अहमदनगरमध्ये गुलामगिरीतून 21 जणांना असं सोडवलं, महाराष्ट्रातलं तस्करीचं मोठं प्रकरण उघड

मूक महिला

फोटो स्रोत, Pravin Thackeray/BBC

फोटो कॅप्शन, 'या महिलेची जीभ कापली'
    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाच्या बेलवंडी परिसरात मानवी तस्करीचे जे स्वरुप समोर आलं त्यानंतर पोलिसही चक्रावले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 21 वेठबिगारांची सुटका केली आहे. या लोकांना स्थानिक टोळ्यांनी बळजबरीने कामाला जुंपलं आणि त्यांचा अमानूष छळ केला. या 21 जणांपैकी अनेकांना आपलं नाव, गाव काहीच आठवत नाही. त्यातील अनेकांची मनस्थिती अस्थिर आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मानवी तस्करी आणि वेठबिगारीविरोधी गुन्ह्यांखाली 11 जणांना अटक केली आहे, तर 7 जण फरार आहेत.

अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 48 गावं आहेत. पोलिसांना वर्षभरापूर्वी म्हणजे 30 नोव्हेंबर 2022ला सुरेगाव शिवारात एका पोत्यात बेवारस व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. तर ढवळगाव इथे 2023च्या मे महिन्यात एका विहिरीत अनोळखी अपंग व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. नंतर 2023च्या सप्टेंबरमध्येही अशीच घटना घडली.

वर्षभर पोलीस या गूढ मृत्यूंचा तपास करत होते. संशयितांच्या चौकशीतून आणि पुरावे हातात आल्यानंतर पोलिसांनी अखेर डिसेंबर 2023 महिन्यात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 18 डिसेंबरला छापे टाकून आरोपींना अटक केली.

बेलवंडीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सांगतात, “2011 पासून या भागात 71 अनोळखी व्यक्तींचे मृतदेह सापडले. या भागात एकही औद्योगिक वसाहत नाही, त्यामुळे कामासाठी बाहेरुन येणाऱ्यांची संख्या इतकी कशी याबद्दल संशय बळावत होता.”

घटनांचा तपास करत असताना बेलवंडी पोलिसांना खबऱ्यांकडून माहीती मिळाली की, ‘या तालुक्यात काही स्थानिकांच्या टोळ्या काही माणसांना डांबून ठेऊन त्यांच्याकडून घरची तसंच शेतीची काम करुन घेतात. अनेकदा त्यांना मारहाणही केली जाते. इतकंच नाही तर या लोकांना वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवर भीक मागण्यासाठी पाठवलं जातं. अशा व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह पाण्यात किंवा गोणीत भरुन टाकून देतात.’

वेठबिगारी

फोटो स्रोत, Pravin Thackeray/BBC

याच संदर्भात अशा गुलाम केलेल्या काही जणांना विटभट्ट्यांवर आणि शेतात कामावर ठेवल्याची खात्रीलायक बातमी मिळाली असं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांची स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली आणि बेलवंडी परिसरात शोधमोहीम सुरू झाली.

बेवारस मृतदेहांचा तपास करताना...

पोलिसांनी बेलवंडी परिसरातील आठ ठिकाणी छापे टाकून 12 पुरुष आणि 1 महिला अशा 13 वेठबिगारांची सुटका केली, तर घटनेतील 11 आरोपींपैकी 5 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं.

या शोध मोहीमेत पोलिसांनी अनेक घरांमध्येच नाही तर शेतातही छापे घातले. खरातवाडीतील अशाच एका घरातून सलमान उर्फ करण कुमार या तरुणाची सुटका करण्यात आली.

पिलाजी भोसले याने त्याला गुलाम बनवलं होतं. घोटवी शिवारात बोडखे मळा इथे अमोल गिरीराज भोसले याच्याकडे बिहारचा ललन सुखदेव चोपाल हा वेठबिगार सापडला. त्याचीही पोलिसांनी सुटका केली.

करण

फोटो स्रोत, Pravin Thackeray/BBC

फोटो कॅप्शन, करण

याच शिवारातील अशोक दाऊद भोसले आणि जंग्या गफूर काळे यांच्याकडे भाऊसाहेब हरिभाऊ मोरे यांना डांबून ठेवलं होतं, त्यांनाही पोलिसांनी सोडवलं. भाऊसाहेब बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील चनाई या गावचे आहेत.

सुटका करण्यात आलेल्या वेठबिगारांची ओळख पटवायचं काम सुरू आहे. त्यांच्या कहाण्या मन सुन्न करणाऱ्या आहेत.

बबलू, नरशिम, कल्लू, सिद्धीश्वर, प्रकाश भोसले, वसिम, जन्सूर अली, गणेश, प्रवीण, वीरसिंग या पीडित व्यक्तींबद्दल अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे. त्यांना आपलं पूर्ण नाव आणि मूळ पत्ता सांगता येत नाही. सुटका केलेल्या पैकी फक्त तिघांना आपलं नाव आणि पत्ता सांगता आला आहे.

‘पिलाजी येऊन घेऊन जाईल’

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

करण मूळचा छत्तीसगडचा आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या गावातून भरकटल्यानंतर तो हैदराबाद रेल्वे स्टेशनला निराधार म्हणून राहू लागला. तो भीक मागून आपली गुजराण करत होता. त्याच्यावर मानसिक आघात झाला असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. पिलाजी भोसले नावाच्या आरोपीने त्याला जेवण आणि कपडे देतो म्हणत श्रीगोंद्याला आणलं, आणि गुलाम बनवलं.

पिलाजीकडे तो शेतीला पाणी देणं, शेण काढणं, जनावरांची देखभाल अशी कामं करायचा. करण सांगत होता- “मालक इलेक्ट्रिक वायरने मारायचा. डोळ्याच्यावर झालेली मोठी जखम झाली होती. सकाळी नाश्त्याला तिखट मिरची द्यायचे. कधी जखमेवर मिरची लावायचे.”

करणला पिलाजीने फक्त अर्धवट जेवण दिलं, पैसे मात्र दिले नाहीत. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर मोटरसायकलने पाठलाग करत त्याला पुन्हा शेतावर नेण्यात आलं.

करणला आपला पत्ता, कोणी नातेवाईक काहीच आठवत नाहीत. त्याला अंधुकसं आठवतंय ते त्याच्या भावाचं नाव-बबलू. तो सांगतो भाऊ दिल्लीत बसवर काम करतो.

सलग एक वाक्यही न बोलता येणाऱ्या करणला कुठे दुसरीकडे जायची भीती वाटतेय. तो पोलिसांना सांगतोय की- मला अहमदनगरला तुमच्यासोबत राहू द्या.

दुसरीकडे कुठे राहिलो तर पिलाजी येऊन घेऊन जाईल. त्याच्या मनातली दहशत अजूनही डोकं वर काढतेय. पोलीस घराघरात जाऊन चौकशी करत होते तेव्हा पिलाजीने करणला शेतात पळून जायला सांगितलं होतं. पण करण उलट पोलिसांकडे आला आणि त्यामुळेच त्याची सुटका करणं शक्य झालं.

‘मुंबईत स्टेशनवर भीक मागायचो’

बिहारच्या समस्तीपुरचे लल्लन सांगतात- ते गुजरात मध्ये राईसमिलवर काम करत होते. साबरमती ट्रेनने बिहारमधून गुजरातला येत असताना त्यांना वाटेत स्टेशनवर जबरदस्तीने उतरवण्यात आलं.

शेतीकाम आणि स्वयंपाक करण्यासाठी तसंच मुलांना शाळेत सोडण्याचं काम जबरदस्तीने देण्यात आलं. आजारी असतानाही कामाची सक्ती केली जात होती. मालकाने म्हणजेच अमोल भोसलेने भीक मागण्यासाठी 10-12 लोक लिंबूच्या बागेत लपवून ठेवले होते.

लल्लन यांनी मालकाकडून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही माग काढून पुन्हा आणलं गेलं. आणि पाय तोडण्याची धमकी दिली.

पोलिसांच्या अंदाजानुसार लल्लन यांचं वय 45च्या आसपास आहे.

भाऊसाहेब, बीड

फोटो स्रोत, Pravin Thackeray/BBC

फोटो कॅप्शन, भाऊसाहेब, बीड

वेठबिगारीत असलेल्या लल्लन यांना कुणाशीही बोलायची बंदी होती. ते सांगतात- “अमोल भोसले बाहेरुन माणसं आणून 20-25 दिवस बागेत ठेवायचा. त्यांच्याकडून काम करुन घ्यायचा. सुरुवातीला मला मुंबईत बोरिवलीमध्ये त्याच्या इतर माणसांबरोबर भीक मागायला पाठवलं.

अंधेरीला राहायचं आणि दिवसभर बोरिवलीत ब्रिजच्या खाली आम्ही भीक मागायचो. जमलेले पैसे तो स्वतःकडे ठेवून घ्यायचा. दारू प्यायचा.”

लल्लन आता लवकरच घरी परततील. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि मुलगा आहे.

आंबेजोगाईच्या चनाई गावचे भाऊसाहेब मोरे ऊसतोड मजूर आहेत. मुकादमाच्या शोधात असताना ते स्टेशनवर आले. पिलाजी भोसलेने त्यांना फसवून श्रीगोंद्याला आणलं. त्यांना शेतात जुंपलं आणि मारहाणही केली.

गुलामांना शेतात लपवलं

सर्व पीडितांना गुलाम बनवण्यासाठी भारतातल्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरुन आणलं गेलं. मुंबई, दिल्ली, हैदराबाद इथून फसवून आणलं, इतका छळ केला की त्यांची मानसिक स्थिती कमकुवत झाली. पोलिसांच्या मते, कदाचित मानसिकरित्या कमकुवत असणाऱ्या लोकांनाच या टोळ्यांनी हेरलं असावं.

माणसांना गुलाम म्हणून वागवणारे आरोपी गावात राहत नव्हते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यांचा मेंढपाळ आणि शेळीपालन हाच मुख्य व्यवसाय असल्याचे ते दाखवत होते. त्यामुळे इतर गावकऱ्यांना त्यांची फारशी माहिती नाही. आरोपी एरव्ही आपली गुन्हेगारी कृत्य करत असताना वेठबिगार घरी शेती आणि जनावरे सांभाळण्याचे काम करीत.

बीबीसीने कोळगाव आणि घोटावी इथे पोलीस चौकशी करत असताना आरोपींची घरं पाहिली. ग्रामीण भागातल्या एका छोट्या खेड्यातल्या दूर वस्तीवर वेठबिगार आणून कामाला जुंपणं त्यांना म्हणूनच सोपं गेलं. दहशतीमुळे कोणीही हटकणं शक्य नव्हत.

काही ठिकाणी वेठबिगारांना जनावरांसाठी असलेल्या खुराड्यात ठेवलं होतं. तर त्यांचं जेवणाचं भांडही वेगळं होतं. दुसर्‍या एका ठिकाणी ज्वारीच्या शेतात वेठबिगारांना लपवलं होतं. एका घरात मालक खाटेवर झोपायचा तर वेठबिगार खाली... ना अंथरूण, ना पांघरून... जमिनीवर झोपायचा.

वेठबिगार महिलेची जीभ कापली

सध्या सुटका केलेले हे वेठबिगार अहमदनगरमधील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अरनगाव येथील मानवसेवा प्रकल्पात आहेत. या सेवाभावी संस्थेत त्याचं समुपदेशन तसंच त्यांच्यार मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत.

बीबीसीने अरनगावच्या संस्थेला पोलिसांसोबत भेट दिली. वेठबिगारीतून सुटका करणाऱ्या पोलीस दलातील ओळखीच्या चेहर्‍यांना बघितल्यावर पीडितांचे चेहरे खुलले होते. मूक असणारी एक महिला खाणाखुणा करत तिच्यासोबत काय झालं हे सांगण्याचा प्रयत्न करत होती. वेठबिगारीसाठी टोळीतल्या लोकांनी तिची जीभ कापली असा, संशय पोलिसांना आहे.

वेठबिगारी

फोटो स्रोत, Pravin Thackeray/BBC

आता पोलीस पीडितांच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत. “यातले काही वेठबिगार 4-5 वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता असण्याच्या तक्रारी शोधणं कठीण काम आहे. शिवाय त्यांच्या चेहरेपट्टीत आणि शारीरिक बदलामुळे शोध घेण्यात अडचणी येत आहेत.”

“त्यांना बोलते करण्यासाठी सहा महिने देखील लागू शकतात. सुटका झाल्यानंतर त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती. खूप काळ त्यांचं शोषण झालेलं असल्याने त्यांना बोलतं करणं हे मोठं आव्हान आहे.” संस्थेचे व्यवस्थापक सिराज शेख सांगत होते.

गुन्हेगार पोलिसांना चकवा द्यायचे

मानवी तस्करीच्या आणि वेठबिगारीच्या या रॅकेटमध्ये स्थानिक गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय आहेत, असं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सांगतात.

“या टोळ्यांकडील एखाद्या वेठबिगाराचा मृत्यू झाला तर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोत्यात भरून ते निर्जनस्थळी ठेवत होते. हे ते जाणून बुजून करत. पोलीस यंत्रणा या खुनाच्या तपासात व्यस्त होत. त्यामुळे टोळीतल्या गुन्हेगारांचं फावत असे. गुन्हेगारांनी केलेल्या घरफोडयातसंच आर्थिक लुटमारीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याकडे पोलीस प्राधान्य देत नसत. यासाठीच गुन्हेगारांनी वेठबिगारीचा असा वापर केला, अशी त्यांच्या कामाची पद्धत लक्षात येतेय”

त्याचा तपास करताना श्रीगोंदातील काही गुन्हेगार शेतमजूर म्हणून लोकांना देशातल्या इतर भागांतून आणून ठेवतातय. त्यांना मारहाण करतात, अर्धवट उपाशी ठेवून त्यांच्या अन्नात गांजा टाकतात, जेणेकरुन अंगमेहनतीच्या कामाला जुंपता येईल. ही माहिती पोलिसांकडे होती.

पोलिसांनी आतापर्यंत चारुशिला रघुनाथ चव्हाण, रघुनाथ रायफल चव्हाण, झिलुर रायफल चव्हाण, अमोल गिरिराज भोसले, आबा जलिंदर काळे, दालखुश मुकींदा काळे, नंदू किलचंद गव्हाणे, सागर सुदाम गव्हाणे, आब्बास संभाजी गव्हाणे, सचिन जयसिंग गव्हाणे, काळुराम पाटीलबा पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

त्यांच्यावर मानवी तस्करी आणि गुलामगिरी संबंधित भारतीय दंड संहिता कलम 367, 370, 342, 323, 504, 506, 34 आणि वेठबिगार अधिनियम कायदा कलम 16 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आधीही दाखल झालेले आहेत. त्यांना कायद्याची नीट माहिती असल्याने ते कोणतीही कबुली देत नाहीत, असं पोलिसांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)