दिवसभर विहिरीत काम, पळू नये म्हणून रात्रभर पायात बेड्या; अमानुष छळाचा प्रकार उघडकीस

फोटो स्रोत, Pravin Thakare/BBC
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारी वेठबिगारीची घटना उघडकीस आली आहे.
उस्मानाबादच्या भूम तालुक्यात विहिरीचं काम करणार्या ठेकेदारानं दलालामार्फत मजूर खरेदी करून त्यांना 12 ते14 तास कामाला जुंपल्याचं समोर आलंय.
या मजुरांपैकी एकाच्या पायाला जखम झाली. ही जखम चिघळल्यानंतर औषधोपचार केला गेला नाहीच, उलट कामातूनही सूट दिली गेली नाही. शिवाय, हे मजूर पळून जाऊ नयेत म्हणून या सर्वांना साखळदंडाने बांधून ठेवले होते.
या मजुरांपैकी फक्त दोघांकडे मोबाईल होते. कुणाशी संपर्क होऊ नये म्हणून त्या दोघांकडूनही मोबाईल काढून घेतले होते. शिवाय, सर्व मजुरांच्या खिशातील कागदपत्रेही हिसकावून घेण्यात आली होती. कुणी विरोध केला तर लकडी दांडक्याने आणि मशीनच्या पाइपने मारहाण केली जायची. अत्यंत पाशवी पद्धतीने काम करून घेतल्यावर सर्व मजुरांना जबरदस्तीने दारूमिश्रित पेय दिले जायचे आणि त्यामुळे मजूर गुंगी येऊन झोपून जायचे.
पोलिसांकडून काय माहिती मिळाली?
पोलिसांना हा अमानुष प्रकार समजल्यावर त्यांनी दोन ठिकाणाहून 11 मजूर सोडवले.
या प्रकरणात पोलिसांनी 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये दोन महिला आहेत. यातील एक महिला आणि एका अल्पवयीन आरोपीसह 3 जणांना ताब्यात घेतले आहे. यापैकी तीन आरोपींना आधी तीन आणि नंतर चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 11 जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. हे सर्व लोक वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत. हे सर्वजण वेगवेगळ्या कामानिमित्त महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या रेल्वे स्टेशन जवळील कामगार अड्ड्यावर आले होते. काहीजण आई-वडिलांशी वाद झाले म्हणून तर काही गावाकडे कामधंदा नसल्याने कमवायला आले होते.
तर एक मजूर मुलीचे लग्न होते म्हणून लग्नाच्या आधी काही पैसे हाताला यावे म्हणून आला होता. मात्र, कामाच्या बहाण्याने एका दलालाने सर्वांना महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात पाठवले. त्यानंतर त्यांना उस्मानाबाद तालुक्यातील वखारवाडी खामसवाड़ी गावात विहिरीत काम करण्यासाठी नेण्यात आले.
मजुरांचा असा छळ केला जायचा
सकाळी सहा-सात वाजल्यापासून संध्याकाळी 7 किंवा काम संपेपर्यंत या मजुरांना विहिरीत काम करायला लावलं जायचं. त्यानंतर रात्री त्यांना काहीतरी खायला दिलं जायचं. मजूर पळून जाऊ नये म्हणून त्यांना साखळीने बांधून ठेवलं जायचं. विरोध केल्यास बेदम मारहाण केली जायची. 14 तास पाण्यात काम केल्याने सर्व मजुरांच्या पायाला गंभीर इजा झाली होती.
यातला एक मजूर प्रणव होता. प्रणव मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील. प्रणवच्या पायाची जखम पूर्णपणे चिघळली असून सुद्धा तो काम करत होता. सध्या प्रणववर औरंगाबादमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारला उशीर झाला असता तर कदाचित पाय गमावण्याची नामुष्की प्रणववर ओढवली असती.
एकूण 11 मजुरांना अशाप्रकारे ओलीस ठेवण्यात आलं होतं. यापैकी 6 मजुरांना वेगळ्या आणि इतर 5 मजुरांना वेगळ्या कामावर नेण्यात येत असे.

फोटो स्रोत, Pravin Thakare/BBC
यातील एक मजूर कसा तरी पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्यानंतर त्याने हा संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर त्या मजुराच्या कुटुंबीयांनी उस्मानाबादमधील ढोकी पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. हा प्रकार ऐकल्यानंतर पोलिसांचाही विश्वास बसला नाही. मात्र मजुरांनी विनंती केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.
त्यानंतर पोलिसांनी या मजुरांची सुटका केली. तसंच, या प्रकरणी 5 आरोपींना ताब्यात घेतलं.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी कंत्राटदार कृष्णा बाळू शिंदे, किरण आणि संतोष शिवाजी जाधव, तसंच अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘पाय सडला तरी काम करून घेत होते’
हिंगोली जिल्ह्यातल्या सेंनगाव तालुक्यातील कावठा गावचे दोघे चुलतभाऊ भगवान घुकसे आणि संदीप घुकसे हे अहमदनगर येथे कामाच्या शोधात आले होते. त्यांना दलालाने काम असल्याचे सांगत सोबत घेतले आणि एका धाब्यावर आणले. तिथे दारू पाजली आणि दिवसभर गाडीत प्रवास सुरू होता.
भगवान घुकसे सांगतात की, “गाडी दिवसभर फिरत होती. संध्याकाळच्या वेळेस गाडी विहीरीजवळ आणण्यात आली. जेणेकरून कुणाला माहिती पडू नये. तिथे आम्हा दोघा भावांना वेगळं करण्यात आलं. संदीपला दुसर्या विहिरीवर पाठवण्यात आले. त्यदिवशी रात्री दारू दिली आणि आम्ही झोपी गेलो.
“दुसर्या दिवशी सकाळी लवकर विहिरीत कामासाठी उतरवण्यात आलं, चहा वगैरे काहीच नाही. माझ्या आधी आलेल्या मजुरांना विचारलं तर समजलं की येथे फक्त दारू मिळते. जेवणाची वेळ नसते. संध्याकाळी काम झाल्यावर दारू देण्यात आली. मी विरोध केला तर मारहाण करण्यात आली. मग काय करणार? हे असेच सुरु राहिले. काही झाले का मारहाण व्हायची. हातात जे मिळेल त्याने, मग दगड असो काठी.

फोटो स्रोत, Pravin Thakare/BBC
“माझ्यासोबत असलेल्या मुलाचा पाय सडला तरी काम करून घेत होते. मला लक्षात आलं की, हे असंच सुरु असणार आहे. जेवायलाही एकच पोळी द्यायचे आणि त्याबरोबर चटणी, त्यावर पाणी टाकून. नाही खाल्ले तर मारहाण आहेच. विरोध तरी कसा करणार? दहशत होती. आंघोळीचा काहीच मेळ नव्हताच. आंघोळ सोडा, पण शौचासाठी पाणीही देत नव्हते. असे दिवस काढले.
“मग विचार केला की असेही मरणार आणि तसेही मरणार, मग एका पहाटे साडेतीन वाजता सटकलो. पायात चप्पल आधीच घालून ठेवली होती. पायाच्या साखळीला छोटे कुलूप होते. ते काढण्यासाठी मी त्याच्या दांडीत बोट टाकले, पण निघेना. बोटही सुजले. शेवटी अर्ध्या तासानंतर उसाच्या कडे-कडेने पळालो. मध्ये पाटही लागले. काहीच अंदाज नव्हता. रेल्वे जात होती, त्या नुसार गेलो.

फोटो स्रोत, Pravin Thakare/BBC
“ताळवेळ गावाला गेलो. गाव होते 4 किलोमीटर, पण मी गोल गोल फिरत गेलो. अडीच तास लागले. एका इलेक्ट्रिकलच्या दुकानात विचारले की, फोन पे आहे का? फोन पेवर घरून 500 रुपये मागवले. तिथून लातूरला गेलो. तेथे भाऊ आणि त्याचे मित्र होते. तिथून पैसे घेवून गावी गेलो. झालेला प्रकार सांगितला आणि 30-40 माणसे दोन गाड्या भरून ढोकी पोलिस स्टेशनला आलो.
“पोलीस स्टेशनला येऊन जेव्हा झालेला प्रकार सांगितला तर साहेब विश्वास ठेवायला तयार नव्हते. असं होऊच शकत नाही म्हणाले. पण मी विनंती केली आणि पोलिसांना जागेवर घेऊन गेलो. तिथे सर्व दाखवले, साखळीही दाखवली, आरोपीला ताब्यात घेऊन भावाची माहिती घेतली आणि त्यालाही सोडवलं. या लोकांचे नेटवर्क आहे. दोनच माणसे विहिरीवर असतात. पण एक फोन झाला की मिनिटात सर्व गोळा होतात.”
‘रात्री दारू पाजायचे, साखळदंडानं बांधायचे’
अमोल निंबाळकर हा वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार येथून आले होता. कुटुंबीयांशी वाद झाला म्हणून तो कामासाठी अहमदनगरला आला होता.
अमोल सांगतो, “नगरला आल्यानंतर रेल्वे स्टेशनवर बसला होतो. तिथे हिंगोलीचे दोन तरुण दिसले. त्यांच्याशी बोलत असताना एक एजंट तिथं आला. एजंटनं आम्हाला विचारलं, तुम्ही काम कराल का? त्यानंतर आम्ही म्हणालो, हो करू. मग त्यानं आम्हाला ऑटोमध्ये बसवलं आणि दारू पिण्याची व्यवस्था केली. आम्हाला दारूच्या नशेत आल्यानंतर त्याने आम्हाला ऑटोमधून जंगलातील एका ढाब्याजवळ सोडलं. त्यानंतर ठेकेदाराची वाहने आणून आम्हा सहा जणांना वाहनांवर बसवून वेगळे केले आणि रात्री विहिरीवर आणल्यावर आम्हाला साखळ्या बांधण्यासाठी ते आले.

फोटो स्रोत, Pravin Thakare/BBC
“आम्ही त्याला विचारलं की, तुम्ही आम्हाला साखळदंडांनी का बांधत आहात? त्यावर त्यानं आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. मला मारलं म्हणून इतर दोघे दहशतीने काही बोलले नाही. त्यानंतर त्यानं आमच्या खिशातून मोबाईल आणि पैसे काढले. सकाळी साडेपाचच्या दरम्यान आम्हाला उठवलं, शौचास गेलो तर त्याचा माणूस मागे, बॅगजवळ गेलो तर दात ही घासून नाही दिले. थेट आम्हाला विहिरीत कामासाठी सोडले आणि 10 वाजता आम्हाला खायला दिलं.
“दुपारी खायला एक भाकरी, त्यावर चटणी किंवा वांगे तिखट पाण्यातले. रात्री जेवण झाले की दारू पाजायचे, त्यामुळे सर्व विसरायचो. नंतर लगेच साखळदंडामध्ये बांधायचे. विहिरीत काम कमी झाले तर लगेच वरतून दगड यायचा. माझ्या हाताला त्यामुळे जखम झाली. ब्लास्टिंग करण्यासाठी दारूगोळा ठोसण्यासाठी एक काठी येते, त्या काठीने मला मारले. ठेकेदारची आई सुद्धा शिवीगाळ करायची. असेच दिवस काढले.

फोटो स्रोत, Pravin Thakare/BBC
“मला तुमच्या फोनवरून घरी फोन करू द्या, असं सुरुवातीला ठेकेदार कृष्णाला म्हटलं. त्यानं एक-दोनदा ऐकलं, तिसर्यांदा थेट मारायची धमकी दिली. गप येथे काम करायचं, असं बजावले, माझ्याबरोबर प्रणव होता. त्याच्या पायाला मोठी जखम झालेली. माझ्या पायालाही पाण्यात काम करून चिखल्या झालेला. मी त्याला ठेकेदार कृष्णाला सांगितलं की, जखम झाली आहे, दवाखाण्यात जाऊ दे. पण ऐकलं नाही. प्रणव एकदा विहीरीच्या मालकाशी बोलला. हे ठेकेदार कृष्णाच्या भावाने ऐकले आणि त्याने कृष्णाला सांगितले. कृष्णाने प्रणवला होज पाईपणे इतके मारले की काही सांगता येणार नाही.
“इच्छा तर होती पळून जाण्याची. पण सकाळी 6 ते रात्रीपर्यंत विहिरीत काम बाहेर आलो की लगेच साखळदंड बांधले जायचे. दोन्ही पायात फक्त एक फुटाचे अंतर, मग पळणार तरी कसं? आजूबाजूला यांच्या नातेवाईकांचे काम चालू. मामा, आत्या मावशी अशा सर्वांनी मला जेव्हा पायाला जखम झाल्यावर डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितलं, तेव्हा त्यानं माझ्या जखमेवर ब्लास्टिंगच्या दारूगोळ्यातील घोटा (केमिकल स्फोटाच्या दारूचा कडक झालेला दगड) लावला. मी असह्यपणे रडत होतो. दोन तास मातीत पाय घासत होतो, एवढा त्रास झाला. पण त्याने दयामाया दाखवली नाही. आता गावी जाणार तेथेच काम करणार. इथे 500 रुपये मिळतात, तिथे दीडशे मिळतील, पण गावीच काम करणार.”
‘ठेकेदाराणे बारूद ठोसायच्या वेताच्या काठीने मारायचा’
वाशिम जिल्ह्यातील मांनोर तालुक्यातील रुई गावचा भारत राठोर हा आईबरोबर राहतो. शेतकामं किंवा मजुरी करून भारत गुजराण करतो. त्याच्या वडिलांचं निधन झालंय.
भारतच्या पायाची आणि डोळ्याजवळची जखम अजूनही भरली नाहीय. तो सांगतो की, “कृष्णा आणि संतोष हे ठेकेदार खूप मारहाण करायचे. मी आणि माझा मित्र कामासाठी आलो होतो. पहिले दलाल आणि नंतर संतोषने आम्हाला दारू पाजली होती. पाण्यात मीठ मिरची आणि वांगे टाकलेली भाजी आणि एक भाकरी आम्हाला जेवायला दिली. त्यानंतर साखळी बांधायला आले तर माझ्या मित्राने संजयने विरोध केला, तर त्याला बेदम मारहाण करण्यात आली.

फोटो स्रोत, Pravin Thakare/BBC
“मी आणि मित्र म्हणालो की, काम करायला आलोय, तर काम करून घे. आमचं आयुष्य तू विकत घेतलं नाहीस. साखळी का बांधतो? खूप मारायचे. शेतकरी यायचे, बघायचे आणि जायचे. मी पाच-सहा विहीरींवर काम केलंय. मला आजार आहे. कापरं भरतं. म्हणून मी इंजिनला हात लावायचो नाही. कारण इंजिनला धरले की कंप सुटतो. त्यावर ठेकेदाराणे बारूद ठोसायच्या वेताच्या काठीने खूप मारलं. काही ठिकाणी गाळ काढायचो. आठ-आठ फूट गाळ असायचा, पण काम संपल्याशिवाय सुटका नव्हती आणि काम नाही केले तर काठीने मार पडायचा. नाहीतर इंजिनचा फुटलेला पाइप होता, तो घेऊन विहीरीत यायचा आणि मारायचा. धाकाने काम तर करावे लागायचे. अशावेळी शौच असो वा लघवी करणं सर्व विहिरीतच करावे लागायचे. मैला मातीबरोबर बाहेर पाठवायचो.
“आता सुटका झाली, पण घरी आईला सांगितलं की, पैसे बुडाले म्हणून पोलिस स्टेशनला आहे. आई म्हटली की, पैसे मिळव नाहीतर नको, पण घरी ये. आई एकटी आहे कसे सांगणार, मला तर माहिती नव्हते की, तिचे ऑपेरेशन झाले आहे. पोटात गोळा होता. महिन्यापूर्वी ऑपरेशन झालेल्या अशा आजारी माणसाला आपली आपबीती कशी सांगणार?”
‘सकाळी विहिरीत उतरवल्यावर रात्रीच बाहेर काढायचे’
नांदेड जिल्ह्यातील आटकुर गावचे मारुती जटाळकर यांचं तीन मुली, पत्नी आणि आई-वडील असं कुटुंब आहे. मोलमजुरी करूनच त्यांचं कुटुंब चालतं. मारुती यांच्यावरच कुटुंबाची भिस्त आहे.
15 मे 2023 रोजी मारुती जटाळकरांच्या मोठ्या मुलीचे लग्न होते. गावाकडे उन्हाळा असल्याने काही काम नव्हते, म्हणून मारुती कामाच्या शोधात नगरला आले आणि दलालाच्या हाती लागले.
मारुती यांचा विचार होता 500 रुपये रोज मिळाले, तर 15-20 दिवस काम करून लग्नाआधी काही रक्कम हाताशी राहील. पण त्यांना ना घरी संपर्क करता आला, ना लग्नाला जाता आलं. आता संपर्क झाला, तेव्हा समजले की मुलीचं लग्नं झालं. घरचे आणि मारुती अक्षरश: रडले.
मारुती सांगतात की, “मी जेव्हा ठेकेदाराला लग्नाचा विषय सांगितला आणि फोन लावून देण्यास सांगितलं, तेव्हा पहिल्यांदा ठेकेदारणे सांगितली की, तुम्हाला पैसे देऊन आणलं आहे. ते पैसे फिटल्याशिवाय पैसे नाही. मारुती यांनी लग्नासाठी फोन पेवर पैसे पाठवा सांगितलं तर त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.”

फोटो स्रोत, Pravin Thakare/BBC
मारुती सांगतात, “रडतच कामाला लागलो. सकाळी विहिरीत उतरवले तर रात्रीच बाहेर, लघवी, शौच विहीरीतच करत होतो. दुपारी भूक लागली आणि रोटी मागितली तर उडवून लावायचे आणि सांगायचे की एकदाच मिळेल. भाकरी करायला लागलो तर कामाचा वेळ जातो.
मारुप यांनी एकूण एक महिना आणि 18 दिवस काम केलं. पण एकही रुपया मजुरी मिळाली नाही. आता ते परत जाण्यासाठी आग्रही आहे. पण काम फक्त गावाकडे करणार आहेत.
पोलिसांनी स्वखर्चानं मजुरांना घरी जाण्याची सोय केली
ढोकी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी सांगितले की, “आम्हाला सांगितले गेले की, काही लोकांना बेड्या बांधून ठेवले आहे आणि त्यांना काम करायला लावले जात आहे. सुरुवातीला आमचा विश्वास बसला नाही, पण नंतर आम्ही एसपी अतुल कुलकर्णी यांना याबाबत माहिती दिली. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक टीम तयार केली.
“पोलिसांचे पथक वाखारवाडी गावात पोहोचले असता, पाच मजूर विहिरीत काम करताना आढळले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, त्यांना दररोज 12 तास काम करायला लावले जाते आणि रात्री साखळदंडाने बांधले जाते. जेणेकरून ते पळून जाऊ नयेत. जवळच्या खामसवाडी गावात आणखी सहा मजूर काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली आणि त्यांचीही अशीच परिस्थिती होती. खामसवाडीतील सहा मजुरांचीही नंतर सुटका करण्यात आली.
“आम्ही मजुरांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, त्यांना दिवसातून एकदाच अन्न दिले जाते आणि विहिरीतच नैसर्गिक विधी करण्यास भाग पाडले जाते. नंतर मानवी कचरा टोपलीत टाकून बाहेर टाकण्यात आला."
सुटका करण्यात आलेल्या सर्व 11 मजुरांना वैद्यकीय उपचार देण्यात आले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी स्वखर्चानं त्यांच्या घरी जाण्याची सोय केली. मालकांनी अजून मजुरांना पैसे दिले नाहीत, पण त्याचा पाठपुरावा पोलीस करत आहेत.
तसेच कामगार आयुक्तालयातील प्रतिनिधी आणि तहसीलदार यांनीही भेट घेतली आहे.

फोटो स्रोत, Pravin Thakare/BBC
पोलीस निरीक्षक जगदीश राऊत पुढे म्हणाले की, “मानवी तस्करीच्या दृष्टिकोनातून पाहत आहोत आणि दोन पोलिस पथके त्यावर काम करत आहेत. आम्हाला आणखी काही एजंट्सबद्दल माहिती मिळाली आहे, जे अशा मजुरांची कंत्राटदारांना विक्री करत आहेत.
“कंत्राटदारांनी मजुरांना एक रुपयाही दिला नाही आणि त्यांचा मानसिक छळ केला. चार-पाच महिने अशा परिस्थितीत मजुराला काम करून दिल्यावर त्याला सोडून दिले जायचे. मजूर पैसे न मागता पळून पळून जायचे.”

फोटो स्रोत, Pravin Thakare/BBC
दरम्यान, पोलिसांनी 18 जून रोजी कंत्राटदार संतोष जाधव, किरण जाधव आणि कृष्णा शिंदे यांना अटक केली. अहमदनगर येथील दलाल मात्र फरार आहे.
भारतीय दंड संहिता कलम 370 (व्यक्तींची तस्करी), 367 (व्यक्तीला गंभीर दुखापत, गुलामगिरी, इत्यादीसाठी अपहरण किंवा अपहरण करणे), 346 (लपून चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करणे) आणि 324 व धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी दुखापत करणे), नुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुटका केलेल्या या मजुरांना शासकीय पातळवरून काही मदत मिळेल का, यावर महसुल व कामगार विभाग चाचपणी करत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








