कुतुबुद्दीन ऐबक : तुर्कांच्या दरबारातला ‘तो’ गुलाम जो पुढे भारताचा सुलतान झाला..

कुतुबुद्दीन ऐबक
    • Author, मिर्जा एबी बेग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

या गोष्टीला तब्बल साडेआठशे वर्षं उलटली असतील. तत्कालिन अफगाणिस्तानाची राजधानी असलेल्या गझनीमध्ये सुलतान मोइजुद्दीन (शहाबुद्दीन) घोरी आपल्या महालात मैफिल भरवायचा. या मैफिलीत बरेच सल्लागार यायचे आणि सुलतानाला सल्ले द्यायचे, त्याचं कोडकौतुक करायचे.

त्या बदल्यात सुलतान या खुशमस्कऱ्यांवर आपली दौलत उधळायचा.

अशाच एका मैफिलीत सुलतान आपल्या दरबारी लोकांना आणि गुलामांना भेटवस्तू, दागदागिने आणि सोने-चांदी देत होता. त्यात एक गुलाम असा होता ज्याने आपल्याला मिळालेल्या भेटवस्तू तुर्क, पहारेकरी, सफाई कामगार आणि गुलामांना देऊ केल्या.

या गुलामाच्या दयाळू वृत्तीची चर्चा संबंध शहरभर पसरली. एवढंच काय तर सुलतानाच्या कानावर ही गोष्ट पडली. या उदार व्यक्तीचं नाव जाणून घेण्याचा मोह खुद्द सुलतानालाही आवरला नाही. या गुलमाचं नाव होतं गुलाम (कुतुबुद्दीन) ऐबक.

घोरी साम्राज्याचा इतिहासकार असलेल्या मिन्हाज-उल-सिराज (अबू उस्मान मिन्हाज-उद-दीन बिन सिराज-उद-दीन) यानेही आपल्या तबकत-इ-नासिरी या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केलाय.

या इतिहासकाराने केवळ ऐबकचं नाही तर सुलतान शमसुद्दीन इल्तुतमिश आणि गियास-उद्दीन बलबन यांची कारकीर्दही जवळून पाहिली आहे.

तो आपल्या तबकत-इ-नासिरी या पुस्तकात लिहितो की, ऐबकाचं औदार्य पाहून सुलतान प्रभावित झाला. त्या दिवसापासून ऐबक सुलतानाच्या खास माणसांमध्ये गणला जाऊ लागला.

सुलतानानेही त्याच्यावर महत्त्वाची कामगिरी सोपवली. या संधीचा फायदा घेत ऐबकाने आपलं कर्तृत्व गाजवलं आणि 'अमीर आखोर' बनला.

अमीर अखोर म्हणजे शाही घोडदळाचा निरीक्षक. या पदाला मोठं महत्त्व होतं. इनसाइक्लोपीडिया ऑफ इस्लाम (दुसरी आवृत्ती) मध्ये ऐबकचा उल्लेख हजारी सरदार म्हणून करण्यात आलाय. त्याच्या हाताखाली असे 3 सरदार असायचे ज्यांच्या हाताखाली 40 सरदार काम करायचे.

कुतुबुद्दीन ऐबकाने भारतात मुस्लिम राजवटीचा पाया रचला आणि ही राजवट 1857 च्या उठवापर्यंत म्हणजे तब्बल 600 वर्षं दिल्लीवर अधिराज्य गाजवत होती.

कुतुबुद्दीन ऐबकाला गुलाम वंशाचा संस्थापक म्हटलं जातं. मात्र जेएनयु विद्यापीठातील मध्ययुगीन इतिहासाचे प्राध्यापक नजफ हैदर सांगतात की, त्याला किंवा त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना गुलाम वंशाचा बादशाह म्हणता येणार नाही. त्यांना तुर्क किंवा मामलुक म्हणता येईल.

दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापक रहमा जावेद रशीद सांगतात की, मुस्लिम राजवटीतले गुलाम आणि बायझंटाईन राजवटीत असलेले गुलाम या परस्पर भिन्न संकल्पना आहेत. म्हणजे मुस्लिम राजवटीत गुलामांना उत्तराधिकारी म्हणूनही दर्जा मिळायचा.

आपण जेव्हा या मुस्लिम राजवटीचा इतिहास पाहतो तेव्हा समजतं की, महमूद गझनवीचं त्याच्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम त्याच्या गुलामांवर, महमूद आणि अयाजवर होतं. अल्लामा इक्बाल त्यांच्या 'शिकवा' या नज्ममध्ये म्हणतात,

एक ही सफ़ में खड़े हो गए महमूद ओ अयाज़

न कोई बंदा रहा और न कोई बंदा नवाज़

हा शेर, तत्कालीन इस्लाम राजवटीत गुलामांचा दर्जा काय होता यावर भाष्य करतो.

ज्या लोकांनी रझिया सुलताना, बाहुबली किंवा तुर्की ड्रामा सीरियल एर्तुग्रुल गाझी पाहिली आहे त्यांना या गुलामांची स्थिती आणि महत्त्व काय होतं यांचा अंदाज लगेचच येईल.

कुतुबउद्दीन ऐबक

फोटो स्रोत, PUNJAB ARCHAELOGY DEPARTMENT

'रझिया सुलताना'मध्ये रझियाचा गार्ड असणारा याकूत हा एक हब्शी गुलाम होता. हब्शी हा अबसीनियनचा अपभ्रंश आहे. त्याने आपल्या राणीसाठी बलिदान दिलं आणि राणीच्या हृदयात स्थान मिळवलं.

तर बाहुबली चित्रपटात दाखवलेला 'कटप्पा' सुद्धा एक प्रकारचा गुलामच असतो. या गुलामगिरीमुळे तो त्याच्या राजकुमाराला मारायला ही मागेपुढे पाहत नाही. एर्तुग्रुल गाझी या मालिकेतही बायझंटाईन गुलामांची स्थिती दाखवली आहे.

नजफ हैदर सांगतात, "एकदा मोहम्मद घोरीला कोणीतरी विचारलं होत की, तुला तर मूलबाळ नाही, येणाऱ्या पिढ्यांच्या तू लक्षात तरी राहशील का? यावर मोहम्मद घोरी म्हणाला होता की, माझ्यामागे माझं नाव जिवंत ठेवायला माझी बरीच मुलं आहेत."

प्रोफेसर नजफ हैदर सांगतात की, मोहम्मद घोरी त्याच्या गुलाम असलेल्या यिल्दोज, ऐबक आणि कबाचा या मुलांबद्दल बोलत होता.

रहमा जावेद सांगतात की, घोरीने या गुलामांमध्येही नातेसंबंध दृढ केले होते. त्याने यिल्दोजच्या एका मुलीचं लग्न ऐबकशी लावून दिलं होतं. तर दुसऱ्या मुलीचं लग्न कबाचाशी लावून दिलं होतं. त्यामुळे आपापसात भांडण्यापेक्षा हे तिघेही एकत्र राहून एकमेकांना आधार देतील हा हेतू होता.

ऑक्सफर्ड सेंटर फॉर इस्लामिक स्टडीजचे दक्षिण आशियाई इस्लामचे प्राध्यापक मोईन अहमद निजामी बीबीसीशी बोलताना सांगतात की,

ऐबकाची ओळख गुलाम वंशाचा संस्थापक म्हणून नव्हे तर भारतातील तुर्क किंवा मामलुक वंशाचा संस्थापक अशी होती.

ऐबकाचं प्रारंभिक जीवन

कुतुबुद्दीन ऐबक हा तुर्कस्तानच्या ऐबक जमातीमधून असल्याचं मोईन अहमद निजामी सांगतात. तो लहानपणीचं आपल्या कुटुंबापासून दुरावला होता. पुढे त्याला गुलामांच्या बाजारात विकण्यासाठी नेशापूरला नेण्यात आलं.

पुढे काझी फखरुद्दीन अब्दुल अझीझ कूफी या माणसाने त्याला विकत घेतलं. या माणसाने ऐबकला आपल्या मुलाप्रमाणे वाढवलं त्याला व्यावहारिक ज्ञान आणि लष्करी प्रशिक्षण दिलं.

'तबकत नासिरी' या पुस्तकात मिन्हाज-उल-सिराज लिहितो, ऐबकला ज्याने विकत घेतलं होतं तो काही साधासुधा माणूस नव्हता तर तो इमाम अबू हनीफाचा वंशज होता. नेशापूर आणि आसपासच्या प्रदेशावर त्याच वर्चस्व होतं.

मिन्हाज-उल-सिराज पुढं लिहितो, "कुतुबुद्दीनने काझी फखरुद्दीनची सेवा करताना कुराणचाही अभ्यास केला. तिथेच घोडेस्वारी आणि तिरंदाजीचं प्रशिक्षणही घेतलं. त्याच्या या प्रयत्नांमध्ये त्याला यश मिळालं आणि लोक त्याचं कौतुक करू लागले."

कुतुबउद्दीन ऐबक

फोटो स्रोत, HIMANSHU SHARMA/GETTY IMAGES

पुढे काझी फखरुद्दीनच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी ऐबकला पुन्हा एका व्यापाऱ्याला विकल्याचं म्हटलं जातं. या व्यापाऱ्याने ऐबकला गझनीच्या बाजारात विकायला आणलं. आणि इथेच सुलतान गाझी मुइझुद्दीन साम (सुलतान मोहम्मद घोरी) ने त्याला विकत घेतलं."

मिन्हाज-उल-सिराज पुढं लिहितो, ऐबक सर्वनिपुण असला तरी त्याची एक पडती बाजू होती. त्याच्या एका हाताचं बोट तुटलं होत त्यामुळे लोक त्याला 'ऐबक शल', म्हणजेच कमकुवत बोटाचा म्हणायचे.

तुर्कीची ऐबक जमात

कुतुबुद्दीन तुर्कीच्या ऐबक जमातीतून होता असं म्हटलं जातं पण त्याचे वडील किंवा त्याच्या जमातीबद्दल फार विशेष अशी माहिती उपलब्ध नाही. ऐबकाचा जन्म 1150 सालात झाल्याची नोंद काही ऐतिहासिक दस्तऐवजात सापडते. मात्र त्याबद्दलही निश्चित खात्री देता येत नाही.

तुर्की भाषेत ऐबक म्हणजे "चंद्राचा स्वामी" असं म्हणतात की या जमातीचे पुरुष आणि स्त्रिया दिसायला अत्यंत सुंदर होते, म्हणून त्यांच्या जमातीला हे टोपणनाव मिळालं. कुतुबुद्दीन मात्र तितकासा देखणा नव्हता असं म्हटलं जातं.

प्रसिद्ध उर्दू शायर असदुल्लाह खान गालिब त्यांच्या एका फारसी गझलमध्ये स्वतःला ऐबक म्हणवून घेतात. आणि हा ऐबक चंद्रापेक्षा सुंदर असल्याचं म्हणतात.

ऐबकम अज़ जमा-ए अतराक

दर तमामी ज़ माहे दह चंदेम

ते म्हणतात की, आम्ही चंद्राहून दसपट सुंदर आहोत कारण आम्ही तुर्कांच्या ऐबक जमातीतले आहोत.

दुसरीकडे दिल्लीतील निजामुद्दीन औलियाचे अनुयायी आणि महान कवी, विचारवंत अमीर खुसरो ऐबकाचं वेगळेपण दिसून येईल असा एक शेर लिहितात,

कुतुबउद्दीन ऐबक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क़ूवत-उल-इस्लाम मशिदीचे अवशेष

गाह तातारी शवद गाह चाची

गाह ऐबक बुवद गाह लाची

म्हणजे मी कधी तुर्की, तर कधी चेचेनियन, कधी ऐबक, तर कधी लाची आहे. ऐबक हा शब्द इतर अनेक अर्थांनीही वापरला गेलाय. याचा एक अर्थ गुलाम असाही आहे.

याशिवाय प्रिय किंवा आदर्श असलेल्या व्यक्तीसाठी देखील याचा वापर केला गेलाय. 13व्या शतकातील सुफी कवी मौलाना जलालुद्दीन रुमी यांनी दूत या अर्थाने या शब्दाचा वापर केलाय.

गुफ़्त ऐ ऐबक बयावर आन रसन

ता बगोयाम मन जवाब बू-अल-हसन

याचा अर्थ असा आहे की, "कोणीतरी त्या दूताला घेऊन या जेणेकरून मी बु-अल-हसनला उत्तर देऊ शकेन."

मोईन अहमद निजामी सांगतात की, ऐबकाने आपली कर्तबगारी सिद्ध करून मोइझुद्दीनचं लक्ष वेधण्यात यश मिळवलं.

घोरीची भारताकडे कूच आणि तराईनचं युद्ध

मोईन अहमद निजामी सांगतात की, कुतुबुद्दीन ऐबककडे 'अमीर अखोर' ही जबाबदारी होती. मोहम्मद घोरीने जेव्हा भारताकडे आपला मोर्चा वळवला त्यावेळी ऐबकने आपलं युद्ध कौशल्य सिद्ध केलं.

त्यामुळे तराईनच्या दुसऱ्या युद्धात घोरीचा विजय झाला. या युद्धात विजय मिळाल्यामुळे खुश होऊन घोरीने ऐबकला 'कहरम' आणि 'सामना' या दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या.

तराईनच्या पहिल्या युद्धात मोहम्मद घोरीला पराभवाचा समाना करावा लागला होता. मात्र दुसरं युद्ध त्याच्यासाठी निर्णायक ठरलं.

असं म्हटलं जातं की या युद्धात राजपूत महाराजा पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाला होता. पहिल्या युद्धात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर जवळपास वर्षभरातचं मोहम्मद घोरी एक लाखांचं अफगाणी सैन्य घेऊन पुन्हा भारतावर आक्रमण करण्यासाठी आला.

हे सैन्य मुलतान आणि लाहोरमार्गे तराईन भागात आलं. याच भागात पृथ्वीराज चौहानचं तीन लाखांचं घोडदळ, तीन हजार हत्ती, तळ ठोकून होते. त्यांनी घोरीचा रस्ता अडवला. या दोन्ही सैन्यामध्ये तुंबळ युद्ध झालं.

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी प्राध्यापक, इतिहासकार मोहम्मद हबीब आणि खालिक अहमद निजामी लिखित 'ए कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया' खंड 5 या पुस्तकात लिहिलंय की, सैन्याची जी संख्या सांगितली गेली आहे त्यात खूप अतिशयोक्ती करण्यात आली आहे. त्याकाळात एखाद्या गोष्टीला महत्त्व प्राप्त करवून घ्यायचं असेल तर संख्या वाढवून सांगितली जायची.

कुतुबउद्दीन ऐबक

फोटो स्रोत, HUTCHINSON & CO

1192 साली लढण्यात आलेल्या तराईनच्या दुसर्‍या युद्धात मोहम्मद घोरीने एक नवी रणनीती आखली. त्याने आपल्या सैन्याचं पाच तुकड्यांमध्ये विभाजन केलं. या तुकड्या चार वेगवेगळ्या दिशेला तैनात केल्या आणि फक्त 12 हजारांची एक तुकडी युद्धात उतरवली. युद्ध सुरू झाल्यावर या 12 हजारांच्या सैन्याने माघार घ्यायची असं ठरलं.

घोरीचं सैन्य माघार घेतंय असं वाटून पृथ्वीराज चौहान यांचं सैन्य त्यांच्यामागे पळू लागलं.

पृथ्वीराज चौहान यांचं सैन्य टप्प्यात आलं आहे असं वाटल्याबरोबर चारही बाजुंनी घोरीचं सैन्य बाहेर आलं, आणि जे सैन्य पळत होत त्यांनीही माघारी वळून हल्ला चढवला. पृथ्वीराज चौहान यांचं सैन्य आता चारही बाजुंनी वेढलं होतं. असं म्हटलं जातं की, पृथ्वीराज चौहान हत्तीवरून उतरून घोड्यावर स्वार झाले आणि रणांगणातून माघार घेतली.

मोईन अहमद निजामी सांगतात की, या युद्धामुळे ऐबकच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. आणि 1206 मध्ये जेव्हा मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला तेव्हा तो दिल्लीच्या सिंहासनावर बसला.

लाहोरच्या सिंहासनावर मांड

सुलतान मुइझुद्दीन मोहम्मद घोरीच्या आकस्मिक मृत्यूमुळे कोणीही अधिकृत उत्तराधिकारी निवडला गेला नसल्याचं इतिहासकार सांगतात. मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर जो तो त्या त्या ठिकाणचा शासक बनला. पण ऐबकने मात्र चलाखीने सिंहासन मिळवलं.

मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्याच्या मागे त्याचे तीन गुलाम उत्तराधिकाऱ्याच्या शर्यतीत होते. यात दिल्लीचा शासक असलेला कुतुबुद्दीन ऐबक, मुलतानचा शासक नसिरुद्दीन कबाचा आणि गझनीचा शासक ताजुद्दीन यिल्दोज होते. या तिघांमध्ये सिंहासन मिळवण्यासाठी संघर्ष निर्माण झाला.

रहमा जावेद सांगतात की, यात अजून एक चौथा गुलामही होता. त्याचं नाव बख्तियार खिलजी. तो या सत्ता संघर्षापासून लांब राहिला आणि त्याने बिहार गाठलं. त्याने स्वतःला बिहार आणि बंगालचा शासक घोषित केलं.

ऐबकने मात्र दुसऱ्या दोघांवर मात केली आणि सिंहासन मिळवलं. 25 जून 1206 रोजी लाहोरच्या किल्ल्यात त्याच्या डोक्यावर सुलतानाचा मुकुट चढला. पण सुलतान या पदवीपासून तो लांबच राहिला. किंबहुना त्याने स्वतःची नाणी चलनात आणण्याचं टाळलं, त्याच्या नावे खुत्बा (धार्मिक उपदेश) पठण करण्याचं टाळलं.

त्याने असं का केलं या प्रश्नावर मोईन अहमद निजामी सांगतात की, ऐबक एक गुलाम होता आणि त्याला स्वातंत्र्य नव्हतं. त्यामुळे लोकांनी त्याला सुलतान म्हणून स्वीकारणं कठीण होतं.

1208 मध्ये ऐबकने गझनीला भेट दिली. या भेटी दरम्यान मोहम्मद घोरीच्या एका उत्तराधिकाऱ्याने ऐबकाचं स्वातंत्र्य घोषित केलं. त्यानंतर साधारण 1208-09 मध्ये ऐबकाने सुलतान ही पदवी स्वीकारली. काही इतिहासकारांच्या मते, या दरम्यानच त्याने स्वतःचं नाव कुतुबुद्दीन असं ठेवलं.

ऐबकने, मोहम्मद घोरीच्या विस्तारवादी धोरणाचा अवलंब केला. दरम्यानच्या काळात त्याने अजमेर जिंकून घेतलं. त्यानंतर सरस्वती, समाना, कहराम आणि हांसी या चार हिंदू राज्यांवर विजय मिळवला.

पुढे कन्नौजचा राजा जयचंद याचा चांदवारच्या युद्धात पराभव करून दिल्ली जिंकली. अवघ्या वर्षभराच्या कार्यकाळात ऐबकाने आपलं राज्य राजस्थानपासून गंगा- यमुनेच्या तटापर्यंत विस्तारलं.

ऐबकने जे काही विजय मिळवले त्याच इत्यंभूत वर्णन मिन्हाज-उल-सिराजने आपल्या तबकत-इ-नासिरी या पुस्तकात करून ठेवलंय.

तो लिहितो, 587 हिजरीमध्ये कुतुबुद्दीनने मेरठ जिंकून घेतलं. पुढं 588 हिजरीमध्ये दिल्ली ताब्यात घेतली. 590 मध्ये त्याने सुलतानाच्या मनात स्थान पक्कं केलं आणि 591 हिजरीमध्ये तर त्याने इस्लामिक साम्राज्याचा विस्तार चीनपर्यंत केला.

दिल्लीतील कुतुबमिनार

इतर मुस्लिम शासकांप्रमाणे ऐबकलाही वास्तुकलेची आवड होती. म्हणूनच त्याने 1199 मध्ये दिल्लीत घोरी राजवटीच्या कर्तृत्वाचं स्मारक मिनाराच्या स्वरूपात उभारलं. गझनीमध्येही अशाच प्रकाचे मिनार उभारण्यात आले होते.

याने कुतुबमिनार सोबतच कुव्वत-उल-इस्लाम ही मशिद बांधली. अजमेर जिंकल्यानंतरही त्याने मशीद बांधली. या मशिदीला ढाई दिन का झोपडा या नावाने ओळखलं जातं. उत्तर भारतात बांधण्यात आलेली ही पहिली मशीद होती.

ही मशीद आजही अस्तित्वात आहे. ही मशीद अवघ्या अडीच दिवसात उभारण्यात आली होती म्हणून तिला नाव पडलं 'ढाई दिन का झोपडा' पण नंतर हेरात (अफगाणिस्तान) प्रांतात राहणाऱ्या अबू बकर या वास्तुविशारदाने या मशिदीची पुनर्रचना केली. इस्लामिक वास्तुशैलीचा हा पहिला नमुना होता.

अशाच पद्धतीने कुतुबुद्दीनने कुतुबमिनार बांधायला सुरुवात केली.

कुतुबउद्दीन ऐबक
फोटो कॅप्शन, कुतुबउद्दीन ऐबक

हा कुतुबमिनार शमसुद्दीन इल्तुतमिशच्या काळात बांधून पूर्ण झाला. पाच मजली विटांचा हा मिनार जगातील सर्वांत उंच मिनार आहे. या मिनारावर कुराणातील आयत कोरण्यात आल्या आहेत. याच दरम्यान ऐबकने क़ुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधली. या मशिदीचे अवशेष आजही कुतुबमिनारजवळ आढळतात.

इतिहासकार रहमा जावेद बीबीसीशी बोलताना सांगतात की, जेवढे काही फारसी दस्तऐवज उपलब्ध आहेत त्यात या मशिदीला जामा मशीद म्हटलं गेलंय. ही मशीद मोठी होती. या मशिदीला कबात-उल-इस्लाम म्हणजेच इस्लामचा घुमट म्हटलं जायचं. पुढे सर सय्यद अहमद खान यांनी आपल्या 'आशार-उस-सनादीद' या पुस्तकात या मशिदीचं नामकरण कुव्वत-उल-इस्लाम मशीद असं केलं.

रहमा जावेद पुढे सांगतात की, जेव्हा मंगोलियन इस्लामी राज्यांवर आक्रमण करत होते तेव्हा भारतातील इस्लामिक राज्य सुरक्षित होतं. त्यामुळे जगभरातील अनेक विद्वानांनी भारतात आश्रय घेतला. त्यामुळेच मिन्हाज-उल-सिराजने दिल्लीला क़ुव्वत-उल-इस्लाम म्हणजेच इस्लामचं आश्रयस्थान म्हटलंय.

ही मशिदी इंडो-इस्लामिक स्थापत्य शैलीचं प्रतीक आहे. ही मशिदी भारतीय कारागिरांनी बांधली. त्यांना अरबी भाषा अवगत नव्हती मात्र कोरीव कामात हे कारागीर कुशल होते.

जैन मंदिरांचे स्तंभ या मशिदीसाठी वापरण्यात आलेत. या स्तंभांवर जैन शिल्प होती पण त्यांचे आकार मिटवण्यात आले. या मशिदीचं काम ही शमसुद्दीन इल्तुतमिशच्या काळात पूर्ण झालं.

पोलो खेळताना मृत्यू

सुलतान म्हणून पदवी धारण केल्यानंतर 1208 ते 09 या कालावधीतील आपला बहुतेक वेळ ऐबकने लाहोरमध्ये घालवला.

पावसाळा संपून नुकताच हिवाळा सुरू झाला होता. याच दरम्यान ऐबक त्याच्या सेनापतींसोबत पोलो खेळायला बाहेर पडला. पोलो खेळता खेळता तो जमिनीवर पडला.

कुतुबउद्दीन ऐबकचा मकबरा
फोटो कॅप्शन, कुतुबउद्दीन ऐबकचा मकबरा

मिन्हाज-उल-सिराज त्याच्या मृत्यूबद्दल लिहितो, "607 हिजरी (इसवीसन 1210) मध्ये पोलो खेळताना ऐबक घोड्यावरून खाली पडला. आणि घोडा त्याच्या अंगावर पडला. काठीचा मोडलेला भाग त्याच्या छातीत घुसून त्याचा मृत्यू झाला."

कुतुबुद्दीनचा दफनविधी लाहोरमध्येच करण्यात आला. इथं आजही त्याची कबर असून दरवर्षी इथे उरूस साजरा केला जातो.

उदारतेच्या कथा

मोईन अहमद निझामी सांगतात की "ऐबकाच्या काळात जे साहित्य लिहिलं गेलं किंवा त्याच्या नंतरच्या काळातही जे साहित्य लिहिलं गेलं त्यात ऐबकची निष्ठा, औदार्य, धैर्य आणि न्याय यांसारख्या गुणांची प्रशंसा करण्यात आली आहे. 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात ऐबकाच्या उदारतेचे किस्से गाजले. त्या काळात मनाने उदार असणाऱ्या लोकांना ऐबक असं संबोधन वापरलं जाई.

ऐबकाच्या दातृत्वापासून वंचित राहिलेला व्यक्ती दिल्लीत सापडणं अवघड असल्याचं म्हटलं जायचं. कुराण ऐबकाच्या तोंडपाठ होत म्हणून त्याला कुराणचा हाफिज म्हणत. तसंच तो चांगल्या सुरात कुराणाचं पठण करायचा.

ऐबकाच्या उदारतेमुळे त्याला कोणताही हितशत्रू निर्माण झाला नाही. यावर मोईन अहमद निजामी सांगतात, उदारतेला दुसरा शब्द म्हणून 'ऐबक' असा शब्दप्रयोग करणं यासारखी दुसरी कोणतीही श्रद्धांजली असू शकत नाही. ऐबकाने आपल्या न्याय आणि उदार वृत्तीने पुढील पिढ्यांवर छाप सोडली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)