'गुलामांसारखी वागणूक, लैंगिक छळ', तस्करी करण्यात आलेल्या महिलांची हृदयद्रावक कहाणी

- Author, फ्लॉरेन्स फिरी आणि तामसिन फोर्ड
- Role, बीबीसी आफ्रिका आय
ओमानमध्ये तस्करी करून नेलेल्या आणि तिथं गुलाम म्हणून काम करण्यास भाग पाडलेल्या मलावीमधील (आफ्रिकेतील एक देश) 50 हून अधिक महिलांना वाचवण्यास एका व्हॉट्सॲप ग्रुपची कशाप्रकारे मदत झाली, याची 'बीबीसी आफ्रिका आय' पडताळणी करत आहे.
(सूचना : या बातमीतील काही माहिती वाचकांना त्रासदायक वाटू शकते.)
ओमानमध्ये चांगलं जीवन मिळावं या आशेनं घरगुती काम करणारी आणि नंतर तिच्यावर झालेलं गैरवर्तन आठवलं की एक 32 वर्षीय महिला रडायला लागते. जॉर्जिना असं या महिलेचं नाव आहे.
मानवी तस्करीला बळी पडलेल्या इतर सर्व महिलांप्रमाणे जॉर्जिना तिचं केवळ पहिलं नाव सांगू इच्छिते.
दुबईमध्ये ड्रायव्हर म्हणून भरती करण्यात आल्याचं तिला वाटत होतं. मलावीची राजधानी लिलोंग्वे येथे जॉर्जिना स्वतःचा छोटासा व्यवसाय करत होती.
यादरम्यान, एका एजंटनं तिच्याशी संपर्क साधला आणि तिलासांगितलं की ती मध्यपूर्वेतील कोणत्याही देशात यापेक्षा जास्त पैसे कमावू शकते. तिचे विमान ओमानची राजधानी मस्कत येथे उतरले तेव्हाच तिला ती फसवणुकीची बळी ठरली आहे याची जाणीव झाली.
ती सांगते की, मी एका कुटुंबाच्या तावडीत सापडली होती. तिथं मला आठवड्याचे सातही दिवस रोज 22 तास काम करायला लावलं जात होतं. मला फक्त दोन तास झोप घेता येत असे.
ती पुढे सांगते, "हे सगळं सहन न करण्याच्या टप्प्यावर मी पोहोचले होते. जेव्हा घरमालकाने मला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यास सुरुवात केली आणि मी नकार दिल्यास मला गोळ्या घालण्याची धमकी दिली."
या सगळ्या प्रकारानंतर जॉर्जिनाने नोकरी सोडली.
ती सांगते, "तो एकटा नव्हता. तो त्याच्या मित्रांना घरी आणायचा आणि नंतर त्यांच्याकडून पैसे घेत असे. माझ्यासोबत अनैसर्गिक सेक्स कसा केला गेला. मला खूप दुखापत झाली होती. मी खूप अस्वस्थ होते."
मानवी तस्करी आणि आखाती देश
एका अंदाजानुसार, आखाती अरब देशांमध्ये जवळपास 20 लाख महिला घरगुती मदतनीस म्हणून काम करत आहेत.
स्थलांतरितांसाठी स्थापन करण्यात आलेल्या 'डू बोल्ड' या धर्मादाय संस्थेने ओमानमध्ये राहणाऱ्या 400 महिलांचं सर्वेक्षण केलं होतं.
यूएस स्टेट डिपार्टमेंटने 2023 मध्ये आपल्या एका अहवालात याचा समावेश केला होता. सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात आलेल्या जवळपास सर्वच महिला मानवी तस्करीच्या बळी होत्या.
यापैकी एक तृतीयांश महिलांनी लैंगिक शोषण झाल्याचं सांगितलं, तर निम्म्या महिलांनी भेदभाव आणि शारीरिक हिंसाचाराची तक्रार नोंदवली.
अनेक आठवडे सर्वकाही सहन केल्यानंतर, जॉर्जिनाचा संयम संपुष्टात आला आणि तिने एका फेसबुक पोस्टद्वारे मदत मागितली.

हजारो मैल दूर, अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर राज्यातील मलावी येथील 38 वर्षीय सामाजिक कार्यकर्त्या पिलिलानी मोम्बे न्योनी यांनी तिची पोस्ट पाहिली आणि चौकशी सुरू केली.
त्यांनी जॉर्जिनाशी संपर्क साधला आणि तिच्या सुरक्षिततेसाठी फेसबुक पोस्ट हटवली.
पिलिलानी यांनी जॉर्जिनाला त्यांचा व्हॉट्सॲप नंबर दिला, जो हळूहळू ओमानमधील अनेक लोकांपर्यंत पोहोचला. मग ही समस्या व्यापक असल्याचं पिलिलानी यांच्या लक्षात आलं.
पिलिलानी यांनी बीबीसीला सांगितलं की, "जॉर्जिना ही पहिली बळी होती. यानंतर एक, दोन, तीन करत अनेक मुली पुढे आल्या. मग मी व्हॉट्सॲप ग्रूप तयार करण्याचा विचार केला कारण हे मानवी तस्करीचं प्रकरण आहं असं मला वाटलं."
ओमानमध्ये नोकर म्हणून काम करणाऱ्या मलावीमधील 50 हून अधिक महिला या ग्रूपमध्ये सामील झाल्या.
मग या ग्रूपमध्ये धडाधड व्हॉईस नोट्स आणि व्हीडिओ पाठवले जाऊ लागले. यातील काही गोष्टी बघायला भीतीदायक वाटत होत्या.

फोटो स्रोत, bbc
या व्हीडिओंवरून महिलांना कोणत्या भयानक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, हे स्पष्ट झालं. ओमानला पोहोचताच अनेक महिलांचे पासपोर्ट हिसकावण्यात आले, जेणेकरून त्या देश सोडून जाऊ नयेत.
मेसेज पाठवता यावेत, कुणाच्या नजरेत येऊ नये म्हणून स्वत:ला टॉयलेटमध्ये कोंडून ठेवल्याचं अनेक महिलांनी सांगितलं.
एक महिला म्हणाली की, "मला वाटत होतं की मी तुरुंगात आहे आणि आम्ही इथून कधीच बाहेर पडू शकणार नाही."
“माझ्या जीवाला खरोखर धोका आहे,” असं दुसरी महिला म्हणाली.
ओमानमध्ये नोकरांसाठी काय नियम आहेत?
पिलिलानी मोम्बे न्योनी यांनी मानवी तस्करी रोखण्यासाठी काम करणाऱ्या धर्मादाय संस्थांशी बोलण्यास सुरुवात केली. या वेळी, त्या ग्रीसमध्ये असलेल्या 'डू बोल्ड'च्या संस्थापक एकाटेरिना पोरास सिवोलोबोवा यांना भेटल्या.
'डू बोल्ड' ही संस्था आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित समुदायासोबत काम करते. ही संस्था तस्करी किंवा सक्तीनं मजुरी करण्यास भाग पाडलेल्यांना ओळखण्याचं आणि त्यांची सुटका करण्याचं काम करते.
सिवोलोबोव्हा बीबीसीला सांगतात, "या महिलांना कामावर ठेवण्यासाठी हे ग्राहक घरगुती मदत पुरवण्याच्या बदल्यात एजंटला पैसे देतात. काम करणाऱ्या लोकांना सोडून देण्याच्या बदल्यात ग्राहक आणि एजंट त्यांचे पैसे परत मागतात, आम्हाला अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो."
"घरगुती कामगार त्यांच्या घरमालकांना सोडून जाऊ शकत नाहीत. मालकांशी त्यांच्याशी कसंही वर्तनं केलं तरी, ते नोकऱ्या बदलू शकत नाहीत, देश सोडू शकत नाहीत, असे ओमानमधील कायदे आहेत.”
मध्यपूर्वेतील देशांमध्ये, या प्रकारच्या प्रणालीला 'कफाला' म्हणतात. यात कराराचा कालावधी पूर्ण होईपर्यंत कामगाराला त्याच्या मालकापासून वेगळं होऊ देत नाही.
मानव तस्करीचा बिमोड करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ओमानच्या राष्ट्रीय समितीनं बीबीसीला सांगितलं की, घरगुती मदतनीस आणि त्यांचे मालक यांच्यातील संबंध करारावर आधारित असेल आणि दोघांमध्ये वाद झाला असेल तर अशा केसेस एका आठवड्यात न्यायालयात नेल्या जाऊ शकतात.
समितीनं असंही म्हटलं की, "कोणतेही घलमालकाला कामगाराला काम करण्यास भाग पाडण्याची परवानगी नाही आणि त्यांना कामगारांच्या लेखी संमतीशिवाय त्यांचा पासपोर्ट किंवा इतर कोणतेही वैयक्तिक कागदपत्र ठेवण्याची परवानगी नाही."
मस्कतमध्ये तीन महिने घालवल्यानंतर आणि न्योनी व ओमानमधील इतर काही जणांच्या मदतीने जॉर्जिना जून 2021 मध्ये मलावीला परतली.
"जॉर्जिनाला मदत केल्यानंतर मला खूप अस्वस्थ वाटत होतं. मला खूप राग आला होता," न्योनी सांगतात.
जॉर्जिनाच्या केसमुळे न्योनी यांनी मलावीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारवर हस्तक्षेप करण्याचा दबाव वाढू लागला.
मलावीच्या चॅरिटी सेंटर फॉर डेमोक्रसी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हज (सीडीईडीआय) ने 'ओमान बचाव' मोहीम सुरू केली आणि महिलांना घरी परत आणण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली.
न्योनी यांच्या व्हॉट्सॲप ग्रूपशी संबंधित असलेली ब्लेसिंग्ज नावाची 39 वर्षीय महिला डिसेंबर 2022 मध्ये मस्कतला गेली आणि ती तिच्या चार मुलांना तिची बहीण स्टॅव्हिलियाकडे (लिलोंगवे) सोडून गेली.
एके दिवशी मस्कतमध्ये काम करत असलेल्या घरात तिला आग लागली, पण तिच्या मालकाने तिला मलावीला जाऊ दिलं नाही.

स्टॅव्हिलियानं बीबीसीला सांगितलं, "माझ्यावर विश्वास ठेवा. माझी बहीण ज्या प्रमाणात भाजली होती, ते पाहून मला वाटलं की, ती वाचू शकणार नाही."
ती आपल्या बहिणीला आठवून सांगते, "स्टॅव्हिलिया आणि मी इथं यासाठी आलो कारण मला चांगल्या आयुष्याची गरज होती. पण मी मेले तर माझ्या मुलांची काळजी घे, असं ती मला म्हणाली. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं.”
गेल्या ऑक्टोबरमध्ये, स्टॅव्हिलिया तिची बहीण ब्लेसिंग्जला लिलोंगवे विमानतळावर भेटली.
स्टॅव्हिलियाने आपल्या बहिणीला घरी परत आणण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा सुरुवातीला, ब्लेसिंग्सचा मृत्यू झाला असं एजंटनं तिच्या कुटुंबाला सांगितलं. पण हे खरं नव्हतं अखेरीस मलावी सरकारच्या मदतीने ब्लेसिंग्स गेल्या वर्षी घरी परतली.
परतल्यानंतर काही वेळातच ब्लेसिंग्सने बीबीसीला सांगितलं, "मी कधीच विचार केला नव्हता की अशी वेळ येईल जेव्हा मी माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांना पुन्हा पाहू शकेन."
ती म्हणाली, "पृथ्वीवर असेही लोक आहेत जे इतरांना गुलामांसारखे वागवतात, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती."
मलावी सरकारची भूमिका
'डू बोल्ड'सोबत काम करणाऱ्या मलावी सरकारचं म्हणणे आहे की, ओमानमधून 54 महिलांना परत आणण्यासाठी त्यांनी 1 लाख 60 हजार डॉलर्स (जवळपास 1 कोटी 32 लाख रुपये) खर्च केले आहेत.
पण 23 वर्षीय ऐडा चिवालो शवपेटीत घरी परतली. तिच्या मृत्यूनंतर ओमानमध्ये कोणतेही शवविच्छेदन किंवा तपासणी करण्यात आली नाही.

फोटो स्रोत, bbc
ओमानच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, कामगार मंत्रालयाला 2022 मध्ये घरगुती मदतनीस म्हणून काम करणाऱ्या कोणत्याही मलावी महिलेची तक्रार प्राप्त झाली नाही आणि 2023 मध्ये एका तक्रारीवर कारवाई करण्यात आली.
"बहुतेक महिलांना यासाठी सोडण्यात आलं कारण त्यांना कामावर घेतलेल्या घरमालकांना एक ते दोन हजार डॉलर्स दिले गेले," सिव्होलोबोवा सांगतात.
"याचा अर्थ त्यांचे स्वातंत्र्य विकत घेतलं गेलं आहे आणि यामुळे मला त्रास होतो. तुम्ही एखाद्याचे स्वातंत्र्य कसे विकत घेऊ शकता?" असा सवाल त्या करतात.
मलावी सरकारच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "आम्ही आता स्थलांतरितांना, त्यांच्या कुटुंबांना आणि पर्यायाने देशालाही लाभदायक ठरतील असे स्थलांतराचे सुरक्षित अधिकार प्रदान करणारे कायदे तयार करत आहोत."

फोटो स्रोत, bbc
न्योनी यांचा व्हॉट्सॲप ग्रूप आता परत येऊ इच्छिणाऱ्यांसाठीचं एक व्यासपीठ बनलं आहे.
त्या म्हणतात की, ओमानमध्ये तस्करी केलेल्या घरगुती कामगारांची समस्या मलावीमधील गरिबी आणि बेरोजगारीची मोठी समस्या अधोरेखित करते.
त्या सांगतात, "मलावीमध्ये जर मुलींना रोजगार मिळाला तर त्या अशा गोष्टीत अडकणार नाहीत. हे तरुण पुन्हा या सापळ्यात पडू नयेत यासाठी आता आपल्याला आपल्या देशाच्या उणिवांकडे लक्ष देण्याची गरज आहे."
जॉर्जिनासाठी हा त्रासदायक अनुभव विसरणं कठीण आहे. आफ्रिकेतील सर्वांत मोठ्या तलावांपैकी एक असलेल्या मलावी सरोवराजवळ बसून त्याकडे टक लावून पाहताना तिला खूप निवांत वाटतं.
ती म्हणते, "मी जेव्हा लाटांकडे पाहते तेव्हा मला वाटतं की, आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही. एक दिवस सर्वकाही इतिहासजमा होतं.
"मला या विचारानं दिलासा वाटतो आणि मी आधीची जॉर्जिना कशी होती, तर स्वावलंबी होती. हे मनाला सांगून स्वतःला प्रोत्साहित करते."











