हशाशिन : वेष बदलून गुप्तपणे वावरणाऱ्या मारेकऱ्यांचा पंथ, जे दिवसाढवळ्या शत्रूचा गळा चिरायचे

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हुआन फ्रान्सिस्को अलोन्सो
- Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड
“जेव्हा एखाद्या म्हाताऱ्या माणसाला सरदाराचा खून करायचा असतो, तेव्हा तो काही तरुणांना गाठतो, हे तरुण अतिशय शूर असतात. तो म्हातारा या तरुणांना सांगतो की जर त्या सरदाराचा खून केला तर त्यांना स्वर्गात जागा मिळेल.”
व्हेनेशियन प्रवासी मार्को पोलो याने त्याच्या ‘बुक ऑफ वंडर्स’ या पुस्तकात मारेकऱ्यांच्या एका पंथाचं वर्णन केलं आहे.
हे मारेकरी मुस्लीम होते आणि मध्ययुगात त्यांनी अनेक ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्याही छातीत धडकी भरवली होती. त्यांना ‘हशाशिन’ म्हणायचे.
यावरूनच इंग्लिश भाषेत 'असॅसिन' (मारेकरी) हा शब्द आला.
या ‘हशाशिन’ च्या कारनाम्यांचा पहिला उल्लेख सापडतो तो बाराव्या शतकात.
28 एप्रिल 1192 साली. टायर नावाच्या शहरात (जे आताच्या लेबेनॉनमध्ये आहे) इटालियन सरदार कॉनरॅड ऑफ मॉनफेराट आपली राजा म्हणून निवड झाली याचा आनंद साजरा करत होता.
हा सरदार तिसऱ्या क्रुसेडचा (ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये झालेल्या धर्मयुद्धांना क्रुसेड्स म्हणतात) सेनापती होता.
पण त्याचा आनंद क्षणिक ठरला. त्यावेळेच्या नोंदीवरून असं दिसतं की दोन संदेशवाहक एक संदेश घेऊन त्याच्यापर्यंत पोचले आणि जेव्हा कॉनरॅड ऑफ मॉनफेराट तो संदेश वाचत होता तेव्हा त्यांनी आपले खंजीर काढले आणि त्याच्या पोटात खुपसले. सरदाराचा मृत्यू झाला.
या मारेकऱ्यांना कोणी पाठवलं हे कधी समोर आलं नाही पण इतकं मात्र लक्षात आलं की ते ‘हशाशिन’ पंथाचे मारेकरी होते.

फोटो स्रोत, Getty Images
या पंथावर आजवर अनेक चित्रपट, कहाण्या, कथा-कांदबऱ्या निघाल्या आहेत. ताजं उदाहरण द्यायचं झालं तर असॅसिन क्रीड हा व्हीडिओ गेमही आला आहे.
इस्लामच्या अनुयायांमध्ये मतभेद आणि ‘हशाशिन’ चा जन्म
माद्रीदच्या विद्यापीठात अरब आणि इस्लामिक स्टडीजचे प्राध्यापक असणाऱ्या इग्नासिओ गुटेरेझ दे तेरान यांनी याबद्दल बीबीसीला अधिका माहिती दिली.
प्रेषित मोहम्मदांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारस कोण बनणार यावरून त्यांच्या अनुयायांमध्ये मतभेद झाले, त्यातूनच या पंथाचा उगम झाला असं म्हणतात. त्यातून इस्लामचे शिया आणि सुन्नी असे दोन पंथ अस्तित्वात आले.
9 व्या शतकापर्यंत शिया पंथाचा बराच प्रसार झाला होता. पण पुढेही नेता कोण असणार यावरून वाद झाले आणि इमाम इस्माईल इब्न जफर यांच्या सन्मानार्थ आणखी एक गट तयार झाला – इस्माइली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
पण या गटातही कोण नेतृत्व करणार यावरून दुफळी माजली. यातला काही लोक निझार नावाच्या राजकुमाराच्या बाजूने गेले. त्याने अलेक्झांड्रियात (इजिप्त) सत्ता स्थापन केली, पण त्यानंतर लगेचच कैरोवर राज्य करणाऱ्या त्याच्या धाकट्या भावाने त्याचा खून केला.
पण निझारच्या अनुयायांनी नवीन नेतृत्व मान्य करण्याऐवजी पर्शियाला (आताचा इराण) स्थलांतर केलं आणि तिथे आपल्या पंथाचा प्रसार सुरू केला.
निझारने स्थापन केलेला पंथ जो इस्लाम पाळायचा त्यात ग्रीक तत्त्वज्ञानाची तत्त्वं होती आणि गुढविद्येचा अभ्यास होता.
हे शिया आणि सुन्नींना पसंत नव्हतं.
त्यांनी आपल्याला वेचून संपवू नये, आपल्यावर हल्ले करू नयेत म्हणून त्यांनी धर्मगुरूंचं एक गुप्त जाळ तयार केलं. हे धर्मगुरू ठिकठिकाणी जाऊन आपल्या पंथाचा प्रसार करायचे. या उपदेशाकांपैकी एकाला 11 व्या शतकात एक तरुण मुलगा सापडला. त्याचं नाव हसन-इ-सबा. त्याचं धर्मपरिवर्तन करवून घेतलं आणि त्याच्या नावाने एक गुप्त पंथही स्थापन केला.

फोटो स्रोत, Getty Images
स्पेनच्या सेव्हील विद्यापीठात इस्लामिक स्टडीजचे प्राध्यापक एमिलिओ गोंझालेझ बीबीसीशी बोलताना म्हणतात, “अरबांनी जो वसाहतवाद चालवला होता त्याची प्रतिक्रिया म्हणून निझारी पंथ स्थापन झाला.”
‘हशाशिन’ हे कडवे निझारी होते.
वेगळं साम्राज्य
निझारींनी स्वतःचं वेगळं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. मग हसन-ए-सबाने निर्णय घेतला की इराणच्या पर्वतरांगांमध्ये आश्रय घ्यायचा. त्यांनी इरबूज पर्वतरांगांमध्ये असलेला अभेद्य असा अलमुटचा किल्ला ताब्यात घेतला.
“या किल्ल्याची तटबंदी मजबूत होती आणि तिचं संरक्षण करणारी भिंत पार आताच्या सीरिया-लेबेनॉनपर्यंत पोचली होती. तिथे बसून या गुप्त पंथाचा संस्थापक ज्याला नंतर ‘पर्वतांमधला ज्ञानी म्हातारा’ असं नाव पडलं, तो वेगवेगळ्या इस्लामिक राज्यांमधल्या राजकारणात उलथापालथ घडवून आणायचा,” गुटेरेझ दे तेरान म्हणतात.
आपली उदिष्टं साध्य करण्यासाठी हसन-ए-सबाने एक फौज उभारली. यात उत्तमरित्या प्रशिक्षित केलेले सैनिक होते. या सैनिकांना हसन -ए-सबा मुस्लीम राज्यांमधले महत्त्वाचे लोक आणि जिथे क्रुसेड चालू आहेत अशा ठिकाणचे ख्रिश्चन लोक यांच्यावर हल्ला करायला लावायचा.
“त्यांच्या पंथाला सत्ता स्थापन करण्याची परवानगी नव्हती, ना ती हस्तगत करण्याची त्यांच्याकडे ताकद होती. त्यामुळे ते सर्जिकल स्ट्राईक करायचे. ते जाऊन एका माणसाचा खून करायचे, भले मग तिथून ते जिवंत परत येवो अथवा न येवो,” गोंझालेझ म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणतात की, हसन-ए-सबा याने चालवली ही माहीम लोकप्रिय नव्हती, यात खूप साऱ्या लोकांचा सहभाग होता असंही नाही, पण फार थोड्या जणांनी योजनाबद्धरितीने, हुशारीने, धर्माच्या नावावर चालवलेली मोहीम होती.”
या बंडखोर सैन्याबदद्ल अनेक कथा कहाण्या आहेत. मुस्लीम ग्रंथात आणि साहित्यात त्यांना ‘फिदायीन’ या नावाने ओळखलं जातं. ‘फिदायीन’ चा अर्थ होतो स्वतःचा बळी देणारे. ‘हशाशिन’चा अर्थ हशीशचं (एक अमली पदार्थ) सेवन करणारे असाही लावला जातो.
आता हशीशचा काय संबंध असं म्हणाल तर गुटेरेझ दे तेरान हा संबंध उलगडून दाखवतात.
ते म्हणतात, “हसन-ए-सबा त्याच्या बंडखोर सैन्याला प्रशिक्षण देताना स्वर्गाबद्दल निरनिराळ्या गोष्टी सांगायचा आणि मग त्यांना अमली पानांची नशा द्यायचा. ते सैनिक ही पानं एकतर काढ्यातून प्यायचे, किंवा चावून खायचे. कोणत्याही मार्गाने ही पानं त्यांच्या पोटात गेल्यानंतर त्यांना नशा चढायची आणि मग हसन-ए-सबा त्यांना खून करण्याचे आदेश द्यायचा.”
पण गोंझालेझ यांना ही कथा पटत नाही. ते म्हणतात की, ही कथा इतरत्र पसरली कारण या पंथाचे सैनिक काय करायचे हे नक्की लोकांना माहीत नव्हतं आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सतत व्हायचा.
“कोणीही अफू किंवा गांजा ओढला असेल त्यांच्या लक्षात येईल की अशा प्रकारची नशा केल्यानंतर कोणाचा तरी खून करण्याचे विचार तुमच्या मनात येऊच शकत नाहीत.”
“त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे अमली पदार्थ दिले जायचे असं सर्वांना वाटतं कारण दुसऱ्याला मारताना ते स्वतःचाच जीव घ्यायचे. पण जर त्यांना नशा दिली जात असेल तर हशीश सोडून दुसऱ्या पदार्थाची असेल असं मला वाटतं,” गोंझालेझ म्हणतात.
त्यांना वाटतं की ‘हशाशिन’ किंवा ‘हॅसासिन’ या शब्दाचा अर्थ ‘कट्टरतावादी’ असाही लावला जाऊ शकतो.
सैन्यात भरती कोण व्हायचं ?
गरीब शेतकऱ्यांची लहान मुलं विकत घेणं किंवा त्यांचं अपहरण करणं अशा मार्गांनी ते आपल्या सैन्यासाठी मुलांची भरती करायचे.
एकदा सैन्यात भरती केलं की त्यांना युद्धकलेचं, हाणामारीचं प्रशिक्षण दिलं जायचंच, त्याबरोबर त्यांना जिथे पाठवलं जाणार आहे तिथली भाषा, संस्कृती, रूढी, प्रथा याचंही प्रशिक्षण दिलं जायचं.

फोटो स्रोत, Getty Images
“ते असे योद्धे होते जे लोकांमध्ये मिसळून जायचे, त्यांना ओळखणं कठीण होतं,” गोंझालेझ म्हणतात.
गुटेरेझ दे तेरान यांना हे मत मात्र पटतं. ते या योद्ध्यांचं वर्णन करताना म्हणतात, “ त्यांच्या वागण्यावरून ते अतिशय उच्चभ्रू, शिकलेले आणि संस्कारी लोक वाटायचे. ते जिथे हल्ला करणार आहेत तिथल्या स्थानिकांच्या चालिरिती, सवयी त्यांना पक्क्या ठाऊक असायच्या.”
त्यांचं ज्ञान, त्यांची क्षमता, मोहीम फत्ते करण्याची हातोटी आणि त्यांचं थंड रक्ताने खून करणं यामुळे लोक त्यांना घाबरायला लागले. या पंथाचं नाव प्रसिद्ध झालं.
14 व्या शतकातला इतिहासकार बर्नाड लुईस याने त्याच्या पुस्तकात, ‘द असॅसिन : रॅडिकल सेक्ट ऑफ इस्लाम’ मध्ये लिहिलं होतं की – ‘या खून्यांना कसी भीती नाही, त्यांना मानवी रक्ताची तहान आहे. एका विशिष्ट किमतीसाठी ते निरपराध लोकांचा खून करतात. त्यांना शिव्याशाप देऊन त्यांच्यापासून लांब पळालं पाहिजे. त्यांना कसलीच भीती नाही. मेल्यावर मुक्ती मिळेल की नाही याचीही भीती नाही.’
लुईस पुढे लिहितो, ‘ब्रॉडकस नावाच्या धर्मगुरूने मला सांगितलं, की ते सैतान आहेत पण देवदूताच्या रूपात येतात. त्यांना अनेक भाषा बोलता येतात, विविध प्रकारचे कपडे ते घालतात, वेगवेगळ्या ठिकाणच्या चालीरितींची नक्कल करतात. ते मेंढीच्या वेशातले लांडगे असतात. जर ओळखले गेले तर ठार केले जातात.’
गोंझालेझ म्हणतात की, “हे जगाच्या इतिहासातले पहिले दहशतवादी होते.”

फोटो स्रोत, Getty Images
का असं विचारल्यावर ते उत्तर देतात, “कारण त्यांची अनेक कृत्यं ही भरदिवसा, सार्वजनिक ठिकाणी केलेली असायची, रात्रीच्या अंधारात नाही आणि त्यांचा उद्देश जनतेच्या मनात भीती उत्पन्न करणं हा होता.”
“जर एखाद्या प्रांताचा प्रशासक त्यांच्या अंगरक्षकांसोबत बाजारात गेला तर कुठूनतरी एक मारेकरी येणार, त्याचा सुरा बाहेर काढणार आणि सगळ्यांसमोर त्या प्रशासकाचा गळा चिरून त्याचा खून करणार. भले मारेकरी स्वतः जिवंत राहो अथवा न राहो,” गोंझालेझ पुढे सांगतात.
उलट त्या मारेकऱ्याचा मृत्यू व्हावा असंच त्याच्या पंथातल्या लोकांना वाटायचं, म्हणजे कोणी त्याच्यावर अत्याचार करून त्याच्या गुप्त ठिकाण्याचा पत्ता लावू शकणार नाही.
स्वर्गाची किंमत... रक्त
असं काय असायचं की हे मारेकरी स्वतःचा जीव पणाला लावायचे, स्वतःचा बळी द्यायचे? हसन-ए-सबा त्यांना कडवं धार्मिक प्रशिक्षण द्यायचा.
मार्को पोलो त्याच्या पुस्तकात म्हणतो की अलमुटचा किल्ला अशाच प्रकारच्या धार्मिक शिकवणीसाठी तयार केला गेला होता.
तो लिहितो, ‘हसन-ए-सबाने दोन पर्वतांच्या मध्ये असलेल्या दरीत एक नितांतसुंदर बाग बनवली होती. तिथे जगातली उत्तमोत्तम फळझाडं लावली होती. बागेच्या मध्यभागी कारंजे होते. वेगवेगळ्या कारंजांमध्ये कुठे वाईनचे फवारे उडत होते, कुठे दुधाचे, कुठे मधाचे तर कुठे पाण्याचे. तिथे त्याने सुंदर सुंदर मुली आणल्या होत्या. त्यांना सगळ्या प्रकारची वाद्यं वाजवता यायची आणि त्या गोड आवाजात गायच्या. तो सैनिकांना असं भासवायचा की हाच स्वर्ग आहे.”
मार्को पोलो पुढे लिहितो, “या बागेत मारेकरी व्हायला तयार असणारा पुरुष सोडून कोणत्याही पुरुषाला कधीच प्रवेश मिळाला नाही.”
हसन-ए-सबा जीवावर उदार झालेल्या सैनिकांना या बागेत ठेवायचा जिथे ते सगळ्या प्रकारचे उपभोग घेऊ शकायचे.

फोटो स्रोत, Getty Images
मग जेव्हा एखादी मोहीम यायची, तेव्हा तो या सैनिकांपैकी एकाला निवडायचा. त्याला अमली पदार्थ द्यायचा. हा सैनिक नशेत धुत झाला की त्याला त्या बागेच्या बाहेर आणायचा आणि म्हणायचा की जर तुला प्रेषित मोहम्मदांच्या उपदेशाने तयार झालेल्या ‘स्वर्गात’ जायचं असेल तर तुला ही मोहीम फत्ते करावी लागेल आणि मरावं लागेल. तरच तू पुन्हा स्वर्गात जाऊ शकशील.
दीडशेहून अधिक वर्षांचं खूनसत्र
निझारी पंथाचे लोक जवळपास 166 वर्षं खून पाडत होते. त्यांचा नायनाट उत्तरेकडून आलेल्या एका शत्रूने केला -मंगोल.
“मंगोल भयानक होते. त्यांची संख्या क्रुसेडर्सपेक्षा शेकडो पटींनी जास्त होती. ते जास्त क्रूर होते. निझारींनी त्यांच्याशी तह करण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत,” गुटेरेझ दे तेरान म्हणतात.
चंगेज खानचा नातू हुगालू खान अलमुटच्या अभेद्य किल्ल्यात शिरला आणि त्याने तो किल्ला अक्षरशः भुईसपाट केला. काही कथांनुसार निझारींनी हुगालू खानच्या एका काकाचा खून केला होता.
पण निझारींचा नायनाट होण्याआधी त्यांनी कित्येक मुस्लीम आणि ख्रिश्चन नेते, धर्मगुरू आणि उमराव-सरदारांचा खून केला होता.
निझारींनी हल्ला केलेला पण स्वतःचा जीव वाचवू शकलेला एक राजा म्हणजे सुलतान सलादीन. यानेच 12 व्या शतकात जेरुसलेम जिंकून मुस्लिमांच्या ताब्यात दिलं.
“जेरुसलेम जिंकण्यासाठी प्रयत्न करत असताना सलादीनच्या लक्षात आलं की काही मुस्लीम राज्य क्रुसेडर्सना (ख्रिश्चन योद्धे) साहाय्य करतात. त्यामुळे त्याने या मुस्लीम राज्यांवरही हल्ला केला. अशाच एका हल्ल्यात त्याने निझारी किल्ला मासयाफला लक्ष्य बनवलं,” गुटेरेझ दे तेरान म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
निझारी यामुळे भडकले आणि 1185 साली त्यांनी सलादीनला संपवण्यासाठी मारेकरी पाठवले.
“मारेकरी सलादीनच्या सैनिकांचा वेष धारण करून त्याच्या तंबूत गेले. त्यांनी त्याच्यावर वार केले पण तो निसटला कारण त्याच्या टोपीखाली त्याने धातूचं शिरस्त्राण घातलं होतं,” गुटेरेझ दे तेरान पुढे सांगतात.
1272 मध्ये इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिलाही असाच निझारी फिदायीनांच्या तावडीतून थोडक्यात निसटला. तो नवव्या क्रुसेडचा सेनापती होता.
पुढे पुढे तर निझारींची प्रतिमा अशी बनत गेली की ते पैशासाठी कोणालाही मारतील. मुस्लिमांकडून मोठ्या रकमा घेऊन ते ख्रिश्चनांना मारायचे तर ख्रिश्चनांकडून पैसा घेऊन मुस्लिमांना.
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








