25 लाख पाकिस्तानी रुपये द्या, तीन महिन्यात युरोपला पोहोचवतो- मानवी तस्करी करणारे लोक कोण?

तरुण
फोटो कॅप्शन, बीबीसीचा गुप्त पत्रकार मानवी तस्कराशी बोलत आहे
    • Author, रेहा कंसारा, सामरा फ़ातिमा और जस्मिन डायर
    • Role, बीबीसी न्यूज

पाकिस्तानच्या क्वेटा येथे राहून माणसांची तस्करी करणारा एक जण लोकांना पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे बाहेर काढण्याचं काम करत होता.

बीबीसीच्या एका गुप्त बातमीदाराला त्याने त्याच्या व्यवसायाचं स्वरूप समजावून सांगितलं.

25 लाख पाकिस्तानी रुपये म्हणजे नऊ हजार डॉलर्स दिले की, तीन महिन्यात सुरक्षित आणि स्वस्थपणे युरोपला पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते असं त्याने सांगितलं.

जर एखाद्याला अशा पद्धतीने पाकिस्तानातून युरोपला जायचं असेल तर आधी पायी प्रवास करून इराणला पोहोचावं लागतं. तिथून टर्की आणि मग पुढे इटली असा प्रवास करून तीन आठवड्यात कसल्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय त्या व्यक्तीला युरोपात दाखल होता येत असल्याची माहिती या मानवी तस्कराने दिली.

हा तस्कर ज्या पद्धतीने हे सगळं सांगत होता त्यावरून खरोखर एखाद्या व्यक्तीला पाकिस्तानातून युरोपला पोहोचता येत असेल असं वाटत होतं.

ज्यांना युरोपात जायची इच्छा आहे अशा व्यक्तींना तो म्हणतो की, "त्यांनी त्यांच्यासोबत खायचं सामान ठेवलं पाहिजे. त्यांच्या पायात चांगल्या दर्जाचे बूट असणं गरजेचं आहे.

त्यांनी दोन ते तीन जोड कपडे सोबत बाळगले पाहिजेत. एवढी तयार केली की बाकी काहीही करण्याची गरज नाही. क्वेटामधून पाणी घ्यायचं, या शहरात यायचं, आम्हाला फोन करायचा आणि मग आमचा माणूस तुमच्या स्वागतासाठी इथे तयार असेल."

माणसांची तस्करी करणाऱ्या आझम नावाच्या या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानची सीमा ओलांडून इराणमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे.

दररोज शेकडो लोक अशा पद्धतीने इराणला जात असल्याचं तो सांगतो. बीबीसीच्या बातमीदाराने त्याच्या भावाला इंग्लंडला पाठवण्याची इच्छा आहे असं सांगितल्यावर आझमने हे सहज शक्य असल्याचं आणि यात कमी जोखीम असल्याचंही सांगितलं.

लोक पाकिस्तानला 'अलविदा' का करत आहेत?

पाकिस्तानात महागाई वाढली आहे आणि त्यासोबतच पाकिस्तानच्या चलनाचं अवमूल्यन झालं आहे आणि म्हणून अनेकांना हा देश वेळीच सोडून परदेशात जायचं आहे.

पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये जवळपास तेरा हजार लोकांनी पाकिस्तान सोडून लिबिया किंवा इजिप्त या देशांचा रस्ता पकडला आहे.

2022 मध्येही सुमारे सात हजार लोकांनी देश सोडला होता.

मात्र अशा पद्धतीने देश सोडू पाहणाऱ्यांचा प्रवास अतिशय जोखमीचा आणि अवघड असतो. याचवर्षी जून महिन्यात ग्रीसच्या किनाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणारी एक छोटी बोट बुडून शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या बोटीवर किमान 350 पाकिस्तानचे नागरिक असल्याचा अंदाज आहे.

पाकिस्तानी स्थलांतरितांचा एक गट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानी स्थलांतरितांचा एक गट तुर्कीतून ग्रीसमध्ये दाखल झाला

आझम म्हणतो की, "जर तुमच्या भावाला रस्त्यात कुणी पकडलं तरीही त्याला त्याच्या देशातच परत पाठवलं जाईल, कुणीही त्याच अपहरण करून खंडणी मागणार नाही."

पण दुसरीकडे लिबियामार्गे पाकिस्तान सोडू पाहणाऱ्या लोकांना स्थानिक गुन्हेगारी टोळ्या आणि सशस्त्र सैनिकांच्या हाती सापडण्याची भीती असते.

तस्करांची मदत घेऊन इटलीला गेलेल्या एका पाकिस्तानच्या व्यक्तीने सांगितलं की या प्रवासात त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर सुमारे तीन महिने त्यांना लिबियाच्या तुरुंगात रहावं लागलं होतं. सईद (नाव बदलण्यात आलेलं आहे) यांच्या कुटुंबीयांनी 2500 डॉलर्सची खंडणी दिल्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली.

युरोपला जाताना लिबियामध्ये त्यांचं अपहरण केलं गेल्याचं त्यांनी सांगितलं.

हे तस्कर त्यांची जाहिरात कुठे करतात? कुणाला लक्ष्य करतात?

पाकिस्तानातील अनेक मानवी तस्कर फेसबुक आणि टिकटॉक सारख्या मुख्य प्रवाहातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्यांच्या अकाउंटवर हजारो फॉलोअर्सदेखील असतात.

मे महिन्यापासूनच बीबीसीने मानवी तस्करीला प्रोत्साहन देणाऱ्या या खात्यांवर पाळत ठेवली होती. यावरूनच बीबीसीला कळलं की हे मानवी तस्कर थेट मेसेज किंवा व्हाट्सअपच्या माध्यमातून पैश्यांची मागणी करतात आणि अशा अवैध सहलीचं नियोजनही करतात.

या अवैध धंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'डिंकी' आणि 'गेम' असे शब्द वापरले जातात. बोटीने प्रवास पूर्ण करण्यासाठी 'डंकी' वापरला जातो आणि एखाद्या व्यक्तीच्या यशस्वी आगमनाचे वर्णन करण्यासाठी 'गेम' हा शब्द वापरला जातो.

सईद
फोटो कॅप्शन, मानवी तस्करीच्या माध्यमातून इटलीत पोहोचलेल्या सईदचे लिबियात अपहरण करण्यात आले होते.

युरोपात जाण्यासाठी पाकिस्तानात तीन प्रमुख मार्ग आहेत. तुर्की, इराण आणि लिबियामधून जाणाऱ्या याच मार्गांचा वापर अशा बेकायदेशीर तस्करीसाठी केला जातो.

ग्रीसमधील स्थलांतरितांच्या बोटीसोबत घडलेल्या दुर्घटनेनंतर आम्ही ज्या तस्करांचा मागोवा घेतला ते आता 'टॅक्सी गेम'ला तस्करीची एक पसंतीची पद्धत म्हणून प्रोत्साहन देत आहेत. हा पूर्व युरोपमधून जाणारा एक छोटा रस्ता आहे.

मानवी तस्कर व्हिडिओ दाखवून लोकांना आकर्षित करतात

तस्करांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जंगलात लपून बसलेल्या आणि मिनीव्हॅनमधून बाहेर पडणाऱ्या स्थलांतरितांच्या गटांचे व्हिडिओ पोस्ट केले जातात.

या पोस्टवर तस्करांची नावं आणि मोबाईल क्रमांक दिलेले असतात. त्यावरूनच ग्राहक आणि हे तस्कर पुढच्या प्रवासाबाबत माहितीची देवाणघेवाण करतात.

आझम या टॅक्सी गेममध्ये निष्णात आहे. त्याच्या म्हणण्यानुसार समुद्री मार्गांचा वापर करून केला जाणारा प्रवास अधिक सुरक्षित आहे मात्र रस्त्यांच्या प्रवासातही काही वेगळे धोके आहेत.

युनायटेड नेशन्स रिफ्यूजी एजन्सी (UNHCR) म्हणते की हिवाळ्यात थंड वातावरणामुळे स्थलांतरित लोक पायी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करतात, त्यांना रस्ते अपघाताचा धोका देखील असतो आणि शेवटी त्यांच्या याच प्रवासात मृत्यूही होऊ शकतो.

सईद
फोटो कॅप्शन, सईद

आम्ही ज्या पाच मानवी तस्करांशी बोललो त्यांनीही याच टॅक्सी मार्गाचा सल्ला दिला.

यापैकी एकानेतर फक्त हजार पाउंड दिले की तो एखाद्या व्यक्तीला अगदी सहज फ्रांसमधून इंग्लंडला घेऊन जाऊ शकतो असा दावा केला.

तक्रारीनंतर 'मेटा'ने पेजेस काढून टाकली

आम्ही आमच्याकडे असणारे पुरावे फेसबुक, व्हाट्सअप आणि टिकटॉकची मालकी असणाऱ्या मेटा नावाच्या कंपनीला दिले आहेत.

आम्ही त्यांना हेही सांगितलं की या पेजेसचा वापर करून अवैध मानवी तस्करीला प्रोत्साहन दिलं जात आहे.

मेटाने आम्ही चिन्हांकित केलेल्या फेसबुक पेज आणि ग्रुपच्या सगळ्या लिंक काढून टाकल्या मात्र हे फेसबुक पेज आणि ग्रुपचालवणाऱ्यांची प्रोफाइल काढून टाकली नाही.

त्यांनी व्हाट्सअप ग्रुप देखील काढून टाकले नाहीत कारण व्हाट्सअपच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनच्या धोरणामुळं अशा ग्रुप्सच्या गोपनीयतेचं रक्षण होतं आणि त्यांचं नियमन करता येत नाही.

मेटा

फोटो स्रोत, Getty Images

टिकटॉकने मात्र आम्ही माहिती दिलेली सगळी खाती त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकली.

त्यांनी दिलेल्या उत्तरात असं लिहिलं होतं की मानवी तस्करीला चालना देणाऱ्यांबाबत ते कठोर कारवाई करतात.त्यांच्या धोरणांचा उल्लंघन करणाऱ्या प्रोफाईल्स आणि पेज त्यांनी हटवून टाकले.

सईद कशाची वाट पाहत आहेत?

सईद सध्या इटलीत आहेत. पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये राहणाऱ्या सईद यांनी सुमारे एक वर्षापूर्वी त्यांचं शहर सोडलं होतं. त्यांच्या परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध नव्हत्या.

यासोबतच भारत प्रशासित काश्मीरच्या सीमेवरही चकमकी झाल्या होत्या आणि त्यांचं घर हे भारत आणि पाकिस्तानच्या प्रत्यक्ष सीमेवर नियंत्रण रेषेजवळ होतं. त्यामुळं त्यांनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला आणि आता गेल्या 10 महिन्यांपासून ते इटलीमध्ये राहत आहेत.

टिकटॉकवर एक ऑनलाईन व्हिडिओ बघितला आणि काही वर्षांपूर्वी युरोपात गेलेल्या त्यांच्या एका मित्राने त्यांना या मार्गाचा वापर करून इटलीत पोहोचण्याची प्रेरणा दिल्याचं ते सांगतात.

ग्रीसमधील एक पाकिस्तानी निर्वासित

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ग्रीसमधील एक पाकिस्तानी निर्वासित

त्यांनी सांगितलं की, "मी ऐकलं होतं की इथे येणं खूप सोपं आहे आणि फक्त 20 दिवसात युरोपला पोहोचता येईल पण हे सगळं खोटं होतं. मला सात महिन्यांहून अधिक वेळ लागला."

आता सईद यांनी इटलीच्या सरकारकडे आश्रयासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जाला उत्तर मिळण्याची सध्या ते वाट बघत आहेत.

बेकायदेशीर मार्गाने इटलीत दाखल झाल्याचा पश्चात्ताप होत असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रवास म्हणजे मृत्यूचा प्रवास होता असंही ते म्हणाले. इटलीमधल्या नवीन आयुष्याचे व्हिडिओ तेही टिकटॉकवर नियमितपणे टाकत असतात.

आमच्या गुप्त बातमीदाराने या मानवी तस्कराला पहिल्यांदा संपर्क केल्याच्या दोन आठवड्यानंतर आम्ही पुन्हा एकदा त्याला कॉल केला. यावेळी आम्ही बीबीसीचे पत्रकार असल्याचं आम्ही त्याला सांगितलं.

आम्ही त्याला अवैध मार्गाने युरोपात जाणाऱ्या या मार्गावर किती मोठी जोखीम आहे याची माहिती देत होतो आणि तेवढ्यात त्याने आमचा फोन कायमचा कट केला.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)