिबियात अडचणी कमी झाल्या नाहीत'

अतिशय दबक्या आवाज लायला सांगतात की, 2023 मध्ये सुरू झालेल्या हिंसक यादवी युद्धाच्या काळात सुदानमधील ओमदुरमनमधील त्यांच्या घरात कशाप्रकारे छापा टाकण्यात आला होता.

त्याचं कुटुंब सर्वात आधी इजिप्तला गेलं. मग त्यांनी लिबियात जाण्यासाठी तस्करांना 350 डॉलर (जवळपास 29,000 रुपये) दिले. त्यांना सांगण्यात आलं होतं की, लिबियात त्यांना चांगलं आयुष्य जगता येईल. तिथे त्यांना सफाई कर्मचाऱ्यांच्या किंवा हॉटेलमध्ये नोकऱ्या मिळतील.

मात्र, लायला यांनी सांगितलं की, त्यांनी सीमा ओलांडताच, तस्करांनी त्यांना ताब्यात घेतलं. तस्करांनी त्यांना मारहाण केली आणि आणखी पैशांची मागणी केली.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "माझ्या मुलाला वारंवार मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्याची वेळ आली."

तीन दिवसांनी, तस्करांनी कोणतंही कारण न सांगता त्यांची सुटका केली.

संकल्पनात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संकल्पनात्मक छायाचित्र
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लायला यांना वाटलं की, लिबियातील त्यांचं नवं आयुष्य चांगलं होऊ लागलं होतं, कारण त्यांचं कुटुंब लिबियाच्या पश्चिमेकडील भागात आलं होतं.

त्यांनी तिथे एक खोली भाड्यानं घेतली आणि काम करण्यास सुरुवात केली. मात्र एक दिवस त्यांचे पती कामाच्या शोधात बाहेर गेले आणि पुन्हा कधीच परत आले नाहीत.

त्यानंतर लायलाच्या नोकरीमुळे ओळख झालेल्या एका व्यक्तीनं त्यांच्या 19 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. लायला सांगतात, "त्याने माझ्या मुलीला सांगितलं की जर तिनं याबद्दल कोणाला काही सांगितलं तर तो तिच्या छोट्या बहिणीवरदेखील बलात्कार करेल."

त्या दबक्या आवाजात घाबरत सांगतात की जर घरमालकिणीला या धमक्यांबद्दल माहीत झालं तर त्यांच्या कुटुंबाला घर सोडावं लागेल.

लायला म्हणतात की त्यांचं कुटुंब आता लिबियामध्ये अडकलं आहे. तस्करांना देण्यासाठी त्यांच्याकडे आता पैसे नाहीत. यादवी युद्धात अडकलेल्या सुदानमध्ये परतण्याचा कोणताही मार्ग त्यांच्याकडे नाही.

त्या म्हणतात, "आमच्याकडे खूप थोडं अन्न शिल्लक राहिलं आहे. माझा मुलगा घराबाहेर जाण्यास घाबरतो. कारण अनेकदा इतर मुलं त्याला मारहाण करतात. त्याच्या काळ्या रंगावरून त्याची टिंगल करतात. मला वाटतं की, हळहूळ माझं मानसिक संतुलन बिघडत चाललं आहे."

सुदानमधील यादवी-युद्ध आणि सर्वसामान्यांची वाताहात

2023 मध्ये सुदानमधील रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) हे निमलष्करी दल आणि तिथल्या सैन्यामध्ये युद्ध सुरू झालं होतं. तेव्हापासून लाखो लोकांनी सुदानमधून पलायन केलं आहे.

2021 मध्ये या सैन्य आणि आरएसएफ या दोघांनी मिळून सुदानमध्ये सत्तापालट केला होता. मात्र त्यांच्या कमांडरमध्ये झालेल्या सत्तासंघर्षानं सुदान यादवी युद्धात अडकला.

सुदानमध्ये 1 कोटी 20 लाखांहून अधिक लोक त्यांच्या घरांमधून विस्थापित झाले आहेत. सुदानच्या पाच प्रांतांमध्ये दुष्काळ आहे. तज्ज्ञांच्या मते, 2 कोटी 46 लाख लोक, म्हणजेच जवळपास सुदानच्या अर्ध्या लोकसंख्येला अन्नधान्याच्या तात्काळ मदतीची आवश्यकता आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासित एजन्सीचं म्हणणं आहे की लिबियामध्ये आता दोन लाख 10 हजारांहून अधिक सुदानी नागरिकांनी आश्रय घेतला आहे.

बीबीसी पाच सुदानी कुटुंबांशी बोललं. ही कुटुंबं आधी इजिप्तमध्ये गेली होती. तिथे त्यांना वंशवाद आणि हिंसाचाराला तोंड द्यावं लागलं होतं. यानंतर सुरक्षा आणि नोकरीच्या चांगल्या संधीच्या शोधात ते लिबियात गेले.

लिबियातील स्थलांतर आणि निर्वासितांच्या समस्यांवर काम करणाऱ्या एका संशोधकाद्वारे आम्ही या कुटुंबाशी संपर्क साधला.

लाल रेष
लाल रेष

सलमा यांचा भयंकर अनुभव

सलमा यांनी बीबीसीला सांगितलं की, सुदानमध्ये यादवी युद्धाची सुरुवात व्हायच्या आधीपासूनच त्या इजिप्तमधील काहिरामध्ये त्यांचे पती आणि तीन मुलांसह राहत होत्या.

मात्र जसजसे इजिप्तमध्ये मोठ्या संख्येनं निर्वासित येऊ लागले, तसतसे तिथल्या निर्वासितांची, स्थलांतरितांची परिस्थिती बिघडत गेली.

सलमा म्हणतात, त्यांनी लिबियात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथे पोहोचल्यावर त्यांना माहीत झालं की तिथली परिस्थिती तर नरकाहून वाईट होती.

लिबिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनेक सुदानी निर्वासित इजिप्तमधून पळून लिबियात राहत आहेत

त्यांच्या कुटुंबानं सीमा ओलांडताच, त्यांना तस्करांच्या एका गोदामात ठेवण्यात आलं.

त्यानंतर तस्करांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. सीमेपलीकडच्या इजिप्तमधील तस्करांना त्यांनी आधीच पैसे दिले होते. मात्र ते पैसे त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचले नाहीत.

त्यांचं कुटुंब जवळपास दोन महिने त्या गोदामात राहिलं. त्यानंतर एक वेळ अशीही आली की सलमा यांना त्यांच्या पतीपासून वेगळं करून महिला आणि मुलांसाठी असलेल्या एका खोलीत नेण्यात आलं.

त्या सांगतात की तिथे पैशांसाठी त्यांच्यावर आणि त्यांच्या दोन मोठ्या मुलांवर अनेक प्रकारचे अत्याचार करण्यात आले.

त्यांनी सांगितलं की, "आमच्या शरीरावर त्यांच्या चाबकांच्या खुणा होत्या. ते माझ्या मुलीला मारहाण करायचे. माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाचे हात पेटत्या तंदूरमध्ये टाकायचे."

"कधीकधी माझ्या मनात विचार यायचा की आम्ही सर्व एकत्र मेलो असतो तर बरं झालं असतं. कारण दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता."

'त्या ठिकाणी होती रेप रूम'

सलमा सांगतात की या घटनेचा त्यांच्या मुलाच्या आणि त्यांच्या मुलीच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीवर विपरित परिणाम होतो आहे. यानंतर त्या दबक्या आवाजात बोलू लागतात.

त्या सांगतात, "ते मला एका वेगळ्या खोलीत घेऊन जायचे. त्याला ते 'रेप रुम' म्हणायचे. तिथे प्रत्येक वेळेस वेगवेगळे पुरुष असायचे. त्यांच्यातील कोणाचं तरी बाळ माझ्या पोटात होतं."

शेवटी, त्यांनी इजिप्तमधील त्यांच्या एका मित्राच्या मदतीनं काही पैसे गोळा केले आणि मग तस्करांनी त्यांच्या कुटुंबाची सुटका केली.

नंतर, सलमा सांगतात की एका डॉक्टरनं त्यांना सांगितलं की आता गर्भपाताला उशीर झाला आहे. त्यांच्या पतीला जेव्हा सलमा गर्भवती असल्याचं माहीत झालं तेव्हा त्यांनी सलमा आणि त्यांच्या मुलांना सोडून दिलं.

यानंतर सलमा यांचं कुटुंब रस्त्यावर झोपू लागलं. ते कचराकुंडीतील उरलेलं अन्न खाऊन आणि भीक मागून पोट भरू लागले.

काही काळ त्यांनी वायव्य (उत्तर-पश्चिम) लिबियातील एका दुर्गम भागातील एका शेतात आश्रय घेतला होता. तिथे ते संपूर्ण दिवस काहीही न खाता किंवा कधीकधी फार थोडं अन्न खाऊन दिवस घालवत होते. तहान भागवण्यासाठी ते जवळच्याच विहिरीतील घाणेरडं पाणी प्यायचे.

सलमा यांनी फोनवर सांगितलं, "माझा मोठा मुलगा जेव्हा म्हणतो की तो भुकेनं व्याकुळ झाला आहे, तेव्हा मला खूप मानसिक त्रास होतो." यादरम्यान त्यांच्याजवळ असलेल्या लहान बाळाच्या रडण्याचा आवाजदेखील ऐकू येतो.

त्या म्हणतात, "तो खूप भुकेला आहे. मात्र त्याला खाऊ घालायला माझ्याकडे काहीही नाही. इतकंच काय, माझ्या स्तनांमध्ये इतकंही दूध नाही की मी त्याला दूध पाजू शकेन."

जमिला आणि हना

जमिला एक सुदानी महिला आहेत. त्यांचं वय जवळपास 45 वर्षे आहे. लिबियात चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं, या सुदानमधील समुदायात पसरलेल्या बातम्यांवर त्यांनीदेखील विश्वास ठेवला.

2014 मध्ये सुदानच्या पश्चिमेला असणाऱ्या दारफुर भागात निर्माण झालेल्या अशांततेमुळे इजिप्तमध्ये पलायन केलं होतं. तिथे त्यांनी काही वर्षे घालवली. मग 2023 च्या अखेरीस त्या लिबियात गेल्या.

त्या सांगतात, तेव्हापासून त्यांच्या मुलींवर वारंवार बलात्कार झाला आहे. त्यांच्या मुली 19 आणि 20 वर्षांच्या असताना पहिल्यांदा त्यांच्यावर बलात्कार झाला होता.

सुदानच्या आरएसएफ आणि सैन्यामध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धाचे गंभीर परिणाम तिथल्या लाखो लोकांना भोगावे लागत आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुदानच्या आरएसएफ आणि सैन्यामध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धाचे गंभीर परिणाम तिथल्या लाखो लोकांना भोगावे लागत आहेत

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "जेव्हा मी आजारी होते, तेव्हा मी माझ्या दोन्ही मुलींना साफसफाईचं काम करण्यासाठी पाठवलं होतं. जेव्हा त्या रात्री घरी परतल्या, तेव्हा त्या घाणीनं आणि रक्तानं माखलेल्या होत्या. त्यांच्यातील एक जोपर्यंत बेशुद्ध झाली नाही तोपर्यंत चार पुरुषांनी त्यांच्यावर बलात्कार केला होता."

जमिला सांगतात की, त्यांच्यावर सुद्धा बलात्कार झाला होता. त्यांच्याहून वयानं खूपच लहान असलेल्या पुरुषानं अनेक आठवडे कैदेत ठेवलं होतं. त्याने जमिला यांना त्याच्या घरातील साफसफाईच्या कामाची नोकरी देऊ केली होती.

ती गोष्ट आठवून त्या म्हणतात, तो मला 'घाणेरडी काळी' महिला म्हणून माझा अपमान करायचा. त्यानं माझ्यावर बलात्कार केला आणि म्हणाला, "महिला याच गोष्टीसाठी जन्माला येतात."

जमिला म्हणतात, "इथली मुलंदेखील आमच्याशी वाईट वागतात. ते आमच्याकडे जनावरं आणि जादूगरांच्या दृष्टीकोनातून पाहतात. आमच्या कृष्णवर्णीय असण्याचा आणि आफ्रिकन असण्याचा ते अपमान करतात. ते स्वत: आफ्रिकन नाहीत का?"

जेव्हा जमिला यांच्या मुलींवर पहिल्यांदा बलात्कार झाला, तेव्हा त्या मुलींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

मात्र जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना हे माहित झालं की ते निर्वासित आहेत, तेव्हा त्यानं तक्रार रद्द केली. पोलीस अधिकाऱ्यानं जमिला यांना धमकी दिली की जर अधिकृतपणे तक्रार नोंदवण्यात आली तर त्यांना तुरुंगात टाकण्यात येईल.

बंदुकीच्या धाकावर झाले बलात्कार

लिबियाच्या पश्चिम भागातील ही घटना आहे.

लिबियानं 1951 च्या निर्वासित करारावर (रिफ्युजी कन्व्हेंशन) किंवा त्यांच्या स्थितीशी संबंधित 1967 च्या प्रोटोकॉलवर सह्या केल्या नव्हत्या. निर्वासित आणि राजकीय आश्रय मागणाऱ्यांना लिबिया 'बेकायदेशीर प्रवासी' मानतो.

लिबिया हा देश दोन भागात विभागला गेला आहे. या दोन्ही भागांमध्ये वेगवेगळी सरकारं आहेत.

मात्र लिबिया क्राइम्स वॉच या मानवाधिकार गटानुसार, लिबियाच्या पूर्व भागातील निर्वासितांची परिस्थिती तुलनेनं चांगली आहे.

कारण तिथे निर्वासित कोणत्याही भीतीशिवाय आणि तुरुंगात टाकलं जाण्याच्या धोक्याशिवाय अधिकृतपणे तक्रार नोंदवू शकतात. त्यांना अधिक सहजपणे आरोग्य सेवा मिळू शकतात.

बंदूक

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात तस्करांकडून चालवल्या जात असलेल्या अनधिकृत केंद्रांमध्ये लैंगिक हिंसा सर्रास होते. मात्र मानवाधिकार गटानुसार, लिबियाच्या पश्चिम भागातील अधिकृत बंदी केंद्रांमध्ये देखील अशाप्रकारच्या शोषणाचे पुरावे मिळाले आहेत.

हना या एक सुदानी महिला आहेत. त्यांच्या मुलांचं पोट भरण्यासाठी त्या कचरा कुंडीतून प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करतात.

त्या सांगतात की पश्चिम लिबियामध्ये त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यांना एका जंगलात नेण्यात आलं होतं आणि बंदुकीचा धाक दाखवून एका गटानं त्यांच्यावर बलात्कार केला.

दुसऱ्या दिवशी त्यांना सरकारकडून चालवण्यात येत असलेल्या स्टॅबिलिटी सपोर्ट ऑथोरिटी (एसएसए) मध्ये नेण्यात आलं होतं. हना यांना कोणीही सांगितलं नाही की त्यांना ताब्यात का घेण्यात आलं होतं.

हना यांनी बीबीसीला सांगितलं, "माझ्यासमोर तरुण आणि मुलांना मारहाण केली जायची. त्यांना अंगावरचे सर्व कपडे काढण्यास भाग पाडलं जायचं."

"मी अनेक दिवस तिथे राहिली. मी माझ्या प्लास्टिकच्या चपलांवर डोकं ठेवून जमिनीवर झोपायची. कित्येक तास विनवणी केल्यावर मला शौचालयात जाण्याची परवानगी दिली जायची. माझ्या डोक्यावर वारंवार मारलं जायचं."

लिबियामध्ये आधीही घडली आहेत अशी प्रकरणं

इतर आफ्रिकन देशांमधून लिबियात आलेल्या निर्वासित किंवा स्थलांतरितांवर लिबियामध्ये अत्याचार झाल्याच्या किंवा त्यांच्याशी गैरवर्तणूक झाल्याच्या घटना आधीदेखील घडल्या आहेत.

युरोपकडे जाणाऱ्या रस्त्यांवरचा लिबिया हा महत्त्वाचा टप्पा आहे. अर्थात बीबीसी ज्या महिलांशी बोललं, त्यांच्यापैकी कोणाचंही युरोपात जाण्याचं नियोजन नव्हतं.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांच्या एजन्सीचं म्हणणं आहे की आता लिबियामध्ये 2,10,000 हून अधिक सुदानी निर्वासित आहेत
फोटो कॅप्शन, संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांच्या एजन्सीचं म्हणणं आहे की आता लिबियामध्ये 2,10,000 हून अधिक सुदानी निर्वासित आहेत

2002 मध्ये अॅमनेस्टी इंटरनॅशनलनं लिबियाच्या एसएसए (स्टॅबिलिटी सपोर्ट ऑथोरिटी) वर अनेक आरोप केले होते.

या आरोपांमध्ये हत्या, मनमानीपणे ताब्यात घेणं, स्थलांतरित आणि निर्वासितांची अटक या गोष्टींचा समावेश आहे.

याशिवाय अत्याचार करणं, छळ करणं, जबरदस्तीनं काम करवून घेणं आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार मानवाधिकारांचं उल्लंघन आणि गुन्ह्यांच्या आरोपांचाही समावेश आहे.

'मला हे देखील माहीत नाही, माझा मृतदेह घरचे स्वीकारतील की नाही?'

या अहवालात म्हटलं आहे की लिबियाची राजधानी असलेल्या त्रिपोलीमध्ये गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी अॅमनेस्टीला सांगितलं की मंत्रालय एसएसएवर लक्ष ठेवत नाही. कारण एसएसए थेट पंतप्रधान अब्दुल हामिद देबिबेह यांच्या अखत्यारीत येते.

पंतप्रधान कार्यालयानं आम्ही विचारलेल्या प्रश्नांना कोणतंही उत्तर दिलं नाही.

लिबिया क्राइम्स वॉचनं बीबीसीला सांगितलं की सरकारी निर्वासित बंदी केंद्रांमध्ये व्यवस्थेमार्फतच निर्वासितांचं लैंगिक शोषण होतं. या केंद्रांमध्ये त्रिपोलीच्या कुप्रसिद्ध अबू सलीम तुरुंगाचा देखील समावेश आहे.

2023 च्या एका अहवालात, मेडसिन्स सॅन्स फ्रंटियर (एमएसएफ) नं म्हटलं आहे की अबू सलीम जेलमध्ये "लैंगिक आणि शारीरिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. यामध्ये व्यवस्थित परिधान करण्यात आलेल्या कपड्यांची तपासणी आणि बलात्काराचा समावेश आहे."

त्रिपोलीमध्ये गृहमंत्री आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या विभागानं आमच्या प्रश्नांना उत्तरं दिलं नाहीत.

सलमा आता शेत सोडून जवळच्या एका कुटुंबाबरोबर एका नव्या खोलीत राहत आहेत. मात्र त्यांचं कुटुंबं अजूनही घराबाहेर काढण्याच्या आणि छळाच्या धोक्याला तोंड देत आहेत.

त्या म्हणतात की त्यांच्यासोबत जे काही घडलं त्यामुळे त्या आता पुन्हा घरी परत जाऊ शकत नाहीत.

त्या म्हणतात, "तिथले लोक म्हणतील की मी कुटुंबाच्या अब्रूला डाग लावला आहे. मला हे देखील माहीत नाही की ते माझा मृतदेह तरी स्वीकारतील की नाही. इथे माझ्यासमोर काय घडणार आहे, याची मला कल्पना आली असती तर किती बरं झालं असतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)