चंगेज खानची वारस राजकुमारी खुतुलुन, जिने लग्नासाठी ठेवल्या 'या' अटी आणि स्वयंवरात जिंकले 10 हजार घोडे

राजकुमारी प्रतिकात्मक फोटो
    • Author, डहलिया व्हेंचुरा
    • Role, बीबीसी मुंडो प्रतिनिधी

मंगोलचा राजा कैडूला अजिर्ने नावाची एक मुलगी होती. तार्तार भाषेत तिच्या नावाचा अर्थ होता, लखलखता चंद्र. ती दिसायला अती रेखीव आणि सुंदर होती. सोबतच ती हुशार आणि शूर होती. संपूर्ण राज्यात तिच्याशी स्पर्धा करू शकेल असा एकही पुरुष नव्हता.

व्हेनेशियन खलाशी मार्को पोलोने आपल्या 'बुक ऑफ वंडर्स' या पुस्तकात मंगोल साम्राज्याविषयी माहिती दिली आहे. याच पुस्तकात कैडूच्या शक्तिशाली राज्याची माहिती आहे.

राजकुमारी अजिर्नेला खुतुलुन या नावाने देखील ओळखलं जायचं. 13व्या शतकात मंगोल साम्राज्य चीनच्या पूर्व समुद्रापासून हंगेरीच्या सीमेपर्यंत पसरलं होतं. यावर चंगेज खानाच्या वंशजांचं राज्य होतं.

चंगेज खानने ओगोदेईला आपला उत्तराधिकारी म्हणून निवडलं होतं. खुतुलून ओगोदेईची नात होती. म्हणजे तिचे पणजोबा, आजोबा आणि वडील शक्तिशाली मंगोल राज्याचे राजे होते.

पण या मंगोल साम्राज्यापेक्षाही खुतुलूनचं व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी आणि अद्भुत होतं. मार्को पोलोने आपल्या पुस्तकात तिच्याविषयी जास्त माहिती दिली आहे.

खुतुलून कुस्तीमध्ये पारंगत होती. तिने ठरवलं होतं की जोपर्यंत एखादा योद्धा तिला या खेळात हरवत नाही तोपर्यंत ती लग्न करणार नाही.

पण तिची ही अट पूर्ण करणं सोपं नव्हतं. कारण ती इतर मंगोल लोकांप्रमाणेच निपुण धनुर्धारी होती. ती उत्तम घोडेस्वार होते. मंगोलियन फ्रीस्टाइल कुस्ती 'बोख' मध्येही ती पारंगत होती. या कुस्तीमध्ये पाय आणि हाताव्यतिरिक्त शरीराच्या इतर अवयवांनी जमिनीला स्पर्श केल्यास त्या व्यक्तीचा पराभव होतो.

त्यामुळे तिच्याशी स्पर्धा करणं हे मोठं आव्हान होतं. तिने ही स्पर्धा जिंकल्यास तिला शंभर घोडे दिले जाणार होते. आणि जर ती या कुस्तीत हरली तर तिला त्या जिंकणाऱ्या व्यक्तीशी लग्न करावं लागणार होतं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तिच्या या अटीची बातमी संपूर्ण राज्यभर पसरली. अनेकजण तिच्याशी कुस्ती खेळण्यासाठी यायचे पण पराभूत होऊन परतायचे. या खेळामुळे खुतुलुनकडे 10,000 घोडे जमले असल्याचं मार्को पोलोने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.

असाच एक राजकुमार खुतुलुनला आव्हान देण्यासाठी येतो. पण जर तो हरला तर 100 घोड्यांऐवजी त्याला 1000 घोडे द्यावे लागतील अशी अट घालण्यात आली.

मार्को पोलो आपल्या पुस्तकात लिहितो, "यामुळे राजा कैडू देखील खूप खुश होता. कारण आलेला राजकुमार एका मोठ्या राजघराण्याचा वारस होता. शिवाय तो खुतुलुनशी लग्न करण्यासाठी खूप उत्सुक होता."

पण खुतुलुनला हरवणं तितकं सोपं नव्हतं. सामना बघायला उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला तिला पराभूत करून तिच्याशी लग्न करायचं होतं.

मार्को पोलो लिहितो, "राजकुमार आणि खुतुलुन समोरासमोर येतात. दोघेही वीरपणे लढू लागतात. पण, अगदी काहीच मिनिटांत खुतुलुन त्याचा पराभव करते."

तो कुस्ती सामना पाहण्यासाठी आलेल्यांना वाईट वाटतं. कारण तो राजबिंडा रूप असलेला राजकुमार पराभूत होतो, त्याने खुतुलुन सोबत लग्न करण्याची सुवर्णसंधी वाया घालवलेली असते.

"या कुस्तीनंतर खुतुलुनला आणखी हजार घोडे मिळतात. राजकुमार मात्र आपली मान शरमेने खाली घालून त्याच्या राज्यात निघून जातो."

अनेकांचा असा अपमान झालेला असतो.

प्रतिकात्मक

आता ही गोष्ट एखाद्या परीकथेसारखी वाटू शकते. पण, मार्को पोलोचं पुस्तक ऐतिहासिक माहितीच्या विश्वसनीय स्त्रोतांपैकी एक आहे.

सुरुवातीला हे पुस्तक अनेकांना आवडलं नव्हतं. कारण बरेच लोक मंगोलियन लोकांना रक्तपिपासू राक्षस मानायचे. तर काही लोक त्यांना सुसंस्कृत मानायचे.

मार्को पोलोने सांगितलेल्या काही गोष्टी अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकतात. पण त्याने खुतुलुनला जसं पाहिलं तसंच चित्रण आपल्या पुस्तकात केलं आहे.

काही इतिहासकारांनी मात्र खुतुलुनला मंगोल पौराणिक कथांमधील तरुणी असं म्हटलंय. रशीद-ल-दीन हमदानी हे त्या इतिहासकारांपैकीच एक आहेत. त्यांनी त्यांच्या 14 व्या शतकातील 'जामी अल-तवारीज' या पुस्तकात खुतुलुन विषयी माहिती दिली आहे.

पण या पुस्तकात दिलेले काही तपशील अतिशय असामान्य आहेत. विशेषतः राजकुमारीची रूपरेषा वास्तविकतेच्या जवळ जाताना दिसत नाही.

त्यामुळे खुतुलुनवर लिहिलेल्या काही कथा काल्पनिक असू शकतात.

तिच्याबद्दल आणखीन कोणती माहिती उपलब्ध आहे?

ती कैडू राजाची एकुलती एक आणि गोड मुलगी होती. तिला एकूण 14 भाऊ होते, जे राजाला वेळोवेळी सल्ला देत असत. पण राजा सल्ल्यासाठी बहुतेक त्याच्या मुलीच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून होता.

तो आपल्या मुलीला सोबत घेऊन लढाईवर जायचा. खुतुलुन, युआन घराण्याचा सम्राट कुबलाई खान याच्याविरुद्धच्या युद्धात सहभगी झाली होती. कुबलाई खानने मंगोलांऐवजी चिनी लोकांची बाजू घेतल्यामुळे त्याच्याविरुद्ध युद्ध पुकारण्यात आलं होतं.

मार्को पोलो लिहितो, "खुतुलुन शत्रूवर विजेप्रमाणे तुटून पडायची. आपल्या शत्रूला पराभूत करून वडिलांसमोर उभं करायची."

तिचं वर्णन करताना मार्को पोलो लिहितो, "ती उंच, बांधेसूद तरुणी होती."

काही पुस्तकांमध्ये असं लिहिलंय की, शेवटी तिने पराभूत झालेल्या राजकुमारासोबतच लग्न केलं. तर काहींनी तिच्या वडिलांसोबत तिचे शारीरिक संबंध असल्याच्या अफवा निर्माण केल्या.

प्रतिकात्मक

फोटो स्रोत, Getty Images

तिने कोणासोबत लग्न केलं याची स्पष्ट अशी माहिती मिळत नाही.

रशीदने आपल्या पुस्तकात लिहिलंय की, खुतुलुन 1295 मध्ये पर्शियन सम्राट गझानच्या प्रेमात पडली होती, पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.

तर काही पुस्तकांमध्ये असा दावा करण्यात आलाय की, तिने तिच्या वडिलांना मारण्यासाठी कुबलाईने भाड्याने घेतलेल्या मारेकऱ्याशी लग्न केलं होतं. त्याचा धाडसी स्वभाव बघून ती त्याच्यावर भाळली होती.

पण, यापैकी कोणतीही माहिती खरी नाही.

बहुतेक इतिहासकार मानतात की, कैडू राजाला आपला उत्तराधिकारी म्हणून खुतुलुनची निवड करायची होती. मात्र, तिच्या भावांचा याला विरोध होता. तिला ही राज्य करण्यात रस नव्हता.

शेवटी, 1306 मध्ये तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू नेमका कसा झाला याचा कोणताही स्पष्ट पुरावा नाही.

तिच्या मृत्यूनंतर तिच्यावर अनेक कथा, पुस्तके आणि चित्रपट आले. शिवाय तिच्या कथेवर आधारित व्हिडीओ गेम्सही बनविण्यात आले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)