'इंडिया क्लब' : लंडनमधील भारतीय चवीसाठी प्रसिद्ध असलेलं हे 70 वर्ष जुनं रेस्टॉरंट होतंय बंद

फोटो स्रोत, INDIA CLUB
- Author, चेरीलन मोलन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तुम्हाला हे ठिकाण साधंसुधं वाटत असेल, पण तसं नाहीये. पण जे लोक 70 वर्षांहून अधिक काळ लंडनमध्ये राहतायत त्यांना मात्र हे ठिकाण अनुभवण्यासाठी मिळालं.
इथे त्यांना ओळखीचे चेहरे दिसायचे. इथली चव त्यांच्या जिभेवर रेंगाळायची. थोडक्यात ते आपल्या मायदेशातील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी इथे यायचे.
सेंट्रल लंडनच्या वर्दळीच्या ठिकाणी हॉटेल स्ट्रँड कॉन्टिनेन्टलमध्ये 'इंडिया क्लब' नावाचं रेस्टॉरंट, बार आणि लाउंज असलेलं हे ठिकाण.
लंडनमधील दक्षिण आशियाई समुदायासाठी अनेक दशकांपासून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेलं महत्त्वाचं स्थान मानता येईल.
1950 च्या दशकात जे लोक इंग्लंडमध्ये वास्तव्यास आले होते, अशा लोकांना समूहासारखं बांधून ठेवण्यासाठी, भेटण्या-बोलण्यासाठी या क्लबची स्थापना झाली होती.
पण आता इंडिया क्लब बंद होणार आहे कारण इमारतीच्या मालकाला इमारतीचा काही भाग पाडून तिथे नवं अत्याधुनिक असं हॉटेल बांधायचं आहे.
क्लबच्या अनेक सदस्यांना याचं दुःख झालंय. क्लब बंद झाला तर शहराच्या इतिहासातील एक पान निखळेल.
क्लब अनेक वर्षांपासून बंद करण्याचा विचार सुरू होता. मात्र लोक त्याविरोधात लढा देत राहिले. या क्लबचे मालक आहेत यादगार मार्कर.
त्यांनी आणि त्यांची मुलगी फिरोजाने हे क्लब बंद पडू नये यासाठी हजारो स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवली होती. त्यांनी ही अस्तित्वाची लढाई तर जिंकली.
पण मागच्या आठवड्यात त्यांनी पत्रकारांना सांगितलं की 17 सप्टेंबरला क्लबचा शेवटचा दिवस असेल. या अखेरच्या दिवशी क्लब खुला राहील.
ही बातमी अनेकांसाठी धक्कादायक होती. कारण या ठिकाणाला तसं ऐतिहासिक महत्त्व आहे. हॉटेल स्ट्रँड कॉन्टिनेन्टलच्या पहिल्या मजल्यावर असलेला हा इंडिया क्लब 1900 मध्ये सुरू करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देणाऱ्या इंडिया लीगच्या सदस्यांनी याची स्थापना केली होती.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे क्लबच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते असं म्हटलं जातं. पुढे 1990 च्या दशकात मार्कर यांनी ही जागा भाडेतत्वावर घेतली.
काही बातम्यांमध्ये असंही म्हटलंय की, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी या क्लबमध्ये व्हायच्या. पण नंतर ते दक्षिण आशियाई लोकांसाठी जेवण, सणसमारंभ, मित्रांच्या बैठकांसाठी एक महत्वाचं ठिकाण बनलं.
इतिहासकार असलेल्या कुलसूम वडगामा 1953 साली ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या.
त्या सांगतात, "1950 आणि 60 च्या दशकात लंडनमधील हे एकमेव ठिकाण होतं जिथे भारतीय लोक आपल्या मित्रमंडळींना भेटायला यायचे. आपल्या मातृभाषेत बोलून जेवणाचा आस्वाद घ्यायचे."

फोटो स्रोत, INDIA CLUB
त्या पुढे सांगतात "इंडिया क्लबने आम्हाला या अनोळखी देशात एकटं पाडलं नाही. वाढदिवस, लग्न किंवा दिवाळी सारखे भारतीय सणसमारंभ, अनेक हिंदू सण साजरे करण्यासाठी लोक इथे यायचे."
कुसुम वडगामा यांचा जन्म पूर्व आफ्रिकेत वसाहतवादी राजवटीत झाला. त्यानंतर त्या अभ्यासासाठी ब्रिटन मध्ये आल्या.
भारताच्या स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात अनेक भारतीय ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी आले होते. मात्र त्यावेळी परदेशी भारतीयांसाठी लंडनमध्ये सांस्कृतिक संस्था नसल्याचं त्या सांगतात.
पण इंडिया क्लबने ती कमतरता भरून काढली. इथे दक्षिण भारतीय पदार्थ, डोसा, सांबार, उत्तर भारतीय पदार्थांमध्ये बटर चिकन, पकोडे, कॉफी, मसाला चहा असे अस्सल भारतीय पदार्थ मिळतात.
एवढंच नाही तर क्लबचं इंटेरियर देखील स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय कॅफे सारखं आहे.
इथे येणारे लोक चहा घेत सिगारेटचे झुरके मारत संस्कृती आणि राजकारणावर बोलत असत. क्लबमधील झुंबर, टेबल आणि खुर्च्या 70 वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यात आजही फारसे मोठे बदल केलेले नाहीत.
या क्लबच्या भिंतीवर असलेले भारतीय आणि ब्रिटीश मान्यवरांचे फोटो तुम्हाला अनेक दशकांचा सामाजिक-राजकीय इतिहास सांगतील.

फोटो स्रोत, NUPUR BASU
जसं की, पाहिले ब्रिटिश भारतीय खासदार दादाबाई नौरोजी आणि तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांनी या क्लबला भेट दिली होती. त्यांचा फोटो या भिंतीवर पाहायला मिळेल.
हा क्लब केवळ भारतीयांसाठीच नाही तर पत्रकार आणि सर्व स्तरातील इंडीयन-ब्रिटिश गटांसाठी 'हॉट स्पॉट' बनला आहे.
पत्रकार आणि लेखिका श्राबनी बसू सांगतात की, 1980 च्या दशकात त्या आपल्या सहकारी पत्रकारांसोबत क्लबमध्ये जायच्या.
त्या पुढे सांगतात की, "त्या दिवसांत सेंट्रल लंडनमधील हे एकमेव ठिकाण होतं. जिथे भारतीय जेवण अगदी स्वस्तात मिळायचं. हे शहरातील एक अज्ञात रहस्य होतं. त्यामुळे माझे मित्र किंवा कुटुंबीय भारतातून आले की मी त्यांना या कल्ब मध्ये घेऊन जायचे."

फोटो स्रोत, SMITA THAROOR
प्रेरणादायी वक्त्या स्मिता थरूर सांगतात "माझे वडील चंदन थरूर हे क्लबच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. लग्नाआधी ते अनेकदा इथे यायचे. या क्लबमध्ये त्यांच्या खूप मजेदार आठवणी आहेत.
स्मिता त्यांच्या आठवणींबद्दल सांगतात की, काही वर्षांनंतर त्यांचे वडील लंडनमध्ये त्यांना भेटायला आले तेव्हा ते त्यांना या क्लबमध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी अनेकदा या क्लबला भेट दिली.
वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ क्लबमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.
थरूर सांगतात, "आम्ही क्लबमध्ये माझ्या पतीचा 50 वा वाढदिवस साजरा केला होता."
"इंडिया क्लबसाठी आमच्या हृदयात विशेष स्थान आहे. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की तो क्लब आता नसणार, केवळ त्याच्या आठवणी असतील."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








