'मला माझ्या आईच्या मृतदेहासोबत वाळवंटात सोडण्यात आले'

- Author, मोहम्मद उस्मान
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"सुदानहून इजिप्तला जाताना त्या मानवी तस्करांनी मला माझ्या आईच्या मृतदेहासोबत वाळवंटात सोडून दिलं."
25 वर्षीय उम्म सलमा (नाव बदललेलं आहे) आणि तिच्या कुटुंबीयांनी युद्धाच्या भीषणतेतून बाहेर पडण्यासाठी एक असा निर्णय घेतला जो त्यांच्या जीवावर बेतला.
इजिप्तमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यासाठी उम्म सलमा आणि तिच्या आईने काही तस्करांची मदत घेतली. उघड्या ट्रक मधून प्रवास करताना उम्म सलमाच्या आईचा मृत्यू झाला.
उम्म सलमा सांगते, "आम्ही ड्रायव्हरला गाडीचा वेग कमी करण्यास सांगितलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. माझ्या 65 वर्षीय आईच्या डोक्याला दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला होता."
आईच्या अशा जाण्याने सलमाच्या अंगातलं बळ हरपलं. आईचा मृतदेह आणि तिच्यासोबत असलेलं सामान घेऊन रडणाऱ्या सलमाला ट्रकमधून उतरविण्यात आलं.
तस्करांनी मृतदेहासोबत प्रवास करण्यास नकार दिला आणि घाबरलेल्या सलमाला तशाच अवस्थेत सोडून निघून गेले.
संयुक्त राष्ट्रांनी सुदानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला 'जगातील सर्वांत मोठं विस्थापितांचं संकट' म्हटलंय. फक्त सलमाच नाही तर अशी हजारो कुटुंबं या संघर्षातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, एप्रिलमध्ये सुदानी सशस्त्र दल (एसएएफ) आणि निमलष्करी गट रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) यांच्यात हिंसक संघर्ष सुरू झाल्यापासून 80 लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, गेल्या दहा महिन्यांत साडेचार लाख लोकांनी सुदान सोडून इजिप्तमध्ये जाण्यासाठी सीमा ओलांडली आहे.
देशाच्या लष्करी नेतृत्वातील संघर्षाचा परिणाम म्हणून गेल्या वर्षी सुदानची राजधानी खार्तूममध्ये भीषण युद्ध सुरू झालं. हे युद्ध देशाच्या सगळ्या भागात झपाट्याने पसरलं. त्यामुळे अनेकांना आपली घरं सोडावी लागली.
हे युद्ध सलमाच्या उम्म डुरमन गावाजवळ पोहोचलं तेव्हा तिने गाव सोडण्याचा निर्णय घेतला. सलमा सांगते, "आमचा जीव धोक्यात होता म्हणून आम्हाला घर सोडावं लागलं."
अनेकांनी सलमाला सांगितलं की, इजिप्तमध्ये कायदेशीर प्रवासासाठी लवकर व्हिसा मिळणं अशक्य आहे. त्यामुळे सलमाने एका मानवी तस्कराशी संपर्क साधला. त्याने सलमाच्या कुटुंबाला सुदानमधून बाहेर काढण्यासाठी प्रति व्यक्ती 300 डॉलर आकारले.
इजिप्त आणि सुदानमधील 1,200 किलोमीटर लांबीच्या सीमेवर मानवी तस्करी सर्रासपणे सुरू असते. हे तस्कर सहसा उत्तर सुदान आणि दक्षिण इजिप्तमधील सोन्याच्या खाणींशी संबंधित असतात. त्यांना या वाळवंटी प्रदेशाचा परिसर माहिती असण्याचं कारण म्हणजे हे लोक या परिसरात काम करतात. शिवाय या लोकांची वाहतूक करण्यासाठी त्यांच्याकडे ट्रकसारखी मोठी मोठी वाहनं असतात.

सलमा आणि तिचं कुटुंब उत्तर सुदानमधील गबाग्बा मध्ये पोहोचलं.
हे शहर मानवी तस्करीसाठी ओळखलं जातं. त्यामुळे स्थानिकांनी त्याला गबाग्बा विमानतळ असं नाव दिलंय.
सलमाला सांगण्यात आलं होतं की, त्यांना वाळवंटातून दक्षिण इजिप्तच्या अस्वान शहरात नेलं जाईल. त्यांना या वाळवंटातून जवळपास आठ तास प्रवास करावा लागला.
मात्र आईच्या मृत्यूनंतर सलमाला गाडीतून उतरविण्यात आलं. ती तिच्या आईच्या मृतदेहासह वाळवंटात अडकली होती. तिच्याकडे ना अन्न शिल्लक होतं ना पाणी.
त्या वाळवंटात अनेक तास वाट पाहिल्यानंतर, सलमाला बघून एक गाडी थांबली. त्या गाडीचा चालक इजिप्तमधून सुदानमध्ये खाद्यपदार्थ आणि इलेक्ट्रिकल वस्तूंची ने आण करायचा.
सलमाने त्या गाडीच्या चालकाला तिच्या आईच्या मृतदेहासह अबू हमाद शहरात नेण्यास कसंबसं राजी केलं. अबू हमादला सुखरूप पोहोचल्यानंतर तिने तिच्या आईचा दफनविधी केला.
धोकादायक प्रवास
सुरुवातीला लोक आमच्याशी बोलायला संकोच करत होते, पण जसंजसं त्यांनी आमच्याशी बोलायला सुरुवात केली तसं आम्हाला समजलं की, ही एकट्या सलामाची गोष्ट नाहीये. मानवी तस्करी करणारे ट्रक भरधाव वेगाने चालवले जातात. त्यांना लवकरात लवकर सीमा ओलांडायची असते.
कैरोमध्ये राहत असलेल्या इब्राहिम (नाव बदललेलं आहे) नामक व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, सुदानची सीमा ओलांडताना त्याच्यासोबत एक माणूस प्रवास करत होता.
ट्रकच्या अपघातात त्या व्यक्तीची मान मोडली आणि मृत्यू झाला. ट्रकमधील इतर लोकांनी विरोध केल्यानंतरही तस्करांनी त्याला वाळवंटात पुरण्याचा आग्रह धरला.

इब्राहिम सांगतो, "प्रत्येक जण घाबरला होता. चालकाने पुन्हा ट्रक हातात घेतला, मी खिडकीतून कबरीच्या दिशेने पाहिले. ट्रकमधील महिला आणि मुलं रडत होती."
इथे लूटमार होणं सामान्य गोष्ट आहे. 60 वर्षीय हलिमा (नाव बदललेलं आहे) यांच्या म्हणण्यानुसार, इजिप्तमध्ये जाण्यापूर्वी त्यांना सुदानच्या वाळवंटात एक भयानक अनुभव आला होता.
त्या म्हणाल्या, "आमचा ट्रक रस्ता चुकला होता, त्यावेळी मास्क घातलेल्या चार बंदूकधाऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यांनी हवेत गोळीबार केला. माझ्या मुलीला कानाखाली मारली आमचं सामान लुटलं. दुसरी गाडी आल्याने ते घाबरले. त्या गाडीचा चालक सुदैवाने मदत करण्यास तयार झाला आणि त्याने आम्हाला सीमेपलीकडे नेलं."
हलिमा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या 25 वर्षांच्या मुलीला इतका मार लागला होता की, इजिप्तमध्ये आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. तिला पॅनिक अटॅक आला होता. तिला श्वास घेता येत नव्हता. तिला वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचं हलिमा यांनी सांगितलं.
बीबीसीने हलिमा यांच्या मुलीचे मृत्यू प्रमाणपत्र पाहिले. श्वसनाचा त्रास असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं यात लिहिलं आहे.
लोक आश्रयासाठी गर्दी करतात
सुदानमधून होणारी मानवी तस्करी थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने इजिप्शियन सरकारशी संपर्क साधला, परंतु त्यांनी अजून प्रतिसाद मिळालेला नाही.
दक्षिण इजिप्तमधील अस्वान येथील सुदानचे राजदूत अब्देल कादर अब्दुल्ला यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 'व्हिसाशिवाय सीमा ओलांडणे हा गुन्हा आहे आणि अधिकाऱ्यांनी लोकांना मानवी तस्करीशी संबंधित धोक्यांबद्दल सावध करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.'
अब्दुल्ला म्हणाले, "सुदानींना कायदेशीररित्या इजिप्तमध्ये प्रवेश करता यावा म्हणून व्हिसा प्रक्रियेला गती देण्यासाठी अस्वानमधील सुदानी दूतावास इजिप्शियन सरकारसोबत काम करत आहे."
महिला आणि मुलांना इजिप्तमध्ये प्रवेश करण्याची परवानगी होती, परंतु सुदानमध्ये लढाई सुरू झाल्यानंतर इजिप्शियन सरकारने नवीन निर्बंध लादले. सुदानमध्ये इजिप्तच्या व्हिसाला जास्त मागणी आहे, कारण इथल्या लोकांना या युद्धातून बाहेर पडायचं आहे.
सुदानी लोक इजिप्शियन व्हिसासाठी उत्तरेला वाडी हाल्फा आणि पूर्वेला पोर्ट सुदान या दोन ठिकाणी अर्ज करू शकतात. बहुतेक लोक वाडी हाल्फाकडे अर्ज करतात, कारण ते अर्जिनच्या जवळ आहे.
सुदान आणि इजिप्तमध्ये जी मुख्य सीमा आहे ती अर्जिन मधून सुरू होते. दुसरीकडे वाडी हाल्फा भागात पायाभूत सुविधा नाहीत.
व्हिसा प्रक्रियेसाठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. अर्ज केल्यानंतर मंजुरीसाठी अनेक महिने वाट पाहावी लागते. निर्वासितांकडे यासाठी फारच कमी पैसा आहे. हे लोक अर्जावर निर्णयाची वाट पाहत असतानाच अनेक रात्री जवळच्या शाळेत किंवा रस्त्यावर कुठेही थांबून काढतात.
सुदानमधून बाहेर पडण्याचा निर्धार केलेल्या सलमाने दुसऱ्या प्रयत्नात कायदेशीर मार्ग पत्करण्याचा निर्णय घेतला. पोर्ट सुदानमधील इजिप्शियन दूतावासात तिने व्हिसासाठी अर्ज सादर केला होता.
दोन महिने वाट पाहिल्यानंतर मात्र तिने हार मानली आणि पुन्हा अवैध मार्ग स्वीकारला. बऱ्याच लोकांना व्हिसा नाकारला जातो, त्यांच्यासाठी वाट पाहणं अवघड होऊन जातं. त्यामुळे साठवलेले पैसे तस्करांना देऊन ते देश सोडण्याचा निर्णय घेतात.
सलमाच्या म्हणण्यानुसार, पहिल्याच प्रयत्नात ही परिस्थिती ओढवल्यानंतर तिने दुसऱ्या मानवी तस्कराशी संपर्क साधला. सलमा सांगते, "यावेळी आम्ही दौऱ्यासाठी अन्न आणि पाण्याची अधिक तरतूद केली."
सलमा सांगते, "दक्षिण इजिप्तची सीमा ओलांडण्यापूर्वी आम्ही सुमारे सहा दिवस वाळवंटात घालवले."
इजिप्तमध्ये पोहोचल्यानंतरही सुदानी स्थलांतरितांची दुर्दशा थांबलेली नाही. त्यांच्याकडे ना निर्वासितांचा दर्जा आहे ना अर्ज. त्यामुळे त्यांना इजिप्त मधून हद्दपार केले जाऊ शकते.
हा अर्ज मंजूर करून घेण्यासाठी त्यांना पुन्हा कैरो किंवा अलेक्झांड्रियाला जावे लागेल.

हजारो सुदानी स्थलांतरित आपली नावं नोंदवण्यासाठी आणि पिवळे कार्ड मिळविण्यासाठी कैरोमधील यूएन उच्चायुक्त केंद्रात रांगेत उभे आहेत. यापैकी बहुतेक स्त्रिया आणि मुलं आहेत.
हलिमा सांगतात, "अर्ज मंजूर करून घेण्यासाठी मी कित्येक तास गारठ्यात उभी होते. मला चार महिन्यांनंतर भेटीची वेळ मिळाली."
त्या सांगतात, "संयुक्त राष्ट्र निर्वासित म्हणून नोंदणी केल्यानंतर पिवळे कार्ड मिळते. हे पिवळे कार्ड मिळाल्यानंतर तो कायदेशीररित्या काम करू शकतो, संयुक्त राष्ट्रांकडून आर्थिक मदत मिळवू शकतो."
हे सगळं इतकं सोपं नसल्याचं इब्तेसाम (नाव बदललेलं) सांगते. तीही एक निर्वासित आहे.
इब्तेसाम गेल्या उन्हाळ्यात मानवी तस्करीच्या माध्यमातून सुदानमधून इजिप्तमध्ये आली. तिच्यासोबत कुटुंबातील 17 जण होते.
इब्तेसामच्या म्हणण्यानुसार, तिच्याकडे पिवळे कार्ड असूनही तिला कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.
ती पुढे सांगते, "माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हे मला कळत नाही. माझा पती हयात नाही. मला दर महिन्याचं भाडं आणि मुलांच्या शाळेची फी भरावी लागते. इथे आम्हाला कोणीही मदत करत नाही."
यूएनएचसीआरच्या प्रवक्त्या क्रिस्टीन बिशाय यांनी इजिप्तमधील सुदानी स्थलांतरितांना भेडसावणाऱ्या त्रासाची कबुली दिली आहे. त्या सांगतात, "संयुक्त राष्ट्रालाही निधीची कमतरता भासत आहे."
त्या पुढे म्हणाल्या की, "आम्ही आमची क्षमता 900 टक्क्यांनी वाढवली आहे. त्यामुळे कोणाला प्राधान्य द्यायचे याचा विचार करायला हवा. इजिप्शियन रेड क्रिसेंटच्या मदतीने आम्ही सीमेवर वैद्यकीय सेवा देत आहोत."
सुदानमधून इजिप्तमध्ये स्थलांतरित झालेल्या उम्म सलमासारख्या लोकांचं जीवन खूप खडतर आहे. पैशांसाठी त्यांना कोणाचा तरी आधार घ्यावा लागतोय.
सलमाच्या म्हणण्यानुसार तिला भविष्याची चिंता आहे. तिला तिच्या मायदेशी परत जायचं आहे मात्र सुदानमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे ते कधी शक्य होईल असं तिला वाटत नाही.











