स्वित्झर्लंडची ईव्ह मराठी अधिकाऱ्याच्या प्रेमात सावित्री झाली, 'परमवीर चक्रा'चं डिझाईन केलं

फोटो स्रोत, Google
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठीसाठी
स्वित्झर्लंडमधली 16 वर्षांची मुलगी. तिच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या भारतीय तरुणाच्या प्रेमात पडते. घरच्यांशी विरोध पत्करून त्याच्याशी लग्न करते आणि भारतात येते.
हे वाचल्यावर अशा प्रेमविवाहात नवीन काय असं तुम्हाला वाटेल...पण हा प्रेमविवाह जवळपास 90 वर्षांपूर्वी म्हणजे 1929 साली झाला होता.
स्वित्झर्लंडची ईव्ह यव्होन भारतात येऊन सावित्रीबाई झाली होती. केवळ नावानेच नाही तर आपल्या कामानेही ती इथल्या संस्कृतीशी इतकी एकरूप झाली होती की, भारतीय सैनिकांना देणाऱ्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराचं म्हणजेच परमवीर चक्राचं डिझाईन त्यांनी केलं होतं.
20 जुलै हा सावित्रीबाईंचा जन्मदिन.
देश, भाषा, संस्कृतीच्या सीमारेषा ओलांडणारी ईव्ह यव्होन उर्फ सावित्रीबाईंची गोष्ट काय होती?
विक्रम रामजी खानोलकर हा 24 वर्षांचा मराठी तरूण रॉयल मिलिटरी अकादमी, सँडहर्स्ट इथे आला होता. मूळचे महाराष्ट्राच्या सावंतवाडीचे असलेले विक्रम रॉयल मिलिटरी अकादमीमध्ये शिकत असताना स्वित्झर्लंड येथे आले होते. तिथेच त्यांची भेट त्यांच्याहून आठ वर्षांनी लहान असणाऱ्या ईव्ह यव्होन लिंडा मॅडे-डे-मारोसशी झाली. ते प्रेमात पडले.
ईव्ह यव्होन हिचे वडील हंगेरियन तर आई रशियन. यव्होनने वयाच्या 16व्या वर्षी विक्रम खानोलकर यांच्याशी लग्न करून सातासमुद्रापार असणाऱ्या भारतात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. पण ईव्ह यव्होन यांच्या समाजशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या वडिलांना त्यांची मुलगी एका कृष्णवर्णीय मुलाशी लग्न करणार ही कल्पनाच सहन होत नव्हती.
पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. 1932 साली वयाच्या 19 व्या वर्षी ती भारतात आली आणि लखनौमध्ये विक्रम खानोलकर यांच्यासोबत तिने विवाह केला.
‘माझा जन्म चुकून युरोपात झालेला आहे’
लग्नानंतर ईव्ह यव्होनने हिंदू धर्म स्वीकारला. तिने आपलं नाव बदललं आणि सावित्रीबाई असं अस्सल मराठमोळं नाव ठेवलं.
विक्रम खानोलकर यांच्यावर असणारं प्रेम हे सावित्रीबाईंच्या भारतात येण्यामागचं कारण होतंच, पण इतरही काही गोष्टी होत्या ज्यामुळे सावित्रीबाई भारताच्या प्रेमात पडू लागल्या होत्या.
हजारो वर्षांची परंपरा असलेले भारताचे अध्यात्मिक ज्ञान, हिंदू धर्मग्रंथ, हिंदू संस्कृती या सगळ्यांचा अभ्यास सावित्रीबाई करू लागल्या. केवळ अभ्यास करूनच त्या थांबल्या नाहीत तर याच विषयात त्यांनी नालंदा विद्यापीठातून पदवीदेखील मिळवली.
हिंदू परंपरा आणि आदर्शांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सावित्रीबाईंना भारतीय समाजात आणि संस्कृतीत मिसळायला फारसा वेळ लागला नाही. त्यांचे हिंदू धर्मात आणि पर्यायाने भारतात सामावून जाणे हे दुधात साखर विरघळण्याच्या प्रक्रियेइतके नैसर्गिक आणि सहज होते.
सावित्री खानोलकरांनी केवळ संस्कृतीचाच अभ्यास केला नाही तर भारतातील भाषादेखील अवगत केल्या. मराठी, संस्कृत आणि हिंदी भाषा त्या शिकल्या. भारतीय संगीत, नृत्य आणि चित्रकलेचा अभ्यासही त्यांनी केला.
सावित्रीबाईंना त्यांना कुणी 'परदेशी' म्हटलेले आवडायचे नाही कारण एव्हाना त्यांनी भारतासोबत आत्मीय संबंध निर्माण केले होते. त्या म्हणत असत की, ''माझा जन्म चुकून युरोपात झालेला आहे.''
सावित्रीबाईंवर भारतीय संस्कृतीचे गारुड एवढे होते की, त्यांनी पौराणिक भारतीय कथा आणि इतिहासाचा सखोल अभ्यास केला होता.
त्यांच्या या अभ्यासामुळेच मेजर जनरल हिरालाल अटल यांनी भारतातील सर्वोच्च शौर्याचा सन्मान करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पदकाची निर्मिती करण्यामध्ये सावित्रीबाईंची मदत घेतली.
स्विस वंशाच्या सावित्रीबाई खानोलकर आणि पूर्वाश्रमीच्या इव्ह यव्होन मॅडे डी मारोस भारतीय इतिहासातील एका अविस्मरणीय प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनल्या.
असं तयार झालं परमवीर चक्र
1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण देशाची फाळणीही झाली. भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश अस्तित्त्वात आले.
स्वातंत्र्यानंतर लगेचच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं. भारताच्या जवानांनी या युद्धात दिलेल्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी भारतीय सैन्य नवीन पदक तयार करण्याचा विचार करत होते. याची जबाबदारी मेजर जनरल हीरालाल अटल यांना देण्यात आली होती.
अटल यांनी सावित्रीबाईंना या पुरस्कारांची रचना करण्यासाठी पाचारण केले. वेदांचा अभ्यास आणि विविध भारतीय भाषांवर असणारे प्रभुत्व यामुळे मेजर जनरल अटल यांनी परदेशी वंशाच्या सावित्रीबाईंची या कामी मदत घेण्याचे ठरवले.

फोटो स्रोत, National War Memorial
सावित्रीबाईंनी दोन पुस्तकंही लिहिली होती. महाराष्ट्रातील संतांवर त्यांनी एक पुस्तक लिहिले होते आणि संस्कृत भाषेतील नावांचा एक शब्दकोशही त्यांनी तयार केला होता.
भारतावर सुमारे दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडमध्ये सैन्यातील शौर्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार होता व्हिक्टोरिया क्रॉस. भारतातही त्याच तोडीचा पुरस्कार बनवला जावा हे आव्हान सावित्रीबाईंसमोर होते.
परमवीर चक्राची रचना करताना सावित्रीबाईंनी हिंदू पुराणकथांचा आधार घेतला. हा शोध घेत असताना एका कथेतून वाईटावर चांगुलपणा विजयासाठी इंद्राचे पौराणिक शस्त्र बनलेल्या 'वज्रा'ची प्रेरणा त्यांना मिळाली. भारतीय पुराणात महर्षी दधिची यांनी इंद्रदेवाला वृत्रासुराला मारण्यासाठी लागणारे अमोघ शस्त्र (वज्र) बनवता यावे म्हणून त्यांचे शरीर त्यागले होते. त्यांच्या अस्थिंपासून बनवलेल्या वज्राने इंद्राने वृत्रासुराचा वध केला.
यावरून प्रेरणा घेऊन सावित्री खानोलकर यांनी 3.5 सेमी व्यासाचं कांस्य धातूचं गोलाकार पदक बनवलं. या पदकावर एका बाजूला दधिचीच्या त्यागाचं प्रतीक असलेल्या वज्राच्या चार प्रतिकृती आहेत. त्याच्या मध्यभागी अशोकस्तंभ कोरलेला आहे.
दुसऱ्या बाजूला हिंदी आणि इंग्रजीत परमवीर चक्र लिहिलं आहे.
1948 च्या पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धादरम्यान बडगामच्या लढाईत लढताना शहीद झालेले मेजर सोमनाथ शर्मा यांना पहिले परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. मेजर सोमनाथ शर्मा हे सावित्री खानोलकर यांची थोरली मुलगी कुमुदिनी हिचे दीर होते.
केवळ परमवीर चक्रच नाही तर सावित्री खानोलकर यांनी अशोक चक्र (AC), महावीर चक्र (MVC), कीर्ती चक्र (KC), वीर चक्र (VrC) आणि शौर्य चक्र (SC) यासह इतर अनेक प्रमुख शौर्य पदकांची रचना केली.
1952 मध्ये विक्रम खानोलकर रांचीवरून सावित्रीबाईंसह रेल्वेने कोलकात्याला येत होते. त्यावेळी 29 ऑगस्ट रोजी सकाळी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.
त्यानंतर सावित्रीबाईंनी रामकृष्ण मठात त्यांचे उर्वरित आयुष्य घालवले. युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना, तसेच फाळणीमुळे निर्वासित झालेल्या कुटुंबांना मदत करून त्यांनी वेगवेगळी सामाजिक कामे केली.
स्वित्झर्लंडच्या एका शहरात जन्मलेल्या ईव्ह यव्होन लिंडा मॅडे-डे-मारोस या वयाच्या सोळाव्या वर्षी एका मराठी लष्करी अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्या, 19 व्या वर्षी त्यांचा देश सोडून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या भारतात आल्या. भारतीय संस्कृती, इतिहास, धर्मग्रंथ आणि भाषांचा सखोल अभ्यास केला. स्वतःच्या ज्ञानाचा वापर भारतीय मातीसाठी केला.
रोजी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








