सौदी अरेबिया : भटक्या टोळ्या, स्वतंत्र राष्ट्र बनण्यासाठी 3 वेळा प्रयत्न ते तेलामुळे आलेली श्रीमंती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सईदूल इस्लाम
- Role, बीबीसी बांगला, ढाका
हिमयुग संपल्यानंतर सुमारे 15 ते 20 हजार वर्षांनंतर सौदी अरेबियाच्या वाळवंटात मानवाने वस्ती करायला सुरुवात केली.
इस्लामच्या प्रसारानंतर हे वाळवंट खलिफाचं मुख्य स्थान होतं. पण त्यांचं वास्तव्य फार काळ टिकलं नाही.
सीरिया, इराक आणि तुर्कस्तान या देशांनी कायम सौदी अरेबियावर शासन केलं आहे.
आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी सौदीने जवळपास तीनदा प्रयत्न केले आणि मग सौदी अरेबिया स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं.
भटक्या बेदोइन लोकांचा देश
सौदी अरेबियाच्या या भागात बेदोइन नामक भटक्या जमाती राहायच्या. इथल्या ज्या कोणत्या जमाती होत्या त्या स्वतंत्र होत्या.
जेम्स वेनब्रँड यांनी आपल्या 'अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ सौदी अरेबिया' या पुस्तकात लिहिलंय की, सध्याच्या बहारिन आणि आसपासच्या किनारी भागात इसवी सन पूर्व 32 व्या शतकात दिलमुन नावाची संस्कृती विकसित झाली.
त्यावेळी त्यांचा सिंधू नदीच्या खोऱ्यातील मेगान (सध्याचे ओमान), बॅबिलोन आणि मेसोपोटेमियासारख्या शहरांशी व्यापार सुरू असायचा.
त्या काळात दिलमुन हे मोत्यांसाठी जगभर प्रसिद्ध होतं. त्यावेळी येमेनला साबा किंवा सेबा या नावाने ओळखलं जायचं, तर जॉर्डनला नाबातायेन नावाने ओळखलं जायचं.
पण अरब खोऱ्यातील लोक त्यांच्या भागाला अल-अरब किंवा अरबांचं बेट असं म्हणायचे. पण त्यांनी स्वतःला अरब असं संबोधन का लावलं हे कळू शकलेलं नाही. यातील बहुतेक लोक भटके होते त्यांना 'बेदोइन' असं म्हटलं जायचं.

फोटो स्रोत, Getty Images
जेम्स वेनब्रॅंड यांनी लिहिलंय की, इसवी सन पूर्व पासून ते दुसऱ्या शतकापर्यंत यापैकी बहुतेक गट रोमवर राज्य करत होते. मात्र नंतर त्यांनी हा अधिकार स्वीकारण्यास नकार दिला.
तिसर्या शतकात 'बेदोइन' जमातीचे लोक एकत्र आले आणि त्यांनी मोठ्या आदिवासी संघाची स्थापना केली, ज्यामुळे त्यांची शक्ती आणखी वाढली. त्यांनी पाचव्या शतकात सीरिया, पॅलेस्टाईन आणि जेरुसलेमवरही हल्ले केले.
मक्का मुस्लिमांच्या ताब्यात कधी आली?
इस्लामच्या प्रसारानंतर, मक्का 630 साली मुस्लिमांच्या ताब्यात आली. तेव्हापासून मदिना येथून इस्लामचा प्रचार सुरू झाला आणि विविध भूभाग मुस्लिमांच्या ताब्यात येऊ लागले.
इस्लाम मधील शेवटचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूपर्यंत जवळजवळ संपूर्ण अरब प्रदेश मुस्लिमांच्या ताब्यात आला होता. तोपर्यंत अरबस्तानातील बद्दू लोकही इस्लामच्या छत्रछायेखाली आले होते. त्यांनी आपापसातील हेवेदावे थांबवून इस्लाम धर्माचा सर्वांगीण प्रसार करण्याचा संकल्प केला.
पुढील शंभर वर्षांत स्पेन आणि भारतासह जगाच्या अनेक भागात इस्लामचा प्रसार झाला. पण त्याचबरोबर इस्लामिक साम्राज्याचे केंद्र हे अरब प्रदेशातून सरकत सरकत दमास्कस आणि नंतर बगदादमध्ये स्थिर झालं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळी अरब प्रदेश हेजाज आणि नजद या दोन भागात विभागला होता. पश्चिम किनारपट्टीच्या क्षेत्राला हेजाज म्हटलं जायचं. त्यात मक्का, मदिना आणि जेद्दाह सारखी शहरं होती. उमय्याद, अब्बासीद, इजिप्शियन आणि ऑट्टोमन यांनी वेगवेगळ्या कालखंडात या भागावर राज्य केलं.
वाळवंट आणि डोंगराळ भागाला नजद म्हणून ओळखलं जायचं. भटक्या आणि युद्धप्रेमी बद्दू जमातीचे लोक इथे राहायचे. या भागात रियाधसारखी शहरं होती. या भागावर कधीही कोणत्याही परकीय लोकांची सत्ता नव्हती. हे लोक स्वतंत्र वृत्तीचे होते.
उस्मानिया किंवा ऑट्टोमन साम्राज्य
सन 1557 मध्ये ऑट्टोमन शासक सुलेमान सलीम पहिला याने सीरिया आणि इजिप्तवर राज्य करणाऱ्या मामलुकांचा पराभव करून हेजाजवर ताबा मिळवला.
सुलतान सलीमने स्वतःला मक्केचा संरक्षक म्हणून घोषित केलं. पुढे त्याने तुर्की साम्राज्याचा विस्तार लाल समुद्राजवळील अरब भागात केला. पण असं असूनही अरबस्तानचा मोठा भाग स्वतंत्रच होता.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सौदी राष्ट्र
मोहम्मद बिन सौद यांनी अरब धर्मगुरू मोहम्मद इब्न अब्दुल वहाब यांच्या मदतीने 1744 मध्ये सौदी अरेबियामध्ये आपलं पहिलं राष्ट्र स्थापन केलं.
मुहम्मद बिन सौद रियाधजवळील दिरिया नावाच्या भागात राहणाऱ्या टोळीचे प्रमुख होते. त्यांनी उस्मानच्या राजवटीपासून दूर होऊन दिरिया अमिरात नावाचं राष्ट्र निर्माण केलं, जे इतिहासातील पहिलं सौदी राष्ट्र होते. ते आजच्या सौदी सारखं अजिबातच नव्हतं.
जेम्स वेनब्रॅंड यांनी त्यांच्या 'अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ सौदी अरेबिया' या पुस्तकात लिहिलंय की, मोहम्मद इब्न अब्दुल वहाब यांना त्यांच्या आदर्शांचा प्रचार करण्यासाठी लष्करी मदतीची गरज होती. दुसरीकडे, मोहम्मद बिन सौद यांना स्वतंत्र अरब राष्ट्राच्या निर्मितीसाठी धार्मिक पाठिंब्याची गरज होती. दोघांनी मिळून नजदला एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
मोहम्मद इब्न सौदचे उत्तराधिकारी असलेल्या अब्दुल अल-अजीझने नंतर ऑट्टोमन शासकांचा पराभव केला आणि कर्बलासह इराकमधील काही भाग ताब्यात घेतला. त्यावेळी शाही घराण्यात विवाहसंबंध जोडून नजद आणि हेजाज प्रांत एकत्र आले.
यानंतर, 1803 मध्ये एका जीवघेण्या हल्ल्यात अब्दुल अल-अजीझचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मुलगा सौद बिन अब्दुल अझीझ याने मक्का आणि मदीना देखील ताब्यात घेतले. परंतु तुर्की लोकांच्या सततच्या हल्ल्यांमुळे हे राष्ट्र फार काळ टिकलं नाही.
1818 मध्ये दिरिया पुन्हा तुर्कांच्या ताब्यात आलं. सात महिन्यांच्या युद्धात शेवटी, अब्दुल्ला इब्न सौदने इजिप्शियन लष्करी कमांडर इब्राहिम पाशासमोर आत्मसमर्पण केलं. नंतर कॉन्स्टँटिनोपलमध्ये त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
तुर्कीच्या इब्ने अब्दुल्ला इब्ने मुहम्मद इब्ने सौदने दुसऱ्यांदा सौदी राष्ट्राची स्थापना केली. तो दिरिया अमिरातीचा शेवटचा शासक अब्दुल्लाचा चुलत भाऊ होता.
पहिल्या सौदी राष्ट्राच्या पतनानंतर तो अल सौद कुटुंबातील इतर अनेक सदस्यांसह पळून गेला. या सगळ्यांनी वाळवंटात एका भटक्या जमातीकडे आश्रय घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
मादाबी अल रशीद यांनी 'ए हिस्ट्री ऑफ सौदी अरेबिया' या पुस्तकात लिहिलं आहे की, "त्याने 1823 मध्ये तुर्की आणि इजिप्तविरुद्ध युद्ध पुकारलं. या युद्धात त्याने रियाध आणि दिरिया पुन्हा ताब्यात घेतलं. त्याने रियाधला राजधानी म्हणून घोषित करताना नजद अमिरात नावाचं दुसरं सौदी राष्ट्रही घोषित केलं.
पण तेही फार काळ टिकू शकलं नाही. 1834 मध्ये इब्ने अब्दुल्ला इब्ने मुहम्मद इब्ने सौदची त्याच्याच चुलत भावाने हत्या केली. यानंतर, 1891 मध्ये दुसरं सौदी राष्ट्र देखील कोसळलं.
या दुसऱ्या सौदी राष्ट्राचा शेवटचा शासक अब्दुल रहमान बिन फैसलने आणि त्याच्या मुलाने मुर्रा नावाच्या बेदोइन जमातीचा आश्रय घेतला."
सध्याचे सौदी अरेबिया
अब्दुल अझीझ बिन अब्दुल रहमान बिन फैसल यांनी 1902 मध्ये रियाध ताब्यात घेतल्यानंतर तिसऱ्यांदा सौदी राष्ट्राची स्थापना केली. त्यांना इब्न सौद या नावानेही ओळखलं जातं. मात्र त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्राला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली नाही.
इतिहासकार जेम्स वेनब्रांड लिहितात की, "जेव्हा इब्न सौद रियाध काबीज करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत फक्त 40 लोक होते. पण रियाधच्या वाटेवर बेदोइन जमातीचे अनेक लोक त्यांच्या सोबत सामील झाले. त्यावेळी, मक्का आणि मदीनासह सौदी अरेबियाचा बहुतेक भाग ऑट्टोमन शासकांच्या ताब्यात होता."
दुसरीकडे, हेजाज प्रांत शरीफ हुसेन नामक शासकाच्या ताब्यात होता आणि नजद इब्न सौद यांच्या ताब्यात होता. पण त्यांना नजदमधील रशीदींविरुद्ध युद्ध चालूच ठेवावं लागलं होतं.
त्यावेळी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि रशियासह अनेक परकीय शक्ती त्या क्षेत्रावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर शरीफ हुसेन ब्रिटिशांना जाऊन मिळाले. त्यावेळी ब्रिटिश सैन्याने ऑट्टोमन साम्राज्याविरुद्धच्या लढाईत अरबांना मदत केली. प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांनी शस्त्रास्त्रांचा पुरवठाही सुरू केला.

फोटो स्रोत, Getty Images
पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर सौदी अरेबिया ऑट्टोमन शासकांच्या हातातून गेलं. पण युद्ध संपल्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्सने एका गुप्त करारानुसार मध्यपूर्वेतील बरेच भूभाग आपापसात वाटून घेतले. त्यावेळी शरीफ हुसेन आणि इब्न सौद यांच्यात अरब क्षेत्रांवर ताबा मिळवण्यासाठी युद्ध सुरू झालं.
मादाबी अल रशीदने आपल्या पुस्तकात लिहिलंय की इब्न सौदने प्रथम रशिदींचा पराभव केला आणि नजद ताब्यात घेतलं. यानंतर 1924 मध्ये हज यात्रेकरूंवर हल्ला केल्याचा आरोप करत त्यांनी हेजाजमध्ये लष्करी मोहीमही सुरू केली.
दरम्यान, शरीफ हुसेन आणि ब्रिटनच्या संबंधांमध्ये वितुष्ट येऊ लागलं. ब्रिटीशांची मदत न मिळाल्याने शरीफ यांना आपला भाग सोडून पळून जावं लागलं. त्यानंतर इब्न सौदने हेजाज आणि नजदवर ताबा मिळवला.
1926 मध्ये, मक्का-मदीना आणि जेद्दाहवर नियंत्रण मिळवून अब्दुल अझीझ बिन सौदने स्वतःला हेजाजचा बादशाह घोषित केलं. याआधीच त्यांनी नजदचा सुलतान अशी पदवी धारण केली होती. त्यानंतर पुढच्याच जानेवारीमध्ये त्यांनी नजद आणि हेजाजचं विलीनीकरण करून 'किंगडम ऑफ नजद आणि हेजाज' निर्माण करण्याची घोषणा केली.
त्यासाठी त्यांनी ब्रिटीश सरकारशी करार करून मान्यताही मिळवली. त्यावेळी ते स्वतःला इमाम म्हणवून घ्यायचे. पण सरकारी कामकाजात त्यांना बादशाह म्हटलं जायचं.
सौदी अरेबिया हे राष्ट्र कधी अस्तित्वात आलं?
यानंतर त्यांनी अरबांना त्यांची पारंपारिक जीवनशैली बदलण्याचे आदेश दिले. इब्न सौदने बेदोइन जमातींमध्ये आपापसात होणाऱ्या मारामाऱ्या, हल्ले आणि लुटमारीवर बंदी घातली.
18 सप्टेंबर 1932 रोजी इब्न सौद यांनी हेजाज आणि सौद यांना एक देश म्हणून घोषित करणारा शाही हुकूम प्रसिद्ध केला.
त्यानंतर, 23 सप्टेंबर रोजी त्यांनी एक शाही आदेश प्रसिद्ध केला. यात असं म्हटलं होतं की, आतापासून अरब भूभाग अल मामलाकातूल अराबिया आस सौदीया किंवा सौदी अरेबियाच्या नावाने ओळखला जाईल. पण तोपर्यंत सौदी अरेबियातील बहुतेक लोकांना भटक्या जीवनशैलीची सवय झाली होती. त्यांची आर्थिक स्थितीही फारशी चांगली नव्हती.
मात्र तेलाचा शोध लागल्यानंतर या भागाचं चित्र बदललं. 1922 मध्ये सौदी अरेबियामध्ये तेलाचं उत्खनन सुरू झालं.
कार्ल अॅश विट्सेलने एक अमेरिकन नागरिक चार्ल्स क्रेनच्या मदतीने 1932 मध्ये सौदी अरेबियात येऊन तेलाच्या शोधात सर्वेक्षण सुरू केलं.
त्यानंतर 1935 पासून ड्रिलिंग सुरू झालं आणि 1938 मध्ये पहिल्यांदा तेलाचं उत्पादन सुरू झालं.
तेव्हापासून सौदी अरेबियाचा चेहरामोहरा बदलू लागला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








