सहाशे वर्षांची सत्ता, तीन खंडांमध्ये पसरलेलं साम्राज्य; ही शक्तिशाली राजवट कोणती होती?

ऑटोमन साम्राज्य

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नॉर्बर्टो परेडेस
    • Role, प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

1 नोव्हेंबर 1922 रोजी तुर्कीच्या राष्ट्रीय संसदेने सुलतानशाही समाप्त झाल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे इतिहासाला ज्ञात असलेल्या सर्वात महान महासत्तांपैकी एक पण मरण पंथाला लागलेल्या ऑटोमन साम्राज्याची शेवटची वीट निखळून पडली.

त्या दिवशी जवळपास 600 वर्ष सत्तेवर असलेलं राजघराणं इतिहासजमा झालं आणि दुसऱ्या बाजूला प्रजासत्ताक तुर्कीचा उदय झाला.

1299 मध्ये स्थापन झालेल्या उस्मानी राजवंशाने तीन खंडांवर आपलं अधिराज्य गाजवलं. यात आताचा बल्गेरिया, इजिप्त, ग्रीस, हंगेरी, जॉर्डन, लेबनॉन, इस्रायल, पॅलेस्टिनी प्रदेश, मॅसेडोनिया, रोमानिया, सीरिया, सौदी अरेबियाचा काही भाग आणि उत्तर आफ्रिकेच्या किनारी भागाचा समावेश होता.

शिवाय अल्बानिया, सायप्रस, इराक, सर्बिया, कतार आणि येमेन यांसारखे इतर अनेक देश देखील अंशतः ऑटोमन साम्राज्याचा भाग होते.

पण यातल्या बहुतांशी राष्ट्रांचा शाही इतिहास इतका वादग्रस्त आहे की त्यांना या इतिहासाच्या त्या स्मृती नको आहेत. पण तुर्कस्तान मात्र त्यांच्या या शाही इतिहासाला सुवर्णकाळ असल्याचं मानतो.

उस्मान (पहिला) सेल्जुक साम्राज्याचा राजा होता. त्याच्याच राज्याच्या शेजारी असलेल्या बायझन्टाईन साम्राज्याची पडझड सुरू झाली होती. उस्मानने ही संधी हेरली आणि 1299 मध्ये अनातोलिया ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. आज हा प्रदेश तुर्कस्तान म्हणून ओळखला जातो.

अशा प्रकारे उस्मान तुर्की राज्याचा संस्थापक आणि पहिला सुलतान बनला.

उस्मानच्या वंशजांना पुढे ऑटोमन म्हटलं जाऊ लागलं. याचा उच्चार काहीवेळा ओटमन किंवा ओथमन असाही केला जायचा. पण या ऑटोमन वंशाने जवळपास सहा शतकं बलाढ्य राष्ट्रावर राज्य केलं.

कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव

पॅरिस डिडेरोट विद्यापीठातील ऑटोमन आणि मध्य पूर्व इतिहासाचे प्राध्यापक ऑलिव्हियर सांगतात की, 1299 मध्ये फक्त तुर्की राज्याची स्थापना झाली होती. पुढे 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला तसा ऑटोमन साम्राज्याचा विस्तार होऊ लागला.

सुलतान मेहमत द्वितीयने हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या बायझन्टाईन साम्राज्याचा पाडाव केला. त्यानंतर बहुतेक स्थानिक लोकांच्या हत्येचा आदेश दिला. तर बाकीच्यांना निर्वासित व्हायला भाग पाडलं.

त्यानंतर त्याने ऑटोमन साम्राज्यातील लोकांना आणून हे शहर पुन्हा वसवलं.

ऑटोमन साम्राज्य

फोटो स्रोत, Getty Images

मेहमत द्वितीयने कॉन्स्टँटिनोपलचं नाव बदलून इस्तंबूल ठेवलं. इस्तंबूल म्हणजे इस्लामचं शहर. त्याच्या कारकीर्दीत या शहराची पुनर्बांधणी सुरू झाली.

राजकीय आणि लष्करीदृष्ट्या या शहराला महत्व प्राप्त झालं. इस्तंबूल आता ऑटोमन साम्राज्याची राजधानी बनलं होतं. युरोप, आफ्रिका आणि आशियाला जोडणारं हे शहर एक महत्त्वाचं जागतिक व्यापाराचं केंद्र बनलं.

या साम्राज्याला आर्थिक सामर्थ्य लाभलं ते मेहमत द्वितीयच्या आर्थिक धोरणांमुळे. त्याच्या राज्यात व्यापारी आणि कारागीरांची संख्या मोठी होती.

त्याने अनेक व्यापाऱ्यांना इस्तंबूल मध्ये येऊन व्यापार सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी देखील हेच धोरण पुढे सुरू ठेवलं.

यशाची पायरी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ऑटोमनांच्या सत्तेमध्ये प्रतिद्वंद्वींना नेस्तनाबूत करून सत्ता केवळ एकाच व्यक्तीकडे केंद्रित व्हायची. याविषयी बाउक्वेट सांगतात की, हे साम्राज्य अनेक कारणांमुळे यशस्वी झालं. मात्र यातलं मुख्य कारण म्हणजे आर्थिक-लष्करी वैशिष्ट्य.

त्यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितलं की, "हे असं राज्य होतं ज्याचा आर्थिक आधार लष्करी विजयावर अवलंबून होता. एकापेक्षा अधिक राज्य काबीज करून त्यांच्याकडून कर वसूल करणं आणि नवी संपत्ती मिळवणं हेच त्यांचं धोरण होतं."

इतर इतिहासकारांच्या मते, साम्राज्यातील आणखी एक शक्ती म्हणजे त्यांचं लष्कर.

ऑटोमन लष्करात जलद हल्ले करणारं विशेष सैन्य दल होतं. यात जेनिसरीजचं एक दल होतं जे सुलतानची रक्षा करायचं. एक घोडदळ होतं ज्याच्याकडे कर गोळा करण्याची जबाबदारी होती.

ऑटोमन साम्राज्यात अति केंद्रीकृत नोकरशाही होती. यामुळे संपत्तीचे वितरण नीट व्हायचं. यासाठी इस्लामची प्रेरणा आणि एकजूट होती. शिवाय या साम्राज्याचा शासकही एकच होता.

बाउक्वेट सांगतात, "हा एक बहु-सांप्रदायिक समाज होता आणि या समाजात कोणतंही सक्तीचं धर्मांतर होत नव्हतं असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात काही प्रदेशांमध्ये इस्लामीकरणाचे धोरण अस्तित्वात होतं."

ऑटोमन्स त्यांच्या व्यावहारिकतेसाठी देखील प्रसिद्ध होते. त्यांनी इतर संस्कृतींमधून चांगले विचार घेतले आणि ते स्वतःचे बनवले.

सुलेमान- द मॅग्निफिसेंट

या साम्राज्यातील सर्वात प्रसिद्ध सुलतानांपैकी एक म्हणजे सुलेमान. त्याने 1520 ते 1566 पर्यंत राज्य केलं आणि आपलं राज्य बाल्कन आणि हंगेरी पर्यंत वाढवलं. या राज्याची सीमा रोमन शहर व्हिएन्नाच्या वेशीपर्यंत जाऊन पोहोचली.

त्याकाळातील लोकांनी सुलेमानला 'पृथ्वीवरील अल्लाहचा उपपंतप्रधान', 'या जगातील लोकांचा स्वामी' अशी अनेक अतिशयोक्तीपूर्ण विशेषण दिली होती. पण यातून त्याचं महत्व दिसून येतं.

सुलेमान द मॅग्निफिसेंट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुलेमान द मॅग्निफिसेंट

त्याच्या सर्वात वादग्रस्त नावांपैकी एक म्हणजे 'पूर्व आणि पश्चिमेचा सम्राट'. त्याच हे नाव रोमन साम्राज्यासाठी थेट आव्हान होतं असं इतिहासकारांना वाटतं.

सुलेमानच्या काळात ऑटोमन साम्राज्याने जास्तीत जास्त प्रादेशिक विस्तार केला. मात्र पश्चिमेसाठी हा सुवर्णकाळ मानला जातो. कारण त्यावेळी पश्चिमेत मोठ्या प्रमाणात लष्करी मोहिमा पार पडल्या आणि यशस्वी देखील झाल्या.

सार्वभौम साम्राज्याची कल्पना

'पूर्व आणि पश्चिमेचा सम्राट' या नावातून सुलेमानला दाखवून द्यायचं होतं की आमच्याशी बरोबरी करणारं दुसरं कोणीही नाहीये.

इतिहासकार ऑलिव्हियर बाउक्वेट सांगतात की, "ऑटोमन सुलतानाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता सम्राट अस्तित्वातच नव्हता."

सार्वभौम साम्राज्याची कल्पना बायझंटाईन आणि इस्लाममधून आल्याचं बाउक्वेट सांगतात.

ते म्हणतात, त्यांना इस्लाम जगाताच्या बाहेरील सर्व प्रदेश जिंकायचे होते.

ऑटोमन

फोटो स्रोत, Getty Images

ऑटोमन साम्राज्याच्या सैन्यासाठी कोणतीच सीमा वर्ज्य नव्हती. इतर प्रदेशांवर विजय मिळवण्यासाठी त्यांचं मार्गक्रमण सुरूच होतं. त्यामुळेच ऑटोमन साम्राज्य इतकं पसरलं.

बाउक्वेट सांगतात, "ज्या क्षणी विजय मिळवणं कठीण होतं किंवा थांबतं त्या क्षणी साम्राज्य कमकुवत व्हायला सुरुवात होते."

अंताची सुरुवात

इतिहासकारांनी लिहिलंय की, सोळाव्या शतकापासूनच ऑटोमन साम्राज्याची भरभराट कमी होऊ लागली. 1571 मध्ये कॅथोलिक राज्यांनी बनलेला गट स्पॅनिश राजेशाहीच्या नेतृत्वाखालील ऑटोमन साम्राज्याच्या विरोधात उभा ठाकला होता. या लेपॅंटोच्या लढाईत ऑटोमन साम्राज्याला पराभवाचा सामना करावा लागला.

त्यामुळे प्रतिस्पर्धींच्या तुलनेत त्यांची लष्करी शक्ती कमी झाली आणि लष्करी विस्ताराचा अंत झाला.

18 व्या शतकात, ऑटोमन राजवटीविरुद्ध अनेक देशांमध्ये बंडखोरी सुरू झाली आणि साम्राज्याला उतरती कळा लागली.

20 व्या शतकाच्या सुरुवातीस ऑटोमन साम्राज्याच्या कमाईचे प्रमुख स्त्रोत कमी होऊ लागले. राजकीय आणि आर्थिक अस्थिरता येऊ लागली.

अशातच बाल्कन युद्ध (1912-1913) लढलं गेलं. या बाल्कन गटात बल्गेरिया, ग्रीस, मॉन्टेनेग्रो आणि सर्बिया यांचा समावेश होता. बाल्कन देशांतील बंडाला रशियाने पाठिंबा दिला.

प्रतिस्पर्धींच्या तुलनेत ऑटोमन साम्राज्याची लष्करी शक्ती कमी पडली.

ऑटोमन साम्राज्य या युद्धात हरले. ब्रिटन आणि फ्रान्सने कॉन्स्टँटिनोपल सोडून मध्यपूर्व आणि उत्तरेकडील ऑटोमन प्रदेश ताब्यात घेण्याचं काम केलं.

इतिहासकारांच्या मते ऑटोमन साम्राज्याचा हा पराभव अपमानास्पद तर होताच पण ही महत्वाची घटना देखील होती.

साम्राज्याचे पतन

भारत आणि पूर्व आशियातील मसाले आणि रेशीम व्यापारावरील कर हे ऑटोमन साम्राज्याच्या कमाईचे प्रमुख स्त्रोत होते.

पण सोळाव्या शतकात जेव्हा नवीन जग किंवा नवीन देशांचा शोध लागला आणि भारत-चीन व्यापारासाठी नवीन सागरी मार्गांचा शोध लागला तेव्हा ऑटोमनांच्या या क्षेत्रावरील अवलंबित्व कमी झाले.

वाढते व्यापारी शत्रुत्व आणि वाढती बेरोजगारी यामुळे परिस्थिती आणखीनच खराब झाली.

याच काळात पोर्तुगाल, स्पेन, ब्रिटन यांच्या सामर्थ्यात वाढ झाली आणि त्यांच्यात विस्तारवादी महत्वाकांक्षा वाढली. ऑटोमनांचा याला विरोध होता.

शिवाय आर्मेनिया, ग्रीस, इजिप्त, अरब भागात युद्धे सुरू झाली. आर्मेनिया आणि ग्रीसमध्ये नरसंहार केल्याचा आरोप ऑटोमनवर होता.

ऑटोमन

फोटो स्रोत, Getty Images

अशात ऑटोमन साम्राज्याने फ्रान्स, ब्रिटीश साम्राज्य, अमेरिका आणि रशिया यांच्या नेतृत्वाखालील शक्तिशाली आघाडीविरुद्ध नवे युद्ध सुरू केले.

ऑटोमन साम्राज्याचा पहिल्या महायुद्धात (1914-1918) झालेला पराभव आणि तुर्कस्तानसह विविध देशांतील राष्ट्रवादाचा उदय यामुळे ऑटोमन साम्राज्य शेवटची घटका मोजू लागलं.

महायुद्धातील पराभवानंतर तुर्कस्तानला अनेक अपमानास्पद अटी स्वीकाराव्या लागल्या. यात मध्यपूर्व ब्रिटन आणि फ्रान्समध्ये विभागले गेले. भूमध्य सागरी किनारा इटलीला, एजियन किनारा ग्रीसला, तुर्की सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय शक्तींकडे गेला. त्याच वेळी, आर्मेनियाचा एक मोठा भाग स्वतंत्र देश म्हणून ओळखला गेला.

1917 मध्ये बाल्फोर करारावर देखील स्वाक्षरी करण्यात आली होती. यानुसार ब्रिटीश सरकारने ज्यू लोकांना पॅलेस्टाईन प्रदेश देण्याचे वचन दिले होते. हा देखील ऑटोमन साम्राज्याचा एक भाग होता.

नवं राष्ट्र: तुर्कस्तान

1 नोव्हेंबर 1922 रोजी ऑटोमन साम्राज्याचं अस्तित्व संपुष्टात आलं आणि तुर्की प्रजासत्ताक राष्ट्राचा उदय झाला.

23 एप्रिल 1920 रोजी मुस्तफा केमाल अतातुर्क यांची अध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी तुर्कस्तानच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचं नेतृत्व केलं होतं.

ऑटोमन साम्राज्याचा शेवटचा सुलतान मेहमेत सहावा जीवाच्या भीतीने इस्तंबूलमधून बाहेर पडला आणि ब्रिटीश जहाजाने माल्टाला पळून गेला.

ऑटोमन

फोटो स्रोत, Getty Images

1923 मध्ये त्याला पदच्युत करण्यात आल्यानंतर त्याच्याच पुतण्याला गादीवर बसविण्यात आले. सुलतानाची जागा रद्द झाली व नवी व्यक्ती खलीफा म्हणून आली.

चार वर्षांनंतर तो मरण पावला. त्याच्या मृत्यूच्या क्षणी तो इतका गरीब होता की स्थानिक व्यापाऱ्यांचे कर्ज फेडेपर्यंत इटालियन अधिकाऱ्यांनी त्याची शवपेटी जप्त केली होती.

दरम्यान नवीन प्रजासत्ताक राष्ट्रात लोकशाही, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, संख्यावाद आणि सुधारणावाद यांचा पुरस्कार करण्यात आला.

आधुनिक तुर्कीची धर्मनिरपेक्षता हा ऑटोमन साम्राज्याचा वारसा असल्याचा दावा अनेक इतिहासकार करतात.

निओ-ऑटोमॅनिझम

प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून मान्यता मिळाल्यानंतरही तुर्कस्तान मध्ये खिलाफत चळवळ सुरूच होती. पण तुर्कस्तानमध्ये निधर्मी प्रजासत्ताक राज्य आल्यामुळे खलीफाची जागा 1924 साली खालसा करण्यात आली. आणि खिलाफत चळवळ आपोआप विराम पावली.

पहिल्या महायुद्धात ऑटोमनांचा पराभव झाल्यामुळे त्यांचे साम्राज्य संपुष्टात आले याला काही जण विरोध करतात. ऑटोमन साम्राज्य संपुष्टात यायला पाश्चात्य दोषी होते असं त्यांचं म्हणणं आहे.

अलिकडच्या काही वर्षांत तुर्कस्तानमध्ये निओ-ऑटोमॅनिझमच्या पुनरुज्जीवनाला चालना मिळते आहे असं काहीजण म्हणतात.

ही एक इस्लामवादी आणि साम्राज्यवादी राजकीय विचारधारा आहे.

यात तुर्कीच्या ऑटोमन साम्राज्याचा सन्मान केला जातो. पूर्वी ऑटोमन साम्राज्यात असलेल्या प्रदेशांमध्ये तुर्कीचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अनेक दशकांपासून तुर्कीच्या नेत्यांनी आपल्या देशाला धर्मनिरपेक्ष स्वरूपात पुढं आणलं. त्यांनी तुर्कीला त्यांचा शाही वारसा आणि इस्लामपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

परंतु एर्दोगान सत्तेवर आल्यावर लोकशाहीचे स्वरूप बदलले. एर्दोगान यांनी तूर्कीला पुन्हा धर्मवादाच्या मार्गावर नेले.

याचं उदाहरण म्हणजे हेगाया सोफायासारख्या धर्मनिरपेक्ष वास्तूत पुन्हा नमाज पढला जाऊ लागला.

बाउक्वेट म्हणतात, ऑटोमन साम्राज्य संपुष्टात आलं मात्र आता निओ-ऑटोमॅनिझम विकसित झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)